Login

द बॉस- पर्व 3 भाग 2

तनिषाच्या फोटोवरची माळ खाली पडणं हा कसला संकेत?

अनकाच्या मनात अनेक प्रश्न उठतात. तेच प्रश्न घेऊन ती घरी जाते. घरी गेल्यावर इनाया-तिची आई तिच्याकडे न बघताच म्हणते,

"चला..आजचा बिझनेस तर झाला, आता उद्या काय नवीन?"

अनका प्रश्नाचं उत्तर न देता तशीच बसून राहते. इनाया तिच्याकडे बघते आणि म्हणते,

"काय गं काय झालं? आणि प्रोडक्टची बॅग कुठेय?"

"विकले गेले सगळे"

इनाया डोळ्यावरचा चष्मा बाजूला करत- "काय??"

इनायाला कळत नाही, सगळे प्रोडक्ट विकले गेले तरी हिचा चेहरा का उतरलाय?

"अगं इतकी आनंदाची गोष्ट आणि तू इतकी नाराज का?"

"नाराज नाही आई, गोंधळात पडलीये मी.."

"कसला गोंधळ?"

अनका आईला सगळी हकीकत सांगते. इनाया क्षणभर विचारात पडते, हे असं कुणी का करेल? कोण होती ती बाई?

तिला क्षणात तनिषा आठवली. ती अशीच होती, बिझनेस मधले बारकावे ती क्षणात हेरायची, कुठे चुकतंय, काय बिघडतय सगळं तिला समजायचं...पण, ती कशी असेल? ती तर....

इनाया गोंधळात पडते पण लगेच अनकाला धीर देते.

"हे बघ, अल्लाह कोणत्याही रुपात आपली मदत करतो.. हे तेच समज आणि पुढे जा."

"आई आज आम्ही प्रोडक्ट विकले पण ती आमची मेहनत नव्हती, ते त्या बाईने दाखवलेल्या हुषारीमुळे झालं..कोणत्या प्रेरणेने आम्ही बिझनेस करू?"

"मग काय करायचं ठरवलं आहेस?"

"मी थोडा ब्रेक घेतेय..मला आज जाणीव झाली की बिझनेस करण्यासाठी मला खूप गोष्टी शिकाव्या लागणार आहेत..पण.."

"पण काय??"

"कोण शिकवेल मला? इंटरनेट वर बिझनेस ट्युटोरियल्सचा जणू पाऊस पडतोय, पण ते सगळं नाही बसत माझ्या डोक्यात.."

इनायाचे डोळे पाणावले, आज तनिषा असती तर तिच्या हाताखाली माझ्या लेकीला धाडलं असतं. बिझनेसचं दुसरं नाव तनिषा. फक्त बिझनेस नाही तर बिझनेस मधून माणसं कशी जोडायची आणि आपण स्वतः एक परिपूर्ण माणूस कसं बनायचं हे तिने शिकवलं असतं. असो..

तनिषाची आठवण झाली तशी इनायाने पटकन गाडी काढली आणि शब्दांतरच्या ऑफिसमध्ये नेली. शब्दांतरच्या सिनियर म्हणून इनायाला अजूनही तिथे मान होता. तनिषाने तसं वातावरण घडवून ठेवलेलं, की ज्या लोकांनी रक्ताचं पाणी करून शब्दांतरला उभं केलं त्यांच्या सावलीचीही पूजा करावी. इनाया जाताच सर्वजण उठून उभे राहिले. इनाया सर्वांना भेटून तनिषाच्या केबिनमध्ये गेली. तिथे शब्दांतरचा जुना सफाई कामगार साफसफाई करत होता. इनाया जाताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला.

"नमस्कार मॅडम"

"नमस्कार, काय सगळं बरं चाललंय ना?"

"आयुष्यात सगळं चांगलं चाललंय मॅडम, तनिषा मॅडमने माझ्या मुलांचं भविष्य घडवलं.दोन्ही मुलं आज मोठे झाले..चांगल्या नोकरीला लागले.."

"अरे वा, अहो मग तुम्ही अजूनही का काम करताय? आता मस्त रिटायर होऊन आराम करायचा की.."

"मॅडम, खरं सांगू? आज माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे..पण हे ऑफिस, हे केबिन आणि इथली देवता..यांची पूजा केल्याशिवाय समाधान मिळत नाही. तनिषा मॅडमने कित्येकांची आयुष्य सुखकर केली.. मीही त्यातलाच एक..कित्येकदा भास होतो, तनिषा मॅडम लगबगीने केबिनमध्ये येताय, भैरव त्यांच्या मागोमाग येतोय..मॅडम त्यांच्या नवीन प्लॅनबद्दल तन्मयतेने सर्वांना सांगताय आणि मी ते सगळं कौतुकाने ऐकत सर्वांना चहा वाटतोय..."

हे ऐकून इनायाचा बांध फुटला..शब्दांतर केवळ एक कंपनी नव्हती, एक कुटुंब होतं.. जिथे परत परत येणं म्हणजे आपल्या घरी आल्याचा भास होई.

इनायाने स्वतःला सावरलं, तनिषाच्या खुर्चीकडे तिची नजर गेली आणि ती म्हणाली,

"अगदी शून्य होते मी, तू मला वर आणलं आणि मला लाखमोलाची किंमत दिलीस, आणि आता आम्हाला रडवून स्वर्गात मजा करतेय होय? की तिथेही काही बिझनेस सुरू केलाय? तिथल्या अप्सरांसाठी नवीन फॅशन ब्रँड वगैरे?"

इनाया आणि तो सफाई कामगार हसू लागतात, तोच... तनिषाच्या फोटोवरची फुलांची माळ खाली पडते. इनाया आणि तो कामगार स्तब्ध होतात...इनाया म्हणते,

"दादा, खिडकी बंद करून घ्या, हवेने झालं असेल.."

सफाई कामगार खिडकीजवळ जातो,

"मॅडम, खिडकी तर बंद आहे..."

इनाया केबिनमध्ये नजर फिरवते, हवा यायला कुठेही जागा नव्हती...

हे योगायोगाने घडलं? की हा काही संकेत होता??