Login

तेरा मेरा साथ रहे भाग-२

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
तेरा मेरा साथ रहे भाग-२

शीर्षक:- तेरा मेरा साथ रहे

भाग-२

मागील भागात:-

अभिषेक, स्मिता, आरूषी व परी त्या गाडीने व बाकीचे दुसऱ्या गाडीने कार्यक्रमाच्या जागी निघाले.

आता पुढे:-

एका आलीशान अशा सुंदर फुलांनी सजवलेल्या हाॅलसमोर अभिषेकची गाडी थांबली. गाडीतून उतरतो न तोच त्यांची वाट पाहत असलेले सर्वजणांनी त्यांना गराडा घातला. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत केलं. त्यांनीही हसतमुखाने सर्वांना हात जोडून नमस्कार केला. त्यांच्यासोबत स्मितालाही तो सन्मान मिळत होता. त्यामुळे तिला भरून येत होतं. छोटी परी कुतूहलाने सर्व पाहत त्या दोघांच हात पकडून मधोमत चालत होती.

निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती समारंभाचा त्यांचा कार्यक्रम एका मोठ्या नामांकित हाॅलमध्ये ठेवला होता. सारा हाॅल माणसाने गजबजून गेला होता. शाखा अभियंता असलेले ते काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांच्या स्वभाव खूपच चांगला होता. सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने वागायचे व बोलायचे. प्रत्येकाला मदत करण्यात तर ते सर्वात पुढे असायचे. कोणी मदतीची याचना केली आणि त्यांनी केली नाही असे कधी झालेच नाही. त्यांच्या स्वभावामुळे ते कित्येकाचे लाडके होते. आदराने त्यांनी कोणी आण्णा तर कोणी डॅडी म्हणायचे. स्मिताही तशीच होती. दोघाही नवराबायकोंचा जनमाणसात खूप मान व आदर होता. माणुसकी काय असते हे यांच्याकडून शिकावं असे या दोघांचे व्यक्तिमत्व होतं. ते नको म्हणत असतानाही ऑफिस मधील सर्वांनी मिळून त्यांचा ह्या सोहळ्याचा घाट रचला होता.

व्यासपीठावर अनेक खुर्च्या व टेबल मांडले होते. एका खुर्चीवर अभिषेक व दुसऱ्या खुर्चीवर स्मिता पदर खांद्यावर घेऊन बसली. नंतर बरेच मान्यवर बसले. एक एक जण येऊन अभिषेकबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलत होतं. ज्यामुळे अभिषेक व स्मिताला भरून आले. नंतर मुख्य पाहुण्यांनी अभिषेकचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान केला आणि स्मिता हिचा त्या पाहुण्यांच्या पत्नीने पैठणी देऊन हळदीकुंकू लावून सन्मान केला. पतीच्या बरोबरीने आपल्याला मिळणारा सन्मान पाहून तिच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. अभिमानाने तिचा ऊर भरून आला.

लाखात माझा राया
मला अभिमान वाटे
सन्मान सोहळा पाहून
नयनी आसवे दाटे

तिच्या मनात नकळत या चारोळी ओठात आल्या. सर्वांनी अभिषेकला चार शब्द बोलण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी हलकेच मान वळवून स्मिताकडे पाहिले तिने डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करत हलकं स्मित करत संमती देत मान डोलावली.

ते पाहून व्यासपीठावर त्यांच्या शेजारी बसलेला रमाकांत ओठांच्या कोपऱ्यात हसत मनात म्हणाला, 'काय प्रेम आहे यांचं कोणतीही गोष्ट न विचारता करत नाहीत. एकमेकांवर जेवढ प्रेम आहे तेवढचं आदरही आहे. खूप नशीबवान आहेत हे दोघे. नाहीतर आमची मंडळी. जेव्हा बघाव तेव्हा वसकन अंगावर येती.' समोर बसलेल्या त्याची बायको रूपाकडे लक्ष जाताच त्याचे हसू गायब झाले. तिने भुवया उडवत त्याला काय म्हणून विचारलं तर त्या काही नाही या अर्थाने खांदे उडवले. तरीही ती कपाळावर आट्या पाडत त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्यावरील नजर हटवत अभिषेक काय बोलणार याची वाट पाहू लागला.

