द अफेअर: टेल ऑफ सिक्रेट्स (भाग-तीन)

कैफियत प्रेमाची
पाठलाग करत असताना आरोहीच्या वडिलांची कार एका कॅफेजवळ थांबली. कार मोकळ्या जागेत पार्क केल्यानंतर कारमधून एक तरुणी व एक पुरुष बाहेर आले आणि ते एकमेकांच्या हातात हात गुंफून कॅफेच्या आत गेले. त्यांच्या लागोपाठ आरोही देखील तिथे पोहोचली आणि तिनेही थोड्या अंतरावर योग्य ठिकाणी तिची दुचाकी ठेवली.

त्यानंतर त्या दोघांना पाहताच आरोही म्हणाली, 'बाबा? पण ते इथे काय करत आहेत? आणि ही मुलगी कोण आहे? शिवाय ते दोघे हातात हात गुंफून कॅफेच्या आत का गेले?'

विचार करतच आरोहीने हेल्मेट काढून डिक्कीत ठेवले. त्यानंतर चेहऱ्याला ओढणी बांधून व डोळ्यावर काळा चष्मा लावून मुद्दाम ओळख लपवण्याचा प्रयत्न करत ती पळतच कॅफेच्या आत शिरली पण कॅफेच्या आत जाताच ती थोड्या अंतरावर असलेल्या खुर्चीवर बसली आणि तेथून तिने तिच्या वडिलांना फोन केला. त्यांनी काहीच वेळात कॉल उचलला पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या तरुणीला शांत राहण्यास सांगितले.

आरोहीला तिच्या जागेवरून तिच्या वडिलांची प्रत्येक हालचाल स्पष्ट दिसत होती म्हणून क्षणाक्षणाला तिचा संताप होत होता परंतु कॉलवर नम्रपणे बोलत ती म्हणाली, " हॅलो बाबा, तुम्ही कुठे आहात? मला तुमच्याकडे काम होतं. तुम्ही भेटू शकता का? "

" काय झालं बाळा? काही अर्जंट आहे का? सायंकाळी बोलता येईल की आपल्याला मी घरी आल्यावर. " तिचे वडील बोलले.

" बाबा, खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं होतं आणि घरी नाही बोलता येणार या विषयावर म्हणून मला तुम्हाला आता भेटायचं होतं. मी येऊ का तुमच्या ऑफिसमध्ये? फ्री आहात का तुम्ही? " आरोही विचारपूस करू लागली.

" अं... सॉरी राजा. सध्या बिझी आहे मी फार. एक महत्त्वाची मिटींग आहे माझी त्यातच बिझी आहे. शिवाय मी ऑफिसमध्ये नाहीये सध्या. " तिचे वडील म्हणाले.

" पण तुम्ही आहात तरी कुठे? " आरोहीने आग्रही स्वरात विचारले.

" ड्रीम पॅलेसमध्ये आहे. " तिच्या वडिलांनी खोटाच पत्ता दिला.

" बरं, तुम्ही अटेंड करा तुमची मिटींग. मी ठेवते फोन. " जड अंतःकरणाने आरोही बोलली.

" ह्म्म पण तुला काय बोलायचं होतं महत्त्वाचं? हरकत नसेल तर कॉलवर बोलू शकतेस. " तिचे वडील बोलले.

" नाही, एवढं काही महत्त्वाचं नव्हतं. जस्ट एक असाईनमेंट पूर्ण करायचा आहे मला म्हणून मी भटकंतीला जायचा विचार करतेय तर तुम्हाला एखादं निसर्गरम्य ठिकाण माहिती आहे का? असं विचारायचं होतं. " आरोहीने खोटा बहाणा केला.

" तू तुझ्या एखाद्या मैत्रिणीला वा बॉयफ्रेंडला विचार कारण सध्या मला काही सुचत नाहीये. " तिचे वडील बोलले.

" बरं. चालेल. " आरोही निर्विकारपणे उत्तरली.

" हो, बाय. " तिच्या वडिलांनी थोड्याच वेळात आरोहीचा निरोप घेऊन फोन ठेवला.

तेवढ्यात त्यांच्यापुढे बसलेली तरुणी त्यांना उद्देशून म्हणाली, " रवी, का खोटं बोललात तुमच्या मुलीशी? "

" एरवीही आपल्याला फारसा वेळ भेटत नाही इरा. आज सवडीने मी तुझी भेट घ्यायला आलोय तरीही नीटसा एकांत मिळत नाहीये म्हणून हा खटाटोप. " रवी अर्थात आरोहीचे वडील त्या तरुणीचा अर्थात इराचा हात हातात घेऊन बोलले पण त्यांचा संवाद ऐकून आरोहीला दुहेरी धक्का मिळाला.

" ह्म्म. बाय द वे, तुम्ही तुमच्या मुलीला आणि बायकोला आपल्या नात्याबद्दल कधी सांगणार आहात? " इराने रवीच्या डोळ्यात पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत विचारले.

" तू कशाला काळजी घेतेय? मी केलाय गं सगळा बंदोबस्त. मी एकताला आपल्या नात्याबद्दल सांगणार आहे लवकरच. दोन दिवसांनी आरोही गोव्याला ट्रिपला जातेय. त्यादिवशी मी तुझी नि तिची भेट घालून देईल. तिला सगळं सविस्तर सांगेल. तिची समजूत काढायला कठीण जाईल पण एकता समजूतदार आहे. कालांतराने ती समजून घेईल आणि घटस्फोटासाठी होकारही देईल. " रवी इराला आश्वस्त करत म्हणाले.

