Login

तेलाची पोळी (भाग ३)

नातं असावं तेलाच्या पोळीसारखं
तेलाची पोळी (भाग ३)
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

“आई, अगं महालक्ष्म्यांसाठी करतात बायका घरात स्वयंपाक; पण गणपतीसाठी असं कधी ऐकलं होतंस का?” अमृता तिच्या आईसोबत फोनवर बोलत होती.

“अगं कोसा-कोसावर रीतीभाती बदलतात. प्रत्येक घरात वेगवेगळ्या परंपरा असतात. तुझ्या सासरी आधीच्या पिढ्यांमध्ये एखादा काही नवस वगैरे बोलल्या गेला असेल किंवा काही घटना झाल्या असतील म्हणून असा नियम असेल. तू टेंशन घेऊ नकोस. एका वेळचा तर स्वयंपाक करायचा आहे.” अमृताची आई तिला समजावून सांगत होती.

“अगं पण चाळीस लोकांचा स्वयंपाक आहे ना.” अमृता

“होईल गं सगळं नीट. तुझ्या सासूबाईंनी आमंत्रण दिलंय बरं. भेटू विसर्जनाच्या दिवशी.” अमृताच्या आईने बोलून फोन ठेवून दिला.


‘भाज्या, कोशिंबिरी, चटण्या होतील कशाही. त्यात काही हात घालून बसावं लागत नाही. पण पोळ्या! त्याचं कसं करू. माझ्या हातचे चार पाच फुलके ह्या हिशोबाने घरातल्या लोकांसाठी मला पंधरा-वीस फुलके बनवावे लागतात. मग त्या हिशोबाने चाळीस लोकांचे किती होतील? आणि त्यादिवशी सकाळी पूजा आहे घरात तर नाश्ता होणार नाही म्हणजे सगळ्यांना सपाटून भूक लागेल. बाई गं, विचार करूनच माझे तर हातपाय दुखत आहेत.’ अमृता नुसता विचार करूनच चरफडली.


“काय गं अमृता, काय विचार करतेय?” तिकडून आशाताई आल्या.


“काही नाही आई. भाजी वगैरे मलाच आणावी लागेल का?” अमृता


“नाही गं. चल, आपण काय स्वयंपाक करायचा ते ठरवू आणि त्यानुसार वाण- सामान, भाजीपाल्याची यादी तयार करू. अनिकेतचे बाबा सगळं आणून देतील.” आशाताई म्हणाल्या आणि अमृता त्यांच्यासोबत यादी करायला बसली.

घरात गणपती येणार म्हणून सगळेजण आनंदात तयारी करत होते. अमृता मात्र स्वयंपाकाचाच विचार करत होती.


गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला आणि घरात विधिवत गणेश स्थापना करण्यात आली. अनिकेतचे काका-काकू, मामा-मामी घरी आले होते. गणेश स्थापना करून ते आपापल्या घरी परत गेले. त्यांची मुलं म्हणजेच अनिकेतचे चुलत भावंडं आणि मामे भावंडं रात्री तिथेच थांबले होते. सर्वजण मस्तपैकी गप्पा करत होते. अमृता थोडावेळ तिथे बसली आणि उठून जाऊ लागली.

“अमू, बस ना, कुठं जातेय?” अनिकेत

“झोपते रे. उद्या सकाळी लवकर उठावं लागेल ना. नैवेद्याची तयारी करावी लागेल. बाकी स्वयंपाकपण आहेच की. तुम्ही बोलत बसा.”अमृता म्हणाली आणि तिच्या खोलीत निघून गेली.


दुसऱ्यादिवशी सगळं नीट होईल की नाही ह्या विचारामुळे तिला झोपही लागत नव्हती. रात्री कधीतरी तिचा डोळा लागला.

क्रमशः

©® डॉ. किमया संतोष मुळावकर
टीम- सुप्रिया

0

🎭 Series Post

View all