" सुमेधा, झाला का डबा तयार?" विशालची हाक कानावर येताच लगबगीने सुमेधा डब्बा घेऊन बाहेर आली.
" नाश्ता पण तयार आहे. वाढू का?"
तिने दबकतच विचारले. लग्नाला महिना झाला तरी अजूनही आपल्या नवर्याशी बोलण्याचे धाडस तिच्यामध्ये आले नव्हते. ती म्हणजे नाजूक साजूक वेलीसारखी आणि तो एका भक्कम झाडासारखा. अगदी टॉल, डार्क आणि हँडसम. त्यात स्वतःची जीम असल्याने भरपूर कमावलेलं शरीर. ते बघूनच तिच्या आईवडिलांच्या नजरेत तो भरला होता. आईवडिलांच्या हो ला हो म्हणून तिनेही लग्नाला होकार दिला. तसा विशाल तिला आवडला होताच. पण त्याच्या व्यक्तीमत्वाची तिला भितीही वाटायची. त्यात त्याचा धीरगंभीर, अबोल स्वभाव तर हिला भरपूर बोलायची सवय. त्याच्या न बोलण्याने अजुनही त्याला काय आवडते, काय नाही हे तिला समजत नव्हते. नशीबाने तिच्या सासूबाई तिला समजून घेत होत्या. विशालच्या आवडीनिवडी, त्याचा खास आहार त्या तिला समजावत असायच्या. त्यामुळे तिला त्याची चिंता नसायची पण अचानक गावच्या जमिनीचा वाद निर्माण झाल्याने त्यांना व सुमेधाच्या सासऱ्यांना काही दिवस गावाला जावे लागले होते. आज म्हणूनच सुमेधाची धांदल उडाली होती.
आईच्या राज्यात केला तर केला स्वयंपाक नाही तर नाही. इथे आल्यापासून तिने सासूबाईंकडे धडे गिरवायला सुरुवात केली होती. आता त्याच नाहीत म्हटल्यावर स्वयंपाक कसा होणार याचे तिला खूप टेन्शन आले होते. त्यातल्या त्यात सोपे म्हणून तिने नाश्त्याला ऑम्लेट केले होते. पण ते विशालला आवडेल की नाही याचेच टेन्शन होते. विशाल मात्र तिचा उडालेला गोंधळ मिस्किलपणे बघत होता. तिने किंचित करपलेल्या ऑम्लेटवर टाकलेले ब्रेडचे तुकडे त्याने बघितले. तिला त्याची नजर समजली.
" ते चुकून ऑम्लेट थोडं करपलं." तिने स्पष्टीकरण दिले.
" मी काही बोललो?" त्याचा आवाज ऐकून ती परत गप्प झाली.
" बाहेरून काही आणायचे आहे का? म्हणजे आईबाबा नाहीत म्हणून विचारतो."
" नाही.. लागलं तर मी आणेन."
" तुला समजेल का इकडचं? "
" हो.. सासूबाईंनी नेहमीची दुकाने दाखवून ठेवली आहेत. काही लागलं तर जाईन मी."
" मग निघू मी?" विशालने विचारले. सुमेधाने मान हलवली.
" काळजी घे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. तू ही गरजेशिवाय बाहेर पडू नकोस." सूचना देऊन विशाल बाहेर पडला.
तो जाताच सुमेधाने हुश्श केले आणि जोरात गाणी लावून नाचायला सुरुवात केली.
कसे वळण घेईल विशाल आणि सुमेधाचे नाते.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा