Login

समजूतदारपणाचे बांडगुळ

समजूतदार असणे आणि हक्काच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून इतरांचा भार पेरणे यात फरक आहे
"उल्हास, मला वचन दे, माझ्या पश्चात निखिल आणि सुहासला अंतर देणार नाहीस त्यांना सांभाळून घेशील. काहीही झालं तरी हे घर तुटू देणार नाहीस. समजूतदार तर आहेसच तु. दोन्ही लहान भावांना अंतर देऊ नकोस".
विलासराव त्यांच्या अंतिम समयी आपल्या मोठ्या मुलाकडून वचन घेत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या आजुबाजूला उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रु होते. जयश्री ताई म्हणजेच विलासरावांच्या पत्नी त्यांच्या उशाशी बसुन होत्या. उल्हास ने त्यांना वचन दिले, "बाबा तुम्ही निश्चिंत रहा. मी सगळे सांभाळुन घेईन. " काहीच वेळात विलासरावां ची प्राणज्योत मालवली.
ठाण्यातील प्रशस्त थ्री बी एच के फ्लॅट मध्ये हे कुटुंब राहत होते. विलासराव, त्यांच्या पत्नी जयश्री ताई, मोठा मुलगा उल्हास, मधला निखिल आणि धाकटा सुहास. उल्हास चे लग्न झाले होते. त्यांची पत्नी स्वाती गृहिणी होती. 'विलासरावांच्या जाण्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी आता माझ्यावर आहे' अस समजुन उल्हास आणखीनच जबाबदारी ने वागू लागला. जयश्री ताईंना काय हव नको रोज विचारायचा. स्वाती सुद्धा खुप समंजस होती. निखिल आणि सुहास नुकतेच नोकरीला लागले होते. ती त्यांच्या सुद्धा वेळा पाळून डब्बे बनवुन द्यायची.
यथावकाश निखिल ला स्थळ पाहणे सुरू झाले. सुहास ने आधीच सांगितले होते कि, त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे. आणि लग्न तो तिच्यासोबत करणार. घरात कोणाला काही अडचण नव्हती. सर्वानुमते असे ठरले की निखिल आणि सुहास यांचे एकाच मांडवात लग्न लावुन द्यायचे. काही महिन्यांनी निखिल ला पुण्याची मुलगी पसंत पडली आणि लग्नाच्या तारखा काढण्यात आल्या. एकाच मांडवात निखिल चे चित्रा सोबत आणि सुहास चे मीनाक्षी सोबत लग्न लागले. या प्रसंगी सर्वात जास्त उत्साही स्वाती होती. सर्व कामात अग्रेसर होती. सगळ्या पाहुण्यांचे तिने जंगी स्वागत केले. आता जाऊबाईंच्या रुपात मला दोन मैत्रिणी मिळणार म्हणुन खुशीत होती ती.
लग्न झाल्यानंतर सुरवातीचे विधी मग नातेवाईकांच्या ओळखी आणि इकडे तिकडे फिरण्यात कसा एक महिना गेला कळलेच नाही. सर्वांचे रुटीन पूर्ववत सुरू झाले. मीनाक्षी जॉब करायची तर चित्रा डिग्री नंतरचा कोर्से करत होती. स्वातीला आता यांचे सुद्धा डब्बे करावे लागत. पण ती प्रेमाने करे. सुरुवातीला त्या दोघींनी स्वातीच्या पाककलेचे आणि मॅनेजमेंट चे खुप कौतुक केले. पण नंतर नंतर त्या तिला गृहीत धरू लागल्या. स्वातीला वाटायचे कधी तरी त्यांनी आवरा आवर करायला मदत करावी किंवा निदान जवळ उभे राहून थोड्या गप्पा माराव्यात. पण मीनाक्षी जॉब करून थकल्या चा बहाणा द्यायची तर आल्यानंतर चित्राला पुन्हा अभ्यास करायचा असायचा. जयश्री ताईंना सर्व दिसायचे पण त्या दोघींचे नवीन लग्न असल्याने त्यांना वाईट वाटेल म्हणुन त्या गप्प रहायच्या.
