Login

वही......... एक रहस्य

Mystery Behind The Copy Of A Small Girl

            आज तिला घरून निघायला नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाला होता . दिवाळी आठ दिवसांवर आली होती त्यामुळे आता जास्त दिरंगाई करुन चालणार नव्हतं . शेवटी तिने मनात विचार केला अर्धा तास म्हणजे फार उशीर नाही, आणि गाडीला किक मारली सुद्धा. लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असणारे सामान खरेदी करून आता फक्त वाण सामानाची यादी घेऊन किराणा दुकानात जायचं होतं , आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी तेवढी घ्यायची राहिली होती.

             दिवाळी तोंडावर असल्याने वाण्याच्या दुकानात तर फारच गर्दी होती म्हणून, ती जरा बाजूच्या बाकावर बसली . तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला , आता \"यावेळी कोणाचा फोन?\" मनात विचार करत, तिने पर्स मधून फोन काढला ,फोनच्या स्क्रीनवर नवऱ्याचं नाव ! तिच्या डोक्यावर आठ्या पसरल्या.(तिचा नवरा तिला असं दिवसाच्या अधेमधे किंबहुना,  स्वतःहून कधीच फोन करत नसे). तिने फोन उचलला,

नवरा- कुठे आहे तू? लँडलाईन वर चार फोन लावले उचलत का नाहीस?

ती- अहो , मी सामान घेण्यासाठी बाजारात आली आहे.

नवरा-  एक काम कर, ते सगळं सामान उद्या घे, आधी तू घरी जा . नवऱ्याचा काळजीचा सुर.

ती-  का काय झालं?(तिच्या मनात अनेक प्रश्न ,कारण नवरा असं कधी फोन करून काही सुचवत नसे)

नवरा - \"अगं प्रश्न नको विचारू . आधी घरी जा!\" (वैतागून )आणि घरी गेली की माझं आणि \"मनीच\" बोलणं करून दे.

                  \"मनी\" म्हणजे राम आणि नलिनी यांच्या संसाराच्या वेलीवर उमललेलं एक सुंदर फुल. राम हा फार महत्वकांक्षी मध्यमवयीन व्यवसायिक, आपल्या व्यवसायात जम बसवता बसवता त्याच्या लग्नाला जरा उशीरच झालेला . तसही घर - बायको - कुटुंब या विषयी राम जरा बेफिकीरच. तो आणि त्याचा व्यवसाय एवढंच त्याचं विश्व . त्याला एक यशस्वी उद्योजक व्हायचंय होतं,  आणि त्या एकाच स्वप्नासाठी तो जगत होता. पण मनीच्या येण्याने त्याच्यातला बाप जागा झाला . जगात सगळ्यात जास्त प्रेम तो मनीवर करायचा , आणि तिच्याबद्दल प्रचंड पझेसिव्ह होता. मनीचा शब्द तो कधी खाली पडू द्यायचा नाही. तिचे तो खूप लाड करायचा , सगळे हट्ट पूर्ण करायचा. रामचं मनी विषयीच प्रेम नंदिनीला माहिती होतं, त्यामुळे तिने फोनवर नवऱ्याला फक्त \"हो\" म्हटलं आणि लगेच घरी पुतणी ला फोन लावला.

नलिनी - \"सोनू मनी कुठे आहे ग?\"

सोनू - "काकू ती माझ्यासोबतच खेळत होती , पण अर्ध्या तासापूर्वी किती खाली आजीकडे गेली".

         (सोनू , नलिनी च्या मोठ्या जावे ची मुलगी. आता बारावीत तिने प्रवेश घेतला होता . सोनू मनी चा खूप लाड करायची , सोनुला लहान मुलं फार आवडत)

           ( संपूर्ण जोशी कुटुंब एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहत होतं दोघे भाऊ - राम आणि रमेश दोन वेगवेगळ्या माळ्यावर तर त्यांची आई अपार्टमेंटच्या सर्वात पहिल्या माळ्यावर राहायची.)

    सोनूला फोन लावायच्या आधी नलिनीने विचार केला होता की , मनी जर सोनू सोबत खेळत असेल तर आपण सोनुला म्हणून,  मनीच आणि रामचं बोलणं करून देऊ, पण आता तिला घरी परतण्या शिवाय पर्याय च नव्हता.

