Login

हळुवार भाग 2

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग दोन

स्वतःच्या खोलीत रमा चिडून बसली होती.

"आई बाबांना काय झालंय? अग ते असं कसं करू शकतात? माझं म्हणणं तरी ऐका ना तुम्ही!" रमा रडवेली होऊन बोलत होती.

"हे बघ रमा अगं आता तुही चिडणार, संताप करणार तर मी काय करू? तू जरा शांत रहा ना! मी बोलते बाबांशी. फक्त मला एक सांग कोण मुलगा आज बाबांना भेटला? आणि नेमकं तुला बघायला पाहुणे येणार तेव्हाच त्याने बाबांना हे सगळं का सांगितलं?" सीमाताईंना सगळं प्रकरण माहिती करून घ्यायचं होतं.

"आई अग खरच मला काहीच माहित नाही. तू तर माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना ओळखतेस ना? मला तर कोणी काहीच बोललं नाही. आई मला एवढ्यात लग्न नाही करायचं. प्लीज तू बाबांना सांग ना तसं." रमाचा अजूनही निर्णय होत नव्हता.

"हे बघ रमा मी प्रयत्न करीन. पण तुझे बाबा माझा ऐकतीलच असं नाही. तुला तुझ्या बाबांचा स्वभाव माहिती आहे ना?" यावर रमा काहीच न बोलता खिडकीतून दूर बघू लागली.

झाल्या प्रसंगामुळे जोशींच्या घरात एक विचित्र ताण आला होता. नेहमी हसत-खेळत असणार जोशींचे कुटुंब आता जणू थीजल होतं. रमाने तिच्या बाबांशी बोलण्याचा, स्वतःची बाजू मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण रमेशरावांना हे सहनच होईना की, एका बार वाल्याच्या मुलाने रमाला मागणी घालावी. तेही रमाचे प्रेम आहे ही, बळेबळेच बतावणी करून.

रमेशरावांचं मन हे मान्य करत होतं की, रमा तसं काहीही करणार नाही. पण बुद्धी आणि विचार मात्र त्यांच्या मनाला साथ देत नव्हते. रमालाही तिच्या बाबांची ही तगमग बघत नव्हती. आपल्यावर अपार प्रेम करणारे बाबा त्या एका प्रसंगाने एवढे हादरून जातील असं रमाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाप-लेकीचा असा अबोल दुरावा सीमाताईंनाही बघवत नव्हता. पण ही विचित्र कोंडी फोडायची कशी आणि कोणी हा मात्र यक्षप्रश्न होता. सीमाताईंना रमेशरावांच्या मनाची अवस्था कळत होती. पण रमाची, आपल्या लेकीची समजूत कशी काढायची ते मात्र कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रमाला बघायला पाहुणे येणार होते. रमेशराव त्याप्रमाणे तयारी करत मन रमवत होते. पण रमाला काय वाटेल? ती कशी सामोरी जाईल या सगळ्या प्रसंगाला? हे मात्र सीमाताईंना सुचत नव्हतं.

"रमा मी काय म्हणते, अग तू फक्त साडी घालून समोर ये." सीमाताई आर्जवी स्वरात रमाशी बोलत होत्या.

"आई मी, तुझ्या आणि बाबांच्या शब्द बाहेर नाही. तू जसं म्हणशील तसं." रमाने समजुतदार उत्तर दिले.

ठरल्याप्रमाणे रमाला बघायला पाहुणे आले. मुलगा एक उद्योजक होता. दिसायला अतिशय हँडसम, सहा फुटाची उंची, पाणीदार नाक-डोळे. अमेरिकेत जाऊन त्याने एम.बी.ए.चा कोर्स पण केलेला होता. टेक्स्टाईल, पॅकेजिंग, आणि विशेष म्हणजे  कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग हे त्याचे मुख्य व्यवसाय होते. संपूर्ण विदर्भातील सरकारी कार्यालयात संगणक आणि त्या संबंधित सामग्री पुरवणे ह्याच कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं होतं. अतिशय कष्टान त्यानं शून्यातून त्याचं उद्योग विश्व निर्माण केलं होतं. वडील लहानपणीच गेले होते. आई, हा आणि एक लहान भाऊ असे सुटसुटीत त्याचं कुटुंब होतं.