अलिकडे स्वाती ची दगदगीमुळे तब्येत खराब राहायची. तिला एकूण एक सगळी कामे झेपत नव्हती. तर तिने उल्हास समोर हा विषय मांडला, तर त्याने तू त्या दोघींशी बोलून बघ असा सल्ला दिला . तिने पण दुसऱ्या दिवशी मीनाक्षी आणि चित्रासमोर हा विषय मांडून बघितला. ती समजावणीच्या सुरात दोघींना म्हणाली की," सकाळी थोडे आणि संध्याकाळी थोडे कामे आपण वाटून घेत जाऊया म्हणजे माझ्या एकटीची दगदग होणार नाही ". मीनाक्षीने 'मी जॉब करून थकते' असे बोलून तिचे म्हणणे उडवून लावले , आणि चित्राने 'आता माझ्या परीक्षा जवळ येत आहेत त्यामुळे मला तरी खूप काही करणे जमणार नाही ' या शब्दात स्पष्टपणे सांगितले. स्वातीला त्यांचे असे बोलणे ऐकून वाईट वाटले. तिने आशेने सासूबाईंकडे पाहिले, पण त्यांनी नजरेनेच 'तुमचे तुम्ही बघून घ्या' असे खुणावले. झाल्या प्रकाराने स्वाती दुखावली गेली असल्याने तिने परत तो विषय उल्हास समोर मांडला तर यावेळी उल्हास ने," मला तुमच्या बायकांच्या गोष्टी सतत सांगू नकोस." असे म्हणून तिचे म्हणणे धुडकवले आणि तो झोपून गेला.
निखिल आणि सुहास जरी नोकरी करत होते तरी घर खर्चाचा अर्ध्यापेक्षा जास्त भार उल्हास उचलायचा. आणि ते दोघे अधे मध्ये आपापल्या सोयीनुसार पैसे जयश्री ताईंच्या हातामध्ये द्यायचे. बाकी खर्च ते आपल्या बायकांवरती करायचे. मीनाक्षी जरी जॉब करत असली तरीही आजपर्यंत तिने घर खर्चाला पैसे कधीही दिले नव्हते. उल्हासच्या अशा सवयींमुळे त्याच्याकडे स्वातीला देण्यासाठी पैसेच उरायचे नाही. त्यामुळे स्वाती स्वतःकडे लक्षच देऊ शकत नव्हती. तिने अडून-अडून या गोष्टी उल्हासला सुचवायचा प्रयत्न केला होता पण त्याने ,"आपण या घरातील मोठे आहोत, जबाबदार आहोत, आपल्यालाच सगळे सांभाळायचे आहे आणि तसे मी बाबांना वचन दिले आहे, त्यामुळे मी मागे हटणार नाही .निखिल ,सुवास आणि आईला सांभाळायची जबाबदारी माझी आहे ,त्यामुळे याबाबतीत माझ्यामागे भूनभून करू नकोस."
मध्यंतरी निखिल ला स्वतःसाठी चार चाकी घ्यायची होती, तर त्याने उल्हास कडे पैसे मागितले. उल्हास ने विचारले ,"अरे आत्ता लगेच गाडीची काय गरज ."तर तो म्हणाला ,"अरे अडीनडीला आपल्याला कुठेही पटकन जाता येईल. आणि घरामध्ये एखादी चार चाकी असलेली कधीही चांगली. आपल्याला ती उपयोगीच पडेल , आणि तुझे पैसे मी हळूहळू परत करतो." त्याचे बोलणे पटून उल्हास ने गाडीसाठी मित्राकडून पैसे उचलले आणि निखिल ला दिले. काही दिवसानंतर घरामध्ये नवीन गाडी आली तर निखिलने फक्त आपल्या बायकोलाच गाडीची पूजा करायला सांगितले. आणि तिला घेऊन फिरून आला. ही बाब स्वातीला खटकली, आणि तिने नवऱ्याला विचारले," अहो, गाडी सर्वांसाठी घेतली ना मग आपल्याला का नाही घेऊन गेले?" तर उल्हास म्हणाला," अग त्यांचे नवीन लग्न आहे त्यांना फिरून घेऊ दे नंतर आपणही जाऊ."
