दि बूमरँग.. भाग १२
पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, सत्येनचा खून जेनीने केला हे स्पष्ट झाल्यावर अल्बर्टने सर्वांच्या समोर त्याची योजना सांगायला सुरवात केली. ज्या दिवशी जेनी मिसिंग कम्प्लेन्ट नोंदवण्यासाठी पोलीसस्टेशनला गेली होती त्याचदिवशी पहाटे पोलिसांना दरीत कोसळलेली एक कार सापडली. चौकशी केल्यानंतर ती कार सत्येन बजाज यांची आहे समजलं. अल्बर्टला पोलीस चौकीत एका अनोळखी व्यक्तीने निनावी फोन करून जेनीने सत्येनचा खून केला आहे हे सांगितलं त्यामुळे जेनीकडून हे सत्य तिच्याच तोंडून वदवून घेण्यासाठी पोलिसांनीच हा डाव, नाटक रचलं होतं. आता पुढे..
दि बूमरँग.. भाग १२
”मि. कुमार..! प्लिज आत या”
अल्बर्टने कुमारला आवाज दिला. जेनीने डोळे विस्फारले आणि आश्चर्याने तिने दाराच्या दिशेने पाहिलं. कुमार आत आला. त्याला जिवंत पाहून जेनीच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
“कुमार तुम्ही! जिवंत आहात!! तुम्हाला तर यांनी...”
जेनीच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले. ती आश्चर्याने कुमारकडे पाहत होती.
“काय मिसेस बजाज, धक्का बसला ना! होय, कुमार जिवंत आहे. हेही आमच्या प्लॅनचीच किमया. तुम्हाला "अँथनी बेकर्स”ची आठवण झाली. आणि तुमचा मोबाईल नंबर आधीच टॅप केलेला असल्याने तुमचं आणि त्या केक शॉपचे मालक कुमार यांचं काय बोलणं झालं आम्हाला आधीच माहीत होतं. त्यामुळे ऑफिसर अमृता यांनी कुमार यांना आमचा प्लॅन आधीच समजावून सांगितला होता. संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी तुम्हाला धमकावणं, कुमारवर ऑफिसर अमृताने नकली बंदुकीच्या नकली गोळ्या झाडणं मग शंतनूने त्याला दरीत टाकून देणं, हाही त्याच प्लॅनचा भाग होता. मि कुमार यांना जेंव्हा दरीत टाकून देण्याचं नाटक करण्यात आलं होतं. त्यांना अशा ठिकाणाहून फेकण्यात आलं होतं की जिथून त्यांना फारसं लागणार नाही. आणि आमची पोलिसांची टीम खाली उभी होती. आणि त्यांनी कुमार यांना अलगद झेललं होतं. हे तुमच्या डोळ्यांदेखत आम्ही मुद्दाम घडवत होतो कारण एखाद्या व्यक्तीचा खून झालाय हे पाहून तुम्ही घाबरून खरं बोलाल अस वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. आणि आज आता इथे आल्यानंतर नेन्सीकडे आय मिन ऑफिसर अमृताकडे संपत्तीच्या पेपर्सऐवजी संस्थेचे पेपर्स मिळाले हाही आमच्या प्लॅनचाच भाग. सो मिसेस बजाज, इतका सारा प्रपंच आम्ही तुमच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी केला. आता बोला का खून केलात तुम्ही सत्येन बजाज यांचा?”
अल्बर्टने जेनीकडे पाहिलं आणि तिला प्रश्न केला. जेनीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने तिचा गुन्हा मान्य केला होता. जेनी सांगू लागली.
“हो इन्स्पेक्टर, मीच खून केला सत्येनचा. माझ्या नवऱ्याचा. मी ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं. त्याच्यासाठी माझ्या जन्मदात्या आईवडिलांना दुखावलं. त्यांचा रोष पत्करला. श्रीमंतीत वाढलेली मी, त्याच्याशी लग्न करून काही दिवस भाड्याने घर घेऊन राहिले. घरदार, संपत्ती, सुखसोयी समृद्धी या सर्वांवर पाणी सोडून सत्येन सोबत आले. पण त्याने काय केलं माझ्या सोबत? माझा विश्वासघात? त्याने मला फसवलं? गेली बारा वर्षे तो मला फसवत होता. प्रेमाचं नाटक करत होता. मी त्याच्यासाठी खूप पजेसिव्ह होते. माझा जीव की प्राण होता तो. वेड्यासारखं प्रेम करत होते. त्याच्यासाठी मी माझा जीव देऊ शकत होते आणि घेऊही.. सत्येन आणि ज्यूली इतकंच विश्व होतं माझं. पण त्याच्या जगात मला काहीच स्थान नव्हतं. तो मात्र त्याच्याच विश्वात रममाण होता. सत्येनचं माझ्यावर प्रेम नाही. इतकी वर्षे तो मला धोका देत होता. विशेष म्हणजे तो माझ्याच बंगल्यात माझ्याच बेडरूममध्ये दुसऱ्या कोणासोबत मौज करत होता. बाहेरख्यालीपणा करत होता. हे सत्य माझ्यासमोर माझ्याच बंगल्यात माझ्याच लग्नाच्या वाढदिवसादिवशी समोर आलं.
