Login

द डी.एन्.ए. (भाग -३)

Story Of Experiment That Harm The World. CID Story. Suspense And Thriller Story.


द डी.एन्.ए. (भाग -३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रॉबर्ट तर त्याच्या प्रयोगामुळे खूपच खुश होता. त्याला जे जे बदल यात अपेक्षित होते ते ते सगळे होत होते आणि त्याच्या डोळ्यांदेखत त्याचं ते विकृत स्वप्न आकार घेत होतं. आता तो त्याच्या पुढच्या स्वप्नांमध्ये हरवला होता. एवढी वर्ष स्वतःला झोकून देऊन, समाजापासून दूर राहून त्याने इथवर मजल मारली होती. आता पुढचं सगळं तो ज्या मीटिंगला जाणार होता त्यावर अवलंबून होतं. त्याने एक ना एक दिवस आपल्याला अजून फंडस् लागणार म्हणून बरेच महिने आधीपासूनच या मीटिंगची तयारी करून ठेवली होती. त्याच्या आयुष्यातला उद्याचा दिवस हा टर्निंग पॉइंट ठरणार होता. आज जरी त्याने कैलासला सगळं निरीक्षण करून इंजेक्शन तयार करण्याचा फॉर्म्युला शोधायला सांगितला असला तरी त्याचा खरा प्रयोग तो मीटिंग वरून आल्यावर सुरू होणार होता. ते फंडस् मिळणं त्याच्यासाठी आता खूप महत्त्वाचं होतं, नाहीतर इतक्या वर्षांची त्याची मेहनत ही मातीमोल ठरणार होती.

"कैलास! मी निघतोय. तुला जी कामं सांगितली आहेत ती नीट करायची. आता आपल्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे हे तुला वेगळं सांगायला नको." रॉबर्ट म्हणाला.

"हो सर! मी या सेल जवळ कॅमेरा फिट करायचा विचार करतोय म्हणजे छोटे छोटे बदलसुद्धा त्यात रेकॉर्ड होतील ते अभ्यासायला बरं पडेल." कैलास म्हणाला.

"गुड! तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं." रॉबर्ट म्हणाला आणि जाऊ लागला.

कैलासने त्याला अडवत विचारलं; "सर, तुम्ही आता किती दिवसांनी येणार? इथे हा तुमचा प्रयोग खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे, तुम्ही इथे असाल तर पुढे काम करताना बरं पडेल."

त्याच्या डोक्यात खरंतर रॉबर्टचा नक्की कुठे जाऊन आणि कोणाला भेटायचा प्लॅन आहे हे काढून घेणे हा हेतू होता. पण इतकी वर्ष ज्याने ही बातमी गुप्त ठेवली तो असा सहजासहजी थोडीच काही सांगणार होता.

"येईन मी दोन दिवसात! जास्तीत जास्त तीन दिवस. पण कायम तुझ्या टच मध्ये असेन. आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही." तो म्हणाला आणि त्याचं काहीही ऐकून न घेता कसलीतरी फाईल घेऊन तिथून निघाला.

बाहेर येऊन त्याने मेन डोअरला त्याचे फिंगर प्रिंट आणि आय लॉक लावले आणि तिथून निघाला. त्याने ही लॅब एका सामसूम जंगलात उभारली होती. आजूबाजूला गर्द झाडी आणि सहसा तिथे कोणी येणार नाही अशी जागा निवडून ही लॅब उभारण्यात आली होती.

"देवा! सगळं आता तुझ्या हातात आहे रे. तू तर सगळं बघतोयस. तुला चांगलंच माहीत आहे आता पुढे काय होणार आहे. काहीही करून मला इथून बाहेर कुणालातरी हे सगळं सांगायची संधी आणि बळ दे." तो त्याच्या टेबलावर ठेवलेल्या प्रतिमेकडे हात जोडून प्रार्थना करत म्हणाला.

या संकटाची चाहूल आता भयावह रूप धारण करतेय आणि आपण काहीही करू शकत नाहीये म्हणून त्याला अजून अपराधी वाटत होतं आणि डोळ्यांत अश्रू दाटून येत होते.
****************************
सी.आय.डी. ब्युरोमध्ये जयश्री अजूनही रडतच होती. इन्स्पेक्टर लोखंडे तिथे आले होते. तेरा वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं; खरंच ऋषभ जिवंत आहे की तेव्हाच गेला आहे आणि जयश्रीच्या मनावर त्याचा परिणाम झाला आहे का हे आता लोखंडेच सांगू शकत होते.

"जय हिंद सर." लोखंडेंनी त्यांना सेल्युट केला.

सगळे त्यांना "जय हिंद" म्हणाले आणि मूळ मुद्यावर आले.

"सर! या बाई? या आता आल्या का इथे पण?" लोखंडे जयश्रीला बघून म्हणाले.