बघण्याचा कार्यक्रम झाला. रमाचं हे एम. ए.च शेवटचं वर्ष होतं. ती ही अभ्यासाच्या तयारीला लागली. रमाला पुढे शिकायचं होतं. खरंतर मुला कडून होकार येईल असं तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण रमाच्या वाटण्याला नियती साथ देत नव्हती. देवदत्त - रमाच्या होणाऱ्या नवऱ्यानं होकार कळवला होता.

"रमा भाव्यांकडून होकार आला आहे." सीमाताई रमाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होत्या. "बाबांना वाटतं तू पण होकार द्यावा."

"ठीक आहे. बाबा जसं म्हणतील तसं. मी तुझ्या आणि बाबांच्या शब्दाबाहेर नाही." रमाने शब्दांनी होकार दिला होता. पण तिचं मन मात्र त्याकरिता तयार नव्हतं.

रमा पण तिच्या बाबांचीच लेक होती. स्वतःच्या बाबांच्या आनंदासाठी, समाधानासाठी रमान स्वतःच्या इच्छांना मनाच्या तळघरात एका कोपऱ्यात फेकून दिलं होतं. रमाच्या उत्तरानं रमेशराव फारच सुखावले होते. त्यांनी सीमाताईंना जवळचाच मुहूर्त काढायला सांगितला. लग्नाचा मुहूर्त अगदी पंधरा दिवसानंतरचा निघाला. देवदत्तची आई मीनाताईंना पण हा मुहूर्त चालणार होता. त्यांनी देवदत्त जवळ त्याबद्दल विचारलं तर देवदत्तच मत मात्र वेगळं होतं. देवदत्तला एकदा रमाला भेटायचं होतं. मीनाताईंनी तसे सीमाताईंना कळवलं. रमेशरावही त्याकरिता तयार होते, पण सीमाताईंना मात्र वेगळाच घोर लागला होता.

"रमा, देवदत्त येणार आहेत तुला भेटायला. प्लीज तू त्यांना त्या मुलाबद्दल काही सांगू नकोस." सीमाताई समजावणीच्या स्वरात बोलल्या.

"आई अग पण तसं काही नाहीच आहे, आणि नव्हतच मुळी! मग मी का सांगेन तसं काही?" रमा स्वतःची बाजू मांडण्याचा असफल प्रयत्न करत होती.

"गुणाची लेक माझी. अग आयुष्यात काही गोष्टी, काही घटना घडल्याच नाही असं वागावं लागतं बाईच्या जातीला. स्वतःसाठी नाही पण घरच्यांसाठी, कुटुंबासाठी मनाविरुद्ध काही निर्णय घ्यावे लागतात. मला खात्री आहे तू योग्य तोच निर्णय घेशील."

देवदत्त रमाला भेटायला आला. त्यांनी रीतसर रमेशरावांकडे तशी परवानगी मागितली आणि रमेश रावांनी ती दिली.

देवदत्त -"मला रमाशी काही बोलायचंय."

रमेशराव -"बोला ना! त्यात गैर काहीच नाही."

देवदत्त -"मला एकट्यात बोलायचं आहे."

सीमा ताई -"हो चालेल ना! आम्ही आत जातो."

देवदत्त -"नको तुमच्याच घरात तुम्ही का आत जाणार? मी रमाला बाहेर नेलं तर चालेल का? एका तासात परत येऊ आम्ही?"

रमेशराव -"आमची काहीच हरकत नाही. तुम्ही रमाला नेऊ शकता."