अपराधी कोण भाग तीन

सुधाकररावांचा खुन कोणी केला?
अपराधी कोण भाग तीन

“या घरातून फोन तुम्हीच केला होता?” पोलीस इन्स्पेक्टर सुजयला विचारत होते.

सुजयने केवळ होकारार्थीत मान हलवली.

कामिनी हॉलमधल्या एका खुर्चीवर मान खाली घालून हातात बंदूक धरून बसली होती.

इन्स्पेक्टरने कामिनीला प्रश्न विचारला,”तुम्ही कोण? आणि ही बंदूक?”

“इन्स्पेक्टर साहेब मी कामिनी. सुधाकर काकांचे ड्रायव्हर बाबुरावची मी मुलगी. काल रात्री काकांचा आणि जयचा जोरजोरात भांडणाचा आवाज मला आला. गेले कित्येक दिवस जय काकांच्या मागे ईस्टेट माझ्या नावे करा म्हणून तगादा लावत होता. गेल्या महिन्याभरापासून तर त्याने काकांचा जीव अगदी नको केला होता. पण कालच्या भांडणाचा आवाज अगदीच टिपेला पोहोचला म्हणून मी इथे आले. काका आणि जय मध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच, मग हाणामारी सुरू झाली. ती हाणामारी सोडवता सोडवता माझ्या डोक्याला खोच पडली. काकांनी संपूर्ण इस्टेट माझ्या नावावर केली हे जयला अजिबात पटलं नव्हतं आणि म्हणूनच तो माझा जीव घेण्यासाठी माझ्या अंगावर धावला, त्याच वेळी काकांनी टेबलाच्या खणातली बंदूक काढून त्याच्यावर रोखली. परत एकदा बाचाबाची सुरू झाली, त्यातच काकांच्या हातातून बंदूक खाली पडली आणि माझ्या हाती आली. जय काकांना बेदम मारहाण करीत होता. त्यांच्यावर तो अगदी तुटून पडला होता. तेवढ्यात लाईट गेली‌. काका जीवाच्या आकांताने ओरडले. मला ते सहन झालं नाही आणि जयला मारण्यासाठी मी बंदुकीची गोळी झाडली, पण नेमका त्यात काकांचा………” एवढं बोलून कामिनी हमसाहमशी रडू लागली. “इन्स्पेक्टर साहेब मी माझ्या गुन्ह्याची कबुली देते. जी काही शिक्षा होईल ती मला मान्य आहे.”

इन्स्पेक्टर कामिनीला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. इकडे सुजय कामिनीला कसे सोडवता येईल याबद्दल विचार करत होता. झालेल्या घटनेचा केवळ जयच एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार होता. पण त्याचा आता कुठेच पत्ता लागत नव्हता.

सुजय गावातल्याच दामले वकिलांकडे गेला. त्याने दामले वकिलांना कामिनीची केस लढवण्याची विनंती केली. गावातले दामले वकील म्हणजे एक बडप्रस्थ. अतिशय वक्तशीर, क्षणाक्ष, हुशार आणि पैशांबाबत फारच काटेकोर अशी त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती. पण पैशांसाठी ते कधीच असत्याची बाजू घेत नव्हते. सत्य त्यांना प्राणाहून जास्त प्रिय होतं.

दामले वकिलांनी कामिनीची केस लढवणार असं मान्य केलं आणि फी सुद्धा अगदी नाममात्र घेणार असंही सुजय आणि दामले वकिलात ठरलं.

न्यायालयात साक्षीपुरावे सादर करण्यात आले. कामिनीने जो कबुली जवाब इन्स्पेक्टरला दिला होता, तोच तिने न्यायालयातही तसाच ठेवला.

सरकारी वकील “न्यायाधीश महोदय गुन्हेगाराने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. संपूर्ण घटना पाण्यासारखी अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. स्वतःच्या मुलापेक्षा सुधाकर रावांनी कामिनीवर जास्त विश्वास ठेवला आणि तिनेच इस्टेटच्या मोहापायी त्यांचा बळी घेतला, त्यामुळे कामिनीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.”

न्यायाधीश “आरोपीच्या बाजूने कुणी वकील आहे का?”

