द बॉस पर्व 3- भाग 1
देशात स्टार्टअपचे वारे जोरदार वाहत होते. नोकरी करून पिचलेले लोक बिझनेसची स्वप्न पहात होते, अगदी लहान सहान मुलांना सुद्धा या बिझनेसने भुरळ घातली होती. सिनेमात, मालिकांमध्ये सुद्धा हिरो एखाद्या मोठ्या बिझनेसचा मालक असल्याशिवाय हिरो म्हणून शोभत नसे. त्यात शार्क टॅंक सारख्या सिरियल्समुळे तर युवकांना अजूनच प्रोत्साहन मिळत होतं.
अश्या या वातावरणात सुद्धा शब्दांतरने आपलं स्थान टिकवून ठेवलं होतं. तनिषा गेली, नंतर आर्याने सर्व कारभार पाहिला. पण आर्याचं लग्न झालं तसं तिने पूर्णवेळ संसाराला दिला.
जशी भरती येते तशी ओहोटीही मागून येतेच. शब्दांतर नंतर अनेक नव्या दमाच्या कंपन्या आल्या आणि त्यांनी आपलं स्थान बळकट करायला सुरुवात केली.
तिकडे इनाया कंपनीतून निवृत्त झाली होती. तरीही अधूनमधून कंपनीची दखल ती घेत असे. शरीराच्या तक्रारी डोकं वर काढत होत्या, शब्दांतरची जुनी माणसं हळूहळू बाजूला झाली तशी कंपनी धीम्या गतीने चालू लागली. कंपनी सुरू होती ती केवळ तनिषाचा आदर्श ठेऊन आणि तिने घालून दिलेल्या तत्वांवर.
इनाया अशीच एकदा सकाळी पेपर वाचत असतांना तिची मुलगी घाईगडबडीत येते आणि म्हणते,
"अम्मा, आज लवकर जायचं आहे मला...प्लिज डबा दे लवकर"
"अगं हो हो, इतकी कसली घाई?"
"आज आम्हाला आमच्या नव्या बिझनेस चा शुभारंभ करायचा आहे...आम्ही स्टॉल लावतोय कॉस्मेटिक्स चा.."
"हे बिझनेस चं खूळ तुझ्या डोक्यातून काही जात नाही.."
"अम्मा तू अशी बोलतेस? तनिषा मावशी आज असती तर मला किती सपोर्ट केला असता तिने.."
असं म्हणत अनका घाईने निघून जाते, पण तनिषाचं नाव ऐकताच इनायाच्या डोळ्याच्या कडा पाणावतात..डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतं..तनिषाने तिला दिलेली संधी, जिंकलेलं सायबर वॉर, अमेरिकेत केलेल्या उलाढाली...सगळं डोळ्यासमोर आणलं तरी अंगावर शहारे यायचे...काय दिवस होते ते...!!!
तिकडे अनका आपल्या मैत्रिणींसोबत स्टॉल लावायला सुरवात करते...
"आता बघ, हे एवढे प्रोडक्ट विकले गेले ना तर उद्या दुसरा माल आणू.."
"पण हे सगळे विकले जातील?" दुसरी मैत्रीण म्हणते...
"का नाही? Positive बोल यार.."
मुली एका कॉलेजबाहेर स्टॉल लावून बसतात..येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे आशेने बघतात...पण कुणीही फिरकत नाही..
उन्हात बराच वेळ घालवल्यानंतर त्या वैतागून जातात..काय करणार, गेल्या महिन्यातील हा त्यांचा चौथा बिझनेस होता..सकाळी सुरू व्हायचा आणि संध्याकाळी बंद पडायचा...
पण पोरींनी आशा काही सोडली नव्हती..उन्हात दमल्याने मुलींनी ठरवलं की स्टॉल शेजारी असलेल्या कॅफे मधून काहीतरी खाऊन घ्यावं..एकजण तिथेच थांबली, तोवर बाकीच्या कॅफेमध्ये गेल्या..
परत येऊन बघता तर काय, स्टॉल समोर गर्दीच गर्दी..त्यांना कळेना, हे अचानक?
त्यांनी धावत जाऊन मैत्रिणीला पकडलं, "काय गं? हे कसकाय?"
मैत्रीण ग्राहकांना वस्तू देण्यात व्यस्त होती,
"थांब जरा.." ती म्हणाली..
ग्राहक संपले, सगळे प्रोडक्ट विकले गेले, तेव्हा त्यांनी मैत्रिणीला विचारलं..
"काय चमत्कार केला तू?"
मैत्रीण भांबावली,
"अगं.. तुम्ही कॅफे मध्ये गेल्या आणि मी इथे मोबाईल मध्ये व्यस्त होती...तेवढ्यात एक कुणीतरी बाई आली..स्टॉल समोर काहीतरी करत होती... मी जवळ गेले तशी ती झपझप पावलं टाकत निघून गेली...तिने एक बोर्ड स्टॉल वर ठेवला...ते बघून लोकं गर्दी करायला लागली.."
"बोर्ड? बघू..."
तिथे बोर्डवर प्रोडक्टची माहिती, हर्बल असल्याचा टॅग, आणि इतर प्रोडक्ट आणि आपल्या प्रोडक्टमध्ये असलेला फरक स्पष्ट लिहिला होता.."
"माय गॉड, हे आपल्याला कसं सुचलं नाही.."
"ते ठीक आहे...पण ती बाई कोण होती???"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा