द अफेअर: टेल ऑफ सिक्रेट्स (भाग-दोन)

कैफियत प्रेमाची अन् प्रेमळ नात्यांची
आरोहीला दारात पाहताच एकता म्हणाली, " गुड आफ्टरनून आरू, कसा होता आजचा दिवस कॉलेजचा? "

" ह्म्म. होता ठीक. " एकताकडे न पाहताच आरोही निर्विकारपणे उत्तरली.

" काय गं? चेहरा का उतरलाय? रडली होतीस का? भांडण वगैरे झालं का तुझं नि तुझ्या बॉयफ्रेंडचं? " एकता काळजीने विचारपूस करू लागली.

" मला नि माझ्या बॉयफ्रेंडला नात्याची किंमत आहे म्हणून आमच्यात विनाकारण वाद होत नाहीत. " आरोही रागीट कटाक्षाने पाहत उत्तरली.

" बरं पण एवढं तणतण करायला काय झालं? साधा प्रश्न तर विचारलाय मी. " एकताने गोंधळून आरोहीला विचारणा केली.

" काही नाही सहज. जस्ट मूड स्विंग्ज. " आरोही तात्पुरती टाळाटाळ करत उत्तरली आणि एकताने हुंकार भरला. तेवढ्यात आरोही परत एकताला उद्देशून म्हणाली, " काय गं, थोड्या वेळापूर्वी आपल्या बंगल्याबाहेर कोण गेलं? तो मुलगा हेल्मेट घालून होता म्हणून मला चेहरा काही नीट दिसला नाही. "

तो प्रश्न ऐकून एकताचे हावभाव बदलले आणि शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली, " अगं तो चुकून इकडे आला. त्याला बंगला क्रमांक सातमध्ये पाठारेंकडे जायचं होतं पण अनावधानाने तो बंगला क्रमांक सतरामध्ये म्हणजेच आपल्या बंगल्यात आला. मी त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली; त्यामुळे तो लगेच निघून गेला. "

एकताचे ते खोटे उत्तर ऐकून आरोहीला जबरदस्त धक्का बसला. तथापि ती काहीही प्रतिक्रिया न देता निरपेक्षपणे ती तिच्या खोलीत निघून गेली. एकता तिला हाक देत राहिली पण आरोहीच्या कानापर्यंत एकही शब्द गेलाच नाही. अनभिज्ञ एकताने खांदे उडवले व ती कशाचाही ताण न घेता नियतकालिक चाळायला लागली.

दुसरीकडे आरोही तिच्या खोलीत शिरली आणि तिने दार लावून घेतले. खोलीत शिरताच दफ्तर बिछान्यावर ठेवून देत ती भावनाशून्य अवस्थेत न्हाणीघरात गेली आणि शॉवर सुरू करून ती तिथेच कोसळली. डोक्यावरून जसजसे पाण्याचे थेंब तिच्या अंगावर पडत होते तसतसा आरोहीचा बांध ढासळत होता आणि पाहता पाहता तिची आवाजशून्य तळमळ आक्रोशात रुपांतरित झाली.

ती रडतच बडबडायला लागली, 'का आई? का केलंस तू हे सगळं? काय गरज होती तुला असं वागण्याची? तुझं नि बाबांचं प्रेम पाहून माझा प्रेमावरचा विश्वास ठाम झाला आणि तूच आज मला हा दिवस दाखवलास? तुझ्या नि बाबांच्या प्रेमाचे किस्से ऐकून मी लहानाची मोठी झाले आणि आज तू घटस्फोट घ्यायचा विचार करतेय ते देखील एका नवख्या तरुणामुळे? तात्पुरत्या मोहामुळे तू शाश्वत प्रेम नाकारतेय? सांग ना आई, का केलंस तू हे सगळं?'

आरोहीच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले होते पण त्या प्रश्नांचे उत्तर देणारे सध्या तिथे कुणीच नव्हते. सरतेशेवटी तिने स्वतःच स्वतःला सावरले. त्यानंतर ती मनोमन निर्णय घेत म्हणाली, 'नाही, ही वेळ मुळमुळ रडण्याची नाहीये. कदाचित आई थोडीशी वाट चुकलीय पण बाबा तिला खऱ्या प्रेमाची ओळख नक्की करून देतील. म्हणतात ना, सुबह का भुला शाम को वापस आएं तो उसे भुला नहीं कहते! कदाचित या काही दिवसात आईसुद्धा थोडी लेफ्ट आऊट फिल करत होती असेल आणि त्याचवेळी हा कोण तो लक्ष्य तिच्या आयुष्यात आला असेल पण बाबा नक्की यावर उपाय शोधतील. मला वाटतं की मी बाबांना भेटून आणि त्यांना विश्वासात घेऊन सगळं सविस्तर सांगायला हवं. मी लगेच त्यांना भेटायला जाते आणि सगळं सांगते.'