आमच्या लग्नाच्या बाराव्या वाढदिवसाचा किती छान प्लॅन केला होता मी!! एक महिनाभर आधी सुट्टी घेऊन ठेवली होती. लग्नाचा पहिला वाढदिवस आम्ही गोव्यात साजरी केला होता. एका साध्या हॉटेलमध्ये. आम्ही तेंव्हाच ठरवलं होतं. काही वर्षांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस पुन्हा गोव्यात साजरा करायचा तोही आपल्या स्वतःच्या बंगल्यात! मग कितीही कष्ट करावे लागले तरी बेहत्तर!! करायचे आणि गोव्यात आपला स्वतःचा बंगला आम्ही विकत घेतला. माझं स्वप्नं सत्येनने सत्यात आणलं होतं.. किती खुश होते मी..! पण मलाच माझ्याच हातांनी साऱ्या स्वप्नांची राखरांगोळी करावी लागली. हेच माझं दुर्दैव! हीच शोकांतिका!! अचानक मला ऑफिसच्या कामानिम्मित बेंगलोरला जावं लागलं. मीटिंगमध्ये किती वेळ लागणार हे माहीत नसल्याने मी एअर तिकीटचं बुकिंग ऍडव्हान्स मध्ये करू शकत नव्हते. मीटिंग संपल्यानंतर मी तिकीट बुक करत होते. पण त्या दिवशी बेंगलोरहुन गोव्याला जाणाऱ्या सगळ्या फ्लाईट फुल होत्या. म्हणून मग मी सत्येनला फोन करून सांगितलं की मी उद्या संध्याकाळी घरी येते. मला खूप वाईट वाटत होतं. पण अचानक समोर जाऊन मला सत्येनला गोड सरप्राइज द्यायचं होतं. बरोबर रात्रीच्या बाराच्या ठोक्याला मला त्याच्या सोबत रहायचं होतं. त्याच्या सोबत प्रत्येक क्षण मला जगायचा होता म्हणून मी कार ने गोव्याला जायचं ठरवलं. बेंगलोर ते गोवा कारने प्रवास करायला दहा तास लागणार होते. खूप मोठा प्रवास होता. पण सत्येनच्या भेटीची ओढ मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. मी धडपडत बेंगलोरहुन गोव्याला आले. माझ्याकडे असलेल्या बंगल्याच्या चावीने दरवाजा उघडून आत आले. मला आमच्या बेडरूममध्ये कसली तरी हालचाल जाणवली. कोणीतरी आत हलक्या आवाजात कुजबुजत होतं. सत्येनचा आवाज माझ्या कानावर पडला.
“आय लव्ह यु डार्लिंग..गेली बारा वर्षापासून मी तुझ्या बाहुपाशात आहे पण मन भरत नाही यार. ते सुख मला जेनीच्या सहवासात कधीच जाणवलं नाही.. लव्ह यू स्वीटहार्ट.. ”
आतून हसण्याचा आवाज येत होता. सत्येन बरंच काही बरळत होता. माझं डोकं भडकलं. संतापून मी बेडरूमच्या दरवाज्यावर थाप मारली आणि सत्येनला जोराने आवाज दिला. दरवाजा आतून बंद होता. मी जोरजोरात दरवाजा ठोठावत होते. सत्येनने दरवाजा उघडला. बेडरूमच्या मागच्या दाराने कोणीतरी घाईघाईने बाहेर पडताना माझ्या दृष्टीस पडलं. बाहेर खूप काळोख होता म्हणून मी नीटसं पाहू शकले नाही. सत्येनला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत पाहून मला प्रचंड चीड आली होती. अचानक मला समोर पाहून सत्येनची चांगलीच बोबडी वळाली होती.
मी चिडून त्याला विचारलं,
“सत्या कोण बाहेर गेलं? काय चाललंय तुझं? ”
सत्येन प्रचंड घाबरला होता.
“कोणी नाही जेनी, तू उद्या संध्याकाळी येणार होतीस ना! मग अशी अचानक कशी आलीस?” - सत्येन
“हो.. आले.. बरं झालं तुझं खरं रूप समोर आलं. खरंतर मी तुला असं अचानक तूझ्या समोर येऊन सरप्राईज देणार होते पण मलाच तुझ्याकडून सरप्राईज मिळालं.. छान सत्या..वेल डन..” - जेनी
“जेनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.. तू समजतेस तसं काही नाही ग.. तू बस शांतपणे! मी तुला सगळं नीट समजावून सांगतो” - सत्येन
सत्येन मला जवळ घेण्याचा प्रयत्न करत मला पलंगावर बसवत होता. मी खूप चिडले होते. मी जोरात त्याच्यावर ओरडले,
“नालायक माणसा, मला स्पर्श करू नकोस. दूर हो.. तू मला फसवलंस. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं आणि तू माझ्या प्रेमाची प्रतारणा केलीस. माझा विश्वासघात केला. दूर हो..मला काहीही ऐकायचं नाहीये”
माझ्या डोळ्यांत पाणी होतं. मी खूप चिडले होते. सत्येन मला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तो माझ्या अंगाशी झोंबू लागला. मी खुप उद्विग्न झाले. मी पूर्ण शक्तीनिशी त्याला दूर लोटलं. तो मागे धडपडला. तो पुन्हा मला जवळ घेत होता पण माझा राग अनावर झाला होता. कपाटाच्या शेजारी असलेला टेबलवरचा फ्लॉवरपॉट माझ्या हाती लागला. मी पूर्ण ताकदीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. सत्येन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आणि जागीच गतप्राण झाला होता.