पुढे स्वातीला कधीतरी माहेरी जायचे होते. तेव्हा त्यांनी चार चाकी ची किल्ली मागितली .तेव्हा निखिल म्हणाला," अरे दादा आता थोड्या दिवसात मी आणि चित्रा सुद्धा फिरायला जाणार आहोत, तर आम्हाला गाडी लागेल . तुम्ही टू व्हीलर करून जा. त्यावर उल्हास काही न बोलता स्वातीला घेऊन निघाला. तिथे सुद्धा स्वाती थोडीशी चिडली, पण तिने गप्प राहणे पसंत केले.
आठ महिने होऊन गेले तरी निखिलने उल्हासला एकही पैसा परत केला नव्हता. इकडे स्वातीची तब्येत रोज काम करून करून खंगत चालली होती. आणि ते उल्हासला पण दिसत होते पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले . एके दिवशी स्वातीला खूप ताप आला. तर ती दिवसभर पडून राहिली. स्वयंपाक करण्या इतपत तिच्यात ताकदच नव्हती. संध्याकाळी सर्वजण घरी परतले तेव्हा जेवण अजिबातच तयार नव्हते. जयश्रीताई म्हणाल्या," स्वातीची तब्येत ठीक नाही तर तुम्ही दोघी स्वयंपाक करून घ्या." त्यावरून त्यांची धुसफुस सुरू झाली. तण तण करतच त्यांनी स्वयंपाक केला. आणि स्वतःपुरते खाऊन आत निघून गेल्या. याची तक्रार आपापल्या नवऱ्यान कडे करायला विसरल्या नाही. रात्री स्वातीसाठी जराही जेवण शिल्लक नव्हते. आणि हे उल्हासच्या डोळ्यासमोर घडूनही तो शांत होता. पोटात अन्नाचा एक कण नसल्याने दुसऱ्या दिवशी स्वातीला चक्कर आली. तिला शुद्धच येत नसल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. डॉक्टर म्हणाले ," यांचे बीपी सुद्धा लो झाले आहे तसेच हिमोग्लोबिन सुद्धा बरेच कमी झाले आहे. यांना काही दिवस स्ट्रेस अजिबात झेपणार नाही. स्वातीला काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवावे लागले."
इकडे मीनाक्षी आणि चित्रा यांची चिडचिड होऊ लागली.आणि त्यामुळे निखिल आणि सुहास सुद्धा चिडचिड करू लागले. जयश्रीताई म्हणाल्या," थोडे दिवस सुद्धा यांना स्वयंपाक करणे जमत नाही आहे." त्यावरून त्या जयश्रीताईंशी सुद्धा भांडल्या. त्यांचे नवरेही त्यांचीच री ओढत होते.
घरातले असे वातावरण बघून उल्हास स्वाती पाशी जाऊन प्रेमाने म्हणाला," तुझ्या वाचून घरचे सगळे काम अडले आहे, तब्येतीची काळजी घेऊन लवकर बरी हो. आपले घर तुझी वाट बघत आहे." यावर स्वाती उसळून म्हणाली," बास झाले आता तुमचे मोठेपण .मला आता हे समजूतदारपणाचे बांडगूळ झेपणार नाही. इतर कोणीही मला घर कामात मदत करत नाही. सगळ्यांनी नुसते गृहीत धरले आहे. बर, असेही नाही की आर्थिक दृष्ट्या बाकीचे सगळे घराला हातभार लावत आहेत. सगळ्यांसाठी घ्यायची म्हणून तुमच्याकडून पैसे घेऊन गाडी घेतली, पण आज पर्यंत एकदाही गाडीमध्ये बसायची संधी मला मिळाली नाही. मी कोणी घरातील मोलकरीण नाही. घर एकत्र बांधून ठेवायची घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी असते . कोणीही एकट्याने मन मारून ते ओझे पेलायची गरज नाही. मान्य आहे तुम्ही बाबांना वचन दिले आहे , पण म्हणून सगळ्यांचा संसार तुम्ही एकट्याने करावा असे नाही. प्रत्येकाने त्याची त्याची आणि त्यांच्या संसाराची जबाबदारी उचललीच पाहिजे. तुम्ही एकट्याने तीन जणांचे संसार करू शकत नाही आपलेही पुढे कुटुंब वाढेल .आपल्यालाही पैशांची गरज भासेल . आत्ताच आपल्याला कोणीही आर्थिक किंवा घरगुती हातभार लावत नाही आहे, पुढे कोणाकडून मी कशी अपेक्षा करू? लग्न करून तुम्ही माझी जबाबदारी घेतलेली आहे, आणि मी तुमची. पण याचा अर्थ असा नाही की गेलेल्या लोकांसाठी जिवंत असणाऱ्या माणसांचे मन मारावे. मी आज पर्यंत तुमच्याकडून माझ्या हक्काचा एकही पैसा मागितला नाही. मला वाटले तुम्हाला त्याची जाणीव असेल. पण तुमच्या लेखी जर मी फक्त एक मोलकरीण असेल, तर तुम्ही खुशाल सर्वांची जबाबदारी पेला मी हॉस्पिटल मधून थेट माझ्या घरी जाईन."
