Login

तेरा मेरा साथ रहे- भाग ३

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
शीर्षक: तेरा मेरा साथ रहे

भाग-३

मागील भागात:-

अभिषेक व स्मिता पूर्ण परिवारसह त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम त्यांच्या अॅफिसमधील सहकारी मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांचा  व स्मिता यांचा सन्मान करतात. त्यांच्या कार्याचा आढावा घेत ज्यात त्यांच खूप कौतुक केल जातं. नंतर त्यांना चार शब्द बोलण्याची विनंती केल्यावर ते आपल्या या जीवन प्रवासात स्मिता खूपच मोलाची साथ व सिंहाचा वाटा आहे म्हणून तिचे भरूभरून स्तुती करत तिचे आभार मानले. त्यांच्या बोलण्याने तीही भारावून जात तिच्या डोळ्यांच्या कडा पाणवतात.

इतका सुंदर कार्यक्रमासाठी सर्वांचे मनस्वी आभार मानले व परतीच्या वाटेवर निघतात.

आता पुढे:-

गाडीत बसल्यावर स्मितला पुन्हा अभिषेकचे बोलणे आठवले आणि तिचे मन भूतकाळात डोकावले.

भूतकाळात-

संध्याकाळची वेळ होती. चाऱ्याच्या शोधात निघालेले पक्षी जसे पिल्लांच्या ओढीने घरट्याकडे परतात तसेच कामावर गेलेली गावातील माणसांना घराची ओढ असते. एक दांपत्य आपल्या घरी निघाले होते.

साधारण सतरा-अठरा वर्षाचा एक मुलगा एका झोपडीवजा घरासमोर येऊन उभा राहिला. तेथील अंगणात तेरा-चौदा वर्षे वयाच्या चार-पाच मुली जिबलीचा खेळ खेळत होत्या. त्या मुली त्या मुलाच्या पाठमोऱ्या असल्याने दोघेही एकमेकांना दिसत नव्हते. त्यात त्या खेळण्यात दंग होत्या. त्यामुळे त्यांचे लक्ष नव्हतं.

तो मुलगा पुढे येत म्हणाला,"मामा-मामी कुठे गेलेत?"

"ए, कोण रे तू? दिसत नाही का तुला आम्ही खेळत आहोत ते? चल हो बाजूला? " त्यातली जराशी सावळी, कुरळ्या केसांची दोन वेण्या लाल रेबीनने बांधलेली मुलगी त्याला ठसक्यात म्हणाली. सावळी जरी असली तरी नाकी डोळी खूपच सुंदर होती ती.

"ए, कोण म्हणून काय विचारतेस? पाहुण्या मासणाला कसे बोलावे कळतं नाही का तुला?" तिचे ठसक्यात बोलणे न आवडल्याने तोही जरा रागात म्हणाला.

"कोण पाहुणा? ए पोरींनो तुम्हाला इथे कोणी पाहुणा दिसतो काय गं?" असे म्हणत ती मुलगी इतर मुलींना टाळी देत हसू लागली.

तिच्या हसण्याने त्याचा पारा आणखीच चढला व तो तावातावाने पुढे येत तिचा दंड पडकडू तिला दम देत असल्यासारखे म्हणाला, "ए, हसायला काय झालं? मामा कोठे आहेत ते सांग आधी?"

"ओय, केव्हापासून मामा मामा लावलंय? कोण मामा,हा? त्यांच काही नाव आहे की नाही? आणि आधी माझा दंड सोड. नाही तर.. " तीही आता भयंकर रागात नाकपुड्या फुगवत डोळे मोठे करत म्हणाली.

"अरे, अभि तू कधी आलास? " मागून एका व्यक्तीचा आवाज आला तसा त्याने तिच्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकत तिचा दंड सोडला व मागे वळून त्या व्यक्तीकडे गेला. त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या व्यक्तीने त्याला भरभरून आशीर्वाद देत त्याला गळ्याशी लावून घेतले.

"आताच आलो, मामा." तो पुन्हा त्या मुलीकडे रागात बघत म्हणाला.

'अय्यो, हा बाबांना मामा म्हणाला म्हणजे बाबा याचे मामा व आई त्याची मामी. मेले आता आईजवळ याने माझी जर चुगली केली ना तर संपलं मग त्यात मी तिने सांगितलेले काम करायचे सोडून जिबली खेळत होते हे जर तिला कळलं ना, तर मग.. पळ आत चिमे ती यायच्या आत' ती मुलगी तिचे बाबा अशोक व त्या मुलाकडे बघत मनात बडबडत करत होती.

"अरे, अभिषेकराव, तुम्ही कधी आलात? " त्या मुलीची आई त्या मुलाला म्हणजे अभिषेकला म्हणाली.

तिची आई येताच सगळ्या मुली आपापल्या घरी निघून गेल्या.

"आताच आलो, मामी." असे म्हणत अभिषेक तिच्याही पाया पडला. तिनेही त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत दोन्ही हातांनी त्याची नजर काढत आपल्या कानामागे बोटे मुडपली. नंतर त्याच्या माथ्यावर ओठ टेकवत प्रेमाने हात धरून तेथील बाजावर बसवलं.

हे सगळे बघून स्मिताचे डोळे विस्फारले. आईबाबांची नजर आपल्यावर पडण्या आधी आपण इथून सटकलेले बरे असे विचार करत स्मिता दबक्या पावलांनी घरात जात होती. तर तिची आई सुवर्णाने तिला आवाज दिला.

"चिमे, पाणी आण अन् च्या ठेवं." सुवर्णाने तिला हुकुम केला.

तिने कसेबसे मान डोलावली व जाऊ लागली. जाता जाता तिने सहज अभिकडे पाहिले तो तिला चिडवत असल्यासारखं हसत होता असे तिला वाटले. तिने त्याला पाहून नाक मुरडलं आणि घरात निघून गेली.

तिला नाक मुरडलेलं पाहून त्याने डोळे वर केले,'अजब मुलगी आहे ही, नाव तर किती मजेशीर आहे हिच, चिमे.' तो मनात बडबडत करत गालात हसला.

'कोण हा अभि फभी? आई पण ना त्याच्यासमोर काय गरज होती असं हुकुम सोडायची.' इकडे स्मिताही चुलीवर चहाचं भांड चढवत मनात पुटपुटली. 

ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याला दिले व पुन्हा आत आली. तो तिच्या आईबाबांशी बोलत होता.

तिने चहा छोट्या स्टीलच्या पेल्यात गाळले व सर्व पेले एका छोट्याशा ताटात घेऊन आली. सर्वांना चहा दिला व स्वतःचा पेला हातात घेत अशोक यांच्याजवळ बसली.

अभिने पेल्यातील चहाचा एक घोट घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं. कित्येक दिवसांनी तो घरचा चहा पित होता.

'चहा मस्तच बनवते ही. मगाशी कशी लवंगी मिरची सारखी बोलत भांडत होती. पण चहात मात्र गोडवा टाकला आहे. आता मामा-मामी समोर कशी भीगी बिल्ली बनली. मला तर तिचं तोंड पाहून हसायला येतंय.' तो चहा पित मध्ये मध्ये नकळत तिच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला पाहत हसत मनात बोलत होता.

क्रमशः

भांडणातून सुरू झालेलं नातं काय वळण घेईल अभि व स्मिता यांच्या आयुष्यात? अभि कशासाठी आला असेल इथे? इतक्या दिवसांनी घरचा चहा पित आहे असे तो का मनात म्हणाला?

©️ जयश्री शिंदे

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

अष्टपैलू लेखक स्पर्धा- २०२५

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all