Login

तेलाची पोळी (भाग २)

नातं असावं तेलाच्या पोळीसारखं

तेलाची पोळी (भाग २)
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

अमृता मनाला येईल तसे वागत बोलत होती. पण उगी भांड्याला भांडे लागू नये म्हणून आशाताई तिला काही बोलत नव्हत्या.


“तुला सांगू, मी ह्यांचे नखरेच बंद केले सगळे. लग्नाआधी अनिकेत नेहमी सांगायचा, त्याची आई त्याच्या ताटात रोज गरम पोळी वाढते. मी आता असले हे लाड ठेवलेच नाहीत. सगळ्या पोळ्या सोबतच करून ठेवत असते. बरोबर जेवतात की नाही सगळे. तुला सांगू, मला तर बाई तशा तेलाच्या जाड जाड पोळ्याच आवडत नाहीत. मी आमच्या घरातल्या तशा पोळ्याच बंद करून टाकल्या. अगं असंच धारेवर धरून ठेवावं लागतं सगळ्यांना म्हणजे सगळं कसं आपल्या मनासारखं होतं.

तुला मी फक्त तेलाच्या पोळीची गोष्ट सांगितली. घरात अजून अशा कितीतरी गोष्टी केल्यात मी. आता सगळे माझे नियम आणि माझ्या अटी लागू होणार, बरं का? असं समज ना माझंच राज्य असेल. सगळ्यांना दाखवून देईल मी, मलाही सगळं सांभाळता येतं.” अमृता तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होती. आशाताईंनी तिचे फोनवरचे बोलणे ऐकले आणि मनाशीच काहीतरी ठरवले. मधले काही दिवस असेच गेले.


“अनिकेत, गणेश चतुर्थी जवळ येतेय. तयारी सुरू करावी लागेल बरं.” एका रात्री जेवताना आशाताई अनिकेतला म्हणाल्या.


“अरे हो की, माझ्या तर डोक्यातूनच गेलं होतं हे.” शरदराव म्हणाले.


“बरं का अमू, आपल्याकडे दीड दिवसाचाच गणपती असतो पण असली मजा येते ना. तू बघशील ह्या वेळी.” अनिकेत अमृताला म्हणाला.


“मजा नंतर, गणपतीची आरास वगैरे सगळं आधीच ठरवून टाक. दरवर्षी सारखं वेळेवर धावपळ नको करू. काय काय आरास करायची त्यानुसार सामानाची यादी करा आणि घेऊन या.” आशाताई


“करतो गं आई, तू त्याचं नको टेन्शन घेऊ.” अनिकेत


“अरे टेन्शन का नको घेऊ? बरं का अमृता, तुला सांगायचं राहिलं. गणपती विसर्जनाच्या दिवशी सकाळी आपल्याकडे पूजा असते. गुरुजी येतात पूजा सांगायला. त्यादिवशीचा सगळा स्वयंपाक घरातल्या सुनेनं करायचा असतो. चटण्या, कोशिंबीरी, भजे, वडे अगदी भरगच्च स्वयंपाक असतो बरं आपल्याकडे. ” आशाताई


“हो का?” अमृता


“हो. सगळे मिळून तीस-पस्तीस जणं होतात. तुझे आई वडील, तुझी इथली आत्या त्यांनाही बोलवावं लागेल. मी तर म्हणते सरळ सरळ चाळीस माणसांचा स्वयंपाक गृहीत धर.” आशाताई


“चाळीस! एवढे लोकं! आई, मी काय म्हणते आपण स्वयंपाकाला बाई सांगूया.” अमृता


“चालणार नाही. पिढ्यानपिढ्या हीच परंपरा सुरू आहे. ही मोडली जाणार नाही.” शरदराव करड्या आवाजात म्हणाले. अमृताने त्यावर नुसती मान डोलावली.


“अनिकेत, मघा आई म्हणाल्या की सगळा स्वयंपाक सुनेनं करायचा असतो.” रात्री झोपताना अमृता अनिकेतला म्हणाली.


“हो. अगं लहानपणापासून बघतोय, आईच सगळा स्वयंपाक करते. माझी आई ह्या घरची मोठी सून आहे ना, सगळं जबाबदारीनं पार पाडलं तिनं. आजी गेली तरी तिने ही प्रथा काही बंद केली नाही. आणि तू बघ, देवच तुला शक्ती देईल सगळं करायची. तुला सांगू एवढी मजा येते गं. काका-काकू, मामा-मामी, गावातली ओळखीची जवळची माणसं सगळा गोतावळा जमतो. आम्ही मुलं तर इतकी मज्जा करतो ना! तू बघशील ना आता ह्यावेळी. धम्माल नुसती! गणपतीचे दोन दिवस कसे जातात काही कळत नाही. अमू, आम्ही तर रात्री झोपतही नाहीत. मस्त गप्पाटप्पा सुरू असतात. मध्ये मध्ये गेमही खेळतो. रात्री भूक लागली की आम्हाला खायला म्हणून आई आधीच शेव चिवडा वगैरे बनवून ठेवते. दिवाळीतही येत नसेल इतकी मजा येते.” अनिकेत उत्साहात सांगत होता. अमृताला मात्र चाळीस लोकांच्या स्वयंपाकाचे टेंशन आले होते.

क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
टीम-सुप्रिया


0

🎭 Series Post

View all