भाग-२३
मागील भागात:-
अभि ऑफिसमध्ये गेल्यानंतर दोन तासाने स्मिताच्या कानावर एक बातमी आली ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
आता पुढे:-
स्मिता तिन्ही मुलांना रूपाच्या घरी सोडून रमाकांत सोबत अभि असलेल्या ठिकाणी गेली. तिथे खूप लोकांची गर्दी जमा झाली होती. लोक आपापसात कुजबुजत होते.
"इतक्या चांगल्या माणसासोबत असे कसे झाले? तो असा करणे शक्यच नाही." असे शब्द तिच्या कानावर पडत होते.
काय झालं नेमकं या विचाराने तिचे काळीज धडधडू लागलं. अभिची खूप काळजी वाटू लागली. कंठ दाटून वारंवार डोळे ओले होतं होते. काही होणार नाही असे रमाकांत धीर देत होत होता.
गर्दीतून वाट काढत ते पुढे आले. पोलीस गाडी व काही पोलीस तिला दिसले. ज्यामुळे तिला खूप भीती वाटू लागली. अभि तिला कुठेच दिसेना तेव्हा त्याच्या काळजीने तिचा जीव वर खाली होऊ लागला.
नंतर एका ठिकाणी अभि पोलिसांना काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिला दिसला. त्याला पाहून तिला हायसे वाटले. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे होते. चेहरा त्रासलेला होता. त्याच्याकडे जाण्यासाठी ती पुढे सरसावली तर पोलीस तिला त्याला भेटू देत नव्हते.
"अहो, ते माझे पती आहेत. मला भेटू द्या ना त्यांना, प्लीज. एक तर काय झालंय हे पण तुम्ही सांगत नाहीत." स्मिता आर्जव करत होती.
"हे पाहा, बाई त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. त्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे. काही वेळात त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येईल तेव्हा तुम्ही तिथेच येऊन भेटा. आता तुम्ही भेटू शकणार नाही." एक हवालदार तिला आत जाण्यापासून रोखत म्हणाला.
हे ऐकून स्मिताला भोवळचं आली. तिचा हात आपसुकच तोंडावर गेला. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता ; परंतु अभिवर तिचा पूर्ण विश्वास होता. तो स्वतः जवळचे देईल पण दुसऱ्याचे कधीच घेणार नाही याची खात्री तिला होती. तिने स्वतःला सावरलं. आपल्या नवऱ्यावरचा खोटा आरोप तिला सहन झाला नाही.
ती तावातावाने त्या हवालदाराला म्हणाली," माझे पती असे कधीच करून शकत नाहीत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमचा गैरसमज झालाय, सर. हा आरोप खोटा आहे. नक्कीच कोणीतरी त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करतोय. "
"काय खोटं काय खरं हे तर कोर्टात सिद्ध होईल. सुरूवातीला सगळे असेच बोलतात. नंतर खरं सिध्द झालं की तोंड लपवतात." तो हवालदार कुत्सित हसतं म्हणाला.
त्याच्या अशा बोलण्याचा तिला खूप राग आला. तिने त्याला डावलून मुख्य साहेबाकडे धाव घेतली. तो हवालदार तिच्या मागे तिला ओरडत थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण ती कोणालाही न जुमानता अभिजवळच पोहचली. तिला पाहून अभि चाट पडला.
ती पोलिसांना विनवणी करू लागली. त्याने काही केले नाही त्यांना सोडा असे डोळ्यांत पाणी आणतं म्हणाली.
खूप लोक होते जे अभिच्या बाजूने होते. तो जमाव त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ देत नव्हता.
"साहेब, हा देवमाणूस आहे. कोणाचा काही घेणारा नाही तर सढळ हाताने देणारा माणूस आहे." असे काही लोक म्हणतं होते.
नंतर खूप चौकशी अंती ज्या माणसांकडून अभिने पैसे घेतले होते. त्या माणसाने सगळे खरे सांगितले. तेव्हा अभिला सोडण्यात आले ; तरी केसच्या सुनावणीच्या वेळी त्याला कोर्टात हजर राहायला सांगितले होतं. 'खाया पिया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आणा' अशी अवस्था अभिची झाली होती. तो सुटल्यामुळे स्मिताने सुटकेचा श्वास तोडला.
पोलीस स्टेशन व कोर्टाची कधीही पायरी न चढणाऱ्या माणसांच्या आयुष्यात ती वेळ आली याचं अभि व स्मिता यांना वाईट होतं. पण ही वेळ ही निघून जाईल याची त्यांना खात्री होती.
फ्लॅशबॅक:-
त्या दिवशी सकाळी अभि ऑफिसला निघाला होता. तेव्हा काय माहिती स्मिताला त्यादिवशी काही तरी विपरीत घडेल असे वाटतं होतं. मन बेचैन होतं. तिला वाईट स्वप्नही पडलं होतं. तिने ते त्याला बोलूनही दाखवलं होतं. तसं काही नसतं, तिच्या मनाचे खेळ आहेत. काळजी करू नकोस असे त्याने तिला सांगितले.
तरीही तिला ठीक वाटतं नव्हते. जाताना काळजी घ्या म्हणाली होती. हो म्हणतं तिचा व मुलांचा निरोप घेऊन तो ऑफिसकडे निघाला.
तेव्हा वाटेत त्याला संकेत भेटला. थोडा वेळ माझ्यासोबत चल एक काम आहे असे म्हणत तो त्याला एका हाॅटेलमध्ये घेऊन गेला. एका टेबलाजवळ ते दोघे खुर्चीवर बसले. तिथे आधीच अजून एक जण बसला होता. तो संकेतच्या ओळखीचा होता असे बोलताना त्याने सांगितले. त्याचे नाव अमित होते.
चहा गप्पा झाल्यावर त्या अमितने संकेतला पैशाबद्दल विचारले. त्याने त्यावरून त्याच्याशी वाद घातला. अभिने मध्यस्थी करत ते थांबवले. अमितने त्याला पैसे देऊ केले. पण संकेतने त्याच्याकडून घेण्यास नकार दिला. तेव्हा अमितने ते पैसे अभिकडे दिले. अभि ते पैसे घेत नव्हता; पण त्याने विनंती केली की त्याने हे पैसे संकेतला द्यावे. म्हणून अभिने ते पैसे घ्यायला व अँटी करप्शनची धाड पडायला एकच गाठ पडली.
अधिकाऱ्याने अभिचा हात पकडत तुम्ही लाच घेताना पकडले गेलात असे सांगून त्याला तिथेच थांबायला सांगितले. तो खूप जीव तोडून सांगत होता. पण ते काही ऐकून घेत नव्हते.
त्या संकेत, अमित व अभि यांना त्यांनी ताब्यात घेतले होते. हाॅटेल काही वेळासाठी सिल केला होता.
संकेत मात्र बघ्याची भूमिका घेत होता. मनात तो ही घाबरला होता. अमितचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
क्रमशः
अभि या संकटातून बाहेर पडेल का?
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा