द हनीट्रॅप ( भाग १ ला)

देशाचे सुरक्षा कवच असलेले गुप्तहेर खाते जेव्हा हनीट्रॅपमध्ये अडकते..
द हनीट्रॅप ( भाग १ ला)
© आर्या पाटील

आभाळात ढगांनी गर्दी केली होती. थंडगार वारा पावसाची चाहूल देत होता. नवीन घराच्या बाल्कनीत उभी असलेली विभाही पहिल्या वहिल्या पावसाच्या सरी अनुभवायला आतुर झाली होती. नुकतच घरातील सामान लावून झाले होते. एकटीच राहत असल्याने आणि भाड्याचे,ते घरही वेल फर्निश असल्याने तिचे सामानही खूप जास्त नव्हते परिणामी दोनच दिवसात तिने आपल्या घराची घडी नीट बसवली. पावसासोबत असलेलं हळवं नातं जपत ती आठवणींत हरवली. भूतकाळातील गोड आठवणींनी चेहऱ्यावर उमटलेली स्मितहास्याची लकेर तिचं सौंदर्य आणखी खुलवती झाली. खूप सुंदर नसली तरी चेहऱ्यावरील आत्मविश्वासाने चारचौघींत उठून दिसणारी मात्र ती नक्कीच होती. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली ती नुकतीच त्याच शहरातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉईन झाली होती.

गावापासून दूर शहरात राहायची ही तिची पहिलीच वेळ नव्हती. याआधीही शिक्षणासाठी मग नोकरीसाठीही ती दुसऱ्या शहरात एकटी राहिली होती. दरम्यान या नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि ती इकडे शिफ्ट झाली.
ढगांच्या गडगडाटाने पावसाच्या आगमनावर शिक्कामोर्तब केला आणि आभाळाचा हात सोडून इवलेसे पावसाचे थेंब धरणीकडे सरसावले. त्यांना कवेत घेत धरणीही तृप्त झाली. त्यांच्या मिलनाचा सुगंध आसमंतात उधळला. विभाला पहिल्या पावसात दरवळलेला मातीचा तो सुवास भारी प्रिय. डोळे बंद करत, दीर्घश्वास घेत तिने तो सुवास अंतरात भरून घेतला.
तोच दारावरची बेल वाजली आणि तिची तंद्री सुटली.
बाल्कनीतून घरात येत तिने दरवाजा उघडला. मोजक्या किराणा सामानाची डिलिव्हरी घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता.लिस्ट चाळत ती सामानाची खात्री करून घेऊ लागली.

"आय ॲम सॉरी हा. मला वाटलं हा फ्लॅट अजूनही बंदच आहे." समोरच्या फ्लॅट मधून बाहेर येत एक व्यक्ती त्या डिलिव्हरी बॉयला म्हणाली.
त्या डिलिव्हरी बॉयने मघाशी चुकुन त्याच्या घराची बेल वाजवली होती.
त्या आवाजाने मात्र विभाच्या काळजात ओळखीची घालमेल झाली. पाठमोरी असलेली ती लागलीच मागे वळली.

"कौस्तुभ, तु आणि इथे ?"क्षणाचाही विलंब न लावता ती विचारती झाली.तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य उमटले.

"विभा.." त्याने म्हणताच तिच्या गालावर खळी पडली.

त्या खळीने तो आजही तसाच स्तब्ध झाला जसा पाच वर्षांपूर्वी कॉलेजात व्हायचा.

"मॅडम, सामान बरोबर आहे ना ?" डिलिव्हरी बॉयच्या बोलण्याने दोघेही भानावर आले.

होकारार्थी मान हलवत तिने प्रतिउत्तर दिले. तसा तो तेथून निघून गेला.
"किती वर्षांनी पाहते तुला." बोलतांना मात्र ती हळवी झाली.
त्याने नेहमीसारखी फक्त मानच हलवली.

"अजूनही तसाच आहेस." तिने असे म्हणताच त्याने तिच्यावर गहिरा कटाक्ष टाकला.

"तु ही ?" तो ही तेवढ्यात ठामपणे म्हणाला.

"इकडे ?" तिने विचारले.

"आठवडाभरापूर्वी जॉबच्या निमित्ताने इकडे शिफ्ट झालो.
'इन्फोटेक' मध्ये सिनियर इंजिनियरच्या पोस्टवर काम करत आहे." त्याने उत्तर दिले.

"मी ही नुकतीच इथल्या मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉईन झाले आहे." ती म्हणाली.

