Login

मराठीचे भवितव्य: आपली जबाबदारी

मराठी गौरव दिन!
मराठीचे भवितव्य: आपली जबाबदारी

मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याची गरज लागते. तसेच आपले मनातील विचार आणि व्यक्त होण्यासाठी जर काही लागत असेल तर ते म्हणजे मुखातून निघालेले शब्द.संवादासाठी शब्दांची गरज असते. संवादातून माहितीची देवाण-घेवाण होते.

महाभारत आणि रामायण ह्यासारख्या कित्येक वर्षांपूर्वी घडलेल्या घटना ह्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कशा हस्तांतरित केल्या तर त्यासाठी ताम्रपत्रे, भित्ती चित्रे आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगितल्याने हे झाले. व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे बोलीभाषा.

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. विविधतेने नटलेल्या ह्या देशाला अनेक परंपरा आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. त्यातलीच एक मुख्य भाषा म्हणजे मराठी.महाराष्ट्र राज्यात ही प्रामुख्याने बोलली जाते.

मराठी म्हणून राज्यभाषा लाभलेल्या ह्या महाराष्ट्रात ‘मुंबई’ ही आर्थिक राजधानी आहे.आता तर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही प्राप्त झाला आहे.अनेक ठिकाणाहून लोक मुंबईत स्थलांतर करतात. त्यामुळे विविध भाषिक लोक इथे राहत असले तरी मराठीत बोलणे आता हळू हळू कमी होऊ लागले आहे.

आता स्पर्धा वाढल्यामुळे बरेच लोक इतर भाषेच्या माध्यमातून आपल्या मुलांचे शिक्षण करत आहेत. जसे बदल होत आहेत ते अंगीकारणे आवश्यक आहेच,परंतु म्हणून मातृभाषा बोलता न येणे हे त्यामागचे कारण नसायला हवे.

रामदास स्वामी म्हणतात ‘दिसामाजी काही तरी लिहावे.’ असेच पुढच्या पिढीला आपली भाषा बोलता आणि लिहिता यायला हवी ह्यासाठी घरातून प्रयत्न करायला हवे.

जसे अन्य भाषेच्या शिकवणी वर्गात मुलांना शिकवण्यासाठी पाठवतात, तसेच जर आठवड्यातून एकदा त्या मुलाला मराठीबद्दल सांगितले तर पुढे जावून त्याला त्यात रुची निर्माण होईल. आपल्या मातृभाषेतून आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो त्यासाठी दुसऱ्या भाषेचा आधार घ्यायची गरज लागणार नाही.

अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याच प्रकारे मराठी लेख,पटनाट्य,शुध्दलेखन तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या तर त्यातून बरेच जणांना प्रोत्साहन तर प्राप्त होईलच पण शिकण्याची एक आवड जपली जाईल.

जर असा विचार केला की एक कुटुंब आहे त्यात कोणीच महाराष्ट्रीय असूनही मराठी बोलत नाहीत, तर पुढे जाऊन त्या घरातील पुढची पिढी कशी बोलेल ? हा प्रश्न गंभीर आहे.

आपली जबाबदारी ही आहे की आपली मायबोली जिला आपण आई म्हणून मान देतो. तिला आपले घर सोडून जाऊ नये म्हणून प्रयत्न करायला हवे. आधुनिक जगात टिकायचे असेल तर आपण जर इंग्रजी वर्तमानपत्र विकत घेतो तर त्यासोबत शक्य असल्यास मराठी वर्तमानपत्रही विकत घेवून स्वतः त्या घरातील मोठ्या व्यक्तींनी वाचायला सुरुवात केली की आपसूकच त्या लहान मुलांना ती सवय लागेल.

जुनी गाणी आणि अभंग ऐकली की अनाहूतपणे मुखात ते बोल येतात. काही जाणकारांचे असेही म्हणणे आहे की भक्तीगीते आणि स्त्रोत ह्यामुळे मुलांचे उच्चार स्पष्ट होतात. संध्याकाळी प्रार्थना करतेवेळी मुलांना सामील करून घेतले की तेही त्या भाषेत बोलायला लागतील.

अनेक महान व्यक्तींची पुस्तके मग गनिमी कावा आणि दूरदृष्टी सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारे महात्मा फुले असतील हे सर्व त्यांना त्या गोष्टी वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

नाटक आणि एकांकिका कार्यक्रम,अनेक साहित्य संमेलन तसेच पुस्तक प्रदर्शन ह्यातून त्यांना लेखन आणि वाचनाची आवड लागेल पण कलेबद्दल जिज्ञासू वृत्तीही निर्माण होईल.

आपल्या मराठी भाषेचा वारसा आपल्याला पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणे हे महाराष्ट्रीय म्हणून आपले कर्तव्य आहे. तिला जपून आपल्या लोकांत जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न तर करायचे आहेत, सोबतच कृतीची जोड ही त्याला असावी तरच मराठीचे भवितव्य हे उजळ असेल.

१ मे ला 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा करतात तसेच मराठी राज्यभाषा दिनही म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तसेच २७ फेब्रुवारी हा दिवस 'वि.वा शिरवाडकर' म्हणजेच प्रसिद्ध
'कुसुमाग्रज' ह्यांचा वाढदिवस आणि आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन म्हणूनही साजरा केला जातो.

त्याच माझ्या मराठी भाषेसाठी काही ओळी,

मराठी माझा अभिमान
जपूया मातृभाषेची शान
बोलून वाचून अन् लिहून
वाढवूया मायबोलीचा मान

© विद्या कुंभार

सदर लेखाचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all