Login

सल मनातला

Emotional Crisis Of Simple Housewife
    
      
  (सदर कथा ही निव्वळ काल्पनिक असून कथेतील घटना, प्रसंग आणि पात्र हे ही काल्पनिक आहे. त्यांचा वास्तववात कोणाशीही कसलाही संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)





               आज दुपारचा जरा निवांत वेळ मिळाला म्हणून, मी माझं एक पुस्तक घेऊन बसले होते. मुलांनी मागच्या आठवड्यापासूनच नाताळच्या सुट्टीत गावातच राहणाऱ्या त्यांच्या मामाकडे जायचा तगादा लावला होता आणि माझी आई त्यांना आज त्यांच्या लाडक्या मामाकडे घेऊन गेली होती. म्हणूनच वाचना करिता जरा सवड मिळाली होती.
           ह्या कादंबरीची नायिका खूप हुशार होती .योग्य वेळी योग्य वराशी तिचा विवाह झाला ,पण तिचा नवरा निघतो बाहेर ख्याली, पण नायिका धीराने सगळं सहन करते, आणि शेवट गोड होतो असं काहीसं कथानक होतं.
        मी मनात विचार केला नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा विसरून, खरंच एखादी स्त्री उर्वरित आयुष्य आपल्या जोडीदारासोबत सुखा- समाधानाने घालवु शकते का? की आयुष्यभर ती केवळ मनात जळत राहते? आणि जगाला आपण खुप आनंदी आणि सुखी आहोत असा आभास करवत , चकवत राहते? मी माझ्याच विचारात गुंग होते तेवढ्यात मोबाईल वाजला ! नेहाचं नाव मोबाईल वर बघून मला खूप आनंद झाला!
           नेहा माझी बालमैत्रीण.बडबडी, हुशार, उत्साहाचा अखंड धबधबा ची जणू. ती माहेरी आली की मला नेहमीच भेटायला येते. प्रत्येक वेळी तिच्या संसारातल्या अडचणी मला सांगते. मी पण माझे प्रश्न तिला सांगते आणि आम्ही दोघी एकमेकींना जवळ मोकळं होतो.
              मला आजही आठवते, लग्न झाल्यानंतर जवळपास जेव्हा महिन्याभराने नेहा पहिल्यांदाच \"मांडव परतनीं\" साठी माहेरी आली होती, तेव्हाही ती मला भेटायला आली होती. तेव्हाही फोनवर तिचा आवाज असाच जड झालेला होता……..
मी - \"हां नेहा बोल कशी आहेस? ‌\"
नेहा - \"ठीक आहे ग\" (तिची थंड प्रतिक्रिया) \"मी येऊ का ग तुला भेटायला?\" \"आता आहे का तू घरी?\" \"वेळ आहे का थोडा तुझ्याजवळ?\"
मी - \"अग येना! मी घरीच आहे\" (मी अती आनंदाने) \"आणि तुझ्यासाठी माझ्याजवळ नेहमीच वेळ असतो\". \"नाहीतर मीच येऊ का तुझ्याकडे? काका-काकूंना ही भेटून खूप दिवस झाले\".
नेहा - \"नको ग आई बाबांसमोर मोकळं बोलता येणार नाही!\"
मी - \"लगेच ये मी वाट बघते आहे\".
             मी मनात विचार करत होते की, काक-काकूंसमोर मोकळं न बोलता येण्यासारखं नेहाला काय सांगायचं आहे? जेमतेम महिना झाला हिच्या लग्नाला आणि ही अशी थंड का?\"
             दहाव्या मिनिटाला नेहा माझ्या घराच्या दारात उभी होती सुरुवातीचं हाय-हॅलो झालं, गळामिठी ही झाली आणि मग…….
नेहा - \"रिमा , काकू कुठे आहेत?\"
मी - \"ती दादाकडे गेली आहे उद्या येणार आहे परत\".
