शीर्षक:- परिवर्तन भाग -१
"आपल्याला आपल्या घरच्यांना सांभाळावे लागणार." तो म्हणाला.
"हो माझेही तेच म्हणणे आहे." तिनेही होकार दिला.
काव्या आणि मधुर ह्यांचे एकमेकांशी बोलून झाल्यावर घरच्यांना पसंत आहे सांगितल्यावर त्यांचे लग्न झाले.
मधुर हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. एकुलता एक मुलगा असल्याने त्याने आई वडिलांसाठी एकत्रच राहण्याची अट लग्नाआधी घातली होती.
"सासूबाई, मी उद्या माझ्या माहेरी जाणार आहे. ह्यावेळेस मी चांगले पंधरा दिवस राहून येणार आहे." टीव्ही बघत असताना काव्या म्हणाली.
निर्मलाबाई म्हणजेच काव्याची सासू, तिचे ऐकून चकित झाल्या. कारण लग्नाला दोनच महिने झाले होते त्यात त्यांची सून आज ह्याचा वाढदिवस तर उद्या माझे माहेरी काम आहे म्हणून महिन्यातून दोन वेळा सारखी तिथे जात होती.
नवीन लग्न झाले आहे आणि लगेच घरात भांडण नको म्हणून त्यांनी काही तिला तेव्हा टोकले नव्हते.
"मी उद्या माझ्या मम्माकडे जाणार आहे. तिची तब्येत ठीक नाहीये." तिने रात्री झोपताना आपल्या नवऱ्याला सांगितले.
"ठीक आहे पण लवकर ये. कारण आईला पण देवदर्शनाला जायचे आहे." मधुर बोलला.
"हो." म्हणून ती दिवे मालवून झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता करताना मधुरने आपली बायको माहेरी जाणार सांगितले ते ऐकून आपला मुलगा आपला राहिला नाही असेच त्याच्या आईवडिलांना वाटले.
"सूनबाईचे असे वरचे वर माहेरी जाणे मला पटत नाही. कारण इथल्या काही गोष्टी शिकायच्या किंवा कोणत्या समारंभाला गेले की मला सर्व तुमची सूनबाई कुठे आहे म्हणून विचारतात. प्रत्येक वेळी ती माहेरी आहे, हे कारण दिले की सर्व जण त्यांच्या भुवया उंचावतात. तिचा मुलांचा क्लास घरातून आहे तर केले तर करते घरातील काम नाहीतर सरळ टीव्ही तरी लावेल किंवा माहेरी फोन करून तासन् तास गप्पा मारेल. आपला लळा तिला लागणार कसा? " निर्मलाबाई आपल्या नवऱ्याला मनातील भावना बोलून दाखवत म्हणाल्या.
त्यांनीही मधुर आणि सूनबाई आल्यावर बोलू म्हणून तात्पुरता विषय टाळला.
पाच दिवस होऊन गेले होते. आपल्या सुनेने एकदा तरी फोन करावा असे त्यांना वाटत होते.
"काव्या कधी येणार आहे?" दहा दिवस होऊन गेले होते म्हणून शेवटी मधुरचे बाबा त्याला विचारत होते.
"ती कधी येणार आहे असे काही तिने सांगितले नाही. मी तिला आज फोन करून विचारतो." तो जेवत म्हणाला.
मधुरने आईला भांडी घासण्यासाठी मदत केली.
"आई, तू शांत का आहेस?" त्याने न राहून विचारलेच.
"काही नाही रे, तू ते तेलाची बाटली आण. मघाशी डोके धरून बसला होतास ना तर केसाला तेल लावून मालिश करून देते. तुला थोडे बरे वाटेल."
आईने आपल्या डोकेदुखीचे निरीक्षण केलेली पाहून आईसारखी कोणीच नसते हे त्याला तिच्या काळजीतून पटले.
"मधुर, राग येणार नसेल तरी एक बोलू का?" डोळे बंद करून खाली बसलेल्या आपल्या मुलाच्या केसांमध्ये तेलाची धार सोडत आईने विचारले.
त्याने मानेनेच होकार दिला.