आरोहीने निर्धार केला आणि ती उभी राहिली. तिने शॉवर बंद केला आणि कपडे बदलून ती न्हाणीघरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने केस पुसून घेतले. जिन्सच्या खिशात मोबाईल ठेवून व खांद्यावर दफ्तर घेऊन अन् मनाची तयारी करून ती खोलीबाहेर पडली. ती जिना उतरून मुख्य खोलीत गेल्यावर तिला सोफ्यावर एकता बसून दिसली पण तिला काहीही न कळवता आरोही बाहेर जाऊ लागली.

तेवढ्यात एकताने आरोहीकडे पाहिले आणि ती विचारणा करत म्हणाली, " आताच तर आली होतीस मग परत कुठे निघालीस? "

" नुकतेच एक असाईनमेंट मिळाले आहे. ते कम्प्लीट करायचे आहे म्हणून मोकळ्या हवेत चालली आहे भटकंती करायला आणि मोटिव्हेशन घ्यायलाही. " आरोही खोटा बहाणा देत म्हणाली.

" असाईनमेंट घरीच होणार नाही का? " एकताने लगेच प्रश्न विचारला.

" आई, शिल्पकला साधी कला नाही. नवनवीन आयडियाज घरी राहून सुचत नाहीत. त्यासाठी घराबाहेर जावे लागते, निसर्गाचे निरिक्षण करावे लागते म्हणूनच जातेय ना मोटिव्हेशन घ्यायला. घरी राहून काही सुचले असते तर मी उगाच बाहेर गेले असते का? " आरोही त्रागा व्यक्त करत म्हणाली.

" बरं बाई. मला कुठे कळतं तुझ्या शिल्पकलेबद्दल. असो. तुला जायचंय तर जा पण चार घास खाऊन जा. " एकता मायेने म्हणाली.

" नको, माझा मूड नाही. " आरोही उत्तरली.

" जेवणासाठी मूडची नाही, भुकेची गरज असते. " एकता नम्रपणे म्हणाली.

" हो पण माझा मूडही नाही आणि मला सध्या भूकही नाही. " आरोही कंटाळून बोलली.

" का? सकाळी नाष्टा करूनही गेली नव्हतीस. एव्हाना तीन वाजत आले आहेत आणि तू म्हणतेय की तुला भूक नाही? हे कितपत योग्य आहे? उगाच स्वतःची फरफट करू नको आणि मुकाट्याने चार घास खा, नाहीतर माझ्याएवढे वाईट कुणी नाही. लक्षात ठेव. " एकता दम देत म्हणाली.

" जा, तुला जे करायचंय ते कर. मी नाही घाबरत तुला. तसंपण या जगात तुझ्याएवढे वाईट कुणी असूही शकत नाही. " आरोही एकाएकी ओघाओघात बोलून गेली.

तिचे शब्द ऐकून एकता दुखावल्या गेली. तिच्या डोळ्यात अलगद पाणी तरळले आणि ती हुंदका आवरत म्हणाली, " एवढे काय बोलले मी? मला तुझी काळजी वाटतेय म्हणून बोलतेय ना. तू जेवलीस तर तुझ्याच शरीराला लागेल, माझ्या पोटात तर एक कणही जाणार नाहीये ना. "

एकताला रडताना पाहून आरोहीला लगेच तिची चूक लक्षात आली आणि ती समजूत काढत म्हणाली, " सॉरी आई, मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. ॲक्च्युली असाईनमेंटचा ताण आहे ना! त्यामुळे थोडीशी चीडचीड होतेय. "

" ह्म्म. ते कळतंय मला पण तुला उपाशीपोटी कुठेही जाऊ देणार नाही मी. तू थोडंसं खा नि मगच जा. " एकता हट्ट करत म्हणाली.

" बरं, जशी तुझी इच्छा. वाढ जेवायला. " शेवटी एकतापुढे आरोहीनेच माघार घेतली.

त्यानंतर त्या दोघींनी एकत्र बसून थोडे जेवून घेतले. जेवण होताच एकताचा निरोप घेऊन आरोही तिची दुचाकी घेऊन बाहेर गेली. बंगल्याबाहेर गेल्यावर थोड्याच अंतरावर एक बसस्थानक होते. तिथेच दुचाकी थांबवून आरोहीने तिच्या वडीलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. तथापि तिने वडिलांचे कार्यालय गाठण्याचा निर्णय केला आणि तिने दुचाकी परत सुरू केली.

तेवढ्यात तिथे एक कार आली. ती कारचे निरीक्षण करत म्हणाली, 'ही तर बाबांची कार आहे पण ते इथे काय करत आहेत? त्यांना कळले असेल का मी इथे आहे?'

आरोही मनोमन एकीकडे विचार करत होती तेवढ्यात तिच्याच वयाची एक तरुणी तिच्या वडिलांच्या कारमध्ये बसली आणि आरोही डोळे विस्फारून पाहतच राहिली. ती काहीशी थक्कच झाली होती. दुसरीकडे ती तरुणी कारमध्ये बसताच कार निघून गेली आणि आरोही हरखून कारच्या प्रतिकृतीकडे पाहत राहिली. त्याच दरम्यान बस आली. बसचा भोंगा वाजताच आरोही भानावर आली आणि तिने लगेच वडिलांच्या कारचा पाठलाग करायला सुरुवात केली.

क्रमशः

🎭 Series Post

View all