नेहा - माहित नाही आता काकूंची आणि माझी भेट केव्हा होईल? मला लगेच उद्या परत जायचं आहे ना !
मी - अग पण कालच तू आली ना आणि उद्या लगेच परत ? रावां शिवाय करमत नाही वाटतं?
नेहा - सकाळच्या स्वयंपाकाची अडचण होते तिथे.
मी - म्हणजे?
नेहा - अगं आता काय सांगू तुला? लग्न झाल्यावर \"नव्याची नवलाई\" माझ्या वाट्याला आलीच नाही! कधी बाहेर फिरणं नाही की , निवांत गप्पा मारत बसलो नाही आम्ही दोघं. फक्त कामच काम, घरात सगळ्या बायकाच! सासू, आत्ये सासू, नणंद, जाऊ तिच्या दोन मुली- रमा आणि मीरा , आणि पुरुष माणूस म्हणून केवळ तीन जण - नवरा, भासरा आणि सासरे, (तिने सुस्कारा सोडला).
मी - तुला तर कामात खूपच मदत होत असेल!
नेहा - कसली मदत ग ? फक्त सगळ्यांचं एकावं लागतं.आत्ये सासुबाई सारखं लक्ष ठेवतात, स्वयंपाक घरात त्यांचं च राज्य असतं. महीन्याच्या \"त्या\" चार दिवसात वेगळं बसावं लागतं , सोवळ-ओवळ, उष्ट - खरकटं, अती स्वच्छता , इतके नियम की स्वयंपाक करताना वाटतं काही चुकलं तर काय होईल? आणि काय नाही?नंणदेचं सारखं खाण्याचं कौतुक, चटण्या, लोणची, हा पदार्थ ,ती मिठाई, कुठलीतरी नवी भाजी, पुलावाचे कितीतरी नवे प्रकार,  बापरे! काय ते जिभेचे चोचले!! केवळ खाण्यासाठीच जणू तिचा जन्म झालाय असं वाटतं!!! नणंदेला केवळ खाण्यात रुची करण्यात नाही.सासूबाईंचं तर देव घर, अन् देव - देव करणं सुटत नाही. सासरे आजारी म्हणून, जाऊ सगळा वेळ तिच्या मुली आणि सासऱ्यांचे करण्यातच घालवते. दिवसभर नवरा घरी नसतोच, आणि असला तरी चकार शब्द बोलत नाही . दिवसभर त्याचे व्यवसायासंबंधी फोन सुरू असतात. व्यवसायामुळे रात्री घरी उशिरा येणं होतं, मग रात्रचं सगळे आवरून जागरणं, एका शब्दाने विचारत नाही- \"तू कशी आहे? आज दिवसभरात काय केलं? आज चा दिवस कसा गेला? परत सकाळी लवकर उठून तेच…….. रविवार म्हणजे तर ओव्हर टाईम- सुट्टी असल्याने सगळ्यांच्या वेगवेगळ्या फर्माइश , स्वयंपाक घरात उभं राहुन, राहून पायात गोळे येतात , पण सांगणार तरी कोणाला आणि ऐकणार तरी कोण?
मी - तू तुझ्या नवऱ्याला काही सांगण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न नाही केलास का?
नेहा - केला ग! पण ते म्हणाले \"मी घरी तुझी गर्हाणी ऐकायला नाही येत, मी घरी यावं असं वाटत असेल तर, मला या फालतू गोष्टी सांगू नकोस. सांग आता काय म्हणायचं याला ? ऑफिस मधून येताना फोन करतात, \"मी आणि दोन मित्र सोबत येत आहे, पुलाव आणि भरल्या वांग्याची भाजी करून ठेव\"! बाकी माझ्याशी काहीच देणेघेणे नाही.मला तर वाटते की त्यांना माझ्यात काही इंटरेस्ट च नाही.
              त्यानंतर ही नेहा माहेरी आली की , मला भेटायला यायची, सासरच्या गोष्टी सांगायची.... कधी कधी तिला ते सगळं असंह्य व्हायचं पण तिचा नाईलाज होता…..
एकदा मी तीला म्हटले - \"तु वेगळं का राहत नाही?\"
नेहा - ते म्हणतात, \"मी बायको चा गुलाम नाही, तुझ्या साठी मी घरच्यांना सोडणार नाही\"

