द अफेअर: टेल ऑफ सिक्रेट्स (अंतिम भाग) (भाग-पाच)

कैफियत नात्यांची
रवीचे बोलून झाल्यावर दुसऱ्याच क्षणाला एकता आरोहीला म्हणाली, " तुझ्या या कारकिर्दीविषयी ऐकून त्या क्षणी कशी प्रतिक्रिया द्यावी, हेच कळले नाही आम्हाला. तू लहान होतीस अगदी तेव्हापासून आम्ही तुला प्रेम करायला शिकवलं पण स्वतःचं प्रेम लादायला कधीच शिकवलं नाही. सरतेशेवटी तू मात्र तेच केलेस. तू स्वतःच्या स्वार्थासाठी एवढी निष्ठूर झालीस की तुला योग्य-अयोग्याची जणू जाणच राहिली नाही. तू चक्क आकर्षणामुळे तुला प्रिय असणाऱ्या युहान सरांचा संसार मोडायलाही मागेपुढे पाहिले नाही. "

" आरोही, तुझे युहान सर समजूतदार आहेत आणि त्यांना त्यांच्या संसाराची जाणीव आहे म्हणून ते सरळ तुझ्या आई-बाबांकडे आले पण त्यांच्याऐवजी इतर कुणी असते तर नक्कीच तुझा फायदा घेतला असता. " विदिशा कोठारे आरोहीला उद्देशून बोलल्या. आरोहीने त्यांच्याकडे पाहिले आणि तिला स्वतःचीच लाज वाटली व दुसऱ्याच क्षणाला तिच्या डोळ्यात पाणी साचले.

" सॉरी मॅम. " आरोही रडतच उत्तरली.

" सॉरी हा शब्द महत्त्वाचा आहे पण योग्य वेळी बोलला गेला तरच त्या शब्दाला महत्त्व प्राप्त होतं, नाहीतर पश्चात्तापाऐवजी हातात काहीच शिल्लक राहत नाही. " विदिशा कोठारे गांभीर्याने बोलल्या.

" तुला माहीत आहे आरोही, तुझ्यामुळे आम्ही आमच्या डॅडवर संशय घेतला आणि तुझ्या हट्टामुळेच आमच्या मॉम-डॅडच्या प्रेमळ नात्याची ताटातूट होणार होती. " लक्ष्य आणि इरा एकत्रच बोलले पण त्यांच्या शब्दांचा संदर्भ आरोहीला लागला नाही.

" हं? तुमचे मॉम-डॅड? " आरोहीच्या कपाळावर आठ्या पसरल्या होत्या.

" अजूनही कळलं नाही का? लक्ष्य आणि इरासोबत आमचे कोणतेही अनैतिक नाते नाही. ते दोघे तुझ्या युहान सरांची मुलं आहेत. " रवी खुलासा करत बोलले.

" काय? " आरोहीला परत आश्चर्याचा धक्का बसला.

" हो. जेव्हा युहान सर आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला तुझा पराक्रम सांगितला तेव्हा आम्ही फार संतापलो होतो पण तुला वठणीवर आणणेही तेवढेच गरजेचे होते म्हणून आम्ही एक योजना आखली. आम्ही मुद्दाम युहान सरांना विनंती केली तुला खोटा होकार कळवण्याची. ते आधीपासूनच विरोधात होते पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स केले आणि त्यांनी नाईलाजानेच आमच्या प्रस्तावाला स्वीकृती देत तुझ्या प्रेमाचा खोटा स्वीकार केला.

आम्हाला लगेच पाऊल उचलून तुझ्या संशयाला खतपाणी घालायचे नव्हते म्हणून दोन आठवड्यांनी आमची योजना एक्झिक्युट करण्याचं ठरलं पण त्याच दरम्यान युहान सरांना सरप्राईज व्हिजिट द्यायला आलेल्या मिसेस विदिशा कोठारे आणि युहान सरांच्या मुलांनी अर्थात लक्ष्य-इराने तुम्हाला एका कॅफेत मिठी मारताना पाहिले. ते पाहून अर्थातच त्यांचा गैरसमज झाला आणि मिसेस कोठारे व लक्ष्य-इराच्या मनात युहानप्रती चीड निर्माण झाली.

त्या तिघांनी तू कॅफेतून घरी गेल्यावर युहान सरांना गाठले. त्या वेळी नको नको ती बोलणी युहान सरांना ऐकावी लागली पण आम्हीही त्या कॅफेत होतोच म्हणून प्रकरण चिघळायला लागताच आम्ही स्पष्टपणे मिसेस कोठारे आणि लक्ष्य-इराचा गैरसमज दूर केला. तुझ्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला माफ केले व लक्ष्य-इरा स्वेच्छेने आमच्या योजनेत सामील झाले आणि अशा रितीने आम्ही सगळ्यांनी प्रेम, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसारखे प्रकरण जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती करतात तेव्हा प्रत्यक्षात काय वाटतं, ह्याची प्रचिती तुला करवून दिली. " एकताने स्पष्टीकरण दिले पण ते ऐकून आरोही आ वासून पाहतच राहिली.

" ह्याचा अर्थ तुम्ही दोघे डिव्होर्स घेणार नाहीत ना? तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही ना? तुमच्या मनात लक्ष्य-इराविषयी कुठलेही आकर्षण नाहीये ना? " आरोहीने रडतच रवी-एकताला विचारले.

