Login

चहा आणि बरंच काही भाग ४०(अंतिम भाग)

Story of love and friendship

आपण मागील भागात बघितलं, शिवानीने मेघनाच्या बाबांना सत्य परिस्थिती समजावून सांगितल्यावर मेघनाचे बाबा मेघनाच्या व आदित्यच्या लग्नासाठी त्यांनी होकार दिला. मेघनाचे आई बाबा आदित्यच्या घरी गेले, तिथे जाऊन त्यांनी आदित्यच्या बाबांची माफी मागितली आणि लग्नाची पुढील बोलणी केली.

आता बघूया पुढे...

मेघना व आदित्य दोघेही कंपनीत आपापल्या कामात व्यस्त होते. मेघनाच्या व आदित्यच्या बाबांनी मेघना व आदित्यला सरप्राईज देण्यासाठी प्लॅन ठरवला.

प्लॅन प्रमाणे मेघनाच्या बाबांनी मेघनाला फोन केला.मेघनाने हातातील फाईल बाजूला ठेवली व तिने फोन उचलला,

मेघना--- हॅलो बाबा

बाबा--- बाळा कामात बिजी आहेस का?

मेघना--- हो बाबा बिजी आहे पण बोला ना काय म्हणता? काही काम होत का?

बाबा--- माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे, आपण इतक्या दिवसापासून तुझ्यासाठी मुलगा शोधत होतो तसा मुलगा अखेर सापडला. संध्याकाळी त्या मुलाला भेटशील का? तुझ्या कंपनी जवळ भेटली तरी चालेल.

मेघना--- बाबा लगेच संध्याकाळी, नंतर भेटलं तर नाही चालणार का?

बाबा--- अरे बाळा त्यांना जरा घाई आहे,खूप चांगलं स्थळ आहे, आपल्या हातच जायला नको.

मेघना--- ठीक आहे बाबा, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा.

मेघनाने बाबांना सांगितलं खरं पण तीच मन त्या मुलाला भेटायला तयार होत नव्हते. खूप विचार केल्यावर तिने आईला फोन लावला,

मेघना--- हॅलो आई, बाबांचा फोन आला होता, आज संध्याकाळी कुठल्या तरी मुलाला भेटायला लावत आहेत.

आई--- हो बाबांनी सांगितलं मला, मग काय झाले?

मेघना--- अग आई मी पहिल्यांदा त्या मुलाला भेटायला जाणार आहे, माझा अवतार कसा आहे? रोज घालते तसे कपडे घातलेले आहे, ते कसं वाटतं अस भेटायला.

आई--- (मनातल्या मनात बेटा सरळसरळ सांग ना तुला त्या मुलाला भेटायचं नाहीये, उगाच कारण काय देत बसली आहेस पण मीही तुझी आईच आहे) मेघना तुझा त्यांनी फोटो बघितला आहे, त्यांना तु पसंत आहेस, तुमची भेट म्हणजे फक्त एक फॉर्मलिटी आहे. आणि तशीही तु आज खूप छान दिसत आहेस. काही टेन्शन न घेता त्या मुलाला भेटायला जा.

मेघना--- ठीक आहे, कुठे भेटायचे आहे याचे डिटेल्स बाबांना मला पाठवायला सांग.

फोन ठेवल्यावर मेघना विचारात पडली," मी खरंच आदित्य सोडून दुसऱ्या कोणाशी लग्न करायला तयार आहे का? शिवानी म्हणते तसा मी पुन्हा आदित्यचा विचार करायला पाहिजे का? जाऊदे यार जास्त विचार करत बसायला नको. अति विचार केल्याने गोंधळ वाढतो. संध्याकाळी कोण मुलगा आहे त्याला भेटूया मग बघू पुढे काय होईल ते"

दुसरीकडे आदित्यच्या बाबांनी आदित्यला फोन लावला.

आदित्यचे बाबा--- हॅलो आदित्य बाळा कुठे आहेस?

आदित्य--- बाबा दररोज यावेळी मी कुठे असतो? काही काय विचारताय, बाबा मी खूप जास्त बिजी आहे, कामासाठी फोन केला असेल तर ते लवकर सांगा.