                तिने स्कूटरला किक मारली आणि घराच्या दिशेने निघाली. गाडी चालवता चालवता तिच्या डोक्यात अनेक विचार की , राम ने मनी साठी फोन का केला? काय झालं असेल? मनी विषयी काही कमी-जास्त असेल का?राम असा तडकाफडकी फोन करणाऱ्यांपैकी नाही ! काहीतरी गंभीर आणि महत्वाचं कारण असल्याशिवाय राम आपल्याला इतके फोन करण शक्यच नाही ! फक्त आता मनी घरी सुखरूप असली म्हणजे झालं!

             (तसंही नलिनी मनी ला घर सोडून कुठेही जाऊ देत नसे . त्यांच्याच त्या अपार्टमेंट मध्ये घरातल्या नोकर आणि आजी -सोनू -काकी यांच्याशीच मनी चा खेळ रंगत असे)

           घरी आल्या आल्या तिने आधी गेटवर च्या वॉचमन काकांना, \"मनी कुठे बाहेर गेल्याचं विचारलं\" तर काका म्हणाले, \"नाही नलिनीताई आज सकाळपासून तर मनी खाली उतरलीच नाही ,मघाशी तुम्ही बाहेर गेल्या , त्यानंतर फक्त सोनुताई तेवढ्या क्लासला गेल्या\". "अरे आता सोनू ही घरी नाही, म्हणजे मनी नक्कीच आपल्या फ्लोअर  वर टीव्ही बघत असेल नाहीतर, आजी सोबत खेळत असेल" नलीनीने मनाशी विचार केला. तेवढ्यात परत तिचा फोन वाजला. रामचाच फोन होता "अगं नलु पोहोचली का तू घरी?  माझं आणि मनी चं बोलणं करून दे बरं!"

नलिनी- "अहो! मी गेट वरच आहे!  पाच मिनिटात वर पोहोचते आणि तुमचं मनी शी बोलणं करून देते"

(काहीतरी नक्की झालं आहे! नलीनीने मनाशी विचार केला - नाही तर राम एवढे फोन करणारच नाही!)

नलीनी लगेच सासुबाई कडे गेली, "आई मनी आहे का हो?"

सासुबाई -"कोण नलु? अगं ती आत्ता इथेच होती पण मघाशीच पळाली. का? काय झालं ?आणि तू माझ्या गोळ्या आणल्या का?"

           नलिनीला स्वत:ला ही काही माहित नसल्याने, ती सासूला तरी काय सांगणार? रामच्या सतत फोन करण्यामुळे ती सासूच्या गोळ्या घ्यायला ही विसरली होती. ती परत खाली उतरली , पण तिथे सिक्युरिटी काका नव्हते . तिने जास्त वेळ घालवला नाही आणि लगेच स्वतःच्या माळ्यावर गेली. तिने स्वतःचं  अख्ख घर शोधलं तरी मनी चा कुठेच पत्ता नव्हता.  आता नलिनी चं टेन्शन वाढत होतं ,नलीनीने आपल्या जावे ला फोन केला  की , मनी त्यांच्याकडे आहे का ? तर जाऊ बाई म्हणाल्या की , \"सकाळपासून त्या महिला मंडळाच्या मीटिंगमध्ये आहे\". नलीनीने मनात विचार केला की,  "आता जर राम चा फोन आला तर आपण काय सांगणार? आणि मनी नेमकी आज गेली तरी कुठे?रामचा राग नलीनी पुरेपूर ओळखून होती ,त्यामुळे मनी लवकरात लवकर सापडणं आणि तिचं राम शी बोलणं करून देणे फारच गरजेचं होतं . शेवटी पाच एक मिनिटांनी नलिनी फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली , तर मनी तिथे तिच्या बाहुलीचे कपडे धुवत होती. मनिला बघून नलिनीला खूप बरं वाटलं आणि दोन क्षणांसाठी खूप राग ही आला.

             पण ते सगळं बाजूला ठेवून नलिनी मोबाईल कडे वळली तर परत रामचाच फोन," अगं तुला कळत नाही का? दोन तासांपासून म्हणतोय की मनीशी माझं बोलणं करून दे म्हणून!"  राम चा वैताग त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवत होता.

    मनी- "मम्मी कोणाचा फोन?"

   नलिनी- "पप्पांचा"

    मनी - "मला बोलायचं "आणि म्हणी ने फोन हीसकला."पप्पा मला एक डॉल हवी आहे . तुम्ही कधी येणार पप्पा ? पप्पा रात्री लवकर घरी या ना ! हो पप्पा !! लव यू पप्पा !!! ओके बाय पप्पा!!!!