" पण तुमच्या मुलीचं काय? तिला हा धक्का पचवता येणार नाही. तिची समजूत कशी काढणार आहात? " इराने आणखी काही प्रश्न विचारले.

" तीच काळजी मलाही आहे पण त्यावरही मार्ग निघेल. आरोहीचं मन तुटेल आमचं नातं विखुरताना पाहून पण ती आता मोठी झाली आहे. तिलाही समजेल हळूहळू सर्वकाही. तू विनाकारण काळजी करू नकोस आणि आपल्या नात्यावर लक्ष दे. " रवी इराचा चेहरा ओंजळीत घेत बोलले.

" इश्श! तुम्ही पण ना! " इरा थोडीशी लाजली आणि अशाप्रकारे त्यांची कुजबुज सुरू झाली पण आरोही तिच्या जागेवरून उठली व भावनाशून्य अवस्थेत त्या कॅफेच्या बाहेर निघून गेली.

ती तिच्या दुचाकीजवळ गेली. तिने डिक्कीतून हेल्मेट काढले व डोक्यात घातले. ती दुचाकीवर स्वार झाली व ती तेथून निघून गेली. तिची दुचाकी भरधाव वेगात होती. तिच्या मनात गुंतागुंत करणारे प्रश्न आणि दुचाकीची गती जणू समसमान प्रमाणातच पळत होते. काहीच वेळात तिने गाडी थांबवली आणि पुढे पाहिले तर ती महादेवाच्या देवळाच्या आवारात होती. तिने तिथे तिची गाडी ठेवली व ती पळतच देवळात गेली आणि बराच वेळ अगदी मनातले वादळ शांत होईपर्यंत ती तिथे बसून राहिली.

कालांतराने ती घरी गेली. त्यादिवशी ती कुणाशीही काहीही बोलली नाही, तिने नीट जेवणही केले नाही कारण एकता आणि रवीने दिलेला विश्वासघात तिला अगदी अस्वस्थ करून गेला होता. तिने स्वप्नातही कधी जो विचार केला नव्हता अशी परिस्थिती तिच्या नजरेपुढे होती. त्यामुळे आई-वडिलांचे प्रेम काळाच्या आड कुठे मावळले, हा विचार करतच ती रात्र सरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ती महाविद्यालयाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेली पण त्या दिवशी तिने अर्धा दिवस एकताचा आणि उर्वरित अर्धा दिवस रवीचा पाठलाग केला.

खरंतर तिला पाठलाग करण्याची काहीही गरज नव्हती पण मनाला दिलासा देण्यासाठी आणि तिने आदल्या दिवशी जे अनुभवले होते ते सर्व खोटे आहे, अशी स्वतःच्याच मनाला शाश्वती देण्यासाठी तिने दिवसभर पाठलाग केला पण सरतेशेवटी वास्तविकता तीच होती त्यामुळे तिचे मन तीळ तीळ तुटत होते. तिने तिच्या मोबाईलमध्ये मुद्रित केलेला लक्ष्य-एकताचा व्हिडीओ पूर्णपणे नाहीसा केला कारण तिचा संशय अचूक असल्याची ग्वाही देणारे बरेच पुरावे तिला दिवसभर मिळाले होते.

तथापि, तो दिवसही सरून गेला. कळत-नकळत आरोही आणि तिच्या आई-वडिलांच्या नात्यात एक अदृश्य पोकळी निर्माण झाली होती. रवी-एकता आरोहीशी बोलण्याचा प्रयत्न करत असले तरी ती बोलत नव्हती. तिच्यातील हे बदल त्या दोघांना पेचात पाडत होते पण कदाचित अभ्यासाच्या ताणामुळे ती अशी वागत असावी, हा विचार करून तिला त्या दोघांनीही तिचा वेळ घेऊ दिला व उगाच विचारणा केली नाही.

ती रात्रही सरताच आरोही पुढील दिवशी गोव्याला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेली पण तिने तिच्या प्रियकराला आधीच काही कारणास्तव गोव्याची सहल रद्द करत असल्याचे कळवले व ती त्या दिवशी गोव्याला गेलीच नाही पण या वास्तवापासून अनभिज्ञ रवी-एकताने मात्र अनुक्रमे इरा आणि लक्ष्यला घरी बोलावले.

ते दोघेही एकाच वेळी तिथे आले. ते दोघे बंगल्यात शिरताच दबक्या पावलांनी आरोही देखील तिथे गेली आणि सगळ्यांच्या नकळत उंबरठ्याजवळ उभारून आतील संवाद ऐकू लागली. दुसरीकडे रवी-एकताने आपापल्या विवाहबाह्य नात्याची कबुली दिली आणि स्वेच्छेने घटस्फोट घेण्याचा विचार केला. त्या चौघांचे आपापसांत विचार पटताच ते आनंद व्यक्त करत होते. तेवढ्यात उंबरठा ओलांडून आरोही आत गेली आणि चढ्या आवाजात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत तिने बोलायला सुरुवात केली.

" पण मला हा निर्णय मान्य नाही. " आरोही बोलली आणि तिचा आवाज ऐकून त्या चौघांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला व ते तिच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागले.

क्रमशः

🎭 Series Post

View all