अपराधी कोण भाग एक

सुधाकररावांना कुणी मारलं?
अपराधी कोण भाग एक



बाहेर सोसाट्याचा वारा सुईं सुईं आवाज करत घोंगावत होता. विजा कडकडाट करत आकाशात बेफामपणे नाचत होत्या, मध्येच ढगांचा गडगडाट आणि जोशींच्या बंगल्यावर सुरू असलेल्या इस्टेटसाठीच्या वादावादीने चांगलाच जोर धरला होता.

सुधाकररावांचा मुलगा जय, सुधाकररावांना संपूर्ण इस्टेट स्वतःच्या नावे करण्यासाठी त्यांच्याशी तावातवाने भांडत होता, मध्येच त्यांना जिवे मारण्याची धमकीही देत होता.

सुधाकरराव मात्र शांतपणे त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करीत आराम खुर्चीवर स्वस्थपणे बसून, आपल्या हातातले पुस्तक वाचत होते.

“बाबा मी तुम्हाला किती वेळा म्हणून झालं आहे; विनवून झालं आहे, मला माझा हिस्सा द्या आणि माझ्या वाटेने जाऊ द्या.” उर्मटपणे, रागारागात जय सुधाकररावांशी बोलत होता.

“हे बघ जय आतापर्यंत मी तुझं शिक्षण , शिकवण्या आणि हॉस्टेलसाठी पुष्कळ पैसे भरले आहेत. तुझा दररोजचा खर्चच नुसता पाच ते सात हजार आहे. आतापर्यंत मी तुला कधीही त्या पैशांचा हिशेब विचारला नाही, पण माझ्याजवळही काही पैशाचं झाड नाही. मला वाटायचं तू शहरात राहून मन लावून अभ्यास करशील. आयुष्यात काहीतरी बनून दाखवशील, पण तू वागला मात्र उलटाच! शहरात काय गेलास आणि तुला तर पंखच फुटले. दहाव्या वर्गापर्यंत पहिल्या पाचात असणारा तू, बारावीत दोनदा नापास झालास! हेही नसे थोडके म्हणून तुला इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी महागड्या ट्युशन्स लावून दिल्या, दुनियाभराच्या नोट्सची पुस्तकं आणि घरचं सकस अन्न मिळावं म्हणून इथून स्वयंपाकी पाठवला पण तू? तू अभ्यास न करता चुकीच्या संगतती राहिलास. वर्षे वाया गेली, शेवटी तुझ्या आईच्या इच्छेखातर, तुझी लायकी नसताना तुला भरमसाठ डोनेशन भरून इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन दिला. तिथेही तू माती खाल्लीस. अभ्यास करायचं सोडून, ज्या गोष्टी सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणसांनी करू नये त्या सगळ्या तू केल्यास, चार वर्षाचा इंजिनियरिंगचा कोर्स तू सात वर्षात पूर्ण केलास.” सुधाकरराव कधी नव्हे ते आपल्या मनातली सल बोलून गेले.

“हे बघा बाबा मी माझ्या आयुष्यात काय केलं आणि काय नाही, हे तुम्ही मला परत परत आळवून आळवून सांगू नका. मला माझा हिस्सा द्या. नाहीतर शेती माझ्या नावे करा. मला पैशांची फारच गरज आहे.आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर मला तुमच्यावर त्यासाठी जबरदस्ती करावी लागेल, आणि त्यानेही तुम्ही बधला नाहीत तर, मग तुम्हाला तुमचे प्राण प्रिय असतील तर मुकाट्याने सर्व इस्टेट माझ्या नावे करा. आणि ही माझी धमकीच समजा. यानंतर मी काहीच बोलणार नाही फक्त कृती करून दाखवेल. तुम्हाला जगायचं असेल आणि तेही शांततेत तर गपगुमान सगळा पैसा आणि इस्टेट माझ्या नावे करा.” जय रागाने लालबुंद होत सुधाकररावांच्या अंगावर धावून गेला.

तेवढ्यात कामिनी तिथे आली. “जय काय करतो आहेस? सोड बाबांना, सोड म्हणते ना.” कामिनी संपूर्ण ताकदीनिशी जयला मागे ओढत होती. जय आणि सुधाकररावांमध्ये बाचाबाची सुरू असताना कामिनी बाजूच्या टेबलावर ढकलल्या गेली आणि त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली.


“आई गss ” कामिनी तळमळली.

“चल हो बाजूला, आली मोठी माझ्या बाबांची बाजू घ्यायला.”असं म्हणून जयने कामिनीला जोरात धक्का दिला. “या म्हाताऱ्याचा तुला इतकाच पुळका असेल ना तर, सांग त्याला ह्या इस्टेटच्या कागदांवर सह्या कर म्हणून. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.”

“अरे जा नाही घाबरत तुला आणि तुझ्या त्या पोकळ धमक्यांना काय करायचं ते कर. हा म्हातारा चांगला मजबूत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव जय तुझीही असली सगळी थेरं बघून मी सगळी इस्टेट कामिनीच्या नावे केली आहे. तू तुझं वागणं सुधारल नाहीस ना तर तुला यापुढे माझ्याकडून एक छदामही मिळणार नाही.” सुधाकररावही तेवढ्याच आवेशाने जयवर दातओठ खाऊन कडाडले.

“स्वतःचा सख्खा मुलगा सोडून तुमच्या त्या फालतू ड्रायव्हरची ही मुलगी! तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रिय झाली बाबा? थांबा आता हिलाच संपवतो म्हणजे सगळा प्रश्नच मिटला.” आणि जय कामिनीच्या अंगावर धावून गेला आणि तिचा गळा दाबू लागला.

सुधाकरराव मध्ये पडले. परत एकदा धक्काबुक्की आणि बाचाबाचीला सुरुवात झाली कसा कोण जाणे पण जयच्या हाताला टेबलावरचा चाकू लागला आणि तो कामिनीवर वार करण्यासाठी धावून गेला, परत एकदा सुधाकरराव निकराने जयला मागे ओढत होते. इकडे कामिनीचा श्वास गुदमरत होता. शेवटी सुधाकररावांनी टेबलाच्या खणातली बंदूक बाहेर काढली आणि त्यांनी जयला शेवटचा इशारा दिला.

“जय सोड कामिनीला नाहीतर आता ही बंदूक आणि तुझं डोकं एकाच रेषेत आहे. तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्म देऊन माझे पित्र तर पाण्यात गेलेत पण तुझा जीव घेऊन निदान मी सुखाने मरू तरी शकेन.” सुधाकरराव रागाने थरथरत होते.

सुधाकर रावांचं ते उग्र रूप पाहून एक क्षण जय घाबरलाच. आपल्या गळ्यावरची जयच्या हाताची पकड सैल झाल्याचं क्षणातच कामिनीच्या लक्षात आलं, तीच संधी साधून तिने जोरदार त्याच्या हाताला हिसका दिला आणि ती सुधाकररावांजवळ पळाली.

जय मात्र मोठ्याने हसत सुटला, हाहाहा. “बाबा तुमचं वय झालयं आता. अहो तुम्हाला नीट तुमची काठी सांभाळता येत नाही आणि तुम्ही माझ्यावर गोळी चालवणार?” उपरोधिकपणे जय बोलला.

“जय ही माझी शेवटची विनवणी समज नाही तर, धमकावणी! पण आत्ताच्या आत्ता इथून चालता हो! आणि परत या घरातच नव्हे तर या गावात जरी दिसलास ना तर माझ्या बंदुकीची गोळी तुझा बळी घेतल्याशिवाय शांत होणार नाही.” सुधाकरराव रागारागाने जयला घरातून निघून जायला सांगत होते.

खोलीतून शांतपणे जयने बाहेर जाण्याचा अभिनय करत परत एकदा सुधाकररावांच्या हातावर झडप घातली. पुन्हा एकदा बाचाबाची सुरू झाली. अचानक बंदूक कामिनीच्या हाती आली. जय, सुधाकररावांना बेदम मारहाण करीत होता. सुधाकररावही निकराचा प्रतिकार करत होते. कामिनीला ते बघवत नव्हते, तेवढ्यात वीज गेली,

“आई गsssss मेलो मेलो.” असा आवाज कानावर पडताच, तिने बंदूक दोन्ही हातात गच्च पकडली आणि गोळी झाडली……..



पुढल्या भागात बघूया कामिनीच्या हातातल्या बंदुकीने कुणाचा जीव घेतला?


सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लेखनाचे सर्व हक्क लेखीकेकडे सुरक्षित असून कुणीही त्याचा कुठल्याही प्रकारे गैरवापर करू नये व्हिडिओ बनवू नये तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all