अभिषेक खुर्चीवर उठून माईक हातात घेत म्हणाले,"नमस्कार, राम राम मंडळी, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो. हा सोहळा खरं तर मी नको म्हणालो होतो ; पण तुम्ही सर्वांनी प्रेमाने हे सर्व केलेत त्यामुळे मला नाही म्हणताच आले नाही. तुमच्या या निस्सीम, निस्वार्थ प्रेमाने मी भारावून गेलो. काय बोलू शब्द नाहीत माझ्याकडे.

या माझ्या सर्व यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा माझी अर्धांगीनी स्मिताचा आहे. तिची साथ नसती तर आज हा अभिषेक तुमच्यासमोर कदाचित उभा नसता. प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठी अगदी खंबीर व ठामपणे उभी होती. प्रसंगी खडी फोडणे, बिगाऱ्याच्या हाताखाली टोपल्या वाहण्याचे कामही तिने केले. तुम्हाला विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे. राहायला घरही नव्हतं तरी कधी तिने तक्रार केली नाही. अगदी हसतमुखानं तिने आमच्या संसाराचा गाडा हाकला.

मुलांना छान संस्कार दिले, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. माझ्याकडेही लक्ष दिले, मला जपलं. सर्वांना काय हवं नको ते सर्व पाहत आली. पैपाहुण्यांचे स्वागत, करणीधरणी अगदी सर्व सर्व तिने केले. माझ्यापर्यंत कोणतीही गोष्ट तिने येऊ दिली नाही. म्हणूनच मी आजपर्यंत निश्चिंतपणे माझ्या कामाकडे लक्ष देऊ शकलो. ती आहे म्हणून मी आहे. ते म्हणतात ना एका यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचा हात असतो. तो हात माझ्या धर्मपत्नीचा आहे, जी माझा गर्व व अभिमान आहे. तिच्याशिवाय मी अधुराच आहे. मी खूप नशीबवान आहे की मला अशी पत्नी मिळाली. माझ्याबरोबर माझ्या कार्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या माझ्या पत्नीचाही सन्मान केलात यासाठी तुम्हां सर्वांचे मनस्वी आभार.

माझ्या कामात मला सहकार्य करणारे सर्व लहानमोठ्यांचेही धन्यवाद. त्यांच्याही सहकार्य लाभले नसते तर मी माझे काम चोख करू शकलो नसतो. म्हणून त्यांचेही विशेष आभार." त्यांनी हात जोडत सर्वांना नमस्कार केला. टाळ्यांचा कडकडाट झाला. स्मिताच्या डोळ्यांतून कधीचेच अश्रू ओघळत होते. तिने त्यांच्याकडे बघत टिपून घेतले. ते तिलाच बघत डोळ्यांचेच शांत हो असे म्हणताच तिने आसवांना बांध घातला. तरीही ते कुरघोडी करत ते बांध तोडू पाहत होते. कसे बसे तिने त्याला आवर घातला. कारण अभिषेकचेही डोळे भरून आले होते.

घरी गेल्यावर तिच्यावर बोलू असा विचार अभिषेक यांनी मनात केला.

जेवणं वगैरे झाली. सर्वांनी शुभेच्छा व भेटवस्तू दिले. पुन्हा एकदा उत्सवमूर्तीने सर्वांचे आभार मानले व आपल्या कुटुंबाबरोबर घराचा रस्ता धरला.

गाडीत बसल्यावर स्मितला पुन्हा अभिषेकचे बोलणे आठवले आणि तिचे मन भूतकाळात डोकावले.

क्रमशः

कसा होता अभिषेक व स्मिता यांचा भूतकाळ? कोण कोणती संकटातून त्यांना जावं लागलं? जाणून घेण्यासाठी वाचत राहा..तेरा मेरा साथ रहे

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा- २०२५

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

🎭 Series Post

View all