द हनीट्रॅप (भाग २ रा)

देशाचे सुरक्षा कवच असलेले गुप्तहेर खाते जेव्हा हनीट्रॅपमध्ये अडकते..
द हनीट्रॅप ( भाग २ रा)

© आर्या पाटील

त्या दिवशीही नेहमीप्रमाणे ऑफिसमधून ते एकत्रच घरी आले. फ्रेश होऊन कौस्तुभ जेवणासाठी विभाच्या घरी आला.ऑफिसमधून कितीही दमून आली तरी जेवण बनवण्यासाठी विभा नेहमीच उत्सुक असायची. कौस्तुभला बाहेरचं आवडत नाही हे कॉलेजमध्ये असतांना तिला कळलं होतं. त्याच्यासाठी म्हणून रोजच नविन नविन पदार्थांची तिच्या किचनमध्ये रेलचेल असायची. तिला आपली आवड जपतांना पाहून कौस्तुभ भावनिक व्हायचा.
आजही तिने त्याच्याच आवडीचा बेत बनवला होता.

"विभा, बाहेर बस.मी आणतो ताटं वाढून." किचनमध्ये शिरत तो म्हणाला.

" परफेक्ट हसबंड मटेरियल आहेस. देव तुला माझ्यासोबत लग्न करण्याची सद्बुद्धी लवकरच देवो." नौटंकी सुरात म्हणत ती बाहेर आली आणि टिव्ही समोर बसली.

तेवढ्यात तिथेच असलेला कौस्तुभचा फोन वाजला.
रिंगटोनचा आवाज कमी असल्याने कदाचित त्याला तो ऐकू गेला नसेल.आपल्याच तंद्रीत तिने मात्र तो फोन उचलला आणि कानाला लावला.काही कळायच्या आत तो फोन वायुवेगे तिच्या हातातून हिसकावून घेत कौस्तुभने कॉल कट केला.

"परवानगीशिवाय दुसऱ्याचा फोन उचलू नये,एवढाही कॉमन सेन्स नाही का ? आज शेवटचं सांगतो,परत कधीही माझ्या फोनला हात लावायचा नाही." रागात म्हणत तो तडकाफडकी तिच्या फ्लॅटबाहेर पडला.

त्याला असं रागावतांना पाहून विभा मात्र हळवी झाली. कॉलेजमध्ये असतांनाही त्याला त्याच्या वस्तुंना हात लावलेलं आवडत नसायचं. त्याची सवय माहित असल्याने शक्यतो ती त्याच्या रुममध्येही जाण्याचे टाळत होती.आज मात्र अनावधानाने तिने फोन उचलला आणि तो बरसला.

'तुझं हे असं वागणं नेहमीच कोड्यात टाकतं.तुझ्यावर प्रेम करूनही आजवर तु उमगला नाहीस.' स्वगत होत तिने घराचा दरवाजा बंद केला.
तो परतुन येणार नव्हता याची खात्री होती त्यामुळे किचनमधले जेवण झाकून ठेवत ती रुममध्ये आली.
इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये शिकत असतांनाही एकदा तो असाच ओरडला होता.त्या दिवशी ती खूप रडली.मग पुन्हा तोच तिच्या वेदनेवर उपाय ठरला होता. त्याने जेव्हा समजावलं तेव्हा कुठे ती शांत झाली.
आजही तो अगदी तसाच वागला होता; पण यावेळेस तिने स्वतःला सावरले. हळवी ती आता मात्र खंबीर बनली होती. उपाशी पोट आणि डोक्यातले विचार यामुळे झोप येणं शक्य नव्हतं.ती तशीच उठली आणि बाल्कनीत आली. समोर गार्डनमध्ये फोनवर बोलणाऱ्या कौस्तुभवर नजर पडताच ती तिथेच स्थिरावली.
त्याच्या वागण्यातील परकेपणा मनाला छळत होता; पण तो त्याचा स्वभावगुण आहे म्हणून तिने तो स्विकारायचा ठरवला होता. बराच वेळ तो फोनवर बोलत होता.

' घरून फोन असेल का ?नक्की कोणाशी बोलत असेल ?' मनातल्या मनात विचारांत असतांना तिचा फोन वाजला आणि ती भानावर आली.

" अपोलो.." समोरून कोणी म्हणाले.

" जेमिनी." त्याच्या कोडवर्डला प्रतिउत्तर देत ती उत्तरली.

" ऑफिसर, आयएसआयचा अंडर कव्हर एजंट त्याच शहरात असल्याची आपली शंका खरी ठरली आहे. थेट पाकिस्तानातून शहरात असणाऱ्या त्यांच्या त्या एजंटशी फोनमार्फत संपर्क केला जात असल्याचे काही पुरावे मिळाले आहे.एका गुप्त नंबरवरूनच मिळालेल्या त्या पुराव्यात नक्कीच काही तथ्य असणार.आपल्या मिशनला खऱ्या अर्थाने सुरवात होत आहे.केसशी निगडीत सगळी माहिती मी तुला देत राहीन. आर यू रेडी फॉर धिज मिशन ?" इंटेलिजन्स ब्यूरोचे ऑफिसर मिस्टर राव यांनी माहिती दिली.

" येस सर. आय अम.." ती विश्वासाने म्हणाली.

"लवकरच कॉल करून मी पुढच्या स्टेपची माहिती देईनच.बेटा हीच संधी आहे त्या आयएसआय एजंटला पकडण्याची.त्यानेच रचलेल्या हनीट्रॅपमध्ये अडकून अभयने सुसाईड केले असल्याची दाट शक्यता आहे. आपल्या हातून तो सुटता कामा नये." राव सर हळवे होत म्हणाले.
त्यांच्या शब्दांनी तिच्या डोळ्यांत मात्र राग उसळला.