" मुळीच नाही. लक्ष्य-इरा आमच्यासाठी तुझ्याप्रमाणे आहेत गं! " रवी आरोहीच्या डोक्यात हळूच टपली मारत म्हणाले.

" काळजी करू नकोस आरोही. तू जो विचार केलास त्यापैकी काहीच घडणार नाहीये. ना आता, ना भविष्यात. इट वॉज प्री-प्लॅन्ड टू मेक यु अंडरस्टॅंड युअर मिस्टेक्स. " लक्ष्य म्हणाला.

" ह्म्म. तू आमचा पाठलाग करत होतीस याची कल्पना होती आम्हाला म्हणून आम्ही मुद्दाम ते रटाळ डायलॉग्स बोलून तुला खात्री पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो पण प्रत्यक्षात त्यातला एकही शब्द खरा नव्हता. त्यामुळे तू निश्चिंत राहा कारण आम्ही तुझ्या आई-वडिलांचं नातं विखरू देणार नाही पण तू सुद्धा प्रॉमिस कर की तुझ्या भावना तू आमच्या डॅडवर लादणार नाहीस. तुझ्याप्रमाणे आम्हालाही आमच्या मॉम-डॅडचं नातं प्रिय आहे म्हणून तुझ्यामुळे त्यात कुठलाही अडथळा निर्माण होऊ देऊ नकोस आणि प्लीज प्रेमाचा अर्थ समजून घे. " इरा कळकळ व्यक्त करत बोलली.

" हो, मला माझी चूक लक्षात आली. मला माफ करा तुम्ही सर्वजण. प्रेमाचा अर्थ ठाऊक असूनही मी अशी वागले. सर, तुम्हाला फार हर्ट केले मी. आत्महत्या करण्याची धमकी देऊन मी तुमच्याकडून होकार वदवून घेतला पण त्याला जरासाही प्रेमाचा लवलेश नव्हता, हे मला कळलं होतं आधीच तरीही मी या भ्रमात होती की कदाचित हळूहळू तुम्हाला तुमच्या वाईफचा विसर पडेल कारण तुम्ही या शहरात एकटे राहत होते.

विदिशा मॅम आणि तुमची मुले वेगळ्या शहरात राहत होते त्यामुळे एकांताला कंटाळून अनपेक्षितपणे तुम्ही माझ्यावर प्रेम करायला लागणार, ही भ्रामक परिकल्पना माझ्या डोक्यात थुईथुई नाचत होती पण तो माझा निव्वळ गैरसमज होता, ह्याची जाणीव आता होतेय. आय ॲम सॉरी सर. " आरोहीने लगेच डॉ. युहान कोठारेंचे पाय पकडून माफी मागितली.

डॉ. युहानने तिला उभे केले आणि तिची समजूत काढत ते म्हणाले, " इट्स ओके आरोही. उशीर होण्याआधी तुला तुझी चूक लक्षात आली, ह्यातच माझे समाधान आहे पण यापुढे मी अपेक्षा करतो की तू अशी कुठलीही चूक परत करणार नाहीस. "

डॉ. युहान तिच्याकडे आशेने पाहत होते. तेवढ्यात आरोही त्यांना वचन देत म्हणाली, " आय प्रॉमीस, मी परत असे काहीच करणार नाही आणि तुमचा आदर्श घेत आधी फक्त करिअरकडे लक्ष देईल. "

" गुड. आता माझ्या गैरहजेरीतही तू वाट भटकणार नाहीस, याची खात्री पटली मला. " डॉ. युहान बोलले.

" गैरहजेरीतही म्हणजे? तुम्ही कुठे चाललात सर? " आरोहीने लगेच विचारले.

" माझं ट्रान्सफर झालंय. " डॉ. युहान हसत बोलले.

" सर माझ्यामुळे तुम्ही दुसरीकडे जात आहात का? " आरोहीने पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले.

" सुरुवातीला तेच कारण होते पण आता तसे काहीच नाही. मला आता माझ्या बायको आणि मुलांजवळ स्थायिक राहायचे आहे म्हणून मी माझा संसार जिथे थाटला आहे त्या शहरात शासनाला ट्रान्सफर मागितले आणि यंदा ते मला मिळाले. काळजी करू नकोस, तुला कधीही गरज लागली तर हक्काने सांग. मी पत्ता देवून ठेवला आहे तुझ्या बाबांकडे. कधीही ये. बरं, आता येतो आम्ही. " डॉ. युहान निरोप घेत म्हणाले.

" सॉरी सर. " आरोही रडतच म्हणाली.

" माफी बरीच मागितलीस. आता हस आणि हसून निरोप दे आम्हाला. शिवाय कुठेही जात नाहीये मी. वरचेवर आपली भेट होत राहीलच, फक्त तू भेटायला येशील ना? " डॉ. युहान हसत म्हणाले आणि आरोहीने हसत मान डोलावली.

काही वेळाने लक्ष्य-इरा, डॉ. युहान आणि विदिशा कोठारे जाताच आरोहीने एकता व रवीचीही माफी मागितली. त्यांनी आरोहीचे आधी कान खेचले पण नंतर लगेच माफ केले. तत्पूर्वी त्यांनी तिला योग्य समज दिली, हे ही तेवढेच खरे! अशाप्रकारे आई-वडिलांच्या विवाह-बाह्य नातेसंबंधामागील खरे रहस्य उलगडताच आरोहीला तिची चूक लक्षात आली अन् तिने त्यातून बोध घेऊन नवी सुरुवात केली.

समाप्त.

🎭 Series Post

View all