द अफेअर: टेल ऑफ सिक्रेट्स (भाग-चार)

कैफियत प्रेमाची
आरोहीला पाहताच रवी-एकताने एकमेकांकडे पाहिले आणि त्यानंतर तिच्याकडे पाहतच ते तिला एकत्रच विचारपूस करत म्हणाले, " आरू, तू इथे? तू गोव्याला गेली होतीस ना? "

" ते महत्त्वाचं नाहीये सध्या. आई-बाबा, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही डिव्होर्स घेत आहात ते देखील तात्पुरत्या आकर्षणाला भाळून? " आरोही रवी-एकताला जाब विचारू लागली.

" हो आम्ही घटस्फोट घेत आहोत पण हे तात्पुरते आकर्षण नाही. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. " एकता ठामपणे बोलली.

तिला दुजोरा देत रवी म्हणाले, " हो, तुझ्यापेक्षा चार उन्हाळे-पावसाळे जास्तच पाहिले आहेत आम्ही; त्यामुळे प्रेम व आकर्षणातला फरक आम्हाला चांगलाच कळतो. "

" हो नक्कीच असेल तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव पण सध्या तुम्ही चुकीचे वागत आहात. ॲटलीस्ट ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे त्यांचे वय तुमच्या मुलीएवढे आहे, हे तरी बघा. हे प्रेम नाही आकर्षण आहे आई-बाबा, प्लीज थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. " आरोही काकुळतीने रवी-एकताची समजूत काढत बोलली.

" प्रेमाला वयाचं बंधन नसतं. " एकता आरोहीच्या मताचे खंडन करत बोलली.

" शिवाय काय फरक पडतो की आमचे वय जास्त आहे आणि लक्ष्य-इराचे कमी? वी आर इन लव्ह विथ इच अदर, दॅट्स ओन्ली मॅटर. " रवी तटस्थ स्वरात म्हणाले.

" शी! आज मला लाज वाटतेय तुम्हाला आई-बाबा बोलायची. ज्याला तुम्ही प्रेम म्हणत आहात त्याला 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर' म्हणतात. आकर्षण व मोहाला बळी पडून तुम्ही दोघे शाश्वत प्रेमाला विसरत आहात. " आरोही जळजळीत कटाक्षाने रवी आणि एकताकडे पाहत बोलली.

" ओह! जाणतेस ना प्रेम आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची व्याख्या? कळतो ना तुला आकर्षण आणि शाश्वत प्रेमातला फरक? मग तुझ्या नि तुझ्या बॉयफ्रेंडच्या नात्याला जगमान्य भाषेत काय म्हणतात, हे ही तुला ठाऊक असेलच? " एकता तावातावात बोलली पण तिचे शब्द ऐकून आरोहीचे डोळे विस्फारले.

तेवढ्यात रवी म्हणाले, " ह्या क्षणी तुला आमची लाज वाटतेय कारण आम्ही आमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्तींवर प्रेम केलंय आणि आम्ही सांसारिक असूनही आमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्तींशी अफेअर केलंय पण मग तुझा बॉयफ्रेंड काय वेगळं करतोय? तुझ्या बॉयफ्रेंडच्या लेकरांना नसेल का वाटत आपल्या बापाची लाज? आणि ज्याप्रमाणे तुला आमची लाज वाटतेय त्याप्रमाणे आम्हालाही वाटत नसेल का आमच्या लेकीची लाज? कारण तिचे प्रेमाच्या नावाखाली चक्क एका विवाहित पुरुषाशी संबंध आहेत! "

" म्हणजे? तुम्ही दोघे काय बोलत आहात? " आरोही काहीशी स्तब्ध झाली होती; त्यामुळे तिने गोंधळूनच विचारले.

" आम्ही तेच बोलतोय जे तू ऐकायला हवं. आम्हाला माहिती आहे की तुझा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कुणी नसून तुझे शिल्पकलेचे प्रोफेसर, मिसेस विदिशा कोठारे यांचे पती डॉ. युहान कोठारे आहेत. " दाराकडे इशारा करत एकता बोलली आणि तेवढ्यात एक जोडपे उंबरठा ओलांडून त्या खोलीत आले.

