Login

बदल भाग- २ अंतिम

This is the heartwarming tale of a woman who, with her steadfast commitment and nurturing spirit, kept her family closely knit and happy throughout her life, fostering enduring, loving relationships and creating a legacy of harmony and joy.
घरातील सगळ्यांना सारजा आज्जी मध्ये झालेला बदल बघून आश्चर्य वाटत होते. तिचा मोठा भाऊ वारला मागच्या महिन्यात तेव्हापासून आई मध्ये बराच बदल झालेला गजाच्या लक्षात येत होता.

सारजा लग्न होऊन सासरी आली तेव्हा ती बारा वर्षाची पोरसवदा पोरगी होती. तिला स्वयंपाक पाणी बऱ्यापैकी जमत होते. त्यावेळी पिठाची चक्की नव्हती . पहाटेचा कोंबडा आरवला की उठायचं, जात्यावर दळण दळायच. परसातील आडाचं पाणी शेंदायचं. लहान सारजाला सुरवातीला अवघड वाटत होत पण सगळं हळूहळू जमायला लागलं. हळूहळू घरातील सगळ्यांचा स्वयंपाक जमू लागला.गुराढोरांचे शेणा मुताचे काम मात्र तिच्या नवऱ्याने सोपानने तिला करू दिले नाही तो स्वतः ते काम करत असे.

आई बापाच्या आज्ञेत असलेला सोपान आईबापाच्या मार्गदर्शनाखाली शेती करत होता. भरपूर पाणस्थळ जमीन. चार भाऊ आणि दोन बहिणी. सोपान घरातील मोठा मुलगा होता. सगळ्यांची लग्ने झाली होती. सारजा ची सासू ही लवकर वारली, चारी सुनांवर तिचा वचक होता. मोठी सुन म्हणून सारजाला जाण्यापूर्वी खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या. "आता तूच या संसाराला सांभाळायचे आहे, सगळ्या भावांना, आणि जावांना तुम्ही दोघांनी सांभाळायचं आहे. मोठी जाऊ आणि घरातले कर्तेसवरते म्हणून तुम्ही दोघांनी तुमच्या बाबांना साथ द्यायची आहे."

दिर्घ आजारानंतर सारजाच्या सासूने सारजा वर घरातली जबाबदारी सोपवून सर्वांचा निरोप घेतला. आणि घरातली कर्ती, सवरती मोठी सून म्हणून सारजा वर सगळ्या घराला बांधून ठेवण्याची जबाबदारी आली होती. सासऱ्यांचा ही सर्व सुना मुलांवर वचक होता पण घरातील मुख्य करभारीण आता सारजा झाली होती. सासूचा आपल्या सुनांवर घरावर कसा वचक होता तो तिने पाहिला होता आणि तोच आदरयुक्त वचक सारजा ने निर्माण केला होता. नवरा बायको एकत्र कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम चोख करत होते. सात आठ वर्षांनी सासरे वारले आणि घराची संपूर्ण जबाबदारी सारजा आणि सोपान वर पडली पण एक दिड वर्षातच भाऊ-भाऊ वेगळे झाले.

सारजा आणि सोपानची पाच मुले मोठी झाली होती. मुलीचे लग्न झाले, पाठोपाठ चारी मुलांची ही लग्न झाली. मोठा मुलगा शेतीत होता, दोन नंबरच्या मुलाचे दुकान होते. तीन नंबरचा जवळच्या कारखान्यात नोकरीला होता आणि चवथा मुलगा शहरात मुंबईत नोकरी करत होता. मुलगी चांगल्या घरात दिली होती. सारजा आणि सोपानचा संसार बहरत होता. सगळ्या सुना सारजाच्या आज्ञेत होत्या, सासूबद्दल आदरयुक्त भिती त्यांना वाटत असे. घर एकत्र बांधून ठेवायचं म्हणजे सारजाला वचक ठेवून रहावं लागत होता त्यात तिला नवरा सोपानची साथ होती. शेतीवाडी चांगली पिकत होती. घर धनधान्यांनी भरलेलं होतं. गावात सारजाच्या आणि सोपानच्या कुटुंबाला मान होता. गावात आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढी कुटुंब एकत्र होती त्यात सारजाचं कुटुंब आदर्श कुटुंब होतं.

धाकटी सून मुंबई वरुन आली तरी घरकामात मदत करत होती. कुटुंबात एकोपा होता. आता काही नातवंडांची ही लग्न झाली होती. घर अगदी भरलं गोकुळ होतं.

ओसरीवर बसलेल्या सारजा आज्जीच्या डोळ्यासमोरून सगळा भुतकाळ झर्रकन सरकला. दोन वर्षांपूर्वी सोपानची साथ सुटली होती, त्यातून सावरून सारजा लेका, नातवंडांचा संसार सावरत होती, पण मागच्या महिन्यात थोरला भाऊ वारला आणि ऐंशी वर्षाची सारजा आज्जी पार कोलमडून गेली.

बाहेर वळवाचा पाऊस सुरू झाला होता, पोरं गारा वेचत होती आज्जीच्या मनात ही वळीव कोसळत होता. आता पुढचा पावसाळा बघेन की नाही?..मनातच सारजा बोलत होती ,त्या आधीच तिला संसाराची जबाबदारी मोठा मुलगा आणि सुनेवर सोपवून हळूहळू संसारातून निवृत्त व्हायचे होते.

©® सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
१४/५/२०२४