तेलाची पोळी (भाग १)
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
“मी आधीच सांगून ठेवते मला तेलाच्या पोळ्या येत नाहीत. फुलके येतात आणि मी तेच करेल. तुम्हाला तेलाच्या पोळ्या खायच्या असतील तर मी पोळी करणार नाही. आणि हो मी सगळे फुलके सोबतच करून ठेवेल. प्रत्येकाच्या ताटात गरम पोळी वाढणं मला काही जमायचं नाही. आणि हो, हा असा तवा माझ्या काही कामाचा नाहीये, हँडलवाला पाहिजे. बिना हँडलवाल्या तव्यावर पोळ्या करणं अवघड जातं.” अमृता म्हणाली आणि घरातले सगळे डोळे विस्फारून तिच्याकडे बघू लागले.
अमृता आणि अनिकेतचे नुकतेच लग्न झाले होते. देवकार्य, हिंडणे-फिरणे, नव्याची नवलाई संपून आता त्यांच्या संसारला सुरुवात झाली होती. लग्नानंतर आज पहिल्यांदाच अमृता स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला उभी होती. तिच्या अशा अचानक बोलण्याने घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. अनिकेत तिला काही बोलायला जाणार, तोच आशाताईंनी त्याला थांबवले.
“तुला जशा येतात, तशा पोळ्या कर. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये.” आशाताई म्हणाल्या आणि तिथून हॉलमध्ये येऊन बसल्या.
‘नवीन सुनेला सासूनं समजून घेतलं तर सासू सुनेचं नातं सुदृढ होतं असं ईरावरच्या बऱ्याच कथांमध्ये वाचलंय मी. खरंच प्रयोग करून बघायला हवा.’ आशाताई मनाशीच म्हणाल्या.
इकडे अमृताचा स्वयंपाक आटोपला आणि आशाताईंनी तिला पानं वाढायला मदत केली. डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले होते.
“तेलाची पोळी नाही करायची तर करू नका; पण निदान त्या उंड्यामध्ये मीठ तरी घाला. या अशा मिळमिळीत पोळ्या नाहीत उतरत घशाखालून.” शरदराव पहिला घास खाताच म्हणाले.
“टाकेल हो उद्यापासून. आज पहिल्यांदा स्वयंपाक केलाय ना तिने. विसरली असेल ती. बाकी भाजी उत्तम जमलीये बरं.” आशाताई अमृताकडे बघत म्हणाल्या. अमृताने त्यावर मान डोलावली.
“अमृता, उद्यापासून ऑफिस सुरू होतंय माझं. सकाळी मी साडे आठला निघत असतो घरातून. त्याआधी डब्बा तयार ठेवत जाशील.” जेवताना अनिकेत म्हणाला.
“हो, देईलच मी तसा डब्बा वगैरे; पण तुही कधी कधी डब्बा नाही देणं झालं तर काहीही किरकिर न करता कॅन्टीनमध्ये जेवून घेत जा.” अमृता पुन्हा फटकन म्हणाली.
“अगं, सवय आहे त्याला. आधी मीही डब्बा द्यायचे ना. कधी आजारी असले, गावाला वगैरे गेले तर तो कॅन्टीनमध्येच जेवायचा तो.” आशाताईंनी समजावण्याच्या स्वरात म्हटले.
“ठीक आहे.”अमृता खांदे उडवत म्हणाली.
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
टीम- सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा