Login

तेरा मेरा साथ रहे भाग-२४

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
भाग:- २४

मागील भागात:-

संकेत मात्र बघ्याची भूमिका घेत होता. मनात तो ही घाबरलाच होता.

आता पुढे:-

संकेतला अमितला धडा शिकवायचा होता ; पण चुकून अभि त्यात सापडला होता. आता काय करावे त्याला समजेना. नंतर त्याने त्या अधिकाऱ्यांना सर्व खरे सांगितले की अभिची यात काहीही चुक नाही. तो फक्त त्याच्या बोलण्याने त्याच्यासोबत आला होता. तो पैसे घेत नव्हता म्हणून अमितने अभिला मध्यस्थी केले त्यातून हा सगळा गोंधळ झाला. अमितनेही तसेच सांगितले.

नंतर संकेतने अभिची माफी मागितली पण अभि त्याच्या या वागण्याने खूप दुखावला होता. त्याने जाणूनबूजून त्या अधिकारी लोकांना आधीच जसं सांगितले होते तसेच त्याला विश्वासात घेऊन सांगितले असते तर असे काही घडले नसते, असे त्याने बोलून दाखवले.

संकेतने जरी माफी मागितली तरी अभिवर लाच घेणारा हा ठपका थोड्या वेळासाठी का असेना पण लागलाच ह्याचं त्याला खूप वाईट होतं. त्याच्या मनाला ही गोष्ट खूप लागली.

विनाकारण त्याला या सर्व गोष्टींना नाहक सामोरे जावे लागले. नाहक वर्तमान पत्रातील बातमीला सहन करावे लागले. अभिला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्याच बरोबर स्मितालाही या सर्वातून जावे लागले. याचं त्याला वाईट वाटतं होतं.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्यालाच का नेहमी परीक्षेला सामोरे जावे लागते. ही गोष्ट त्याला सतावत होती ; पण स्मिताचा त्याच्यावरचा विश्वास त्यावेळीही डगमगला नाही. नेहमी प्रमाणे तिची साथ तर त्याला होतीच शिवाय त्याची जोडलेली माणसेही त्याच्या सोबत होती. त्यावेळी त्याला आपण माणुसकी कमावली याचा प्रत्यय येऊन त्याचा आनंद झाला होता.

हळूहळू दिवस जात होते. मुले थोडी मोठी झाली. शाळेत चालली होती. स्मिताला आता दुपारचा बराच वेळ मोकळा मिळत होता. मग तिने काही तरी करण्याचा विचार अभिला बोलून दाखवला. त्याने तिला कोणतेही काम न करता तिला पुढे शिकायला सांगितले. तिचे शिक्षण थोडेफार झालेले होते. तिलाही त्याचा विचार पटला.

आपल्या जोडीदाराला आपली काळजी असून आपण पुढील शिक्षण पूर्ण करावे हा त्याचा विचार तिच्या मनाला सुखावून गेला.

तिला शिक्षणाची आवड होतीच आता अभिची साथ मिळाली म्हटल्यावर तिने नव्या उत्साहाने शिक्षणाला सुरूवात केली.

स्वतःचा तर विकास होईलच सोबत मुलांना घडवताना ते शिक्षण कामी येईल हा विचार तिच्या मनात आला.

आधी दहावी, नंतर हळूहळू पुढचे सर्व शिक्षण तिने पूर्ण केले. वाचण्याची गोडी तिला आधीपासूनच होतीच. तिला कविता, चारोळ्या, कथा वाचायला खूपच आवडायचं. तिचं आवडं तिला लेखनाकडे घेऊन गेली. ती सुंदर चारोळ्या व कविता करायची. ह्या सर्व गोष्टीं करताना तिने संसार, घर, मुले व अभि यांच्याकडे थोडेही दुर्लक्ष केले नाही याचे अभिलाही विशेष कौतुक वाटायचे.

यात आणखी काही वर्षे निघून गेली. एकदा स्मिता अभिला म्हणाली,"अहो, किती दिवस आपण भाड्याच्या घरात राहणार? माझं स्वप्न आहे स्वतःचं घराचं. जास्त मोठं नसले तरी चालेल पण आपलं छोटसं घर असावं असं मला वाटतं."

"तू म्हणतेस ते बरोबर आहे, मितू. मुले मोठी झाली की मग त्यांचा शिक्षणाचा खर्च पण वाढेल. आत्ताच एका ठिकाणी जागा पाहून तुला हवं तसं घर बांधू. तू कधी कोणत्या गोष्टींसाठी माझ्या हट्ट केला नाहीस. आज पहिल्यांदा तू तुझं स्वप्न सांगितलेस आणि ते मी पूर्ण करणारच हा शब्द आहे माझा. वेळ लागला तरी चालेल ; पण तुझ्या घराचे स्वप्न मी पूर्ण करेनच. बस्स थोडा वेळ दे मला." तो तिचा हात हातात घेत म्हणाला.

पूर्ण करेल घराचे स्वप्न
माझा प्रेमळ राया
नशीबवान किती मी !
आहे त्याची भार्या

तिने त्याच्या शर्टावर हात फिरवत चारोळी म्हणतं त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्याची ओठांच्या कडा रूंदावल्या. त्याने तिच्या डोक्यावर मायेने थोपटले.

"खूप सुंदर चारोळी, मितू." तो हातांच्या बोटांचा मोर करून आनंदाने म्हणाला.

त्याच्या कौतुकाने ती भारावून खुदकन हसली. छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांचे प्रेम बहरत होतं.

बघता बघता अभिने स्मिताच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. अर्थात तिने आताही त्याची परवानगी घेऊन घरगुती शिकवण्या घेतल्या. त्याच्या मागे उद्देश होते की घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून ज्ञान दानाचे पुण्य व थोडा आर्थिक हातभारही मिळेल. ती गरीब मुलांची वेगळी शिकवणी विनामूल्य घेत होती.

घर बांधताना त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. पण स्मिताची खंबीर साथ त्याला होतीच.

मुलांचे शिक्षण पूर्ण करत त्याने सुंदर घरकुल बांधले. शिक्षण व घर दोन्ही एकत्र आल्याने घर बांधायला वेळ लागला. तब्बल पाच वर्षानंतर घराचे स्वप्न पूर्ण झाले.

घराचे नाव 'अस्मिता' ठेवले. घराची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली म्हणून अभि व स्मिता खूप खुश होते. घर नसून टुमदार बंगलाच होता तो. घरापुढे अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, वेगवेगळी फुलझाडे लावली होती. सर्व काही स्मिताच्या आवडीनुसार त्याने केले होते. नवीन घरी पुजा केल्यानंतर ते राहायला आले.

मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन मुले ही नोकरीला लागली होती. सगळं सुरळीत चालू होतं. छान दिवस आले होते. मध्यंतरीच्या काळात अशोक व सुवर्णा यांचे निधन झाले होते. राजन अधूनमधून ये-जा करायचा.

आईबाबा असेपर्यंत स्मिता गावी जायची तेही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असतं. स्मिताची आर्थिक परिस्थिती सुधारली तेव्हा सुनिता तिच्या समोर गोंडा घोळतं होती. तिलाही कळतं होतं तिच्या वागण्यामागचं कारण पण आईबाबा व राजनमुळे तिला काहीच बोलायची नाही. आईबाबा गेल्यानंतर तिने गावी जाणेचं सोडून दिलं. राजनचं रक्षाबंधन व भाऊबीजला येऊन जात होता.

इतक्या वर्षांत अभिच्या बहिणी चार-पाच वेळा येऊन गेल्या होत्या. ते म्हणतात ना गुळ असेल की मुंगळे लागतात. अगदी तसेच अभिचे सर्व छान चालू आहे म्हटंल्यावर मेहुण्यांनी येणे जाणे सुरु केलं.

ज्यावेळी अभिला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी पाठ फिरवली. 'सुख के सब साथी दुःख में कोई' असे अभि-स्मिता बाबतीत झाले.

मोठा बंगला बघून मेहुणे हरखून गेले. बायकासोबत कित्येक दिवस ते बंगल्यात मुक्काम ठोकतं. मनात कोणतीही अढी न ठेवता स्मिता मनापासून त्यांचे सारे करायची. किती केले तरी ते टोमणे मारायचे. ती उत्तर देणार होती : पण अभिचं त्यांना म्हणाला ज्यामुळे त्यांची बोललीच बंद झाली.

क्रमशः

असे काय म्हणाला अभि?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all