ओळख तेनाली रामाची (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story
ओळख आपल्या तेनाली रामाची

ही गोष्ट आहे ६० व्या शतकातली. त्या काळात मुघल साम्राज्य संपूर्ण भारतभर आपलं साम्राज्य विस्तारत होतं पण तरीही दक्षिण भारतातील एक राज्य अगदी सुखात आणि समाधानाने राहत होतं. हो! तेच! राजा कृष्णदेवराय यांचं विजयनगर. नावाप्रमाणेच विजयनगर सगळ्या आघाड्यांवर विजय मिळवत अगदी सुखाने, दिमाखात उभं होतं.

राजा कृष्णदेवराय! राजा कृष्णदेवराय हे न्यायप्रिय, कलाप्रेमी, देवीचे भक्त आणि दयाळू होते. त्यांच्या दरबारातील मंत्री तिम्मानासू यांचा राजा कृष्णदेवराय सन्मान करायचे आणि आपल्या वडिलांच्या जागी त्यांना स्थान होतं. याउलट राजपुरोहित तथाचार्य हे धूर्त, कपटी आणि संधीसाधू होते. त्यांचं कामच फक्त कपट करून स्वतःचा स्वार्थ साधणे हेच होतं. एवढे असूनही राजाच्या विश्वासपात्र आणि संपूर्ण विजयनगर मध्ये प्रचंड मान असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे तथाचार्य!

पण एक व्यक्ती होती जी दरबारातील अश्या भ्रष्ट लोकांपासून तसेच बाहेरील शत्रूंपासून विजयनगरला सुरक्षित ठेवणार होती. लवकरच ती व्यक्ती विजयनगरमध्ये येणार होती पण या सगळ्यापासून अनभिज्ञ ती व्यक्ती स्वतःच्याच विश्वात दूरवरच्या तेनाली गावात राहत होती. ती व्यक्ती म्हणजे रामा! आळशी आणि एखाद दिवस आपण राजाच्या दरबारातील विशेष स्थानी असू असे दिवा स्वप्न रामा रोज बघत असे.

आज त्याच्या घरात लग्नाची घाई गडबड सुरू होती. हे लग्न दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर रामाचं होतं! रामाची आई लक्ष्मीअम्मा जिने आजीवन मौनव्रत धारण केलेलं असल्याने कायम खाणाखुणा करत ती तिचं बोलणं इतरांपर्यंत पोहोचवायची. संपूर्ण गाव तिला अम्मा म्हणूनच हाक मारी. रामाचा सगळ्यात जवळचा खास छोटा मित्र गुंडप्पा ज्याला घंटी विशेष प्रिय होती आणि तो बोबडे बोलायचा. रामाची होणारी पत्नी म्हणजेच त्याची लहानपणीची खास मैत्रीण शारदा! दिसायला अगदी नाजूक आणि गोड जी आज त्याची अर्धांगिनी होणार होती.

तर रामाच्या लग्नाची सर्व तयारी झाली असली तरीही नवरदेवाचाच कुठे पत्ता नव्हता. सर्व रामाला शोधत होते पण तोच त्याच्या लग्नातून पळून गेला होता.
**************************************
इथे राजाच्या दरबारात मोठ्याने घोषणा होत होती. “सर्वज्ञानी, महाज्ञाता, पंडितांचे पंडित, सर्व वेदांचे शिरोमणी, विजयनगरची शान श्री श्री श्री पंडित रामा दरबारात हाजिर होत आहेत.”
घोषणा झाल्याबरोबर एकदम रुबाबात पंडित रामा दरबारात प्रवेशला आणि सगळ्यांचा एकच जयजयकार सुरु झाला. “पंडित रामा की जय! पंडित रामा की जय” आणि त्या जयघोषातच रामा अगदी रुबाबात आपल्या आसनावर विराजमान झाला.