"तेच नक्की तेव्हा काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे बोलावलं आहे." सुयश सर म्हणाले.

"सर... विचारा ना यांना! मी कितीतरी वेळा त्यांना सांगायचा प्रयत्न केला तो मुलगा माझा नव्हता पण यांनी एकदा तरी ऐकून घेतलं का विचारा." जयश्री रागाने खुर्चीवरून उठून म्हणाली.

सोनालीने तिला शांत केलं. रागात बोलताना सुद्धा तिचा आवाज रडून रडून जड झालेला होता आणि ठसका लागत होता. ईशाने तिला पुन्हा पाणी देऊन शांत केलं.

"सर अहो या मॅडम रोज येतात पोलीस स्टेशनमध्ये. कायतर म्हणे यांचा मुलगा तेरा वर्षांपूर्वी हरवला आहे आणि तेव्हा जी बॉडी यांच्या ताब्यात दिली, शिवाय त्याची डी.एन्.ए. टेस्ट केली ती पण खोटी होती. सर आता तुम्हीच सांगा फॉरेन्सिक रिपोर्ट खोटे कसे असतील?" लोखंडेंनी त्यांची बाजू मांडली.

"एक.. एक.. मिनिट आधी शांत व्हा. तेरा वर्षांपूर्वी ही केस कोणाच्या अंडर होती?" सुयश सरांनी विचारलं.

"सर, या मॅडम पहिल्यांदा आल्या होत्या तेव्हा त्यांनी आम्हाला यांच्या ताब्यात बॉडी दिली होती, टेस्ट केल्या होत्या असं काहीही सांगितलं नव्हतं, म्हणून ती फाईल आम्ही शोधली होती. आम्ही त्याचा अभ्यास केला तर लक्षात आलं यात काहीही तथ्य नाहीये. ही फाईल पुन्हा ओपन करणे म्हणजे नुसता वेळ वाया घालवणे." लोखंडे म्हणाले.

"काय? माझ्या मुलाला शोधणे म्हणजे वेळ वाया घालवणे? अहो माझ्या मुलाच्या जागी तुमचा मुलगा असता तर असंच केलं असतं का?" जयश्री म्हणाली.

"प्लीज जरा शांत व्हा! लोखंडे! तुम्ही फक्त ती केस कोणाच्या under होती एवढं सांगा." सुयश सर म्हणाले.

"सर ती केस इन्स्पेक्टर कांबळे हॅण्डल करत होते. चार वर्षांपूर्वी ते रिटायर झालेत. आम्ही त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केली होती, पण त्यांचं पण हेच म्हणणं होतं की तो मुलगा आता या जगात नाही." लोखंडेंनी सांगितलं.

"ओके. आम्ही बघतो काय करायचं! तुम्ही येऊ शकता." सुयश सर म्हणाले आणि लोखंडे तिथून गेले.

"सर... बघा ना ते कसं बोलत होते... माझा मुलगा अजून आहे. मला मान्य आहे पहिल्यांदा जेव्हा मी तक्रार करायला गेले तेव्हा त्यांना अंधारात ठेवलं, पण माझ्याकडे पण ठोस कारण आहे. मला चांगलं आठवतंय त्या मुलाची बॉडी पूर्ण जळली असली तरी डावा पाय पूर्ण जळला नव्हता. त्या पायाचं एक बोट खोटं वाटत होतं. माझ्या मुलाची तर सगळी बोटं शाबूत होती." तिने सांगितलं.

"तुम्हाला नक्की खात्री आहे का?" विक्रमने विचारलं.

"हो सर! आजही मला ते दृश्य जसच्या तसं दिसतं. एक एक क्षण आठवतो. मला पूर्ण खात्री आहे सर." ती आता सावरली होती आणि कोणीतरी आपल्या बाजूने विचार करतंय म्हणून तिच्या डोळ्यात एक आशेची चमक निर्माण झाली होती.

"मग तुम्ही तेव्हाच का हे सगळं लक्षात आणून दिलं नाहीत? कदाचित आज तुमचे मिस्टर...." अभिषेक म्हणाला.

