Login

परिवर्तन भाग-२

जीवनातील परिवर्तनावर आधारित गोष्ट!
शीर्षक:- परिवर्तन भाग -२

मागील भागात

"तुम्ही काल बोलला नाहीत की तुम्ही आज येणार आहात." काव्या हसतच म्हणाली.

"का? मी इथे आलेलो आवडले नाही का? " मधुरने प्रतिप्रश्न केला.

आता पुढे,

"अहो,तसे नाही. सहजच तिने विचारले." काव्याची आई सावरत म्हणाली.

"मी पण मस्करीतच म्हणालो. आता तुमची मुलगी सासरी राहते तर म्हंटले मी पण माझ्या सासुरवाडीत जावून यावे." मिश्कीलपणे तो बोलत होता.

त्याने असे म्हणताच सर्व हसायला लागले.

"बरं, आलाच आहात तर दोन दिवस राहा मग तुमच्या सासुरवाडीत!" काव्याची आई म्हणाली.

"नाही, मला सुट्टी नाहीये. लगेच निघावे लागेल. आई उद्या अष्टविनायक यात्रेला जाणार आहे." काव्याकडे पाहून त्याने म्हंटले.

जेवण लवकर करून दोघे निघाले. काव्याला अजून राहायचे होते परंतु मधुर स्वतः घ्यायला आला त्यामुळे तिला जावे लागत असल्याने पूर्ण प्रवासात ती गप्पच होती.

दोघांना घरी पोहोचायला रात्र झाली होती.

"आई, तू उद्या सकाळी किती वाजता जाणार आहेस?" त्याने झोपायला जायच्या आधी चौकशी केली.

"मी पहाटे चार वाजता जाणार आहे." आई सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालत म्हणाली.

"ठीक आहे. काव्या तू उद्या माझा डब्बा कर. आई तू तुझे आवरून लवकर जा. जाताना मला आवाज दे. बाबांची काळजी करू नकोस. तिथे गेल्यावर मस्त फोटो काढ आणि इकडची काळजी करू नको. आता काव्या आहे तर ती इथले सर्व बघेल." त्याने असे बोलून झाल्यावर आपली खोली गाठली.

काव्याला वाटले की उद्या आरामात उठेन पण नवऱ्याने डब्बा करण्याचे फर्मान सोडले म्हणून सासू सासऱ्यांसमोर काही न बोलता ती खोलीत गेली.

पहाटेच्या वेळी,

"आई, काळजी घे. मी तुझ्या अकाउंटवर पैसे काल पाठवले आहेत. तुला हवे ते घे आणि मी तुला ऑनलाईन पेमेंट ॲप कसा वापरायचा आहे ते सांगितले आहेच. काही वाटले तर फोन कर. " आईला जवळ घेवून एका हाताने मिठी मारत तो म्हणाला.

"काव्याला मदत कर. भांडू नकोस आणि  तिला समजून घे. " जाता जाता आई सूचना देण्याचे काम करत होती.

"हो." त्याने मान हलवली.

आई तिच्या महिला मंडळाच्या मैत्रिणींसोबत अष्टविनायक दर्शनासाठी गेली.

खोलीत आल्यावर आपल्या झोपलेल्या बायकोकडे पाहून त्याने सुस्कारा सोडला.

सकाळचे सात वाजून गेले होते.

"काव्या, उठ. उशीर होत आहे." बाजूचा गजर वाजून बंद करून झोपलेल्या तिला तो हलवून जागे करत होता.

"झोपू द्या. एकतर कालचा प्रवास पुन्हा त्यात डब्बा आणि नाश्ता करून देणे मला होणार नाही." असे म्हणून ती पुन्हा झोपली.

त्याने उठून चहा आणि नाश्ता बनवला. त्याच्या बाबांना बिपीची गोळी खावी लागायची त्यामुळे त्यांना सकाळी नाश्ता करणे जरूरीचे होते.

"काव्याची तब्येत ठीक नाहीये का?" बाबांनी शेवटी प्रश्न विचारलाच.