लोक रामाची स्तुती करताना थकत नव्हते पण इतक्यात दरबारात त्याला एक आंब्याच्या झाडाची फांदी दिसली आणि त्यातून सावरत नाही तोवर बकरीच्या “बेs बेs”चा आवाज त्याच्या कानी पडला. तो आजूबाजूला शोधू लागला. त्याला समोरून एक बकरी दरबारात चालत असताना दिसली. तोच त्याच्या कानी एक आवाज पडला.

“वाचव रामा! या बकरी पासून वाचव.”

“अरे उठ ना कुंभकरणा!”

एवढे बोलून त्याच्या कानाखाली एक चापकन् बसली. रामा झोपेतून खडबडून जागा झाला.

हे दुसरे तिसरे कोणी नसून पंडित रामाची शेंडी बोलत होती. हो! पंडित रामाची शेंडी त्याच्याशी बोलायची आणि तिचा आवाज फक्त रामालाच ऐकू जायचा. तिचे नाव बंधू!

बकरीला हाकलून रामा आळस देत पुन्हा त्याच आंब्याच्या झाडाखाली बसला. आळस देता देता तो म्हणाला “चला आता झालं ते झालं! खूप भूक लागली आहे.”

“अरे भूक लागली आहे तर हा आंबा तोड आणि खा.” रामाची शेंडी बंधू म्हणाली.

“छे! मी हा आंबा तोडून निसर्गाचा अपमान का करू? या आंब्याचा रंग बघून कोणीही सांगेल की हा कोणत्याही क्षणी खाली पडेल तर मी का तोडायचे कष्ट घेऊ?” आळशी रामा म्हणाला.

“शी! लाज वाटते मला मी तुझ्यासारख्या आळशी आणि कामचुकार माणसाची शेंडी आहे म्हणून.” बंधू नाराज होत म्हणाली.

“लाज तर मला वाटते. ज्याने एखाद्या मोठ्या राजघराण्यात जन्माला यायला हवे होते तो एका एवढ्या लहान तेनाली गावात जन्मला आलाय. असो! आता मला आराम करू दे.” रामा वैतागून म्हणाला आणि पुन्हा जमिनीवर आडवा झाला.

“तुझ्या विश्रांतीचा आता खेळखंडोबा झाला रामा. ते बघ समोरून कोण येतंय.” बंधू म्हणाली.

समोरून धावत गुंडाप्पा येत होता. पळत पळत रामा जवळ येऊन तो बोलू लागला. “लाद वातते मला तुला माझा मितल मनायची. कोना दूसल्याचा नाही पन शालदाचा तली विताल कलायचा. तिला तू पलून गेलेलं समदल तेवापासून काय दालंय तीच!” तो बोबड्या स्वरात चिडून बोलला.

“हो माहितेय. अरे कोणी मला तरी विचारा हा विवाह मी करू इच्छितो की नाही!” रामा वैतागून म्हणाला.

“का? तू तल मनाला होतास तू शालदावल प्लेम कलतोस. मग?” गुंडप्पा म्हणाला.

“हो मी सांगितलं होतं पण मला एक सांग या जगात सगळ्यात महाग गोष्ट काय आहे?” रामाने गुंडप्पाला विचारलं.

“मोतीचुलचे लालू.” गुंदप्पा हाताचा मोठा गोल करत म्हणाला.

त्याचाच हात धरून रामा म्हणाला; “मंगळसूत्र! शारदा काय लग्न झालं की मंगळसूत्र घालून बसेल पण त्याचे हप्ते भरणं, संसाराचा सगळा भार उचलणं हे माझ्याच खांद्यावर येऊन पडणार आहे.”

“लामा…” गुंदाप्पा काहीतरी बोलू पाहत होता पण त्याला मध्येच तोडत रामा पुन्हा बोलू लागला; “बोलू दे मला गुंडप्पे बोलू दे. जेव्हाही मला अम्माने घरातून बाहेर काढलं शारदाने मला तिच्या घरात आश्रय दिला, जेव्हा मला धनाची आवश्यकता होती तेव्हाही तिनेच मला तिच्या खडूस पिताश्रीचे धन चोरून आणून दिले.”