आई "बाळा,मी तुझे कान भरत आहे असे तू नको समजू नकोस. तुझ्या आणि आपल्या घराच्या चांगल्यासाठी मी बोलते आहे."
"आई, तू थेट मुद्द्यावर ये ना." त्याला काही समजत नव्हते म्हणून तो म्हणाला.
"बाळा, तुमच्या लग्नाला अजून जास्त महिने नाही झालेत. सारखे ह्या घराच्या सूनबाईने माहेरी जाणे मला पटत नाही. मी असे नाही म्हणत की लग्न झाले म्हणजे माहेर विसरावे पण सासरच्या लोकांना, तिथल्या रीतिभाती आणि आसपासचा परिसर तसेच इथले लोक ह्याची तिला माहिती असणे जरूरीचे आहे. हे मी तुला ह्यासाठी सांगते की तुमचे नाते नवीन आहे. तू सांगण्यात आणि मी सांगण्यात फरक आहे. बाकी तुमचा संसार आहे तो कसा करायचा हे तुम्ही ठरवा." त्याला आईने समजुतीने सांगण्याचा प्रयत्न केला.
"हो आई." एवढे म्हणून तो खोलीत झोपायला गेला.
आईच्या बोलण्याचा विचार करत असताना त्याला एक एक गोष्ट आठवायला लागली. काव्याने आईची तब्येत ठीक नाही म्हणून ती गेली होती पण दुसऱ्याच दिवशी ती चित्रपट पाहायला गेल्याचे तिचे फोटो त्याने सोशल मीडियावर पाहिले होते.
मागे कोण्या नातेवाईकांचा वाढदिवस आहे म्हणून ती माहेरी गेली तेव्हा पाच दिवस राहून आल्यावर त्याबद्दल तिने विषय काढला नव्हता. कधीतरी त्याच्या आईसोबत जवळ कोणत्या कार्यक्रमात जाण्यासाठी विचारले असता ती नेहमी काहीना काही कारणे देवून बाजूला होत होती.
मागच्याच आठवड्यात काव्याने जेवणात काजूचा वापर केला होता त्यामुळे त्याच्या बाबांना त्याची ॲलर्जी असल्याने त्रास होऊन हॉस्पिटलला न्यावे लागले. आईचे म्हणणेही बरोबर होते की तिने इथे वेळ घालवण्यासाठी सर्वांसोबत राहायला हवे आणि ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या करून घ्यायला हव्यात.
रात्रभर पुढे कसे करायचे हा विचार करतच तो झोपी गेला.
"आई, माझा डब्बा करू नकोस. मी आज सुट्टी टाकली आहे." चहा पिताना मधुर म्हणाला.
"काय रे? तुझी तब्येत ठीक नाही का ?" मधुरचे बाबा वर्तमानपत्र वाचत असताना ते खाली करून त्यांचा चष्मा नाकाच्या वर करत त्याला बघून विचारत होते.
"माझी तब्येत ठीक आहे. काव्याला आणायला जातो म्हणून सुट्टी टाकली आहे." त्याने माहिती दिली.
आईला काल बोलण्याचा फरक जाणवला होता.
मधुरने चार ते पाच तासांचा प्रवास करून आपल्या सासरवाडीत पाऊल ठेवले.
दाराची घंटी वाजली आणि काव्याच्या बाबांनी दार उघडले.
"तुम्ही येणार हे काव्याने आम्हाला सांगितले नाही." हसतच आतमध्ये येण्यासाठी बाजूला होत तिचे बाबा म्हणाले.
"हो, तिला माहीत नाही. मी तिला घेण्यासाठी आलो आहे." त्याने हॉलमध्ये तिचे निरीक्षण करत उत्तर दिले.
त्यांनी काव्याला मधुर आल्याचे सांगितले आणि तिही तो पूर्वकल्पना न देता आल्याने अवाक झाली हे तिच्या चेहऱ्यावरच्या मुद्रेने त्याने टिपले.
"तुम्ही काल बोलला नाहीत की तुम्ही आज येणार आहात." काव्या हसतच म्हणाली.
"का? मी इथे आलेलो आवडले नाही का? " मधुरने प्रतिप्रश्न केला.
क्रमशः
काय होईल पुढे?
© विद्या कुंभार
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा