शीर्षक:- तेरा मेरा साथ रहे
भाग-४
मागील भागात:-
स्मिताला तिचा भूतकाळ आठवतो.
अभिषेक तिच्या समोर अनोळखी पाहुणा म्हणून येतो. ती त्याला थोडी उद्धटपणे बोलत भांडते. तिचे आईबाबा त्याचे मामा मामी होते. तो त्यांना भेटायला आला होता. ती त्याच्या पाहुणचार करते. तो चहा पित असतो.
'चहा मस्तच बनवते ही. मगाशी कशी लवंगी मिरची सारखी बोलत भांडत होती. पण चहात मात्र गोडवा टाकला आहे. आता मामा-मामी समोर कशी भीगी बिल्ली बनली. मला तर तिचं तोंड पाहून हसायला येतंय.' तो चहा पित मध्ये मध्ये नकळत तिच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला पाहत हसत मनात बोलत होता.
आता पुढे:-
चहा पाण्यानंतर अशोकने अभीची खुशाली विचारली.
"काय मग अभि, अचानक कसे काय येणं केलेस?"
तो म्हणाला,"लक्ष्मीमावशीला भेटायला आलो होतो तसेच जाता जाता तुम्हालाही भेटावं वाटलं म्हणून आलो. अरेच्चा! एक मिनिट विसरलोच. थांबा आलोच."
त्याला काही तरी आठवलं तसे तो कपाळावर हात मारून घेतला.
अशोक, सुवर्णा आणि स्मिता गोंधळून पळत जाणाऱ्या त्याला पाहू लागले.
तो पळत अंगणात असलेल्या कडूलिंबूच्या झाडाखाली लावलेल्या सायकलच्या हँडलला अडकलेली छोटीशी पिशवी घेऊन तो पुन्हा त्यांच्याजवळ आला.
ती पिशवी त्यांच्यासमोर करत कचरत म्हणाला, "मामा, ही थोडीशी करवंद आणली आहेत. सध्या माझ्याजवळ देण्यासाठी जास्त काहीच नाही."
"अरे, याची गरज नव्हती रे, बाळा. तू आलास यातच सगळं आलं." त्याचा उदास चेहरा पाहून अशोक ती पिशवी घेत म्हणाले.
"मामा, आबा मला नेहमी म्हणायचे की कोणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यांचे बोलणे लक्षात आले. मग वाटेत करवंद दिसली जी मला परवडणारी होती म्हणून घेऊन आलो." तो ओशाळून त्यांना म्हणाला.
"अरे वा! करवंद आम्हाला खूप आवडतात. बरं केलेस तू आणलेस." अशोक असे म्हणताच अभिची कळी खुलली.
त्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून अशोकच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हसू पसरलं.
" व्हयं व, समद्यांना लय आवडतात बघा करवंद. आमच्या चिमीला तर लयच आवडतात." सुवर्णा पिशवी हातात घेऊन त्यातील एक करवंद तोंडात घालत म्हणाली.
"मला आवडतात म्हणते आणि स्वतःच तोंडात घातलं, ही आईपण ना." स्मिता तिच्या तोंडाकडे बघत ओठात पुटपुटली.
"मस्त, गोड हायती." सुवर्णा अभिकडे बघत डोळे मिचकावत हसत म्हणाली.
त्याच्या ओठाची कमान रूंदावली.
"चिमे, एकटीच काय बडबडीस. चल आत. भाकरी कालवणाचं बघू. अभि, आता तुम्ही जेवूनच जा." सुवर्णा आधी थोडं वैतागलेल्या आवाजात स्मिताकडे व नंतर पुन्हा अभिकडे मोर्चा वळवत म्हणाली.
"अम्म, नाऽऽही नको मामी, जेवणाचे वगैरे घाट घालू नका. जेवायला नंतर येतो. आता इथेच म्हणजे याच गावात पुढचं शिक्षण घेणार आहे तर येणं जाणं होणारच ना." अभि उठून उभा राहत म्हणाला.
"अस्स, होय मग लय बेस झालं की. इथंच राव्हा आता आपल्या घरी." किशोर त्याचा हात हातात घेत म्हणाले.
"माफ करा मामा, मी इथे नाही राहू शकत. स्काॅलरशिपमधून मला वसतिगृहात सरकाराकडून राहण्याची सोय करण्यात आली आहे." तो नम्रपणे नकार देत म्हणाला.
