Login

मुलींचे लग्न आणि खर्चाचा मेळ...

लग्नापेक्षा मुलींचे शिक्षण महत्त्वाचा आहे
शीर्षक : मुलीचं लग्न आणि खर्चाचा मेळ...

मुलगी वयात आली की आई-वडिलांच्या मनात एक नवा विचार रुजतो “आता तिचं लग्न कधी करायचं?” पण गंमत म्हणजे या विचाराची पहिली चाहूल बहुतांशी बाहेरच्यांनाच लागते. शेजारी, नातेवाईक, परिचित लोक सगळ्यांना आधी समजतं की “अरे, ती मुलगी आता लग्नाच्या वयात आली.” आणि मग सुरू होते कुजबुज, सल्ले आणि समाजाच्या अपेक्षांची शर्यत.

आई-वडिलांच्या मनात मात्र त्या क्षणी नुसता लग्नाचा विचार नसतो असतो तो आपल्या लाडक्या मुलीच्या भवितव्याचा. त्यांच्या नजरेत ती अजूनही गोड बाहुलीच असते, जिचं हसणं घरभर प्रकाश पसरवतं. पण समाजाला ती ‘लग्नाच्या वयातली मुलगी’ दिसते. या दोन नजरा, दोन विचार, आणि दोन जबाबदाऱ्या यांचा मेळ साधणं आजच्या पालकांसाठी सर्वात अवघड झालं आहे.

आजच्या काळात लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन एवढंच नाही, तर ते सामाजिक प्रतिष्ठेचं प्रदर्शन बनलं आहे. डेकोरेशन, जेवणावळी, डीजे, कपडे, फोटोग्राफी, आणि त्यातली प्रत्येक गोष्ट “इतरांच्या लग्नापेक्षा थोडी जास्तच” असावी असं सगळ्यांना वाटतं. परिणामी, खर्चाच्या नावाखाली पालक अनेकदा कर्जात बुडतात. मुलीच्या आयुष्याची खरी सुरुवात जिथे आनंदाने व्हायला हवी, तिथे अनेक कुटुंबं आर्थिक ताणाखाली श्वास घेत असतात.

वास्तविक पाहता, लग्न हे एक सुंदर टप्पा आहे पण त्याचा अर्थ दिखावा नाही, तर दोन कुटुंबांचं एकत्र येणं आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न जितकं समारंभपूर्वक करावं, तितकंच विचारपूर्वक आणि समजूतदारपणाने करावं. कारण आजच्या काळात फक्त लग्नाचा खर्च करणं पुरेसं नाही, तर मुलीच्या भविष्याची तरतूद करणं हे अधिक शहाणपणाचं लक्षण आहे.

आजच्या जगात परिस्थिती क्षणात बदलते. नातेसंबंध, नोकरी, आरोग्य काहीही स्थिर राहत नाही. म्हणूनच, पालकांनी लग्नाच्या खर्चाऐवजी आपल्या मुलीला शिक्षण, कौशल्य आणि आर्थिक स्वावलंबन देणं गरजेचं आहे. दागदागिन्यांपेक्षा शिक्षण हा सर्वात मोठा हक्क आणि वारसा आहे. सोनं विकता येईल, पण ज्ञान आणि आत्मविश्वास हे कधीच संपत नाहीत.

मुलगी जर स्वावलंबी असेल, तर ती कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकते. आज समाजात आपण पाहतो कित्येक मुली नोकरी करून स्वतःचं आणि आपल्या घरच्यांचं जीवन सुखी ठेवतात. तर काही वेळा परिस्थिती एवढी कठीण बनते की मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यकच होतं.

आजच्या युगात एक कठोर पण सत्य वास्तव हे आहे की, मुलांना जसं स्वातंत्र्य मिळालं आहे, त्याचा काही वेळा ते गैरफायदा घेतात. नको त्या व्यसनाच्या आहारी जाऊन, चुकीच्या संगतीत पडून अनेक तरुण आपलं आणि घरचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आणि या सर्वाचा फटका अनेकदा मुलींनाच सहन करावा लागतो. कारण समाज अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रीकडेच जबाबदारीचा भार टाकतो.

म्हणूनच, पालकांनी लग्नाच्या आधीच विचारपूर्वक तरतूद ठेवायला हवी मुलीला योग्य शिक्षण, करिअर आणि आत्मविश्वास देऊन तिला स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी घ्यावी. जर संसार उत्तम चालला, तर खूपच चांगलं; पण जर आयुष्यात एखादा वादळ आला, तर ती मुलगी स्वतःचा आधार बनून उभी राहील, कोणावर अवलंबून राहणार नाही. हेच खरं सुरक्षित भविष्य आहे.

लग्न आणि खर्चाचा मेळ म्हणजे फक्त आर्थिक समतोल नाही, तर भावनिक आणि सामाजिक शहाणपणाचं मिश्रण आहे. पालकांनी आपल्या मुलीचं लग्न करताना प्रतिष्ठा नव्हे, तर भविष्य लक्षात घेतलं पाहिजे. कारण समारंभाचे दिवे काही दिवस झगमगतील, पण मुलीच्या शिक्षणाने पेटवलेला दिवा आयुष्यभर उजळत राहील.

शेवटी एवढंच मुलगी ही आई-वडिलांसाठी फक्त जबाबदारी नाही, तर देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे. तिच्या आयुष्याचं पान आपण किती सुंदर लिहतो, हे आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर अवलंबून आहे.

म्हणून,

“लग्न करा मनापासून, पण खर्च करा समजुतीने;
मुलीचं भविष्य घडवा प्रेमाने, पण सजवा ज्ञानाने.”

खरा मेळ तोच जिथे खर्चाचा नाही, तर संस्कारांचा आणि स्वावलंबनाचा उत्सव साजरा होतो...

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0