Login

टेडी हो पर मेरी हो..

टेडी हो पर मेरी हो..
टेडी हो पर मेरी हो..
©अनुप्रिया

“तुझं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही बघ.. खूप बदलला आहेस तू..”

श्वेता नाक फुगवून म्हणाली.

“हा साक्षात्कार कधी झाला म्हणायचा? आणि काय बदललो मी? नाही.. अगं, तुझं बरोबरच आहे म्हणा, खूप बदललोय मी.. आधी तुझी मर्जी सांभाळायचो आणि आता तुझ्या शॉपिंगच्या बॅगा सांभाळतोय..”

त्याच्या चेष्टेने ती अजूनच दुखरी झाली.

“काही नाही रे.. तुम्हा पुरुषांचं मला चांगलंच ठाऊक आहे. मुलगी पटत नाही तोपर्यंत मागेपुढे करत राहायचं. एकदा पटली, लग्न झालं की, मग काय! घर की मुर्गी दाल बराबर..”

“कोण दाल? कोण मुर्गी? काय बडबडतेस? कुठल्या दगडावर आपटलीस का गं तू?”

“नाही रे, मी नाही आपटले.. हा अख्खा दगड मी माझ्या हाताने माझ्या पायावर आपटून घेतलाय..”

“अगं पण तुला झालंय काय इतकं चिडायला? का इतका आकांडतांडव करतेयस?”

“अच्छा, आता माझं साधं बोलणंही आकांडतांडव वाटतंय का? बघ.. मी म्हटलं होतं ना, खूप बदलला आहेस तू.. पूर्वीसारखा राहिला नाहीस तू.. पूर्वी कसा सारखं गोंडा घालत माझ्या मागेपुढे करायचास. काय हवं नको ते पाहायचास.. रोज मला गुलाबाची फुलं द्यायचास. इतकी की गुलकंद बनवण्याची वेळ आली होती. रोज चॉकलेट्स द्यायचास, इतकी की चॉकलेट्स खाऊन डायबेटीस होईल की काय असं वाटायचं, रोज नवनवीन सरप्राईज गिफ्ट्स द्यायचास; पण आता बोलायलाही वेळ नाही तुझ्याकडे.. आठवून बघ लग्नानंतर कितीदा आपण बाहेर फिरायला गेलोत? कितीदा तू माझ्यासाठी भेटवस्तू आणलीस?”

श्वेता तोंड फुगून बसली. प्रशांत तिच्या जवळ आला आणि म्हणाला,

“अगं असं काय ते? तुझ्यासाठीच तर सगळं करतोय ना? तू आनंदी राहावीस म्हणूनच तर चाललंय.. नाहीतर मला माझं डोकं दुखवून घ्यायची काय गरज आहे? ‘दे रे हरी पलंगावारी’ असं म्हटल्यावर हरी आयतं देणार आहे का? त्या हरीला तरी रखुमाई पासून वेळ आहे का?”

“काहीही दाखले देऊ नकोस हं.. तुझं माझ्यावरचं प्रेमच कमी झालंय हेच खरंय..”

“ते का बरं?”

“नाहीतर काय! मी आता पहिल्यासारखी छान दिसत नाही ना.. चवळीची शेंग होते आता भोपळा झालेय.. चंद्र कलेकलेने वाढतो आणि मी किलो किलोने.. आवडणार कशी? सुंदर सुंदर ललना तुझ्या मागे पुढे असल्यावर बायको सुंदर कशी वाटणार?”

आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून प्रशांतला खूप गलबलून आलं. तो आतल्या खोलीत गेला आणि कपाटातून तिच्यासाठी आणलेलं सरप्राईज गिफ्ट घेऊन बाहेर आला. तिच्या समोर बसत म्हणाला,

“सॉरी राणी, तुला पुरेसा वेळ देता येत नाही. खरंच मला क्षमा कर.. हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय?”

श्वेताने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याच्या हातात सुंदर गुलाबी रंगाचा टेडी होता. तिने पटकन त्याच्या हातून घेतला. टेडीला घट्ट उराशी कवटाळत, त्याची ऊब अनुभवत श्वेता आनंदाने म्हणाली,

“अय्या, माझ्यासाठी?”

“हो मग? दुसरं कोणासाठी आणू?”

प्रशांत तिच्याजवळ येऊन बसला. अलगद तिला कुशीत घेत म्हणाला,

“माझी बायको खूप सुंदर आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तुला माहितीये? मी नेहमी माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींना चिडवत त्यांच्यासमोर एक उखाणा घेतो..”

तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.

“बशीत बशी चांदीची बशी
माझी बायको सोडून साऱ्याच म्हशी..”

त्याचा उखाणा ऐकताच ती खळखळून हसली. तिच्या माथ्यावर ओठ टेकवत तो पुन्हा म्हणाला,

“राणी, तू कितीही जाड झालीस तरी तू मला कायम आवडतेस. अगं राणी तूच तर माझी टेडी आहेस. मऊ, उबदार मिठी तुझी सारं टेन्शन विसरायला भाग पाडते. लव्ह यू डार्लिंग.. तुम टेडी हो पर मेरी हो| समजलं?”

श्वेताने खळखळून हसत मान डोलावली. तिच्या हातातला टेडी आणि त्याच्या मिठीतली ती हळूहळू त्याच्या प्रेमात विरघळत चालली होती.