द अफेअर: टेल ऑफ सिक्रेट्स (भाग-एक)

कैफियत प्रेमाची अन् प्रेमळ नात्यांची
आरोही तिच्या प्रियकराच्या कारमध्ये बसून प्रवास करत होती. थोड्याच वेळात ती तिच्या घराजवळ पोहोचली पण तिने तिच्या प्रियकराला त्याची कार अलिकडेच थांबवण्यास सांगितले आणि त्यानंतर तिने त्याचा निरोप घेतला. तिचा प्रियकर तेथून जाताच ती सावकाश डोलतच आपल्या घरी जाऊ लागली. ती काहीच वेळात एका बंगल्यापुढे उभी राहिली.

भलेमोठे फाटक उघडून ती आत गेली. अंगणही बरेच मोठे होते आणि अंगणात बरेच वृक्ष लावलेले होते त्यामुळे आरोही त्या परिसराचे निरीक्षण करतच बंगल्याकडे जाऊ लागली. त्याच दरम्यान तिची नजर एकाएकी बंगल्याकडे गेली. तेथे तिला तिची आई एकता एका दुचाकीवरून खाली उतरताना दिसली. एकताला पाहून ती थोडीशी गोंधळली, तिच्या कपाळावर आठ्या देखील पसरल्या व ती आंब्याच्या झाडाजवळ उभी राहून एकताचे आणि दुचाकीवर स्वार असलेल्या तरुणाचे निरीक्षण करू लागली.

आरोहीला लिप रिडींग अर्थात ओठांच्या हालचालींवरून मूळ संवादाचा अर्थबोध होत असायचा. थोडक्यात व्यक्ती बऱ्याच अंतरावर उभी असेल तरीही ती त्यांचे संवाद त्यांच्या ओठांच्या हालचालींच्या आधारे अचूकपणे ओळखत होती. त्यादिवशीही नकळत तिने एकताचा आणि त्या अनोळखी तरुणाचा संवाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती जसजसे त्यांच्या ओठांच्या हालचाली निरखून पाहत होती तसतसे तिच्या भुवया उंचावल्या जात होत्या. तो संवाद ओळखल्यावर काही क्षणांकरिता आरोही सुन्न झाली होती.

ती स्वतःशीच बडबड करत म्हणाली, 'नक्की ही काय भानगड आहे? मी जो संवाद ओळखला तो खरा आहे की मी काहीही अंदाज बांधतेय? मला वाटतं, मी उगाच नको ते विचार करतेय. त्यापेक्षा मी एक काम करते. मोबाईलचा कॅमेरा झुम करून मी त्यांचा व्हिडिओ काढते आणि त्यानंतर त्यांच्या ओठांच्या हालचाली नीट टिपून नेमका संवाद जाणून घेईल.'

आरोहीने मनातल्या मनात विचार करून खिशातून मोबाईल काढला व व्हिडिओ मुद्रित (रेकॉर्ड) करायला सुरुवात केली. व्हिडिओ करून झाल्यावर आरोहीने मोबाईल परत खिशात ठेवला व तिने एकताकडे पाहिले. तेवढ्यात एकताने त्या तरुणाला घट्ट मिठी मारली आणि त्या तरुणाच्या गालावर प्रेमळ स्पर्श करून ती त्याच्याकडे काही क्षण एकटक पाहत राहिली. एकताचे ती वर्तणूक पाहून आरोहीला घाम फुटत होता.

" लक्ष्य, आता तू जा. माझी लेक काही वेळात येईलच. तिने तुला पाहिले तर उगाच सीन क्रिएट होईल. " एकता थोडीशी चढ्या आवाजात त्या तरुणाचा निरोप घेत बोलली. त्यामुळे ते शब्द अनायासे आरोहीला स्पष्टच ऐकू गेले आणि ते शब्द ऐकून ती काहीशी अचंबित झाली.

तेवढ्यात तो तरुण अर्थात लक्ष्य एकताला उद्देशून म्हणाला, " पण आपल्याला हवा तसा एकांत कधी मिळेल? आय मिस यु सो मच. हे असं चोरून-लपून भेटणं मला नाही पटत यार. आपण प्रेम केलंय पाप नाही. "

" शुश! हळू बोल. कुणी ऐकले तर! " एकता लक्ष्यच्या ओठांवर तर्जनी ठेवून इकडे तिकडे नजर फिरवून म्हणाली. दुसरीकडे एकताची दिशाभूल करत आरोही लगेच झाडाच्या मागे लपली. त्यानंतर एकता परत लक्ष्यकडे पाहायला लागताच आरोही हलकीशी डोकावून त्यांच्याकडे पाहायला लागली.

