Login

तेरा मेरा साथ रहे भाग-२१

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
भाग:- २१

मागील भागात:-

शहरात अभि स्मिताला त्या भाड्याच्या घरी घेऊन आला. दार उघडाच ती आतलं सर्व पाहून चाट पडते.

आता पुढे:-

दारात 'स्वागत' अशी लिहिलेली सुंदर रंगीबेरंगी रांगोळी काढली होती. ती घरात पाऊल ठेवणार तोच "वहिनी, दोन मिनिटे थांबा." असे म्हणत अभिचा मित्र कैलासने तिला थांबवलं.

तिने अभिकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिच्या नजरेतील प्रश्न ओळखून तो म्हणाला, "हा कैलास माझा जिवलग मित्र व ही सुमतीवहिनी त्याची बायको. आपल्या स्वागताला आले आहेत." समोरून औक्षणचे ताट घेऊन येणाऱ्या सुमतीने बोट करून त्याने त्या दोघांची ओळख करून दिली.

सुमतीने त्या तिघांचे कुमकुम तिलक लावून औक्षण केले. आरूषीवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. तांदूळ भरून ठेवलेले मापटे उंबऱ्यावर ठेवले होते. त्याला पाय लावून स्मिताला आत यायला सांगितले. ती हळूवार त्याला पाय लावला. त्यातील तांदूळ घरात विखूरले गेले.

नंतर कुंकवाचे पाणी असलेले परातीत तिला पाय ठेवून ते पांढऱ्या कापडावर पाय उमटवून यायला सांगितले. तसे तिने केले. त्यांच्या जीवनातील संसाराची सुरूवात असलेले ती एक आठवण म्हणून अभि जपून ठेवणार होता. म्हणून तिच्या पावलांसोबत त्याचे आणि आरूच्या पावलांचे ठसेही त्याने त्या कापडावर घेतली होती.

लक्ष्मीचे पावलाने स्मिताने गृहप्रवेश केला.

तिचे अशा प्रकारे स्वागत होईल याचा विचार स्मिताने स्वप्नातही केला नव्हता. अभिने ते प्रत्यक्षात केले. तिला त्याचे खूप कौतुक वाटले.

आपला जोडीदार न सांगताच आपल्यासाठी इतकं काही करतो म्हटल्यावर या सुखावह अजून काय हवे असते. एका जोडीदाराने मनापासून केलेली छोटीशी गोष्ट ही दुसऱ्या जोडीदाराला मोठं सुख देऊन जाते. हेच पाहिजे असते ना संसारात. एकमेकांना सांभाळून घेत साथ देणे. प्रत्येक पावलावर तेरा मेरा साथ रहे असे म्हणत तसे वागायचे.

घरही सुंदर पध्दतीने सजवले होते. झेंडूच्या फुलांनी व रंगीबेरंगी फुग्यांनी घर सुरेख दिसत होते. पुढे आल्यावर तिला आरूषीसाठी पाळणा दिसला जो  सुंदर सजवला होता. स्मिता त्या सर्व कृतीने भारावून गेली. तिच्याजवळ व्यक्त करण्याची शब्दच नव्हते इतका आनंद तिला झाला होता.

आतील रूममध्ये गॅसशेगडी, सिलेंडर,  स्वयंपाकासाठी भांडी, काही डबे, ज्यात किराणा भरलेलं दिसत होतं. पाण्याची भांडी एका बाजूला भरून ठेवली होती. सगळं कसं व्यवस्थित ठेवलं होतं. हे सर्व करण्यात दुपार झाली होती. सुमतीने आज स्वयंपाकही करून ठेवला होता. आरूषी दूध पिऊन झोपी गेली. तिला नवीन पाळण्यात झोपवले.

"स्मिताताई, चला बाळ झोपले आहे तर जेवणं करून घेऊ. नंतर आम्ही घरी जातो मग तुम्ही थोडं आराम करून घ्या." सुमती तिला म्हणाली.

"हो, ताई पण स्वयंपाक करावा लागेल ना." स्मिता कचरत म्हणाली. 

"अहो, त्याची काळजी करू नका. मी केलाय. चला आता." सुमती हसत म्हणाली.

"खूप आभार तुमचे, सुमतीताई. किती केलंय तुम्ही आमच्यासाठी !" स्मिता तिचा हात हातात धरून म्हणाली.

"नाही ताई, अभि भावजीने आमच्यासाठी जे केलंय त्यापुढे हे काहीच नाही. तेव्हा आभार मानू नका." सुमती तिच्या हातावर हात ठेवत एक नजर अभिकडे टाकून म्हणाली.

"म्हणजे?" स्मिता म्हणाली.

"वहिनी, ते नंतर सांगेन पण आता जेवून घेऊ या ना. मला खूप भूक लागली आहे." कैलास पोटावर हात ठेवत केविलवाणा चेहर करतं म्हणाला.

"बरं, पण सुमतीताई, तुम्ही मला ताई न म्हणता फक्त स्मिता म्हणत अरे तुरे बोलायचे. कबूल आहे का सांगा?" स्मिता हसत सुमतीला म्हणाली.

"कबूल, पण तुम्हीही मला फक्त सुमती म्हणून एकेरी हाक मारायची. तसंही आपण जवळपास एकाच वयाचे आहोत. काय म्हणता मग, आहे का मंजूर?" सुमती हात पुढे करतं हसतं म्हणाली.

स्मिताने मंजूर म्हणत हसत तिच्या हातावर टाळी दिली.

"ओय, महिला मंडळी, आधी नवरोबाच्या पोटापाण्याचं बघा मग निवांत गप्पा मारत बसा. जाम कावळे ओरडायला लागलेत पोटात." कैलास इतकुसा चेहरा करत म्हणाला.

"खादाड कुठले? जरा म्हणून दम नाही." सुमती पदर कमरेला खोचत हसतं म्हणतं ताट वाढू लागली.

"काय गं वहिनी माझ्या बिचाऱ्या मित्राला खादाड म्हणतेस." अभि कैलासची फिरकी घेत हसतं म्हणाला.

"हम्म, घ्या तुम्ही मित्राची बाजू. तुम्ही येण्यापूर्वीच नाष्टा केला होता याने. आता लगेच कशी भूक लागली बरं याला." सुमती त्याच्या पुढे ताट करत अभिला म्हणाली.

"ए सुमु, तू माझं खाणं काढत जाऊ नको बरं. नाष्टा करून किती वेळ उलटून गेला. त्यात ही तयारी पण करत होतो ना. मग भूक तर लागणारच ना." कैलास तोंडात घास घालत म्हणाला.

"हं, कळलं, जेव आता गुपचूप." सुमती त्याला दटावत म्हणाली.

त्या दोघांचे संभाषण ऐकून अभि गालात हसत नकारार्थी मान डोलावलत जेवू लागला.

स्मिता नवीन होती इथे. आताच ओळख झाल्याने ती जास्त काही न विचारता शांतपणे जेवू लागली.

जेवण झाली तशी स्मिता नको म्हणत असतानाही सुमती तिला सगळं आवरायला मदत केली.

"चला वहिनी, अभि येतो आता आम्ही. तुम्ही दोघेही आराम करा. काही लागलं तर फक्त आवाज द्या. हे बघा अगदी समोरच आमचं घर आहे." कैलास त्यांच्या घराच्या दोन पावलांवर अगदी समोर असलेल्या घराकडे बोट दाखवतं स्मिताला म्हणाला.

"हो, स्मिता काहीही लागलं तर न संकोच करता अगदी हक्काने सांग." सुमतीही हसून स्मिताचा हात हातात घेत म्हणाली.

तिनेही हसून होकार दिला. तिने सुमतीला हळदीकुंकू लावले. मग ते दोघे त्यांच्या घरी निघून गेले.

ते गेल्यावर स्मिताने आरूषीवर नजर टाकली ती अजूनही गाढ झोपली होती.

"अजून एक तास तरी उठणार नाही ही, आरू." स्मिता अभिला म्हणाली.

"हम्म, प्रवासाने थकली असेल ती. चल ये आपण ही आराम करू या. तू ही दमली असशील." अभि जमीनीवर बिछाना टाकतं म्हणाला.

दोघेही बिछान्यावर पहुडली. तिने त्याच्या हातावर डोकं ठेवलं. किती दिवसांनी असा दोघांना एकांत भेटला होता. त्याने तिला प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या मिठीत तिला स्वर्गसुखाची अनुभूती झाली.

"अहो" तिने त्याला लाडिक साद घातली.

त्याने डोळे मिटूनच हुंकार भरला.

"इतकं सर्व सामानाची गरज नव्हती. हळूहळू नंतर घेता आलं असतं ना. उगीच एवढा खर्च का केलात?" ती काळजी करत म्हणाली.

तिचं बोलणं ऐकून तो डोळे उघडत म्हणाला, "मी गरजेचे सामान आणले होते. त्या दोघांनी माझे ऐकले नाही. आरूसाठी मी पाळणा घेणारच होतो पण त्याने घेऊन दिला."

क्रमशः

कोणी पाळणा घेऊन दिला? अभिला अजून कोणी मदत केली ?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all