Login

तेरा मेरा साथ रहे भाग-६

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
शीर्षक:- तेरा मेरा साथ रहे

भाग- ६

मागील भागात:-

अभिषेक अगदी छोटा बाळ असताना त्याच्या आईचे निधन झाले. त्याच्या बहिणीची लग्न झालेली असून ते त्यांच्या सासरी नांदतात. केशव अभिचे व्यवस्थित संगोपन करत असतात.

पण अचानक एक दिवस त्यांच्या पोटात दुखू लागल्याने ते घरीच असतात. अभि त्यांना दवाखान्यात चल म्हटल्यावर ते नकार देतात.

आता पुढे:-

"आरं लेकरा, काय बी झालं नाय बघ मला. उगीच कशापायी दवादारूसाठी पैका खर्च करायचा. त्योच पैका तुझ्या शिकण्याच्या कामी येईल." ते उठून बसत त्याच्या गालाला हात लावत म्हणाले.

"अहो पण आबा.." तो पुढे काही बोलणार तोच शेजारी राहणारी भीमा घरात आली जिला तो आत्या म्हणायचा.

"केशादादा, बरं वाटतं का आता? चल ही पेज पिऊन घे, नंतर हा काढा पण पी म्हंजे तुला आराम वाटलं." भीमा त्यांच्याजवळ येत त्यांना म्हणाली.

"व्हयं, आक्का वाईज आराम हाय. दुपारी तू दिला होतंस नव्हं काढा त्यामुळे हाय बघ आराम." केशव तिला पाहत अभिकडे पाहून तिरकस नजरेने इशारा करत म्हणाले.

त्यांना काय म्हणायचे ते तिला समजले. तिने अभिला हातपाय धुवायला बाहेर पाठवले. तो बाहेर गेला तशी ती म्हणाली, "दादा, मला काय तुझं दुखणं छोटं वाटतं नाय. हे छोटं दुखणे मोठं व्हायच्या आधी तालुक्याच्या हास्पिटलात जाऊन ये. उगीच अंगावर दुखणं काढू नगसं. पोराला आधीच आय नाय, आता बाप बी नसलं तर कसं रं व्हईलं? माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नगोस. लय दिसापासून तुझं दुखण बघून म्या म्हणतिया, रं." भीमा कळवळून त्यांना म्हणाली.

"व्हयं आक्का, तू म्हणतेस ते बराबर हाय; पर अभिच्या शिक्षणाकरीता तो पैका जमवलाय म्या. ते समद माझ्यावर घालवून बसलो तर त्याचं काय मंग." केशव अभिच्या काळजीने म्हणाले.

"ते समद कळतं रे मला. तू ठीक झाला तर अजून कमवशील की?" भीमा म्हणाली.

"नाय आक्का, तेवढा येळ नाय आता माझ्याकडं. माझं काय बरंवाईट झालं तर माझ्या लेकराला अंतर देऊ नगसं. बघशील नव्हं त्याला." केशव डोळ्यांत पाणी आणतं तिचा हात हातात घेत म्हणाले.

"काय खुळ्यागत बोलाया लागलास तू? गपगुमान पेज पी अन् हा काढा बी पी, आता एक शबुद बी बोलू नगोस." ती डोळ्याला पदर लावत म्हणाली.

बाहेर असलेला अभि त्यांचे बोलणे ऐकत होता.

भीमाला पुढे थांबवत केशव म्हणाले,"आक्का, काही दिवसांपूर्वी म्या हास्पिटलात गेलो होतो. तेथे कळले की माझ्या पोटात एक गाठ हाय. डागडरांनी ते काय तरी इंग्रजीत नाव घेतलं, टुमर की काय? असंच काय तरी होतं बघ. मंग ते मला म्हणाले की माझ्याकडे जास्त दिवस न्हाईत."

ट्युमरचे नाव ऐकताच अभिचे डोळे पाण्याने डबडबले आणि त्याचा कंठ दाटून आला. दारातच तो मटकन खाली बसला. त्याचा मेंदू सुन्न झाला. त्याने  पुस्तकात त्या आजाराबद्दल वाचलं होते. त्याला अभ्यासाशिवाय इतर पुस्तकेही वाचायला आवडत होती. त्यातच एकदा शाळेच्या लायब्ररीमधील एका पुस्तकात अशा आजाराबद्दल त्याने वाचले होते.

'आपल्या बाबांना इतका मोठा आजार झाला आहे,' या विचाराने तो हळहळला. दारातच अश्रू ढाळत बसलेला तो पटकन उठून उभा राहिला व झपझप पावले टाकत आत आला आणि त्यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागला. तो अचानक असा गळ्यात पडून रडू लागल्याने केशव व भीमा गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले.

"आरं, अभि काय झालं, सोन्या? रडतोस का?" ते त्याच्या दंडाला पकडून त्याला बाजू करू पाहत होते. पण तो मात्र काहीच न बोलता त्यांना घट्ट मिठी मारून ओक्साबोक्सी रडू लागला. वयाने जरी लहान असला तरी तो खूपच समजदार होता. त्याला परिस्थितीची जाणीव होती म्हणून तो कसे असेल तसे राहायचा. कधी कोणत्या गोष्टींसाठी हट्ट करत नसायचा. त्यामुळे केशवला त्याचं खूपच कौतुक वाटायचे. आपल्या मुलाला हर तऱ्हेचे सुख देण्याचा त्यांचा आटापिटा असायचा. आपले आजारपण जर कळलं तर त्याचे अभ्यासात लक्ष लागणार नाही, हे ते जाणून होते म्हणून त्यांनी याबद्दल त्याला काहीच सांगितले नाही.

अभि खूप उशीरापर्यंत त्यांच्या गळ्यात पडून रडत होता. केशवने त्याला रडू दिले. त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू पाहत होते. पण आज अभिचे रडणे थांबतच नव्हते. नंतर केशव त्याला स्वतःपासून दूर करत दोन्ही दंड धरून त्याला म्हणाले, "काय झालं लेकरा, कशापायी रडतोस?"

"आबा, का केलंत असं?" तो उलट्या हाताने डोळ्यांतील गालांवर ओघळणारे अश्रू पुसत मुसमुसत त्यांना जाब विचारू लागला.

"काय केलं रं, म्या?" त्याच्या अशा जाब विचारण्याने ते गोंधळून भीमाकडे एकदा व त्याच्याकडे एकदा बघत म्हणाले.

"इतकी मोठी गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी वाटली नाही." तो आता थोडा चिडत त्यांचा खांद्यावरचा हात झटकून म्हणाला.

"आरं, बाबा कोणती गोष्ट तुला सांगितली? समद तर सांगतो की तुला." ते त्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाले.

"खरंच सांगताय?" तो एकटक त्यांच्या नजरेत पाहत म्हणाला.

"आऽऽ व्हयं." ते नजर झुकवत म्हणाले.

"मग घ्या माझी शपथ आणि म्हणा की तुम्ही काही नाही लपवलं." तो त्यांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत पुन्हा त्यांच्याकडे पाहत म्हणाला.

"खुळ लागलं का तुला? जा अभ्यास कर जा. काही झालं नाय मला." ते त्याच्या डोक्यावरील हात पटकन काढून घेत त्याला दरडावत म्हणाले.

क्रमशः

केशव अभिला सांगतील का त्यांच्या आजारपणाबद्दल? काय करेल तो?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all