त्याच दरम्यान लक्ष्य म्हणाला, " हं! ऐकतात तर ऐकू दे. मला काही घेणं-देणं नाही. माझ्यासाठी तू, मी आणि आपलं नातं महत्त्वाचं आहे. दॅट्स इट. "

" हो रे माझ्या राजा! मला कळतोय तुझा आर्जव पण एवढ्यात नाही ना करायचं सगळं. " एकता लक्ष्यची समजूत काढत म्हणाली.

" तू नेहमीच असं म्हणतेस. हे बघ, मी यावेळी सिरीयस आहे. आपण यावेळी सोक्षमोक्ष लावूच. तुझ्या नवऱ्याला आपल्या नात्याबद्दल सांगू आणि निकाल लावून टाकू. त्याला स्पष्टपणे सांगू की पोटगी म्हणून काही नको. आपण दोघे कमवायला सक्षम आहोत त्यामुळे त्याने तुला घटस्फोट देऊन विषय संपवावा. " लक्ष्य काकुळतीने बोलत होता.

" हो बोलू आपण या विषयावर रवीसोबत लवकरच. " एकता दुजोरा देत म्हणाली.

" पण कधी? " लक्ष्यने ओठांचा चंबू करून विचारले.

" दोन दिवसांनी आरोही तिच्या बॉयफ्रेंडसोबत गोवा ट्रिपला जातेय. त्यामुळे मला वाटतं आपण त्याच दिवशी रवीला कन्फ्रंट करुया. " एकता लक्ष्यचा हात हातात घेत बोलली.

दुसरीकडे आरोही आ वासून पाहत राहिली आणि आपोआप त्याक्षणी तिचे हात तिच्या ओठांवर गेले. आयुष्यात पहिल्यांदाच असे काहीतरी ती अनुभवत होती म्हणून त्या क्षणी कशी प्रतिक्रिया द्यावी, हे ही तिला नीटसर कळत नव्हते. त्याक्षणी अक्षरशः तिचे त्राण गळून पडले होते तरीही ती बळ एकवटून त्यांचा संवाद ऐकत होती.

दरम्यान लक्ष्य त्याच्या मनातील शंका व्यक्त करत एकताला म्हणाला, " पण तुझ्या नवऱ्याने घटस्फोट द्यायला नकार दिला तर? "

" अं... डोन्ट वरी, यावेळी मी तयारीनिशीच सगळं काही करणार आहे. मी बॅकअप प्लॅन रेडी ठेवला आहे. समजा, आपल्या नात्याविषयी सर्व जाणून घेतल्यावरही रवीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिला तर मी स्वतःच त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवणार आणि न्यायालयात खोटी कबुली देईल की रवी हल्ली माझ्यावर प्रेम करत नाही किंवा आमच्या नात्यातला गोडवा कमी झाला आहे. यासारखे कारणे दिली की हल्ली लवकर घटस्फोट मिळतो म्हणून तू काळजी करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी करते नीट सगळं. ओके शोना? " लक्ष्यचा चेहरा ओंजळीत घेत एकता बोलली.

" ठीक आहे. तू म्हणशील तसेच करायला मी तयार आहे; कारण माझा तुझ्यावर आणि तुझ्या प्लॅनवर पूर्ण विश्वास आहे. " लक्ष्यने एकताच्या हाताचे चुंबन घेत प्रत्युत्तर दिले. त्यांचे ते प्रेमचाळे पाहून आरोहीच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जात होती.

" ह्म्म गुड. आता तू जा. आरोही येईलच एवढ्यात. " लक्ष्यचा निरोप घेत एकता बोलली.

" बरं, बाय. काळजी घे. लव्ह यु. " लक्ष्य डोळे मिचकावून म्हणाला.

" हो बाय, नीट जा. घरी पोहोचल्यावर कळव. लव्ह यु टू. " एकता लाजतच उत्तरली पण आरोहीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले.

थोड्याच वेळात लक्ष्यने दुचाकी सुरू केली व तो अंगणाच्या बाहेर गेला आणि एकता लाजतच व गालातल्या गालात हसत बंगल्याच्या आत गेली. दरम्यान लक्ष्य जाताच आरोहीने अश्रू पुसले. स्वतःच्या भावनांवर संयम साधला व दीर्घ श्वास घेत ती बंगल्यात शिरली.

क्रमशः

🎭 Series Post

View all