द हनीट्रॅप( भाग ४ था)

देशाचे सुरक्षा कवच असलेले गुप्तहेर खाते जेव्हा हनीट्रॅपमध्ये अडकते.
द हनीट्रॅप (भाग ४ था)

©आर्या पाटील

आपल्या ऑफिसला लिव्ह टाकून इन्फोटेक मधून ती थेट घरी आली. लिस्टमध्ये असलेल्या एम्प्लॉईजची माहिती मिळविण्यासाठी तिने आपला लॅपटॉप बाहेर काढला. सोशल मिडिया खेरीज दुसरा ