अपराधी कोण अंतिम भाग

सुधाकररावांचा खुन कोणी केला?
अपराधी कोण अंतिम भाग


सरकारी वकील “न्यायाधीश महोदय, रक्ताचे नमुने जुळले की नाही या गोष्टींनी आता काहीच फरक पडत नाही. जरी सुधाकर रावांचा मृत्यू बंदुकीच्या गोळीने झाला नसेल ही तरीही ते आता हयात नाहीत, आणि सगळ्या संपत्तीची वारस कामिनीच आहे. त्यामुळे कदाचित हा आधीच रचलेला कट असू शकतो.”

दामले वकील “न्यायाधीश महोदय, न्यायासारख्या अतिशय महत्त्वाच्या कामात जर तर ला आणि कदाचित यासारख्या शब्दांना कुठलंही महत्व नसतं. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या अशीलाला त्या इस्टेटीची आस नव्हतीच! जर तसं असतं तर कामिनीने अगदी सुरुवातीलाच गुन्ह्याची कबुली दिली नसती. आणि तिने सुरुवातीपासून एकदाही खोटं बोललेलं नाही. कदाचित तिच्या सांगण्यात आणि सरकारी वकिलांच्या ऐकण्यामध्ये काही फरक आहे.”

सरकारी वकील “म्हणजे मला ऐकू येत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला दामले? की समोरची व्यक्ती काय म्हणते याचा मला अंदाज येत नाही असा तुमच्या बोलण्याचा रोख आहे का?”

दामले वकील “न्यायाधीश महोदय कामिनीने सांगितलं की त्या दिवशी खूप जोराचा पाऊस येत होता. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या दिवशी खरच पाऊस येत होता. रात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा या सगळ्या वादळी परिस्थितीमुळे रात्री दहा ते सव्वा दहा च्या दरम्यान वीजही गेली होती.”

सरकारी वकील “दामले तुम्ही शाळेतला निबंध लिहीत नाही आहात. रात्री वीज जाण्याचा आणि घडलेल्या अपराधाचा काय संबंध?”

दामले वकील “न्यायाधीश महोदय, जयच्या ढकलण्याने कामिनी खाली पडली. तिच्या डोक्याला खोक पडली, त्यातून रक्त वाहू लागलं, तिला अंधारी ही आली. पण थोड्या वेळाने जय आणि सुधाकर रावांच्या भांडणाने ती परत भानावर आली. परत बाचाबाची सुरू होती. जय कामिनीच्या अंगावर धावून गेला, तो तिचा गळा दाबत होता तेव्हाच सुधाकररावांनी जयवर बंदूक रोखली. परत एकदा बाचाबाची सुरू झाली बंदूक खाली पडली, ती कामिनीच्या हातात आली. जय सुधाकर रावांना बेदम मारहाण करीत होता. तेवढ्यात लाईट गेली, सुधाकर राव जोरात विव्हळले, “आई आईssss ग” कारण ज्याचा चाकू सुधाकररावांना वर्मी लागला होता. कामिनी भांबावलेली होती. सुधाकररावांचे ओरडणे ऐकून तिने गोळी झाडली, पण ती गोळी सुधाकर रावांना न लागता, ज्याने सुधाकर रावांचा गळा आवळला त्या नरेंद्रला लागली. अंधाराचा फायदा घेऊन नरेंद्र तिथून निसटला, आपण बंदुकीतून गोळी झाडली पण, ती कोणाला लागली हे बघण्याचा धीर कामिनीत नव्हता…म्हणून तिने काही वेळाने जिथे बाचाबाची सुरू होती तिथे बघितले, तिथे तिला केवळ सुधाकरराव दिसले, जय तिथे नव्हता.”

सरकारी वकील “न्यायाधीश महोदय, नरेंद्र नावाची कुठलीही व्यक्ती भांडणाच्या वेळी तिथे होती असं कोणीही म्हटलेलं नाही. दामले वकील मनाने कथा रचत आहेत.”


दामले वकील “महोदय मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की रक्ताचे नमुने नरेंद्रच्या रक्ताशी जुळतात, कामिनीने जो जवाब दिला आहे त्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की जय आणि त्याचे मित्र सकाळपासूनच दारू पीत होते. जयच्या मित्रांमध्ये नरेंद्र ही होता. खरं तर नरेंद्रला जयला मारायचे होते. कारण वाईट मित्रांमध्ये राहून जय इतक्या खालच्या पातळीला उतरला होता की त्याने नरेंद्रच्या प्रियसी वर बळजबरी केली होती. आणि शहरात पैसा पेरून ती केस दाबून टाकली होती. नरेंद्रच्या मनात या गोष्टीचा राग होता आणि त्याला जय आणि सुधाकर रावांमधले ताणलेले संबंधही माहिती होते. म्हणूनच त्या रात्री जय आणि सुधाकर रावांच्या भांडणाचा फायदा घेत, नरेंद्र रात्री जयच्या घरी पोहोचला. आकाशात विजा चमकत होत्या, ढगांचा गडगडाटी आवाज होता, वीजही गेली होती, संधी साधून नरेंद्रने बरोबर जयवर हल्ला केला, पण जय चपळाईने सुटला आणि सुधाकरराव नरेंद्रच्या तावडीत सापडले. अंधार असल्याने कोण कुठे आहे, कुणाचीच ओळख पटत नव्हती. नरेंद्रने गळा आवळल्याने सुधाकरराव विव्हळले आणि कामिनीच्या गोळीने नरेंद्रच्या हाताला जखम झाली. नरेंद्र तिथून सटकला पण त्याचं रक्त तिथेच सांडलं. जयने दरवाज्यात दबा धरला होता. नरेंद्र बाहेर जायला निघाला आणि जयने त्याच्यावर झडप घातली. परत एकदा बाचाबाची झाली तेव्हा नरेंद्रच्या कॉलरला असलेला मुंबईच्या टेलरचा बॅच खाली पडला. नरेंद्र तर सटकला, जयलाही सुधाकरराव निपचित पडलेले दिसले, त्यानेही तिथून काढता पाय घेतला, जयने गाव सोडलं पण नरेंद्र मात्र बाजूच्या गावातून सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवत होता, सुधाकररावांच्या नोकरांकडुन त्याला सगळी माहिती मिळत होती. कामिनीने गुन्हा कबूल केला आणि नरेंद्र निश्चिंत झाला. पण तो विसरला की टेलरचा बॅच त्याने पुरावा म्हणून तिथेच सोडला.”


न्यायाधीश “आता नरेंद्र कुठे आहे?”

दामले वकील “इन्स्पेक्टर प्रधान, घेऊन या नरेंद्रला.”


नरेंद्र “न्यायाधीश महाराज मी मान्य करतो की माझ्या हातून खून झाला आहे पण मला जय चा बदला घ्यायचा होता त्यात सुधाकर रावांचा हकनाक बळी गेला. मी माझा गुन्हा कबूल करतो.”


न्यायाधीश “सर्व साक्षी पुरावे आणि साक्षीदारांचा कबुली जवाब लक्षात घेता, हे न्यायालय कामिनीला निर्दोष मुक्त करते आणि नरेंद्रला सुधाकर रावांच्या खुनाचा जबाबदार ठरवते. नरेंद्रला जन्मठेपेची शिक्षा देण्यात येत आहे या संपूर्ण केसचा तपास इन्स्पेक्टर प्रधान यांनी पूर्ण करावा, आणि जयला ही ताब्यात घेऊन संपत्तीसाठी धमकावणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी.”


कामिनी “दामले साहेब तुमचे खूप खूप आभार. माझ्या मनावरचं ओझं आज पूर्णपणे उतरलं. आता मी माझ्या मार्गाने जायला मोकळी आहे.”

दामले वकील “तुझ्या मार्गाने तुला रस्त्यात सुजयची मदत नक्कीच होईल. दुनियेत फक्त सत्य महत्त्वाचे नसून व्यक्ती ओळखणे आणि व्यवहारिक दृष्टीने वागणं हेही महत्त्वाचं असतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट व्यक्त केली जाईलच अशातला भाग नाही, आपल्याला मदत करणारे आणि प्रेम करणारे यांना प्रत्येकाने स्वतःच ओळखावं लागतं. सुजय, कामिनीला तुझ्या भक्कम आधाराची गरज आहे. सुधाकर रावांच्या संपत्तीचा योग्य वापर गावाच्या विकासासाठी करा आणि सुखाने नांदा.”


समाप्त.
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लेखनाचे सर्व हक्क लेखीकेकडे सुरक्षित असून कुणीही त्याचा कुठल्याही प्रकारे गैरवापर करू नये व्हिडिओ बनवू नये तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

©® राखी भावसार भांडेकर.