"हो सर! मला कळतंय तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना तेव्हाच मी जर हे लक्षात आणून दिलं असतं तर आज माझे मिस्टर माझ्या बरोबर असते आणि मुलगा ही तेव्हाच सापडला असता? पण सर माझा मुलगा तीन दिवसांपूर्वी हरवला होता; आम्ही दोघांनी पोलिसात तक्रार केली होती. विद्यावर्धन यांना आधीच डायबिटीसचा त्रास होता त्यात या धक्क्याने आम्हा दोघांना पाणी पण घशाखाली उतरत नव्हतं! त्यांची तब्येत ढासळत होती. कसंबसं स्वतःला सावरुन त्यांना सांभाळत होते. माझी पण मानसिक स्थिती खूप खालावली. दोन दिवसांनी आमच्या डी.एन्.ए. टेस्टसाठी सँपल घेतले गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या समोर एक जळलेलं प्रेत आलं तेव्हा जागीच यांना हार्ट अटॅक आला. एका धक्क्यातून सावरत नाही तोवर हा धक्का बसला. मी तर पूर्णपणे खचून गेले होते. सतत हेच डोळ्यासमोर दिसत होतं. आजूबाजूला काय घडतंय याचं भान सुद्धा नव्हतं! मला हॉस्पिटल मध्ये जेव्हा ट्रीटमेंट पूर्ण होत आली तेव्हा सगळं हळूहळू आठवायला लागलं. हॉस्पिटल मधून मला समजलं की कोणीतरी वैज्ञानिकांनी मिळून मला तिथे भरती केलं आहे." तिने सगळं काही सांगितलं.

एकाच वेळी मुलगा आणि पती जाण्याच्या दुःखाने तिची स्थिती कमकुवत होणं हे साहजिक होतं. पोटचा गोळा आणि नवरा एकाच वेळी असे आकस्मितपणे गेल्याने कुठेतरी तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता पण उपचाराने आता ती पूर्ववत होऊ लागली होती आणि तेव्हा जे काही घडलं ते सगळं आठवून निदान आता आपला मुलगा तरी आपल्याला परत मिळेल या आशेवर जगत होती.

"तुमच्याकडे याबाबतीत काही पुरावा आहे का? कारण मॅडम तुम्ही जे म्हणताय त्यामुळे ज्या डॉक्टरनी टेस्ट केल्या असतील त्यांच्यावर खूप गंभीर आरोप होतायत यामुळे. पुन्हा फाईल ओपन करणं तेही इतक्या वर्ष आधी घडलेल्या केसची ही सोपी गोष्ट नाहीये." सुयश सरांनी विचारलं.

"पुरावा? सरऽऽ अहो खरंच मी पूर्ण खात्रीने सांगतेय. जर तुम्हाला असं वाटलं ना की मी यातलं एकही अक्षर खोटं बोलले असेन तरी तुम्ही मला सी.आय.डी. आणि पोलिसांचा वेळ वाया घालवला म्हणून अटक करू शकता मी काहीही बोलणार नाही पण सर एकदा विश्वास ठेवा. आत्तातरी माझ्याकडे काहीही पुरावा नाहीये." ती पुन्हा रडकुंडीला येऊन म्हणाली.

थोडावेळ शांततेत गेला आणि अचानक तिला काहीतरी आठवलं तसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ती बोलू लागली; "सर! तेव्हा मला आठवतंय आमचा मुलगा हरवला होता तेव्हा विद्यावर्धन कोणत्यातरी मोठ्या प्रयोगावर काम करत होते. तो कोणता प्रयोग होता, त्यातून काय सिद्ध होणार होतं हे सगळं गुप्त होतं पण त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं होतं आणि म्हणून या गोष्टीची सुद्धा बातमी झाली होती. सगळ्या न्यूज पेपरमधे आणि टीव्हीवर सुद्धा या बातम्या येत होत्या. ऋषभ आणि यांच्या अंतयात्रेतसुद्धा रिपोर्टर तिथे होते. मला चांगलंच आठवतंय."

"ठीक आहे. आम्ही पुन्हा सगळी माहिती काढून तुम्हाला कळवतो. तुमच्या मुलाचा ऋषभचा त्या वेळचा एखादा फोटो आणला असेल तर द्या!" सुयश सर म्हणाले.

जयश्री ने सोबत एक फोटो आणला होता. डॉ. विद्यावर्धन, ती आणि ऋषभचा एकत्र फोटो होता तो. सुयश सरांनी तो ठेवून घेतला आणि ईशा तिला रिक्षेपर्यंत सोडायला गेली.

"सोनाली! हा फोटो एडिट करून अंदाजे आता हा मुलगा कसा दिसत असेल अंदाज काढ. गणेश, निनाद! तुम्ही दोघं जाऊन ती केसची फाईल घेऊन या विक्रम आणि मी इन्स्पेक्टर कांबळेना भेटून येतो." सुयश सर म्हणाले.

सगळे त्यांच्या त्यांच्या कामाला लागले. नक्की आता हे प्रकरण जयश्री सांगतेय तसं झालं होतं की तिच्या मनाने अजून मुलगा गेल्याचं स्वीकारलं नव्हतं हे या तपासातून समोर येईल म्हणून लगेचच सगळ्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

क्रमशः.....
***************************
आता नक्की जयश्री म्हणतेय त्या प्रमाणे तपास झाला तर ऋषभचा पत्ता लागेल का? रॉबर्टने त्याच्यावर काय प्रयोग केले आहेत? तो सुखरूप असेल? कैलास हे सगळं थांबवू शकेल का? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all