बाबा--- आदित्य एक मुलगी तुझ्यासाठी सांगून आली आहे. मला व तुझ्या आईला ती मुलगी पसंत आहे. संध्याकाळी तु तिला भेटायला जायचे आहे.

आदित्य--- बाबा आज संध्याकाळी मी खूप बिजी आहे, मला जमणार नाही. कंपनीत कामाचा लोड वाढला आहे. थोड्या दिवसांनी मी त्या मुलीला भेटेल. आज मला जमणार नाही.

बाबा--- आदित्य मी त्या मुलीच्या घरच्यांना शब्द दिला आहे. तुला माझ्या शब्दासाठी त्या मुलीला भेटावं लागेल.

आदित्य---( चिडून) बाबा तुम्ही शब्द देण्याआधी एकदा मला विचारायचे ना. बाबा माझा आज त्या मुलीला भेटायचा बिलकुल मूड नाहीये.

बाबा--- मला ते काही माहीत नाही. आज तु त्या मुलीला भेटणार आहेस म्हणजे आहेस. कुठे आणि कधी भेटायचे याच्या डिटेल्स मी तुला पाठवतो.

एवढे बोलून आदित्यचे बाबा फोन कट करतात. आदित्य विचारात पडतो की त्या मुलीत अस काय आहे की बाबा मला इतका आग्रह करत आहेत. जाऊदेत फक्त फॉर्मलिटी म्हणून भेटू मग बघू पुढे.

कंपनीतून निघण्याच्या आधी मेघना वॉशरुम मध्ये जाऊन फ्रेश होते, तेथून बाहेर पडताना आदित्य व तिची भेट होते, आदित्य तिच्याकडे बघितल्या न बघितल्या सारखा करतो व निघून जातो, मेघनाही त्याच्याकडे दुर्लक्ष करते.

बाबांनी सांगितल्या नुसार कंपनी पासून जवळच असलेल्या कॉफी शॉपमध्ये ती पोहोचते, कॉफी शॉपमध्ये गेल्यावर ती इकडे तिकडे बघते पण कोणीही एकटा मुलगा तिच्या नजरेस पडत नाही. तेवढ्यात तिथे एक वेटर येऊन तिला विचारतो," आपण मिस मेघना का?"

त्याच्या या प्रश्नावर मेघना मान डोलावते. वेटर तिला तिच्यासाठी बुक केलेल्या टेबल कडे घेऊन जातो. वेटर मेघनाला ऑर्डर बद्दल विचारतो तर मेघना त्याला सांगते की तिच्यासोबत अजून कोणी तरी येणार आहे, ते आले की मी ऑर्डर देते.

मेघना त्या मुलाची वाट बघत बसलेली असते. ती मनात पुटपुटते, "समोरच्याच्या वेळेची किंमत आहे की नाही? हा कोण कुठला मुलगा कधी येणार आहे देव जाणे"

आदित्य कॉफी शॉप बाहेर आपली गाडी पार्क करतो व बाबांना फोन लावतो, बाबांनी त्याला सांगितले की टेबल आधीच बुक केलेला आहे, रिसेप्शनला जाऊन चौकशी कर. आदित्य कॉफी शॉपमध्ये जातो व बुक केलेल्या टेबल बद्दल विचारतो. रिसेप्शनिस्ट मेघना बसलेल्या टेबल कडे बोट दाखवते. मेघना पाठमोरी बसली असल्याने आदित्यच्या लक्षात येत नाही की ती मेघना आहे. आदित्य मेघना बसली असलेल्या टेबल कडे जातो आणि तिच्या समोर जाऊन तिच्याकडे न बघता बोलतो," सॉरी मला यायला जरा उशीर झाला" 

मेघना मोबाईल मध्ये डोके घालून बसली असल्याने आदित्यच्या आवाजाने ती भानावर आली व तिने वर बघितले.

मेघना--- आदित्य तु!

आदित्य--- मेघना तु इथे कशी काय?

मेघना--- मला माझ्या बाबांनी इथे यायला लावले होते आणि सांगितले होते की मला बघायला कोणीतरी मुलगा येणार आहे.

आदित्य--- मलाही माझ्या बाबांनीच सांगितले होते की कोणती तरी मुलगी येईल तिला भेटून घे. मला तर काहीच कळत नाहीये.

मेघना--- काहीतरी गैरसमज झाला असेल.