नंतर बराच वेळ मी त्याच्याजवळ बसून राहिले. माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर.. त्याच्या नंतर मी जगून तरी काय करु? आणि मग मी स्वतःच्या हाताची नस कापून स्वतःला संपवण्याच्या या उद्देशाने मी चाकु आणण्यासाठी किचनमध्ये जात होते. इतक्यात मम्माचा फोन आला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने मला कॉल केला होता.
“जेनी, बेटा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”
मला रडू आवरेना. खूप वाईट वाटत होतं.
“मम्मा मला सत्येनने फसवलं ग! ” इतकंच बोलले. मला खूप रडू येत होतं. काहीच सुचत नव्हतं. पुढे शब्दच फुटेना. मी फोन ठेवून दिला. स्वतःच्या हाताची नस कापून स्वतःला संपवणार होते. पण ज्यूलीचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो? डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होत होता. मला माझी चूक उमगली होती. पण वेळ निघून गेली होती. “मला माझ्या मुलीसाठी जगायलाच हवं” हा विचार मनात आला. आणि म्हणून मग मी हे सारं नाटक केलं”
जेनी बोलता बोलता थांबली आणि धाय मोकलून रडू लागली. सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता. सत्येनचे आईबाबा पण खजील झाले होते. आपल्या मुलाने आपल्या सुनेची प्रतारणा केली म्हणून व्यथित झाले.
अल्बर्टने सुस्कारा सोडला आणि त्याने जेनीला विचारलं
“पुढे काय झालं? मि. बजाज यांचा मृतदेह कुठेय?”
जेनी सांगू लागली,
“मी सत्येनला आमच्या बागेत पुरून टाकलं. त्यानंतर फ्लॉवरपॉट स्वच्छ केला. जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग पुसून घेतले. आणि ते रक्ताळलेलं कापड जाळून टाकलं. पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून सत्येनची गाडी घेऊन आंबोली घाटात गाडी दरीत फेकून दिली. रात्रीचे चार वाजून गेले होते. मी पुन्हा घरी न येता कारने गोव्याहून बंगलोरला गेले. येताना बंगलोर ते गोवा फ्लाईटचं तिकीट बुक केलं आणि सत्येनला सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी घरी आले. मला माहित होतं सत्येन कधीच येऊ शकणार नाही. दुसऱ्या दिवशी मी स्वतःहून रीतसर पोलिसांत तक्रार करण्याचं नाटक केलं.”
जेनीने अल्बर्टकडे पाहिलं आणि मान खाली घातली.
“मृतदेह कुठे आहे मिसेस बजाज?” अल्बर्टने प्रश्न विचारला.
जेनीने सत्येनला पुरल्याची जागा दाखवली. अल्बर्टने पोलीस स्टेशनला फोन करून इतर पोलिसांना बोलावून घेतलं. जेनीला अटक करण्यात आली. पोलीस व्हॅन मध्ये बसण्याआधी तिने तिच्या सासुसासऱ्यांची माफी मागितली. आईवडिलांना खजील होऊन क्षमा मागितली आणि ती व्हॅन मध्ये जाऊन बसली. अल्बर्टने पोलिसांच्या मदतीने जेनीने दाखवलेली जागा खणून घेतली. त्यात सत्येनचा मृतदेह होता. मृतदेहाला दुर्गंधी यायला सुरुवात झाली होती. सत्येनची आई तो सर्व प्रकार आणि आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहून चक्कर येऊन पडली. सत्येनचे बाबा आणि जेनीचे आईवडील देखील समोर आलेल्या संपूर्ण प्रकाराने धक्क्यात होते. सगळे कसेबसे एकमेकांना सावरत होते. अल्बर्टने सत्येनचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. अल्बर्टने इन्स्पेक्टर शंतनू आणि ऑफिसर अमृताचे गोवा पोलिसांच्या वतीने या तपासात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. इन्स्पेक्टर शंतनू आणि अमृता परत मुंबईला निघून आले.
दोन दिवसांनी पोस्टमार्टेमचा रिपोर्ट सांगण्यासाठी डॉक्टरांनी अल्बर्टला फोन केला. डॉक्टरांशी बोलता बोलता एकदम त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.
“व्हॉट! हे कसं शक्य आहे?”
तो ताडकन जागेवरून उठून उभा राहत फक्त इतकंच म्हणाला.
अल्बर्टला असं काय समजलं? पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
© निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा