द हनीट्रॅप (भाग ३ रा)

देशाचे सुरक्षा कवच असलेले गुप्तहेर खाते जेव्हा हनीट्रॅपमध्ये अडकते..
द हनीट्रॅप (भाग ३ रा)

©आर्या पाटील

मिशन हनीट्रॅपची सुरवात झाली होती.काही दिवस कौस्तुभही भेटणार नसल्याने विभा निश्चिंत होती. केसशी संबंधित सगळेच धागेदोरे एकत्रित करतांना तिला सतर्क राहावे लागणार होते.
ऑफिसला जाण्याची तयारी सुरु असतांनाच पुन्हा तिचा मोबाईल वाजला.

"अपोलो हिअर." कोड वर्ड सांगत राव सरांनी सुरवात केली.

"जेमिनी सर.." तिनेही लागलीच प्रतिउत्तर दिले.

"महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तो एजंट वेष बदलून इन्फोटेकमध्ये काम करत असल्याची टिप मिळाली आहे. एका निनावी फोन कॉलवरून माहिती मिळाल्याने शंभर टक्के खात्री नाही. तुला त्या ऑफिसमध्ये जावं लागेल आणि तिथल्या एम्प्लॉईजची माहिती मिळवावी लागेल. कसं जायचं आणि माहिती कशी मिळवायची तुला चांगलच माहिती आहे." त्यांनी माहिती दिली.

'इन्फोटेक' नाव ऐकताच ती मात्र गोंधळात पडली. कौस्तुभ याच कंपनीत काम करत असल्याने तिथे जाऊन माहिती मिळवतांना तिला कसरत करावी लागणार होती. या कसरतीची तिला सवय होतीच.

"येस सर, आय विल डु इट." वेळ न दवडता तिने होकार दिला.
पुढच्याच क्षणी फोन कट झाला.

थोडा वेळ विचार करून तिने योजना आखली.
आपला लॅपटॉप बाहेर काढत ती कामाला लागली. एक इंटर्न म्हणून इन्फोटेक कंपनीला ईमेल केला आणि प्रोजेक्ट संबंधी सर्वेक्षण करायची परमिशन मागितली. कॉलेजचं आयकार्ड होतच आता फक्त प्रतिक्षा होती त्यांच्या निर्णयाची.परमिशन न मिळाल्यास आणखी वेगळ्या मार्गाने जावे लागणार होते.
तुर्तास तरी तिने ऑफिसला जाण्याची तयारी केली. डब्बा भरतांना कौस्तुभची आठवण आली. पर्याय नव्हता त्यामुळे तिने मनातल्या भावनांना आवर घातली.आवरून खाली उतरली. पार्किंग एरियात कौस्तुभची गाडी दिसली नाही.ऑफिस जॉईन केल्यानंतर आज पहिल्यांदाच ती ऑटोने जात होती. थोड्याच वेळात ती ऑफिसमध्ये येऊन पोहचली. कामात लक्ष लागत नव्हते. मनात सारखा तोच विचार सुरू होता. काम बाजूला ठेवत तिने जीमेलला एकदा आपला इनबॉक्स चेक केला.अजूनही काहीच रिस्पॉन्स आला नव्हता.एवढ्या सहज ऑफिसमध्ये एण्ट्री मिळणार नव्हतीच पण एक इंटर्न म्हणून संधी मिळण्याचे चॉन्सेस होते. डोक्यात दुसरी योजना आकार घेऊ लागली.
लंच ब्रेकमध्ये तिने पुन्हा इनबॉक्स पाहिला आणि त्यांचा मेल पाहून तिला हायसे वाटले. तिला परमिशन मिळाली होती. उदया सकाळी पंधरा मिनिटांसाठी तिला कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंटना भेटायची परवानगी मिळाली होती. तो मेसेज वाचून तिचा जीव भांड्यात पडला.
ऑफिसच्या कामात लक्ष लागत नव्हते. मनात उदयाची तयारी सुरू होती. तो दिवस जेमतेम भरत ती घरी परतली. पुन्हा एकदा नजर पार्किंग एरियाकडे वळली; परंतु आताही त्याची गाडी तिथे नव्हती.ती तशीच वर घरात आली.
फ्रेश होऊन बाहेर येत तोच तिचा फोन वाजला.
राव सरांनी तिच्या योजनेची माहिती मिळविण्यासाठी फोन केला होता. सविस्तर माहिती देत तिने उद्याच्या प्लॅनविषयी सांगितले. फोन ठेवत स्वयंपाकाची तयारी सुरु केली. कौस्तुभ मात्र आताही मनातून जात नव्हता. शेवटी बुद्धी आणि मनाच्या युद्धात मन जिंकलं. तिने कौस्तुभला कॉल लावला. बराच वेळ बेल वाजली त्याने मात्र तो रिसिव्ह केला नाही.
' एवढं कसलं मोठं काम ? एक गुप्तहेर असून माझ्याकडे वेळ आहे आणि याला मात्र आपल्या कामातून वेळ मिळत नाहीत.' नाक मुरडत ती स्वगत झाली.
पर्याय नव्हता त्यामुळे स्वतःपुरते जेवण बनवत तिने आपल्या भावनांना आवर घातली. जेवणानंतर बाल्कनीत आल्यावर खाली दृष्टीस कौस्तुभ पडला आणि आता मात्र ती पुन्हा हतबल झाली. इयर बड्स कानाला लावलेला तो नक्कीच फोनवर बोलत असणार असा अंदाज बांधतांना तिचा चेहरा मात्र पडला.