मेघना बोलत असतानाच कोपऱ्यात बसलेली शिवानी समोर आली.

शिवानी--- काही गैरसमज झालेला नाही. तुमच्या दोघांच्या आई वडिलांनी तुमच्या साठी हे छान सरप्राईज प्लॅन केले आहे.

मेघना--- शिवानी तु इथे! आणि काय सरप्राईज?

शिवानी--- मेघना तु किती मंद आहेस, अग वेडाबाई तुझ्या बाबांनी तुझ्या व आदित्यच्या लग्नाला स्वखुशीने संमती दिली आहे.

आदित्य--- काय? पण हे सर्व कधी व कसे झाले?

शिवानी--- हे सर्व आजच झाले, तुम्ही दोघे काहीच करत नव्हते, तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग करायला निघाले होते मग मलाच धाडसी निर्णय घ्यावा लागला त्यासाठी मी तुमच्या दोघांकडून मोठी पार्टी घेणारच आहे.

मेघना--- शिवानी तु काय केलंस? जरा सविस्तरपणे सांग.

शिवानी--- मी तुझ्या घरी जाऊन तुझ्या बाबांना सांगितले की तुझे आदित्यवर प्रेम आहे पण तू त्यांच्यासाठी तुझ्या प्रेमाचा त्याग केला आहेस आणि त्यांच्या मनात लव्ह मॅरेज बद्दल असलेले गैरसमज दूर केले. तुझ्या बाबांना माझे म्हणणे पटले व त्यांनी आदित्य सरांच्या बाबांची माफी मागितली आणि लग्नाची बोलणी केली मग त्यांनी दोघांनी मिळून तुम्हाला सरप्राईज देण्याचे प्लॅन केले.

मेघना--- शिवानी बाबा चिडले असतील ना?

शिवानी--- अजिबात नाही, मी एकदम शांततेत त्यांच्याशी बोलले, त्यांना माझं म्हणणं पटलं.

आदित्य--- थँक्स शिवानी. माझे मेघनासोबत लग्न होईल ही आशाच मी सोडून दिली होती.

मेघना--- सॉरी आदित्य, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला.

आदित्य--- तु कशाला सॉरी म्हणतेस, आज जे शिवानीने केले ते मी याआधीच करायला हवे होते. मला तुझा राग आला होता आणि म्हणूनच तु जा म्हटल्यावर लगेच तुझ्या आयुष्यातून निघून गेलो.

शिवानी--- सॉरी मी तुमच्या बोलण्यात जरा व्यत्यय आणते. कोणाचं काय चुकलं, कोण कस वागलं? हे तुम्ही दोघे नंतर डिस्कस करा. तुमच्या दोघांचे आई बाबा तुमची वाट पाहत आहेत. आधी आपण त्यांना जाऊन भेटुयात. माझी सुट्टी संपायच्या आत तुमचे लग्न झाले पाहिजे.

आदित्य, शिवानी, मेघना आदित्यच्या घरी जातात, तिथे दोघांचेही आईवडील हजर असतात. गेल्यागेल्या मेघना व आदित्यने त्यांचा नमस्कार करून आशिर्वाद घेतला. मेघनाच्या बाबांनी तिची माफी मागितली व तिला म्हणाले की," बाळा माझ्या मनात लव्ह मॅरेज बद्दल असणाऱ्या गैरसमजांमुळे तुम्हाला खुप त्रास झाला, नको त्या मनस्तापाला सामोरे जावे लागले" यावर मेघना बाबांना म्हणाली की, " बाबा याच गैरसमजांमुळे मनोज दादा आपल्यापासून दूर गेला आहे, त्याच्या शिवाय आपले कुटूंब अपूर्ण आहे, त्याला माफ करा."

मेघनाच्या बाबांना तिचे म्हणणे पटले, त्यांनी मनोजला फोन करून स्वतः मेघनाच्या लग्नाचे आमंत्रण दिले आणि येताना सोबत जुलियाला व त्यांच्या बाळालाही घेऊन यायला सांगितले. काही दिवसांनी मेघना व आदित्यचे लग्न सर्वांच्या उपस्थितीत, घरच्यांच्या संमतीने थाटामाटात पार पडले.

©®Dr Supriya Dighe