“अले….” गुंडप्पा पुन्हा बोलू लागला तरीही रामाने त्याला पुन्हा अडवले आणि पुन्हा बोलू लागला; “मला बोलू दे! जेव्हा कोणती समस्या निर्माण झाली तेव्हाही तिनेच मला साथ दिली पण म्हणून मी जीवनभर तिच्यासोबत बसू?” तो वैतागून बोलत होता.

“अले मागे तल बग. मागे..” गुंडप्पा म्हणाला.

“तू तर असं बोलतोयस जशी ती माझ्या मागे उभी आहे.” असं म्हणून रामाने हळूच मागे वळून पाहिले तर खरंच शारदा त्याच्या मागे उभी होती.

तिला बघून त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली आणि तो गुंडप्पाच्या मागे लपू लागला. शारदा जोरजोरात रडू लागली.

“अगं का रडतेस? तुला माहितेय ना तू रडताना अजिबात चांगली दिसत नाहीस.” रामा म्हणाला.

त्यावर शारदा अजूनच रडू लागली आणि रडता रडता बोलू लागली; “माझ्या याच साडीचा पदर माझ्या गळ्यात अडकवून या झाडाला टांग. काय करू मी अश्या जीवनाचं? त्यापेक्षा मृत्यू कधीही चांगला.”

“अगं माफ कर ना. विवाह शब्द ऐकूनच मी घाबरून पळून आलो पण तुला तर माहितेय ना मी तुझ्यावर प्रेम करतो आणि विवाहही तुझ्याशीच करेन.” तो शारदाची हनुवटी हातात घेत म्हणाला.

त्याच्या या बोलण्याने ती शांत झाली.
***************************************
इथे अम्माने भटजीला एका खाटेला बांधून ठेवले होते. तो भटजी तिला खूप विनवण्या करत होता की, मला जाऊ दे. राजपुरोहित तथाचार्य मला क्षमा करणार नाहीत. आज ते तेनाली गावात आलेत आणि त्यांच्या इथे वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. तरीही ती काही त्याला सोडायला तयार नव्हती.
************************************
तर इथे विजयनगरमधील तथाचार्य सगळ्या ग्रामस्थांना खोटे काहीबाही सांगून आपली प्रशंसा करून घेण्यात व्यस्त होता. गावात असणाऱ्या एका मोठ्या उंच रंगमंचावर उभा राहून तो संपूर्ण ग्रामस्थांना त्याला रात्री झालेल्या भगवान शंकरांच्या दर्शनाबद्दल सांगत होता.

“लोकहो! तुम्हाला माहीतच आहे मी शिव शंकराचा निस्सीम भक्त आहे आणि काल रात्रीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी मला दर्शन दिलं आणि जे हवे ते मागायला सांगितले. मी तुम्हा सर्व भक्तगणासठी सुख, शांती आणि समाधान मागितले आहे. तुम्हा सर्वांचे सुख तेच माझे सुख.” राजपुरोहित बोलत होता तर त्याचे दोन शिष्य मागे उभे राहून एकमेकांना खुणा करत होते.

तथाचार्यांचे बोलणे ऐकून सर्व ग्रामस्थांनी त्यांचा जयजयकार केला आणि तथाचार्य पालखीत बसून गावातल्या मंडईतून सर्वांना दर्शन देत निघाले.
**********************************
इथे रामा, शारदा आणि गुंडप्पा पुन्हा रामाच्या घरी म्हणजेच विवाहस्थळी यायला निघाले होते. गुंडप्पाने लग्नाचा मुहूर्त टळून गेल्याचे सांगितल्याने रामा त्याला समजावत होता की, निसर्गाने सृष्टी निर्माण करताना कोणता मुहूर्त पाहिला असेल? बाळ जन्माला घालताना आई कोणता मुहूर्त बघते? आणि जर स्वर्गात गाठी बांधल्या जात असतील तर मुहूर्ताचा काय फरक पडणार आहे?

“हे सगल तू शालदाला तांग. अम्मा तल तुला सगल्यांसमोल मालनार बग तू!” गुंडप्पा म्हणाला.

त्याबरोबर रामा घाबरला आणि अचानक त्याला काहीतरी सुचले.

“मी एक काम करतो आधी मी बाजारात जातो. अम्माला सांगेन विवाहाच्या तयारीत व्यस्त होतो. तोपर्यंत शारदा तू अम्माला सांभाळ.” रामा म्हणाला.

ती त्याच्याकडे संशयाने बघत होती.

“मी नक्की घरी परत येईन. विश्वास ठेव.” रामा म्हणाला.

“तुम्ही गुंडप्पाला सोबत घेऊन जा.” शारदा म्हणाली आणि ते दोघे बाजाराच्या दिशेने निघाले.

बाजारात पोहोचल्यावर रामाने पाहिलं एक भाजी विक्रेता त्याच्या ग्राहकाला खराब भाजी विकून देखील ती भाजी बदलून देत नव्हता की त्याचे पैसे परत करत नव्हता. तो ग्राहक तिथून गेल्यावर रामा तिथे आला. त्याने भाजी विक्रेत्याला सर्व खराब भाजी एका पिशवीत भरायला सांगितली. रामाकडे असलेल्या धनाच्या पोटली मधील नाणी पाहून विक्रेता काहीही न बोलता त्याने सांगितले तसे करू लागला.

“हे घ्या श्रीमान! सर्व खराब भाजी पिशवीत भरली आहे.” सर्व खराब भाजी भरून झाल्यावर विक्रेता म्हणाला.

“छान! आता ती पिशवी बाजूला ठेव आणि या चांगल्या भाजीचे योग्य दाम बोल.” रामा म्हणाला.

विक्रेत्याला त्याची चतुराई कळली म्हणून त्यांच्यात वादावादी सुरू झाली. त्याच वादावादीत रामाने घोसावळे समजून एक साप गळ्यात ठेवला. सगळे त्याच्याकडे बघत होते. भाजीवाला दूर झाला आणि हे असं का होतंय हे कळायच्या आतच तिथे तथाचार्यची पालखी आली. रामाच्या गळ्यातील साप बघून पालखी काही पुढे जाईना. गुंडप्पा त्या इतर लोकांच्यात जाऊन ओरडला; “अले ताप आहे तुद्या गल्यात ताप!”

त्याचे शब्द ऐकून रामाने स्वतःचा गळा बघितला आणि घाबरून तो साप कसाबसा हवेत उडवला. त्यामुळे तो साप तथाचार्यच्याच गळ्यात येऊन पडला. पालखी धरणारी लोकंही घाबरून दूर पळाली आणि तो खाली चिखलात आपटला.

रामाने त्याची मनापासून माफी मागितली पण तथाचार्य त्याचा अपमान विसरू शकत नव्हता. तो रामाला काहीबाही बोलू लागला त्यावर रामाकडे प्रत्युत्तर तयार होते. त्याने रामाला सांगितले; “तुला मी आव्हान देतो! हिंमत तर कर कधी विजयनगर मध्ये पाऊल टाकण्याची मग मी बघतो. अशी काही स्वागताची तयारी करेन की तुझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या लक्षात ठेवतील.” असं म्हणून रागाने लालबुंद होऊनच तो तिथून निघाला.

“निमंत्रणासाठी धन्यवाद! आता एवढ्या प्रेमाने बोलावलं आहे म्हणजे यायला तर लागेल.” रामा म्हणाला आणि मनात विजयनगरला जाण्याचे बेत बांधू लागला.

क्रमशः…..

Credit:- Sony SAB “Tenali Rama serial”

🎭 Series Post

View all