Login

तेलाची पोळी (भाग ४ अंतिम)

नातं असावं तेलाच्या पोळीसारखं
तेलाची पोळी (भाग ४ अंतिम)

दुसऱ्यादिवशी अमृता सकाळीच उठली. स्नानादी आटोपून स्वयंपाक करायला लागली. आशाताईंना विचारून तिने चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वगैरे केल्या. तोपर्यंत गुरुजी आले. अनिकेत आणि अमृता पूजेला बसले. यथासांग पूजा पार पडली.

अमृता घाईघाईने स्वयंपाक घरात गेली. तिच्या पोळ्या करायच्या बाकी राहिल्या होत्या. तिने एका परातीमध्ये कणिक भिजवली आणि पोळ्या करायला सुरुवात केली. आशाताईंनी तोपर्यंत नैवेद्याचे ताट वाढले. देवासमोर नैवेद्य ठेवला.


“आता गुरुजी, त्यांच्या सोबत अनिकेतचे बाबा, काका, मामा तुझे बाबा जेवायला बसतील. फटाफट हात चालव. जेवताना पोळीला खंड नाही पडला पाहिजे.” आशाताई म्हणाल्या. त्यांनी पोळ्यांचा दुरडीत पाहिले, आतापर्यंत फक्त चार पोळ्या झालेल्या होत्या.


“आई, पाच दहा मिनिटांनी वाढता का ताटं? थोड्या पोळ्या होतील.” अमृता म्हणाली.

“एवढे छोटे छोटे फुलके कितीवेळ करत बसशील. एक काम कर. तू बाजूला हो. दुसरी परात घे आणि त्यात अजून कणिक भिजव. सकाळपासून कुणी नाश्ता केलेला नाहीये, सगळ्यांना सपाटून भुका लागल्या असतील. काकू, मामी तोपर्यंत वाढणे करतील. आणि हो या शेगडीवरपण दुसरा तवा ठेव.” आशाताई तिला म्हणाल्या.


“पण आई, तुम्ही तर म्हणालात ना की…” अमृता बोलता बोलता थांबली.


“अगं, कर पटापट.” आशाताई म्हणाल्या. अमृताने दुसऱ्याही शेगडीवर तवा ठेवला. एका परातीत कणिक भिजवायला घेतली.


“अजून घे गं कणिक. विसर्जनात सगळे नाचतील आणि पुन्हा सगळ्यांना भुका लागतील. थोड्या जास्तीच्या पोळ्या करून ठेवू.” आशाताई म्हणाल्या. अमृताने त्यांना विचारून अजून जास्तीची कणिक घेतली. अमृता ओट्यावर परात ठेवून कणिक भिजवत आशाताईंकडे बघत होती.


आशाताईंनी मस्तपैकी तेल लावून पोळपाटाएवढी, गोलाकार आणि सगळीकडून एकसारखी पोळी लाटली. ती तव्यावर टाकून एकीकडून शेकून होत नाही तोवर दुसरी पोळी लाटली आणि दुसऱ्या तव्यावर टाकली. एकीकडे पोळी लाटत त्या दोन्ही पोळ्या अगदी लिलया शेकत होत्या. पोळीचा खमंग सुवास दरवळत होता.

मामी आणि काकूंनी भराभर वाढणे केले. आधी घरातल्या पुरुषांची, सोबतच मुलांची पंगत झाली. नंतर घरातल्या बायका जेवायला बसल्या. घरातली पुरुष मंडळी त्यांना वाढत होती.

अमृताने पोळीचा एक घास तोडला. मस्त तीन पदरांची मऊसूत पोळी तोंडात टाकताच तिला तिच्या फुलक्यांवर असलेला अभिमान क्षणात गळून पडला आणि तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं.


“काय गं अमृता, डोळ्यांत पाणी का आलं?” आशाताई तिला म्हणाल्या.


“सॉरी आई. मी प्रत्येक गोष्टीत तुम्हाला न जाणून घेता जज करत गेले. माझ्या मनात न जाणो कुठून शिरलं होतं की घरात सगळं मी म्हणेल तसंच मी करेल. मला ना असं वाटत होतं की मी सगळ्या गोष्टी सहज करू शकते. पण आज माझा अतिआत्मविश्वास गळून पडला.” अमृता


“असं काही वाटून घेऊ नकोस अमृता. अगं पोळी तेलाची असो की बिना तेलाची, आपल्या माणसाच्या ताटात ती प्रेमाने पडायला हवी. आपण आहोतच एकमेकांना साथ द्यायला. आपल्या या घरात माझं तुझं करत बसण्यापेक्षा सगळं आपलं समजलं तरच घरात एकोपा राहील. ह्या तेलाच्या पोळीसारखं. म्हटलं तर हिचे तीन पदर वेगळे पण म्हटलं तर ही एकच पोळी. आपलं पोट भरणारी. घराचं घरपण जपणारी.” आशाताई म्हणाल्या आणि अमृता उठून त्यांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली,


“हो आई, खरंच आहे… आपणही असेच राहुयात, ह्या तेलाच्या पोळीसारखेच.”

समाप्त.

©® डॉ. किमया संतोष मुळावकर
टीम- सुप्रिया

0

🎭 Series Post

View all