मागील भागात आपण पाहिले की अबोल आणि गंभीर विशालची त्याच्या बायकोला सुमेधाला भिती वाटत असते. आता बघू पुढे काय होते ते.
" हॅलो, सुमे.." मी आशु बोलते आहे." सुमेधाच्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आला होता.
" ए बावळट, मोबाईलवर तुझे नाव येते म्हटलं." सुमेधा बोलली आणि दोघीही खळखळून हसल्या.
" किती दिवसांनी अशी हसते आहे माहितीय.. खूप बरं वाटलं ग तुझा फोन आल्यावर." सुमेधा बोलत होती.
" का, जिजू हसायलाही वेळ देत नाहीत वाटते.." कोपरखळी मारत आशु बोलली.
" असं नाही ग.. पण ते जास्त बोलत नाहीत. आणि त्यांना बघितलं की माझी बोलती बंद होते." सुमेधा बोलत होती.
" हो का? मग तुला अजून हसवणारी एक गोष्ट सांगते."
" लवकर सांग.."
" कोणाला सांगू नकोस. आपली ईशानी माहिती आहे ना, तिच्या भावाचे तुमच्याच शहरात घर आहे. तिथे कोणीच रहात नाही. तर आम्ही ठरवतो आहे, तिथे दोन दिवस रहायला यायचे. आणि आपल्या गावात जी मज्जा करता येत नाही ती सगळी करून घ्यायची. तुझे लग्न झाले, उद्या आमचेही होईल. मग परत कधी वेळ मिळेल कधी नाही. आम्ही तिथे आलो की तू ही ये." आशु सांगत होती.
" यायला आवडलं असतं ग.. पण सध्या सासूबाईही घरी नाही. यांच्या जेवणाचे काय?"
" तू ना एका महिन्यात टिपिकल संसारी बाई झाली आहेस.. एक दिवस तरी मॅनेज कर ना. मी बोलू का जिजूंशी?" ते ऐकून सुमेधा गडबडली.
" नको.. मी बघते." इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सुमेधाने फोन तर ठेवला. पण तिला टेन्शन आले होते की हा विषय विशालकडे कसा काढायचा? जवळजवळ महिन्याभरानंतर माहेरचे कोणीतरी भेटणार होते. आपल्या घरी कोणी आलेलं चालेल की नाही तिला अंदाज नव्हता. पण घरी बोलावण्यापेक्षा बाहेर गेलेलेच तिला आवडणार होते. तिने सासूबाईंनी दिलेल्या लिस्टमधला विशालच्या आवडीचा आणि तिला जमणार्या स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली. रात्री विशाल घरी आल्यावर आजचा मेनू बघून खुश झाला.
" हे सगळं तू केलेस? व्वा.." सुमेधाचा जीव भांड्यात पडला. दोघांचे जेवण होत आल्यावर सुमेधाने विषय काढला.
" माझ्या मैत्रिणी शनिवार, रविवार आपल्या शहरात येणार आहेत. मी गेले तर चालेल?" विशालने चमकून तिच्याकडे बघितले.
" एकच दिवस.. तुम्ही जीमवर गेलात की मी जाईन आणि यायच्या आधी परत येईनही. फक्त जेवणाचे.." सुमेधा पुढे बोलू की नको विचार करू लागली.
काय वाटते विशाल देईल परवानगी सुमेधाला बाहेर जायला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा