Login

बदल भाग- १

This is the heartwarming tale of a woman who, with her steadfast commitment and nurturing spirit, kept her family closely knit and happy throughout her life, fostering enduring, loving relationships and creating a legacy of harmony and joy.
झाडाचं पान अजिबात हलत नव्हतं. कोंबड्या कॉ ऽ कॉऽ करत झाडाखाली सावलीत बसल्या होत्या. कुत्रे ,मोरीच्या सांडपाण्याने ओलावलेली जमीन खोदून त्यात गारव्यासाठी बसले होते. बुलबुल आणि चिमण्यांचा झाडावर खेळ रंगला होता.

घरासमोरील आंब्याच्या सावलीत सारजा आज्जी वाळवणाला राखण बसली होती. मधून चोच मारायला येणाऱ्या कावळ्याला हाकलत ती बोलत होती,

"हाड्याऽ तुझ्या बायकोच्या केल्या वड्या."
जवळच पोंर टोरं खेळत होती.
तिचा लेक गजाने ,शेजारच्या सपरात बांधलेल्या म्हसरांना पाणी पाजले आणि वैरण घातली. तेवढ्यात पॉ पॉ हॉर्न वाजवत गारेगार वाला आला.पाठोपाठ कुल्फी वाला ही आला.

पोरं कुल्फी मागू लागली तर कुणाला गारेगार हवा होता. सारजा आज्जी घरात गेली, मोठे घमेले भर भुईमुगाच्या शेंगा घेऊन बाहेर आली. सुना आऽ वासून बघू लागल्या, एवढ्या शेंगा!...
सारजा आज्जीने गारेगार वाल्याच्या झोळीत शेंगा ओतल्या आणि चांगल्या दोन डझन गारेगार आणि कुल्फी घेतल्या.
"आज्जी मला , आज्जी मला" करत पोरांनी एकच गलका केला. आज्जीने प्रत्येकाच्या हातात एक एक कुल्फी दिली आणि ओसरीवर बसून घरात काम करत असलेल्या सुनांना हाक मारली. "घ्या गं तुम्ही बी एक एक कुल्फी घ्या, गारेगार घ्या." सुना अचंबित झाल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून सारजा आज्जी ( सासू) बोलली.

"तुम्हाला बी खावसं वाटतो ना गारेगार मग घ्या की अशा काय बघताय?.. उकाडा केवढा वाढलाय, तेवढच गार गार व्हाल."

मग सुनांनी पण कुणी कुल्फी कुणी गारेगार खाल्ला आणि बारक्या पोरांसारखं एकमेकींना रंगलेल्या जिभा पण दाखवल्या. त्यांची सासू सारजा आज्जी हे सगळं डोळ्याच्या कोपऱ्यातून बघत होती आणि गालात हसत होती.

तेवढ्यात शेजारच्या गावातले पावणे आले. गजाने त्यांना माठातील थंडगार पाणी दिले. घटाघटा तांब्याभर पाणी पिऊन त्याने रिकामा तांब्या खाली ठेवला.

थोड्याच वेळात थंडगार लिंबू सरबत त्यांच्या हातात देत गजा बोलला,
"कसं काय येणं केलं एवढ्या उन्हाताणात?.

"आवं कामच तसं हाय म्हणलं येळ घालवू नये, लगेच निघालो बघा, तुमच्या रेश्माला स्थळ घेऊन आलोय."पार्टी जबरदस्त हाय."

"आर पोरगं काय करत ते सांग आधी"
आज्जी बोलली.
"पोरगा मुंबई ला नोकरीला हाय, त्याच्या बापाचा छोटा बिझनेस हाय, जत्रला आलीत ती, मला पोरगी बघाय सांगितली तर मला आपली रेश्मा आठावली."

रेश्मा ची आई सुनीता माजघरातून सगळे ऐकत होती. डोक्यावरचा पदर सरळ करत ती बाहेर आली आणि बोलली.

"यंदा आम्ही लगीन नाही करत. पोरगी शिकतेय, शिक्षण पूर्ण झाल्यावर लगीन करणार. "

"स्थळ लाखमोलाचं हाय, आपल्या वळखीतलं, हातचं सोडू नका काकू." सारजा आजीला पाहुणा बोलला.

आजी बोलली , "आता पहिल्या सारखं राहिलं नाही, पोरीचा बी इचार घ्याला हवा मग सांगू काय ते, आमाला गडबड न्हाय."

"भारी स्थळ हातचं जाईल." पावणा बोलला

"गेलं तर जाऊदे की दुसरी पोरं न्हाईत व्हय दुनियेत?"...
सुना माजघरातून सगळे संभाषण ऐकत होत्या आणि अचंबित होत होत्या.
ही आपलीच सासू हाय न्हवं!.. .
असेच भाव त्यांच्या तोंडावर होते.
अचानक कडक स्वभावाची सासूबाई सारजा बाईत कसा बदल झाला पाहूया पुढील भागात.
सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
१४/५/२०२४