प्रवासामुळे ती थकली आहे असे कारण त्याने दिले.

डब्बा न घेताच तो कामावर गेला.

ती उठली तेव्हा तो कामावर निघून गेला होता.

दुपारचे जेवण काय बनवायचे ह्याचा विचार करत असताना तिने खिचडी भात बनवला आणि सासऱ्यांना दिला. त्यांनीही तिचे छान बनवला म्हणून कौतुक केले.

दोन दिवस असेच झाले. त्या दोन दिवसांत मधुर तिच्याशी फार काही बोलला नाही.

"मला जरा तुमच्याशी बोलायचे आहे." तिने रात्री जेवण झाल्यावर त्याच्याजवळ विषय काढण्याचे ठरवले.

"हो,बोल." मोबाईलमध्ये पाहत तो म्हणाला.

"आधी तो मोबाईल बाजूला ठेवा." काहीशी चिडतच ती म्हणाली.

त्याने मोबाईल बाजूला ठेवून हाताची घडी घालून तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.

"मला थोडे दिवस माहेरी राहायचे होते. तर तुम्ही न सांगता आलात. पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच डब्बा बनवायला सांगितला. एवढे मला लगेच जमणार का?" तिने विचारलं.

"माझी आई तर सगळे करते." तो म्हणाला.

"पण मला तर सवय नाही ना." ती म्हणाली.

"त्यासाठी इथे राहून तुला ते माहिती करून घ्यायला हवे. हे बघ तू पण एकुलती एक मुलगी आहेस मी पण एकुलता एक मुलगा आहे. तुला सर्वच येत असावे हे मी कधी गृहीत धरले नाही पण तू प्रयत्न तर करू शकते. लग्न झाल्यापासून तू माहेरी किती वेळा गेलीस? माझा डब्बा तर आईच करून देते. तुला कधी असे वाटले नाही का, आपण पण सकाळी उठून आई कशी करते ते पाहून करण्याचा प्रयत्न करावा. तू आई खूप आजारी आहेस म्हणून गेली होतीस पण दुसऱ्या दिवशी तर तू चित्रपट पाहायला गेलीस. आता ह्यातले किती खरे आणि किती खोटे? सांग बरं. तू तुझे माहेर सोड असे म्हणत नाहीये पण आईसोबत बसून तू काही गोष्टी तुला ज्या येत नाहीत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का? टीव्ही एकदा बघत बसलीस की तू काम बाजूला ठेवतेस. जसे तुझ्या आईचे वय झाले तसे माझ्या आईचे पण झाले आहे. तिने काय आयुष्यभर माझेच करायचे का?" त्याने आज सर्व बोलून दाखवले.

"हे सासूबाईंनी तुम्हाला सांगितले?" तिने थोडे रागातच विचारले.

"तिने सांगायला मला काही डोळ्यांनी दिसत नाही का?" त्यानेही रागातच प्रत्युत्तर दिले.

"माझे लग्न तुमच्याशी फक्त तुमच्या घरातील काम करण्यासाठीच लावले आहे का?" ती जाब विचारत होती.

"हे घर तुझे नाहीये का? दोघांनी मिळून आपण तुमचे आणि माझे सासर सांभाळायचे असे ठरले होते ना?" त्याने विचारले.

दोघात भांडण झाले आणि दोघे बोलायचे बंद झाले. बाबांना त्यांचे बोलणे ऐकू गेले होते पण त्यांचे त्यांनी हे मिटवावे असे त्यांना वाटत होते. उगाच कोणाची बाजू घेवून बोलत आहे असे म्हणून त्यातील एकजण नाराज होण्याची शक्यता होती. नवरा बायकोने आपली चार भिंतीतील भांडणे त्या चार भिंतीतच सोडवाव्यात अशा मताचे ते होते.

दोघांचे भांडण वाढेल की मिटेल?

क्रमशः

© विद्या कुंभार.

कथा आवडल्यास लाईक आणि तुमचे विचार कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.