दामले वकील “न्यायाधीश महोदय मी कामिनीची केस लढवणार आहे. कामिनी त्यादिवशी रात्री काय झालं ते तू परत एकदा सांग.”

सरकारी वकील “न्यायाधीश महाराज हा न्यायालयाचा आणि न्यायाचा अपमान आहे उगाच तीच घटना वारंवार सांगून त्यात काही बदल होणार नाही, न्यायालयाचा अमूल्य वेळ अशा फालतू गोष्टींसाठी वाया घालवू नये. आणि अपराधाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.”

दामले वकील “न्यायाधीश महाराज स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिला आहे. आणि तसंही आपलं संविधान सांगतो की दहा गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. त्यामुळे मी कामिनीला परत एकदा विनंती करतो की, त्या दिवशी घडलेला संपूर्ण घटनाक्रम तिने परत एकदा सांगावा.

कामिनी “न्यायाधीश महाराज त्यादिवशी सकाळी जय आणि शहरातले त्याचे दोन मित्र सकाळ पासूनच खूप दारू प्यायले होते. गेल्या महिनाभरापासून जय, सुधाकर काकांच्या मागे ईस्टेटीसाठी लागला होता. त्याला संपूर्ण इस्टेट स्वतःच्या नावे करून हवी होती. पण जयचं असं बेताल आणि बेदरकार वागणं काकांना अजिबात पसंत नव्हतं. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःचं मृत्युपत्र बनवलं होतं आणि संपूर्ण इस्टेटची वारसदार म्हणून माझं नाव नोंदवलं होतं.”

दामले वकील “तुम्हाला कसं माहिती की काकांनी मृत्युपत्र केलं होतं आणि तुम्हाला वारसदार म्हणून नोंदवलं आहे?”

कामिनी “वकील साहेब तुम्हीच काकांचं मृत्युपत्र बनवलं होतं आणि दोन साक्षीदारांसमोर ते तुम्ही मला आणि जयला वाचून दाखवलं होतं. सुजय ही तिथे होता. न्यायाधीश महोदय मी मान्य करते की मी बंदुकीतली गोळी झाडली आणि काकांचा मृत्यू झाला पण मी शपथेतेवर सांगते की इस्टेटच्या लोभापायी मी ती गोळी काकांवर झाडली नव्हती. तर जयच्या तावडीतून काकांची सुटका व्हावी म्हणून मी ती कृती केली होती.”

सरकारी वकील “न्यायाधीश महोदय आरोपींने गुन्हा कबूल केला आहे. झालेल्या गुन्ह्याचे सबळ पुरावे न्यायालयासमोर आहेत, तुम्ही आता केवळ अपराधाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी.”

दामले वकील “न्यायाधीश महोदय इथे सादर करण्यात आलेले पुरावे जरी ठोस असले तरीही, हातांच्या ठशांचे जे निष्कर्ष आले आहेत त्याकडे मी परत एकदा न्यायालयाचे लक्ष वेधू इच्छितो. ज्या बंदुकीने सुधाकर रावांचा खून झाला आहे त्या बंदुकीवर कामिनीचे, जयचे आणि सुजचेही ठसे आहेत. पण सुधाकर रावांच्या शवविच्छेदन अहवालात असे स्पष्ट म्हटलं आहे की सुधाकर रावांचा मृत्यु गळा दाबून झाला असून, त्या नंतर काही मिनिटांनी गोळी झाडल्या गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामिनीने जी गोळी झाडली त्याने सुधाकर रावांचा मृत्यू झालाच नाही, तर ती गोळी जयच्या मित्राच्या हाताला लागली. घटनास्थळावरून जितके रक्ताचे नमुने घेण्यात आले ते सगळे जय, सुधाकर राव आणि कामिनी यांच्या रक्तगटाशी जुळले परंतु एक रक्ताचा नमुना वेगळा आहे आणि तो आहे……


कोणी केला असेल सुधाकर रावांचा खून……. सुजयने?


सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लेखनाचे सर्व हक्क लेखीकेकडे सुरक्षित असून कुणीही त्याचा कुठल्याही प्रकारे गैरवापर करू नये व्हिडिओ बनवू नये तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all