              नलिनी फोनवर काही बोलणार तोपर्यंत रामने फोन कट ही केला होता.

           नलिनी आता सोफ्यावर शांत बसली . मागच्या दोन अडीच तासात काय झालं ? याचा विचार करू लागली , लँड लाईन वर रामचे कॉल मग मोबाईल वर . त्याचं सतत "मनी शी बोलणं करून दे" म्हणून टुमण, काहीतरी गंभीर आणि वाईट झालं आहे, नाहीतर राम इतके फोन करणारच नाही.

            एखाद तासानंतर परत राम चा फोन, आवाज एकदम गंभीर आणि तणावग्रस्त "नल्लू मी आज घरी येऊ शकणार नाही !जेवणासाठी माझी वाट पाहू नकोस, आणि रमेश भाऊ घरी आले की त्यांच्याशी थोडं बोलून घे . मी सुखरूप आहे , थोडं काम आहे म्हणून एका ठिकाणी जात आहे".

          रात्री साडे आठ नऊला रमेश भाऊंचा फोन " नलिनी जरा खाली येतेस का?"

रमेश भाऊ - "नलिनी घाबरण्याचं काहीच कारण नाही, राम उद्या दुपारपर्यंत घरी येईल, पण उद्या सकाळी आपल्याकडे पोलीस येणार आहेत त्यांना मनिशी बोलायचं आहे".

     पोलिसांचं नाव ऐकून नलिनी जरा चपापली आणि घाबरली सुद्धा ,"दादा , मनिशी काय बोलायचंय पोलिसांना? राम चा काही प्रॉब्लेम झाला आहे का?"

रमेश भाऊ - "नलिनी आम्ही सगळे आहोत , तू फक्त धीरानं घे ! पोलिसांशी सहज वाग!! घाबरू नकोस!!! सगळ ठीक होईल!!!"

नलिनी - "पण दादा नक्की झालंय तरी काय?"

     आता विचार कर करून नलिनी चं डोकं फुटायची वेळ आली होती.

   रमेश भाऊ - " नलिनी मनीच्या वर्गातल्या तीन मुलांची मिसिंग ची तक्रार दाखल झाली आहे!"

 नलिनी - "काय?"

" हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस"

नलिनी -"पण दादा या सगळ्या राम आणि मनी चा काय संबंध?"

". ते मी कसं सांगू ? मला एवढंच कळलं आहे , तू एकदा राम शी शांततेने बोलतेस का? "

"हो"

नलिनी - "हॅलो, मी नलिनी काय झालं आहे?"

राम -\" तुला रमेश भाऊंनी सर्व सांगितलं असेल, मी तुला काही नाव सांगतो तू ओळखतेस का त्यांना?\"

      नलीनीने एका कागदावर नाव लिहून घेतले , आणि मोबाईल मध्ये चेक केलं . ते सगळे मनीच्या वर्गातले मुले होती,  मागल्या वर्षी मनीच्या टीचरने व्हाट्सअप ग्रुप बनवला होता त्यात त्यांची ओळख झाली होती. पण यावर्षी सेक्शन चेंज झाल्याने काही मुलं दुसर्‍या सेक्शनमध्ये गेली होती.

             त्या नावांपैकी मधुरा आणि विहानच्या आईशी नलिनी चं अधेमधे बोलणं व्हायचं , तसे तिने रामला फोन करून कळवलं , आणि हेही सांगितलं की "मधुराला ताप असल्याने, ती तीन दिवसांपासून शाळेतच गेली नाही आहे आणि तिच्या घरचे इतर सगळे कोरोना पॉझिटिव असल्याने ते सगळे विलगीकरणातआहेत , तर विहानचे आजोबा वाऱल्याने , तो त्याच्या आईसोबत मामाकडे गेला आहे."

        पण मग ते तिसरे मूल कोणाच? आणि कुठे आहे? विचार करण्याने, नलिनी रात्री झोपली सुद्धा नाही !आणि दुसऱ्या दिवशी तिने मनिला शाळेतही पाठवलं नाही . सकाळी नऊ वाजता एक इन्स्पेक्टर, एक शिपाई , आणि एक महिला कॉन्स्टेबल रमेश भाऊ इकडे आले, त्यांनी नलिनीला बोलावून घेतलं.