स्मिता त्याचे बोलणे थोड्या अंतरावरून ऐकत होती.
त्याचे नम्र व निग्रही बोलणे तिला वेगळंच वाटले.
त्याचे नम्र व निग्रही बोलणे तिला वेगळंच वाटले.
"हुशार दिसतोय, तेव्हाच स्काॅलरशिप मिळाली असेल; पण असा कसा हा बाबांना नाही मला म्हणाला, खडूस, अकडू कुठला? बरं झालं सुंटी वाचून खोकला गेला म्हणायचं. आता ही आई अजून आग्रह करू नये म्हणजे झालं. कधीपासून बघतेय हिला या अभि फभीचा भारीच पुळका येतोय." स्मिता नाक मुरडत तिरप्या नजरेने त्याच्या पाहत मनात म्हणाली.
"आवं पर, आज जेवून जा ना. नंतरच तर यालच की. एक तर इतक्या वर्षांनी आलात अन् " सुवणाचे बोलत होतीच ते तोडत तो मधेच म्हणाला, "मामी, खरंच माफ करा मला. नाही थांबू शकत मी. तस तर मावशीकडे थोडंफार खाणं झालंय माझं. अभ्यास पण करायचा आहे जाऊन. जास्त जेवलो की झोप येईल. आता रात्रपण होईल तेव्हा वेळेत जायला हवं ना वसतिगृहात."
स्मिता जसे आईबद्दल मनात म्हणाली तसे सुवर्णाला म्हणाली म्हणून तिने मनातच कपाळावर हात मारून घेतला. पण पुन्हा अभिचे बोलणे ऐकून तिला हायसं वाटलं.
"बरं, तुमच्या अभ्यासाच्या आड नाय येणार आम्ही. पर जवा बी मन करेल तवा या बघा. तुमचंच घर समजा, अगदी हक्कानं या. तवा जेवल्याबिगार नाय पाठवायची म्या." सुवर्णा त्याच्या तोंडावर हात फिरवत म्हणाली.
"हो, कबूल. चला येतो." असे म्हणत अभिषेक त्यांचा आशीर्वाद घेऊन निरोप घेतला.
पण जाता जाता एक कटाक्ष स्मितावर टाकायला विसरला नाही. जे स्मिताला थोडं वेगळं वाटलं. तिनेही जबरदस्ती एक मेंटासवाली स्माईल करत तिच्या आईबाबांच्या नकळत जीभ बाहेर काढून चिडवले.
तो बघून न बघितल्या सारखे करून सायकलवर टांग मारून निघून गेला.
तो लांब जाईपर्यंत सगळे बघत होते. तेव्हा स्मिताचा मोठा भाऊ राजन जो साखर कारखान्यात काम करत होता तो आला.
"कोण आलं होतं, बाबा?" अभि गेलेल्या दिशेने पाहत तो म्हणाला.
"तुझ्या राणीआत्या व केशवमामाचा मुलगा अभि." अशोक म्हणाले.
"काय अभ्या आला होता?" तो खुशीत मोठ्याने म्हणाला.
"मच, आह ऽऽ नाही त्याचं भूत आलं होतं. काय रे, ए दादू, किती मोठ्याने ओरडलास, कान फुटले ना माझे?" स्मिता कानात बोट घालत वैतागलेल्या स्वरात म्हणाली.
"ए झिपरे, गप्प बस. बघू कुठे कान फुटला तुझा?" तो तिचा कान पकडत म्हणाला.
"आऽऽ आऽऽ दादू , कान सोड माझा." ती कानाला पकडूत विव्हळत म्हणाली.
"आल्या आल्या सुरू झालं का तुमचं?" सुवर्णा रागाने त्या दोघांना म्हणाला.
तसे दोघे शांत झाले. पण थोडाच वेळ पुन्हा त्यांची तू तू मैं मैं सुरू झाली.
"चिमे, अगं त्या अभिकडून शिक जरा. कसं वागायचं बोलायचं ते. आईवडील नायती. पर पोरगं किती गुणाचं हाय." सुवर्णा असे म्हणताच दोघांनी तू तू मैं मैं थांबवली.
स्मिता तर एकदम गप्प झाली. अभिला आईवडील नाहीत हे ऐकून तिला वाईट वाटलं.
क्रमशः
काय झालं होतं अभिच्या आईवडिलांना?
©️ जयश्री शिंदे
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा- २०२५
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.