"तुम्ही फक्त ऑर्डर द्या. त्या एजंटला शोधून काढल्याशिवाय मी शांत राहणार नाही. त्याचसाठी तर ब्युरो जॉईन केला आहे." ती रागात म्हणाली.

"काळजी घे. नंबर ट्रेस झाल्यावर मी लागलीच फोन करतो." म्हणत त्यांनी फोन ठेवला.

विभाने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केले. कपाटात ठेवलेली आपल्या भावाची, अभयची फोटोफ्रेम बाहेर काढत तिने ती उराशी कवटाळली.
डोळे गच्च मिटताच तिला त्या दिवशीची ती घटना आठवली.
त्या दिवशी हॉस्टेलमध्ये तिच्या घरून कॉल आला. वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याचे सांगत लागलीच तिला घरी बोलवले होते. हॉस्टेलमधल्या मैत्रिणीला कळवून ती लगेच घरी जायला निघाली.घरी आल्यावर जे कळलं त्याने मात्र तिच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. इंटेलिजन्स ब्युरो मध्ये ऑफिसर असलेल्या तिच्या भावाने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या त्याने पाकिस्तानच्या आयएसआय एजंटला अनावधानाने आपल्या गुप्तहेरांची माहिती दिली होती आणि त्याचमुळे पाकिस्तानात असलेल्या एका भारतीय गुप्तहेराला अटकही झाली. एटीएसने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. पंधरा दिवसांची पोलिस कोठडीही झाली. अभयला या सगळ्याचा प्रचंड मानसिक धक्का बसला.आपल्या हातून घडलेल्या अपराधाचं ओझं डोईजड झालं आणि त्याने स्वतःला संपवले. त्या दिवशी पहिल्यांदा आपला भाऊ हेरखात्यात असल्याचे तिला कळले होते. अनेक दहशतवादी डाव आपल्या हेरगिरीने उधळवून लावलेल्या अभयला हा डाव कळला नाही आणि तो फसला.देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आपल्या भावाचा अश्याप्रकारे झालेला अंत विभाला बदलवून गेला. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने नमूद केल्याप्रमाणे तिने देशासाठी जगायचे ठरवले.त्याचं अपूर्ण राहिलेलं देशसेवेचं व्रत तिने पूर्ण करायचे ठरवले.आपल्या भावाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या आयएसआय एजंटचा बदला घेण्याचा निर्धार करून तिने इंटेलिजन्स ब्युरो जॉईन केले. हळव्या विभाचा एक गुप्तहेर होण्याचा प्रवास सोपा नव्हता; परंतु अथक परिश्रमाच्या जोरावर तिने खडतर प्रवास करून ध्येयाचा थांबा गाठलाच.
आज तर ध्येयपूर्तीची आणखी एक संधी तिला मिळाली होती. ती सज्ज झाली त्या संधीचं सोनं करण्यासाठी. आयएसआयचा तो एजंट जिथे कुठे असेल तेथून त्याला शोधून काढण्याचा निर्धार पक्का करत ती उठली.अभयची फोटो फ्रेम आत ठेवत तिने कपाट बंद केले.आपल्या कर्तव्याआड आता तिला कोणालाही येऊ द्यायचे नव्हते.स्वयंपाकघरात शिरत तिने स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेतले. बुद्धीने निर्णय घेतला होता परंतु मन काही ऐकत नव्हते. तोच दारावरची बेल वाजली. लागलीच तिने दरवाजा उघडला. समोर कौस्तुभ उभा होता.

"आय ॲम सॉरी." तो मान खाली घालत म्हणाला.

"इट्स ओके. आत ये." म्हणत तिने त्याला आत घेतले आणि दरवाजा बंद केला .

किचनमधुन आणखी एक ताट वाढून आणत तिने त्याला जेवायला बसवले.

"विभा, मला जाणीवपूर्वक असं वागायला लागतं. इच्छा असूनही त्यामागचं कारण मी तुला सांगू शकणार नाही. जमल्यास मला समजून घे." तो म्हणाला.

तिने होकारार्थी मान हलवत त्याला समजून घेतले.

"मी आताही वाट पाहेन त्या दिवसाची जेव्हा खऱ्या अर्थाने तु माझा होशील." ती खात्रीने उत्तरली.

त्याच्या डोळ्यांतील आर्तता मात्र तिच्या काळजाला भिडली.

"आणखी एक.उद्यापासून मी एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करणार आहे त्यामुळे तुला नेहमीसारखं भेटता येणार नाही. तुला ऑफिसला एकटीने जावं लागेल किंबहुना माझी ऑफिसची वेळही अनियमित असेल त्यामुळे जेवण,रोजचा डब्बा याची काही दिवस गरज नसेल. तु समजून घेशील अशी खात्री आहे." त्याने आपली अडचण सांगीतली.

विभाला त्यात आपल्या अडचणीवरचं सोल्यूशन सापडलं.तिलाही केसवर फोकस करायचे होते.

"ठिक आहे. उद्यापासून नाही भेटणार तुला.तुझ्या प्रोजेक्ट आड नाही येणार मी." ती ही लगेच म्हणाली.

काही दिवस एकमेकांना न भेटण्याच्या निर्णयाने तिच्या मनावरचं दडपण कमी झालं होतं. आता एकच लक्ष होतं ते म्हणजे मिशन 'हनीट्रॅप'.

क्रमश:


असं कोणतं सत्य कौस्तुभ विभापासून लपवत असेल ? अभयला हनीट्रपमध्ये अडकवलेला तो आयएसआय एजंट कोण असेल ? तो विभाच्या हाती लागेल का?
या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील पुढच्या भागात..

🎭 Series Post

View all