आरोही त्या दोघांकडे काही क्षण डोळे विस्फारून पाहत होती. तेवढ्यात एकता त्या जोडप्याकडे पाहत म्हणाली, " या, युहान सर आणि मिसेस विदिशा कोठारे. "

त्या दोघांनी अर्थात डॉ. युहान आणि सौ. विदिशा कोठारेंनी दीर्घ श्वास घेत हात जोडून नमस्कार केला. आरोहीची त्या क्षणी दातखिळी बसली होती. ती आई-वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत म्हणाली, " आई-बाबा, मी... ते... "

" स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाही. तुझं जे वय आहे त्या वयात होतात काही चुका कळत-नकळत. होते गल्लत प्रेम आणि आकर्षणाची. वाटतं की असावा आपलाही प्रियकर आणि त्याच्यासाठी लावावी जीवाची बाजी व हे वाटण्यात काही गैर सुद्धा नाही पण प्रेम आणि आकर्षण यात पुसटशी रेघ आहे. ती जाणून घेतल्यावरच प्रेम करायला हवं.

कदाचित तुला ती रेघ दिसली नसेल. प्रेम आणि आकर्षणातला फरक कळला नसेल पण तुझ्या प्रोफेसरकडून ही अपेक्षा नव्हती. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो पण इथे एक शिक्षकच विद्यार्थिनीची दिशाभूल करतोय. तिला आकर्षण आणि प्रेमातला फरक न सांगता तिच्या भ्रमाला खतपाणी घालतोय. शी! याला शिक्षक म्हणतात का? शिक्षक असून असे वागणे कितपत योग्य आहे? " रवी आरोहीकडे पाहत बोलले आणि आरोहीची मान आपोआप खाली गेली.

तेवढ्यात एकता चढ्या आवाजात डॉ. युहान कोठारेकडे पाहत म्हणाली, " सांगा ना, डॉ. युहान. बोला, आता का गप्प आहात? एक शिक्षक असूनही तुम्ही का वागलात असे? का फसवणूक केलीत माझ्या लेकीची? का तिला बळजबरी केली तुमच्या या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी? "

" आई-बाबा, सरांना काही बोलू नका. " आरोही थरथरतच बोलली.

" का? " एकता आणि रवीने एकत्रच विचारले.

" कारण त्यांनी काहीच केलेले नाही. त्यांनी माझ्यावर बळजबरी केलेली नाही; याउलट माझंच त्यांच्यावर एकतर्फी प्रेम होतं आणि मीच त्यांना माझं प्रेम स्वीकारायला बळजबरी केली. " आरोहीने घट्ट डोळे मिटून कबुली दिली. त्यानंतर रवी आणि एकताची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिने सावकाश डोळे उघडले व ती नजर वर करून त्या दोघांकडे चाचरतच पाहू लागली.

आरोही एकता व रवीकडे पाहत होती पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेही आश्चर्यकारक हावभाव नव्हते ते पाहून आरोही गोंधळली आणि प्रश्नार्थक स्वरात म्हणाली, " काय झालं? तुम्ही दोघे काहीच का बोलत नाही आहात? तुम्ही असे का रिॲक्ट करत आहात की जसे तुम्हाला हे आधीच माहिती होते? "

" कारण आम्हाला हे आधीपासून माहिती होतं. " रवी आणि एकता एक सुरात बोलले.

" काय? " आरोहीने भुवया उंचावून विचारले.

" हो, बरोबर ऐकलेस तू. ॲक्च्युली, ज्या दिवशी तू युहान सरांना तुझ्या एकतर्फी प्रेमाची कबुली देत तुझ्या प्रेमाचा स्विकार करण्यासाठी त्यांच्यावर बळजबरी केलीस त्या दिवशी त्यांनी तुला विचार करण्यासाठी वेळ मागितला आणि तू एक दिवसांचा वेळ दिलास. तीच संधी साधून युहान सरांनी आम्हा दोघांना गाठले आणि आम्हाला इत्थंभूत प्रकरण सांगितले. " रवी खुलासा करत बोलले आणि ते ऐकून आरोही अगदीच थक्क झाली.

क्रमशः

🎭 Series Post

View all