स्वातीच्या बोलण्यातले अक्षर आणि अक्षर खरे होते. तिचे निर्वाणीचे बोलणे ऐकून उल्हासला जाणवू लागले की,' आपण दिलेल्या वचनामुळे आपल्या हक्काच्या पत्नीला त्रास होत आहे '.त्याने तिच्या हातावर हात ठेवून तिला डोळ्यांनीच आश्वासन दिले.
तिथून तो तडक घरी गेला त्या रात्री त्याने सर्वांना घरी जमवले, आणि सर्वांसमक्ष तो म्हणाला ,"आजपर्यंत गृहिणी म्हणून स्वातीने तिची सर्व जबाबदारी पार पाडली आहे .पण याचा अर्थ तुम्ही तिला गृहीत धरावे असे नाही. भलेही मीनाक्षी मिळवत असेल किंवा चित्रा क्लास करत असेल, तरीही त्यांची घराप्रती जबाबदारी आहे. आणि निखिल आणि सुहास यांची सुद्धा आर्थिक दृष्ट्या घराला हातभार लावायची जबाबदारी आहे. जर ती कोणाला मान्य नसेल तर मी आणि स्वाती दुसरीकडे राहायला जातो. आईची जिथे इच्छा असेल तिने तिथे रहावे. माझी आईला ना नाही. पण पुढे मागे या घराची वाटणी जर होईल तर त्यात माझाही हिस्सा असेल. कारण हे घर वडिलोपार्जित आहे आणि याच्या देखरेखीत माझाही पैसा लागलेला आहे. आता सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. आणि निखिल पुढच्या दोन महिन्यांमध्ये गाडीसाठी घेतलेले पैसे मला परत कर. कारण स्वातीच्या आरोग्यासाठी मला पैशांची गरज आहे असे बोलून तो तिथून निघून गेला."
पुढच्या दोन दिवसांमध्ये कोणाकडूनही काहीही प्रतिक्रिया आलेली नाही हे बघून त्याने परस्पर एक वन बीएचके रेंटवर बघून ठेवले. आणि स्वातीला घेऊन तो थेट त्याच घरी गेला . काही महिन्यानंतर निखिल , सुहास आणि जयश्री ताईंना जाणवले की मीनाक्षी आणि चित्रा काहीही कामाच्या नाहीत. तेव्हा त्या दोघांनी येऊन उल्हास आणि स्वातीची माफी मागितली. आणि म्हणाले," आम्ही चुकलो दादा, पण आमच्या बायकांना चूक लक्षात येईपर्यंत तू तिकडे येऊ नको. तू फक्त वहिनींना सांभाळ. बाकी आम्ही तिकडे बघून घेऊ. फक्त आम्हाला माफ कर ."
जयश्रीताई आळीपाळीने दोन्ही घरी राहत होत्या.
कालांतराने मीनाक्षी आणि चित्राला सुद्धा त्यांची चूक लक्षात आली . त्या जबाबदारीने घर कामात लक्ष देऊ लागल्या.त्यांनी माफी मागितल्यावर स्वाती आणि उल्हास सुद्धा परत आले.
हेही नसे थोडके म्हणून जयश्री ताईंना समाधान वाटले.


काही वेळेला काही लोकांना कितीही झाले तरी स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होत नाही. पण त्यांच्या मागे वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यात पुढे जाणे गरजेचे आहे.

0