दि बूमरँग.. भाग ८
पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, इन्स्पेक्टर अल्बर्ट जेनी आणि सत्येन समवेत सत्येनची गाडी जिथे बंद पडली होती त्याठिकाणी पोहचले. गाडीचे सर्व पार्टस भुरट्या चोरांनी चोरून नेले होते. सत्येनची कागदपत्रेही चोरीस गेली होती. त्यामुळे तो सत्येन असल्याचा काहीच पुरावा देऊ शकत नव्हता. पण सत्येनने इन्स्पेक्टर अल्बर्टला आर टी ओ ऑफिसला गाडीची चौकशी करायला सांगितली. तेंव्हा ती गाडी सत्येनचीच आहे आणि ती व्यक्ती सत्येन आहे सिद्ध झालं होतं. पण जेनी त्याला आपला नवरा मानायला तयार नव्हती. घरी आल्यावर जेनीने मुद्दाम सत्येनला सर्वांसाठी ड्रिंक्स आणायला सांगितली. त्या ड्रिंक्सच्या कपाटाची चावी फक्त तिला आणि सत्येनलाच माहीत होती. जेनी चक्रावून गेली. आता पुढे..
दि बूमरँग.. भाग ८
जेनी अल्बर्टला थांबण्यासाठी विनवणी करत होती. तो सत्येन नाहिये हे तिला अल्बर्टला सिद्ध करून दाखवायचं होतं. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ते पाहून अल्बर्टला दया आली. तो म्हणाला,
“बरं ठीक आहे. पण मिसेस बजाज हे शेवटचं. हे सत्येन बजाज नाहीत हे जर तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर त्यानंतर मात्र मी एक क्षणही इथे थांबणार नाही.”
जेनीने मान हलवून होकार दिला आणि ती इन्स्पेक्टर अल्बर्टला आपल्या बेडरूममध्ये घेऊन आली. तिच्या मागोमाग सत्येनही आला. जेनी कपाटातल्या कप्प्यात तिने नीट सांभाळून ठेवलेले फोटोज शोधत होती. पण तिला त्या कप्प्यात फोटो सापडत नव्हते. तिने कपाटातल्या सर्व कपड्यांच्या ढीग पलंगावर रचला. पण फोटो कुठेच मिळत नव्हते. तिने दुसरं कपाटही रिकामं केलं. पण फोटो काही सापडले नाहीत. जेनीला समजत नव्हतं. नेहमीच्या जागी ठेवलेले फोटो गेले कुठे? कपाटाला तर लॉक असतो आणि कपाटाची चावी फक्त जेनी आणि सत्येनकडे होती. फोटो कुठे गेले जेनीला काहीच समजत नव्हतं.
“इन्स्पेक्टर, फोटो मी इथेच कपाटात ठेवले होते. कुठे गेले कुणास ठाऊक?”
जेनी कपाटात शोधता शोधता म्हणाली. बराच वेळ झाला तरी जेनीला फोटो मिळत नाही हे पाहिल्यावर इन्स्पेक्टर अल्बर्ट खूप संतापला.
“मिसेस बजाज, खूप झालं आता. सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात. हेच सत्येन बजाज आहेत. माझी खात्री पटलीय. मला असं वाटतं तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. पूर्ण दिवस माझा यातच गेला. मिस्टर बजाज, प्लिज टेक केअर ऑफ हर. गुड बाय मि. बजाज”
असं म्हणत अल्बर्ट जेनीच्या बेडरूमच्या बाहेर पडला.
“इन्स्पेक्टर अल्बर्ट, ट्रस्ट मी. हा सत्येन नाही. हा माझा नवरा नाही प्लिज मला एका अनोळखी माणसाच्या तावडीत सोडून जाऊ नका. प्लिज इन्स्पेक्टर अल्बर्ट..”
जेनी अल्बर्टच्या मागे धावत आली. इतक्यात सत्येन तिला घट्ट पकडलं आणि जवळ घेत म्हणाला,
“जेनी काय होतंय तुला? अशी का वागतेस. तुझी तब्येत ठीक आहे ना? चल आपण डॉक्टरकडे जाऊ..”