थोडा वेळ शांततेत गेला. कधी काळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या त्या दोघांजवळ बोलण्यासाठी काहीच नव्हते का ?
मनात विचारांचा कोलाहल सुरु होता; पण ही अशी अचानक झालेली भेट दडपण ठरत होती. तिला त्याच्याशी खूप काही बोलायचे होते, विचारायचे होते, भांडायचे होते ;पण तो मात्र तसाच होता स्थितप्रज्ञ.
तिने आपल्या भावनांना आवर घातली.
हातातला सामानाचा बॉक्स जड लागत होता.

"मी घेऊ का ?" तो काळजीने म्हणाला.

तिने नकारार्थी मान हलवत तो घरात ठेवला.तो पुन्हा गंभीर बनला.
"ठिक आहे. येतो मी." अगदीच मोजक्या शब्दांत त्याने तिची रजा घेतली.

तिच्यासाठी ते नवे नव्हते. त्याच्या वागण्यातली गंभीरता तिला चांगलीच माहिती होती आणि तरीही ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
तिने पुन्हा मानेनेच होकार दिला.समोर आपल्या घरात शिरत त्याने लागलीच दरवाजा बंद केला.

'आतातरी मनातलं बोलायचस ना ?' ती स्वगत होत तशीच बंद दरवाजाकडे पाहत राहिली.

आठवणी पावसाच्या पागोळ्यांगत डोळ्यांतून ओघळत होत्या तोच त्याने दरवाजा उघडला.
गंभीरतेचा मुखवटा बाजूला ठेवत तो हळवा झाला. तिच्या घरात येत त्याने तिला घट्ट मिठी मारली.

"का सोडून गेलीस मला ? तुझ्याशी संपर्क साधण्याचा किती वेळा प्रयत्न केला पण नेहमीच अपयशी ठरलो. सोबतीचं वचन देऊन एकटं सोडून गेलीस. का वागलीस अशी ?" तो जाब विचारता झाला.

विरहाने पोळलेला तो सूर्य आज सावलीला गच्च बिलगला होता.
त्याला भेटतांना मात्र विरहाच्या आठवणी मागे पडल्या आणि ती तृप्त झाली.

"माफ कर मला." म्हणत तिने त्याच्याभोवतीची मिठी आणखी घट्ट केली.

"पाच वर्षे मी कसा जगलो मलाच माहित आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर." आता मात्र तो गहिवरला.

"तु प्रेमाची कबुली देशील असं माहित असतं तर मी यापूर्वीच अशी वागले असते." हसत ती बोलती झाली.

"आता जर पुन्हा अशी वागलीस तर लक्षात ठेव." त्याने मात्र धमकीवजा शब्दांत सुनावले.

"माझं अबोल प्रेम बोलकं झालं." त्याचा चेहरा ओंजळीत धरत तिने त्याच्या कपाळावर स्पर्शखुण उमटवली.

तिच्या स्पर्शाने त्याने मात्र डोळे गच्च मिटले. डोळ्यांतून ओघळलेले पाण्याचे थेंब त्यांच नातं आणखी गहिरं करते झाले.

"विभा, पण असं काय झालं की तु अचानक कॉलेज सोडलस ? ना कोणाशी संपर्कात राहिलीस ना कोणाला संपर्क साधू दिलास."
भूतकाळातल्या त्या घटनेमागचं कारण विचारतांना तो पुन्हा हळवा झाला.

"आयुष्यात काही घटना अनपेक्षितपणे घडतात आणि आयुष्य बदलतं. तसच काहीसं झालं. अचानक सोबत सुटते आणि आपण एकटे पडतो. मी नशिबवान आहे की पुन्हा एकदा अनपेक्षितपणेच तु माझ्या आयुष्यात आलास. आता मात्र ही सोबत सुटणं मला महागात पडेल."
भूतकाळाचं ते गूढ लपवत तिने मात्र आपल्या मनातल्या भावना स्पष्टपणे त्याच्यासमोर मांडल्या.

"आणि मलाही." म्हणत त्याने तिच्या कपाळावर स्पर्श खुण उमटवली.

"मग लग्न करशील माझ्याशी ?" तिच्या अनपेक्षित प्रश्नाचे त्याने मात्र उत्तर देण्याचे टाळले.

"अजूनही तुला वेळच हवा आहे. मी वाट पाहेन त्या दिवसाची. अगदी आजसारखीच." ती ठामपणे म्हणाली. त्यानेही तिच्या डोक्यावरून आश्वासक हात फिरवला.

( काय असेल विभाच्या भूतकाळाचं सत्य ? कौस्तुभला ती हक्काने सगळं सांगेल का ? तिच्यावर प्रेम करूनही तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय कौस्तुभने का घेतला नसेल ? या अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील )

क्रमश:
© आर्या पाटील.

🎭 Series Post

View all