           पहिल्या बाळंतपणाच्या वेळी ती सांगत होती की, \"घरी सगळ्यांना अपेक्षा आहे मला मुलगा व्हावा त्यांच्या घराण्याकरिता वारस तर हवाच ना!\" , पहिल्या गर्भारपणात तिला कडक डोहाळे लागले होते ,तेव्हा घरातले सगळे तिला म्हणायचे, \" तुला कामाचा कंटाळा आहे म्हणून तू नाटक करते आहेस\"! आणि जेव्हा मुलगी झाली तेव्हा तर सगळ्यांचे चेहरेच उतरले.
        बाळंतपणानंतर तीच्या मुलीला पण तीला जास्त वेळ देता येत नव्हता.पुर्ण वेळ स्वयंपाकपाणी करण्यात च जात होता.मी तिला एकदा सुचवले होते की, \"तू बी.एस.सी. मॅथ आहे आणि बी.एड. केलं आहे तर, एखादा टीचर चा जॉब का नाही करत?\"
नेहा - \"अगं तुला तर माहिती आहे माझे सासरे माजी आमदार आहेत , आणि भासरे सनदी अधिकारी. शिवाय नवरा इंजिनिअर असून त्याचा वेल सेटल बिजनेस आहे. जॉबचं म्हटलं तर ते म्हणतात \"तुला कसली पैशाची अडचण ? मला सांग वाटेल तेवढा पैसा देतो तुला, शिवाय आपल्या घरातल्या बायकांनी नोकरी केलेलं बाबांनाही आवडणार नाही आणि ते चांगलं ही दिसणार नाही\"
        एकंदरीत नेहाची चारी कडून कोंडी होत होती. शिक्षण असुनही विचार स्वातंत्र्य नाही, व्यक्तिस्वातंत्र्य नाही. सोनेरी पिंजऱ्यात अडकलेला एक मूक पक्षी झाली होती ती. केवळ भारी भारी साड्या आणि दागिने घालून  येणाऱ्या जाणाऱ्यांची उस्तवार करणे एवढंच तिचं आयुष्य बनलं होतं.

                                                          मी तिला म्हटलं - नेहा तू जर तिथे अड्जस्ट होऊ शकत नाही तर परत का येत नाहीस ग?
 नेहा - रीमा, तुला तर माहिती आहे, माझ्या लग्नासाठी बाबांनी पाच लाखाचं कर्ज घेतलं होतं. पुढच्याच महिन्यात ताई ची दुसरी  डिलिव्हरी आहे. नीतू ही आता ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी बंगलोरला जाणार आहे. तिची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था जरी त्या संस्थेने केली असली तरी, महिन्याचा काही ना काही खर्च तिला पाठवावा लागणार आहे, आणि बंगलोर हे तसही महागड शहर आहे. मी जर असं सासर सोडुन माहेरी परत आली तर, बाबांना तर हार्ट अटॅक यायचा आणि आईचं काय होईल काही सांगता येत नाही, तिला आधीच दम्याचा त्रास आहे.
           माहेरची अशी सगळीच परिस्थिती विपरीत आणि सासरी कुठे काही बोलायची सोय नाही. नेहाची तगमग मला बघवत नव्हती आणि मी तिला कुठलीही मदत करू शकत नव्हती..                

              आता तिच्या सासवा मुलाकरता तिच्या मागे तगादा लावत होत्या, तर नवरा म्हणत होता , \"दुसरं मूल नकोच\". पण नेहाला वेडी आशा होती की , जर मुलगा झाला तर तिचं आयुष्य कदाचित बदलून जाईल. म्हणून मुलासाठी प्रयत्न करतांना तिने दोन -तीनदा गर्भपात ही केले. त्यामुळे तिची तब्येत वारंवार बिघडत होती, पण घरच्यांच्या मानसिकतेत आणि स्वभावातही कुठलाही फरक पडला नव्हता.
        

         बिचारी नेहा मनातला सल तसाच ठेवून आयुष्य जगत होती.