“दूर हो नालायक माणसा! स्पर्श करू नकोस मला. तू सत्येन नाही. मला माहित आहे तू सत्येनचं नाव घेऊन मला फसवण्याचा प्रयत्न करतोयस..”
जेनी चिडून म्हणाली आणि ती अल्बर्टच्या मागे धावत आली. नेन्सी बाहेर उभी होती. नेन्सीला पाहून जेनी रागाने म्हणाली,
“इन्स्पेक्टर अल्बर्ट, आपण येण्याआधीच सिस्टर नेन्सी इथे आल्या होत्या. त्यांनीच तर फोटो लपवले नसतील ना? तुम्ही यांची झडती घ्या. यांच्याकडेच ते फोटो असतील..”
“व्हॉट नॉनसेन्स मिसेस बजाज, तुम्ही सिस्टर नेन्सीची झडती घ्यायला सांगताय! मी असं काहीही करणार नाही. हेच मि. सत्येन बजाज आहेत. हे सिद्ध झालंय. आता मला काहीच पहायचं नाहीये. तुम्ही तुमची पतीपत्नीची भांडणं एकत्र बसून सोडवा. मी निघतो. सिस्टर नेन्सी चला. तुम्हाला मी सोडतो..”
इन्स्पेक्टर अल्बर्ट चिडून म्हणाला.
“एक मिनिट इन्स्पेक्टर, मी येशूची सेविका. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर हे विकार माझ्या मनाला शिवत नाही. मला कशाचाच मोह नाही. पण मिसेस बजाजना माझ्याबद्दल शंका आलीय ना तर तुम्ही माझी झडती घेऊ शकता माझी काहीच हरकत नाही. पण मी काहीही केलेलं नाहिये.”
स्मित हास्य करत नेन्सी म्हणाली.
“पण मला असं करता येणार नाही. किंबहुना मला ते करायचं नाही. मी असं वागलो तर ईश्वर येशू मला कधीच माफ करणार नाही. तसंही आमच्या पोलीस खात्यात स्त्रियांची झडती घेण्याचा अधिकार स्त्री पोलीसांनाच असतो. मी असं काही करणार नाही” - अल्बर्ट.
“पण इन्स्पेक्टर, माझी काहीच हरकत नाही. मी तुम्हाला अनुमती देतेय. तुम्ही मिसेस बजाज यांची शंका दूर करा. किंवा मिसेस बजाज तुम्ही माझी झडती घ्या. असंही या बायबलशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाही.”
जेनीकडे पाहून स्मितहास्य करत सिस्टर नेन्सी म्हणाली.
अल्बर्टने जेनीला हातवारे करून झडती घेण्याची परवानगी दिली. अल्बर्टच्या परवानगीने जेनीने सिस्टर नेन्सीची झडती घ्यायला सुरुवात केली जेनीने नेन्सी बायबलमध्ये फोटो ठेवू शकते का? ही शक्यताही पडताळून पाहिली. पण तिला नेन्सीजवळ काहीच मिळालं नाही. जेनी निराश होऊन बाजूला उभी राहिली.
“काही नाही न मिळालं मिसेस बजाज! मी म्हणाले होते न तुम्हाला. बरं तुमची शंका दूर झाली न? आता मी निघू?”
सिस्टर नेन्सीने जेनीला विचारलं. अल्बर्टने तिच्याकडे चिडून पाहिलं. नेन्सीची झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागून तिला सोबत येण्याची विनंती केली. नेन्सीने तिचा निरोप घेतला आणि ती अल्बर्टसोबत ती बाहेरच्या दिशेने जाऊ लागली. जाता जाता तिने सत्येनकडे एक कटाक्ष टाकला. सत्येननेही तिला स्मित हास्य करत निरोप दिला. अल्बर्ट आणि सिस्टर नेन्सी जेनीच्या बंगल्यातून बाहेर पडले. थोडं अंतर पार केल्यानंतर एका बंगल्यासमोर नेन्सीने गाडी थांबवायला सांगितली. अल्बर्टचे आभार मानून ती त्या बंगल्यात गेली. अल्बर्ट पुढे निघून गेला.
