खरंतर डॉक्टरांचे आयुष्य म्हणजे रोज एक नवा दिवस आणि रोज एक नव आव्हान. समर आणि रमाचे आयुष्यातही तसचं सुरू होतं. समरला तर स्त्रियांचे कुपोषण आणि त्यांच्या मासिक पाळी विषयीच्या अनेक गुंतागुंती आणि समस्यांचा विचार करून कधी कधी अक्षरशः चिडायला व्हायचं. भारतीय समाजातलं स्त्रियांचे स्थान एकतर देवीचं, शक्तीचं किंवा मग दासीच. तिला एक सर्वसामान्य माणूस म्हणून का जगू दिलं जात नाही हा प्रश्न नेहमी समरला पडे.
समर -" रमा तुला माहिती आहे माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या कितीतरी महिला ह्या कुपोषण, हिमोग्लोबिनची कमतरता आणि इतर अनेक आजारांनी ग्रस्त असतात. पण स्वतःकडे लक्षही देत नाहीत. कुपोषण तर नित्याचीच बाब. अशा काळात जर गर्भधारणा झाली तर पुढे जीविताचीहानी पण होवू शकते. आपला समाज केव्हा बदलेल कुणास ठाऊक?"
रमा -"अरे हो ना! स्वच्छतेचा तर आपल्या भारतात फारच अभाव आहे. छोट्या खेड्यांमध्ये, पाड्यांमध्ये तर आरोग्याच्या इतक्या समस्या आहेत की, आपण जे प्रयत्न करतो आहेत ते किती फुटकळ आहेत असंच मनाला वाटून जातं."
समर आणि रमा रोज रात्री जेवण झाल्यावर एकमेकांशी बोलत बसायचे. तेवढ्यात समरच्या वडिलांनी त्या दोघांच्या खोलीवर टकटक केली आणि आत आले.
समर -"काय झालं बाबा काही प्रॉब्लेम?काही दुखतय का तुमच?"
बाबा -"अरे काही प्रॉब्लेम किंवा दुखणे खुपणे असतील तरच आम्ही तुझ्याकडे किंवा रमाकडे यायचं का? आम्ही तुमच्याशी अवांतर काही बोलू शकत नाही का?"
समर -"तसं नाही बाबा."
बाबा -"तसं नाही तर मग कसं?"
रमा आणि समोर दोघेही एकमेकांकडे बघून चूप बसले.
बाबा -"हे बघ समर तू आणि रमा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पासून अगदी न चुकता आठवड्याचे सात दिवस 24 तास अगदी कामात गुंतलेले असतात. मला माहिती आहे रुग्णसेवेच, समाजकार्याच व्रत तुम्ही घेतलं आहे पण, म्हणून तुम्ही तुमच आयुष्य जगायचं नाही असा त्याचा अर्थ होत नाही. मी तुम्हा दोघांसाठी परदेश प्रवासाची दोन तिकीट आणली आहेत. तुम्ही दोघेजण उद्या संध्याकाळी पंधरा दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहात आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे."
समरचे बाबा इतक्या अधिकार वाणीने आणि निक्षून सांगत होते की. समर आणि रामाने होकारार्थी केवळ मान डोलावली.
रमा आणि समर रात्रीच्या विमानाने इजिप्त कडे रवाना झाले. तसं पाहिलं तर नवविवाहित दांम्पत्याने फिरायला जाण्याकरिता स्वित्झर्लंड किंवा युरोपमध्ये अपेक्षित होतं, पण रमा आणि समरला इजिप्त आणि तिथल्या पिरामिड, ममी, इतर ऐतिहासिक वारसास्थळां विषयी फारच उत्सुकता,आवड आणि जाणून घ्यायचे असल्याने समरच्या वडिलांनी मुद्दाम इजिप्तची तिकिटे बुक केली होती.
रमा आणि समर इजिप्तला पोहोचले. कैरो शहरातील ते एक आलीशान हॉटेल होते. त्या हॉटेलमध्ये सर्व काही अगदी राजेशाही थाटाचं होतं. त्या दिवशी दोघांनी आराम केला आणि मग दुसऱ्या दिवशी ते दोघं गिझाचा पिरामिड बघायला गेले. स्फिंक्स आणि इतर ऐतिहासिक स्थळ पाहिल्यावर, ते संध्याकाळी हॉटेलवर परतले. दुसऱ्या दिवशी नाईल नदीवर नौका विहाराचा आनंद घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं.
समर -"रमा अ ग लवकर कर! किती वेळ करते आहेस?"
रमा -"समर किती घाई करतोयस तू! आपण इथे फिरायला, एकमेकांसोबत वेळ घालवायला आलो आहोत. क्लिनिकमध्ये पेशंटच्या तपासण्या करण्यासाठी नाही, त्यामुळे मला निवांतपणे तयार होवू दे."
समर -"जशी आज्ञा राणी सरकार."
रमा छान तयार होऊन आली. समर आणि रमाने मग नाईल नदीत नौका विहाराचा आनंद घेतला. त्या नाईलच्या किनाऱ्यावर दोघेजण निवांत गप्पा मारत बसले होते आणि अचानक समरच्या पोटात दुखू लागले. त्याला असाह्य वेदना व्हायला लागल्या. रमने त्याला लगेच इजिप्त मधल्या प्रख्यात डॉक्टरांकडे हलवलं.
पुढल्या भागात आपण बघूया की रमा समरला वाचवू शकते की नाही? तोपर्यंत हा भाग कसा वाटला त्याबद्दल तुमचे अभिप्राय अपेक्षित आहेत.
©® राखी भावसार भांडेकर.