Login

ती चांदरात

ती रात्र... नक्की काय घडले त्या रात्री.. ज्यामुळे वाडा शापित दुष्ट शक्तिनी वेढला गेला. त्यासाठी वाचत राहा ती चांदरात


ती रात्र पौर्णिमेची होती. आकाशात पूर्ण चंद्र अगदीच तेजोमय झाला होता. त्याचा मंद प्रकाश सर्वदूर पसरला होता. त्याचे प्रतिबिंब वाड्याबाहेरील छोट्याशा तलावात अगदीच लखलखत होते. त्यामुळे तलावातील कमळ अधिकच खुलून दिसत होते. त्यांची शोभा आणखीनच वाढत होती. ती रात्र जणू चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघत होती. अक्कासाहेब वाड्यातील वरच्या मजल्यावरील बलकानीतून हे सर्व दृश्य न्याहाळत होत्या. मात्र त्यांच्या मनात वेगळीच भीती घर करून बसली होती. कारण हे दृश्य पौर्णिमेचे तर अमावस्येचे दृश्य तर अवर्णांनात्मक होते. विचार करूनच त्यांच्या अंगावर शहारे येत होते. अमावस्येच्या विचारांनी त्यांना रात्रीची झोप येत नसे. जसजशी ती काळरात्र जवळ येत असे तसतसे त्यांचे मन त्या विचारांनी भयभीत होत असे. अखेरीस ती रात्र येताच वाड्याचे सर्व दरवाजे बंद केले जात असे, बाहेरच्यांसाठीही आणि घरच्यांसाठीही. अखेरीस ती काळरात्र आली. आणि नेहमीप्रमाणे पूजेचे तयारी सुरू झाली. दर अमावस्येला विधिवत होम केला जात होता. पण आजची रात्र काही वेगळीच होती.



बाहेर सर्वत्र अंधार पसरलेला होता. घोर अंधार. सुसाट वारा. त्यात झाडाच्या पानांचा सुळसुळाट, कानाला सुन्न करणारा त्यांचा आवाज. तसेच मैल दोन मैल अंतरावर जंगलात रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज. त्यासोबतच रातकिड्यांचा किर्र आवाज. अगदीच भयाण असे वातावरण त्या रात्री झाले होते. काही केल्या ती रात्र संपतच नव्हती. नको नको ते विचार अक्का साहेबांच्या मनात येत होते. पण या परिस्थिती पुढे , आणि भुतकाळापुढे त्या हतबल होत्या. कारण ती रात्र अमावस्येची होती. दर अमावस्येला या गोष्टी घडत होत्या. पण आजची रात्र ही काही वेगळीच होती. जणू काही "ती" वाटच पाहत होती. या रात्रीची.........




गुरुजींचा मंत्त्रोपचार सुरू होता. त्या मायावी दुष्ट शक्तीला रोखण्यासाठी हे सर्व विधी सुरू होते. पण आज कोणत्याही मंत्रांचा परिणाम होत नव्हता. अमावस्येची रात्र असल्यामुळे दुष्ट शक्ती अधिक प्रबळ झाली होती. त्यामुळे वाड्याचे आणि तेथे राहणाऱ्या माणसांचे अस्तीत्व धोक्यात होते. पण यातूनही गुरुजी मार्ग काढतील यावर अक्कासाहेबांचा विश्वास होता. कारण आत्ता पर्यंत त्यांच्या मुळेच वाड्याचे अस्तीत्व टिकून होते. आणि त्या वाईट शक्तींपासून वाडा शाबूत होता. वाड्यातील बंद एका खोलीच्या बाहेरील बाजूस या सर्व विधी चालू होत्या. त्या दरवाज्या आड अत्यंत गूढ असे रहस्य दडलेले होते. त्यामुळे कधीही हा दरवाजा उघडला जाऊ नये. या साठी त्यावर मंत्रोपचारिक दैविय धागा गुरुजी बांधत होते. शिवाय त्याला कोणत्याही प्रकारचे कुलूप सुध्दा लावता येत नसे. फक्त पुरातन काळातील कडी कोंडा आणि त्यावर गुरुजींनी बांधलेला धागा. येवढ्यांनीच तो दरवाजा बंद राहू शकत होता. त्यामुळे दर अमावस्येला त्यावरील धागा बदलून विधिवत पूजा करून पुन्हा दुसरा धागा बांधला जात असे. अक्कासाहेब आणि त्यांच्या सोबत असलेले.. नानाजी ( अक्कसाहेबांचे धाकटे भाऊ ) आणि गुरुजी. वाड्यातील या तीनच व्यक्ती या विधीमध्ये शामील होत असे.




घरातील बाकी सर्व व्यक्तींना वाड्यातीलच एका हॉल मधे बंदिस्त व्हावे लागत असे. कारण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. ती दुष्ट शक्ती कोणाचाही घात करू शकते. आणि तिचा प्रभाव घरच्यांच्या जीवावर बेतू शकतो यासाठी गुरुजींनी सर्वांना एक मंत्रोपचारिक कडा दिलेले होता. तो प्रत्येकाच्या हातात होता. अर्थात त्या वाड्यात जन्माला येणाऱ्या बाळापासून ते, तो व्यक्ती मरेपर्यंत तो कडा त्याच्या हातात असणे गरजेचे होते.
आणि या सर्व गोष्टी वड्यापूर्तीच मर्यादित होत्या.



गावातील लोकांना याबाबत अगदीच तुटक माहिती होती. पण वाड्यावर कोणत्यातरी दुष्ट शक्तीची सावली आहे, हे ते चांगलेच जाणून होते. अर्थात वाड्याचा भूतकाळ च तसा होता.



नक्की काय घडले आहे त्या वाड्यात..??
काय आहे त्याचा भूतकाळ..??
काय असेल त्या वाड्याचे गूढ..??


हे सर्व जाणून घेण्यासाठी असेच माझ्या सोबत रहा आणि हा भाग कसा वाटला ते नक्की आपल्या प्रतिक्रियांमधून कळवा.