इकडे जेनी विचार करू लागली. काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं? जेनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. इतक्यात सत्येन तिला घराबाहेर जाताना दिसला.
“बरं झालं गेला एकदाचा. हा कोण आहे आणि का त्रास देतोय ? काहीच समजत नाही. काय होतंय माझ्यासोबत..”
जेनी विचार करू लागली. बरीच रात्र झाली होती. जेनीला झोप येत नव्हती. विचार करता करता एकदम तिला बंगल्यात काम करणाऱ्या पीटर आणि मारियाची आठवण झाली. ते तर नक्कीच सत्येनबद्दल इन्स्पेक्टर अल्बर्टला सांगू शकतील. तिने लगेच पीटरला फोन केला.
“हॅलो पीटर, तू उद्या ताबडतोब इकडे निघून ये” - जेनी
“हो येतो मॅडम, पण साहेबांनी आठ दिवसांची सुट्टी दिली होती. म्हणून राहिलो. येतो आम्ही दोघेही लगेच..” - पीटर
पीटर लगेच येणार म्हणून जेनीला हायसं वाटलं. उद्या पीटर आल्यावर ही फसवी व्यक्ती सत्येन नाही कोणी लफंगा आहे, हे नक्कीच उघडकीस येईल. उद्या सकाळी अल्बर्टला कॉल करून बोलावून घेते म्हणजे त्याच्याच समोर सगळं चित्र स्पष्ट होईल. जेनीने मनोमन विचार केला.
दुसऱ्या दिवशी जेनी लवकर उठली. टायगरला सकाळी फिरायला घेऊन जाताना अजून एक गोष्ट तिच्या ध्यानात आली. आणि तिने ती गोष्ट इन्स्पेक्टर अल्बर्टला सांगायची ठरवली. घरी आल्यावर तिने अल्बर्टला फोन केला.
“गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर, तो माणूस कुठेतरी बाहेर गेलाय माहीत नाही मला कुठे ते? सर प्लिज विश्वास ठेवा माझ्यावर. हा माझा नवरा नाही. एकदा घरी येऊन जा. या घरातले विश्वासू नोकर पीटर आणि मारिया थोड्याच वेळात येतील. मी त्यांना बोलावून घेतलं आहे. तेच तुम्हाला खरं काय ते सांगतील. हा माणूस सत्येन नाही हे लवकरच तुम्हाला समजेल. प्लिज तुम्ही लवकर माझ्या घरी या.”
जेनीच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. अल्बर्ट तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. त्यालाही वाटलं एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू आणि तो जेनीकडे येण्यास तयार झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेनी अल्बर्ट आणि मारियाची वाट पाहत बसली होती. इतक्यात अल्बर्ट जेनीच्या घरी आला. ती खूप चिंतीत वाटत होती. अजून पीटर आणि मारिया आलेले नव्हते. जेनी पुन्हा पुन्हा पीटर आणि मारियाला फोन करत होती. पण कोणीच फोन उचलत नव्हतं. सत्येनही अजून घरी परतला नव्हता. जेनीने अल्बर्टला बसायला सांगितले.
“इन्स्पेक्टर, थोड्याच वेळात माझे नोकर पीटर आणि मारिया येतील. त्यांनाच तुम्ही विचारा. मी तुम्हाला सांगतेय तो माणूस सत्येन नाही आहे.”
“ठीक आहे ते आल्यावर खरंखोटं समजेलच..” - अल्बर्ट
“बसा मी तुमच्यासाठी कॉफी आणते..”
असं म्हणून जेनी आत स्वयंपाकघरात गेली. अल्बर्ट बाहेर बसून साऱ्या गोष्टी टिपत होता. इतक्यात सत्येन घरी आला. समोर अल्बर्टला पाहून म्हणाला,
“अरे इन्स्पेक्टर तुम्ही! आज सकाळीच इकडे!”