          नलिनी जरा घाबरलेली होती,  पण मनी निर्धास्त खेळत होती .इन्स्पेक्टर ने काही फोटो नलिनी आणि मनीला दाखवले ,तर एक फोटो बघुन मनी म्हणाली "मम्मी ही श्रावणी ,माझी फ्रेंड आहे पण ती शाळेतच येत नाही ! "मनीच्या या वाक्याने सगळ्यांचे टेन्शन अजूनच वाढले.

        मनी ला जायचं सांगून,  इन्स्पेक्टर नलिनीला काही प्रश्न विचारत होते . पण नलिनी व्यवस्थित उत्तरच देऊ शकत नव्हती,  तेव्हा लेडी कॉन्स्टेबल म्हणाली "ताई तुम्ही घाबरू नका ! तुम्ही शांतपणे आणि तुम्हाला माहिती असलेली खरी खरी माहिती आम्हाला द्या " . कॉन्स्टेबलच्या बोलण्याने नलिनी थोडी सावरली , तिने प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे पण दिली.

    शेवटी नलीनीने एक प्रश्न इन्स्पेक्टरला विचारला, "सर हे तीन मुलं मिसिंग ची तक्रार कोणी दिली?". "मॅडम "- इन्स्पेक्टर म्हणाले, "तुम्हाला तर माहिती आहे की , ही शाळा आपल्या शहरात किती नावाजलेली आहे? शहरातल्या पहिल्या नंबरची शाळा आहे ही आणि मिस्टर किंमतकर हे एवढे मोठे नेते ! त्यांच्या शाळेतली च तीन मुलं मिसिंग !! म्हणून मीडियालाही चकवत आमचा हा सगळा शोधाशोध सुरू आहे !!! हे एक हाय प्रोफाईल प्रकरण आहे !!!!" "आपल्या शहरातल्या एका पार्क जवळच्या झुडपात एका पिशवीत काही वह्या आम्हाला मिळाल्या , त्यात एका वहीच्या मागे मिस्टर राम यांचा मोबाईल नंबर होता , इतर 1- 2 वह्यांच्या मागे पण नंबर होते , पण ते नंबर एक तर बंद होते किंवा त्या नंबर वर कोणी रिप्लाय दिला नाही". "मॅडम इतर मुलं सुखरूप असल्याचं काल आम्हाला काळलं,  पण नेमका श्रावणी च्या घरचा फोन किंवा मोबाईल लागत नाही आहे , आणि श्रावणी च्याच वहीच्या मागे मिस्टर राम यांचा नंबर मिळाला आहे."

          तेवढ्यात मनीची क्लास टीचर आणि प्रिन्सिपल मॅडम तिथे पोहोचतात आणि मनीची क्लास टीचर सांगते की , "परवा मुलांच्या वह्या तपासण्यासाठी घरी घेऊन जात असताना , त्यांची स्कुटी स्लिप झाली आणि काही वह्या गहाळ झाल्या".

          मनीची क्लास टीचर पुढे सांगत होती की, \"मागच्या महिन्यात मी वर्गातल्या सगळ्या मुलांना आपापल्या आई-वडिलांचे मोबाईल नंबर पाठ करून यायला सांगितलं होतं . श्रावणी आणि मनी दोघी खास मैत्रिणी म्हणूनच कदाचित दोघींनी एकमेकींच्या वडिलांचा नंबर आपापल्या वह्यांच्यामागे लिहून घेतले असतील\" .   \"श्रावणी च्या वडिलांची मागच्याच आठवड्यात मुंबईला ट्रांसफर झाल्याने , ते लोक पॅकिंग आणि शिफ्टिंग च्या गडबडीत असल्याने दोन दिवसांपासून श्रावणीच्या आईचा फोन बंद आहे\"

           शाळेच्या मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षकांनी स्वतः इन्स्पेक्टरला सगळी माहिती दिल्याने , तीनही मिसिंग च्या केस मागे घेण्यात आल्या .  दुपारी बारा- एक वाजता राम घरी परत आला.

         संध्याकाळी सर्व जोशी कुटुंबाने एकत्र येऊन सहभोजन केले हे वेगळे सांगायलाच नको.


(वाचकहो रहस्यकथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे . तुमचे मतं, अभिप्राय आणि कमेंट नक्की कळवा त्यामुळे मला माझ्या लिखाणात सुधारणा करता येईल)

 (सदर लिखान हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व )

🎭 Series Post

View all