'कॉल नाही उचलला मग निदान मेसेज तरी करायचा.असं बोलायला वेळ असतो आणि मी कॉल केल्यावर मात्र उचलतही नाही.' मनातल्या मनात ती पुन्हा रुसली.
एका क्षणी वाटले सरळ जाऊन त्याला जाब विचारावा; पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला आवर घातली. कर्तव्याआड तिला प्रेम येऊ द्यायचे नव्हते. भावनिक गुंता सोडवतांना तिला आपल्या व्रताला मागे पडू द्यायचे नव्हते. ती ही तर खूप काही लपवत होती त्याच्यापासून मग त्याच्यावर अविश्वास कसा दाखवणार होती. बाल्कनीतून आत येत तिने उदयाची तयारी केली आणि झोपी गेली.

सकाळी लवकर उठून तयारीला लागली.मोठ्या मुश्कीलीने मिळालेली संधी तिला दवडायची नव्हती.वेळेआधीच ऑफिसमध्ये पोहचायचे होते. ऑफिसमध्ये गेल्यावर कौस्तुभच्या नजरेसही पडायचे नव्हते. देवघरातल्या गणरायाचं दर्शन घेत ती आपल्या मिशनवर निघाली. ऑफिसमध्ये आल्यानंतर रिसेप्शन एरियात बसलेली ती, चारी बाजूंनी कौस्तुभचा वेध घेत होती.
तोच रिसेप्शनिस्टने तिला आत बोलावल्याचे सांगितले.
ती लागलीच केबीनच्या दिशेने निघाली तोच मागून कोणीतरी खांद्याला स्पर्शत तिला थांबवले. मागे वळून पाहताच कौस्तुभ दिसला आणि तिने जीभ चावली.

" विभा, तु इकडे का आली आहेस ? मी सांगितलं ना मला काम आहे महत्त्वाचं." तो हळू आवाजात म्हणाला.
त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या तिला आणखी छळत होत्या.

" मी इथे माझ्या कामासाठी आले आहे. आमच्या ऑफिसचं काम आहे." ती प्रसंगावधानता राखत म्हणाली.

" काय ? असं कोणतं काम घेऊन आली आहेस ?" तो आश्चर्याने विचारता झाला.

" सॉरी, प्रायव्हेट आहे त्यामुळे कंपनीच्या ऍम्प्लॉईजना सांगता येणार नाही. ॲण्ड डोन्ट वरी तु सांगितल्या शिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही. काल केलेल्या कॉलसाठी सॉरी." म्हणत ती लागलीच तेथून निघून गेली.
तो मात्र पाठमोऱ्या तिला गंभीरतेने पाहत राहिला.

केबीनजवळ पोहचताच दीर्घ सुस्कारा सोडत तिने स्वतःला शांत केले.
आत केबीनमध्ये गेल्यावर मात्र तिने आपली कामगिरी चोख बजावली. इंटर्न म्हणून एका प्रोजेक्टसाठी सर्वेक्षण करायचे आहे असे सांगून एम्प्लॉईजची नावे मिळवली; पण त्यांचे फोन नंबर आणि पत्ते मिळविण्यात अपयशी ठरली. पर्सनल माहितीचे कारण सांगून त्या अधिकाऱ्याने ते देणे नाकारले. तुर्तास तरी दुसरा कोणत्याही मार्ग नव्हता त्यामुळे मिळालेली माहिती घेऊन ती केबीनबाहेर पडली.
तिच्या वाटेकडे डोळे लावून राहिलेला कौस्तुभ लागलीच बाहेर आला.

"विभा, आय ॲम सॉरी." तिच्या जवळ येत तो म्हणाला.

" इट्स ओके. किती वेळा आणि कशा कशासाठी माफी मागणार ?" बोलतांना दुखावलेल्या तिच्या मनाचा अंदाज लागत होता.

" बाहेर कॅफेमध्ये भेटायचं का ?" तो अपराधीपणाने म्हणाला.

" घाईत आहे. एक महत्त्वाच्या कामं आहे. मला निघावं लागेल." म्हणत ती मात्र जाणीवपूर्वक त्याला टाळत बाहेर पडली.
तिला असे जातांना पाहूनही तो तसाच स्थितप्रज्ञ होता.

क्रमश:

तो एजंट त्या कंपनीमधीलच एखादा एम्प्लॉई असेल का ? कौस्तुभला आभाचं मिशन कळेल का ? त्याच्या वागण्याचा अर्थ आभाला लागेल का ? या साऱ्याचा सरळ संबंध हनीट्रॅपशी असेल का ? अनेक प्रश्नांची लवकरच उत्तरे मिळतील.

🎭 Series Post

View all