“हो थोडं काम होतं याच वाटेने म्हणून आलो. पण तुम्ही कुठे गेला होतात?”
अल्बर्टने सत्येनला प्रश्न केला.
“अहो, गाडीचं बघायचं होतं, मोबाईल पण हरवला ना.! सगळे कॉन्टॅक्ट्स त्यात होते न! म्हणून गेलो होतो.”
सत्येनने उत्तर दिलं. इतक्यात जेनी अल्बर्टसाठी कॉफी घेऊन आली. आणि सत्येनकडे पाहत म्हणाली.
“इन्स्पेक्टर अल्बर्ट, लवकरच सत्य कळेल तुम्हाला..”
इतक्यात जेनीला पीटर आणि मारिया दारातून आत येताना दिसले.जेनीला हायसं वाटलं.
“गुड मॉर्निंग मॅडम, आलो बघा. साहेबांनी चांगली आठ दिवस सुट्टी दिली होती. तुम्ही बोलवलंत म्हणून लगेच गाडीला बसलो. मी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता तुम्हाला आणि साहेबांनाही फोन केला होता. कोणाचाच फोन लागत नव्हता. कसं झालं सेलिब्रेशन?”
पीटर अवांतर बडबडत होता. जेनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण बोलतच होता. एकदम त्याचं लक्ष सत्येन कडे गेलं.
“हॅलो साहेब, कसे आहात? आणि तुमचा फोन का बंद लागतोय? कधीपासून फोन करतोय मी.!”
पीटर साहेबांकडे पाहून हसत म्हणाला.
“व्हॉट नॉनसेन्स पीटर,आर यु मॅड? सकाळ सकाळी दारू पिऊन आला आहेस का? तुझ्या साहेबांना ओळखत नाहीयेस? अरे काय करतोयस तू? मारिया बघ अग, पीटर काय बोलतोय? वेड लागलंय का याला?
जेनी पीटरवर रागावून बोलत होती.
“मॅडम, काय झालंय तुम्हाला? आपले साहेबच आहेत ना हे? असं काय करता? साहेब, काय झालं? बाईसाहेब असं का बोलताहेत? मॅडम रागावल्या आहेत का?”
मारियाने सत्येनकडे पाहिलं आणि हसून विचारलं.
“अग मारिया, काय झालंय तुला? तुम्ही तुमच्या साहेबांना ओळखत नाही का? याला तुम्ही सत्येन का बोलत आहात? तुम्ही दोघे खोटं का बोलताय? इन्स्पेक्टर अल्बर्ट, हे खोटं बोलत आहेत. ट्रस्ट मी हा सत्येन नाही. याने यांनाही आपल्या बाजूने करून घेतलं आहे. हे सगळे खोटं बोलत आहे.”
जेनी अल्बर्टला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत होती. आता मात्र अल्बर्ट प्रचंड संतापला.
“स्टॉप इट मिसेस बजाज! काय नाटक लावलंय? हे सगळे खोटं बोलत आहेत आणि तुम्ही एकट्याच खरं बोलत आहात का? ही व्यक्ती सत्येन असण्याचे किती पुरावे हवेत तुम्हाला? मी खरंच वैतागलो आता तुमच्या या वागण्याला. निघतो मी. उगीच माझा वेळ वाया गेला”
अल्बर्टने चिडून टेबलवर ठेवलेली त्याची फाईल उचलली आणि तो तिथून निघून जाऊ लागला.
जेनी अल्बर्टला जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होती. पण अल्बर्ट काहीही न ऐकता निघून चालला होता. इतक्यात जेनी ओरडून अल्बर्टला म्हणाली,
“थांबा इन्स्पेक्टर अल्बर्ट, मी अजून एक पुरावा देते? यानंतर तुम्हाला कोणत्याही वेगळ्या पुराव्याची गरज भासणार नाही. आता लगेच सिद्ध होईल की हा सत्येन नाही.
अल्बर्ट क्षणभर जागीच थबकला.
पुढे काय होतं? जेनी कोणता पुरावा सादर करणार पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा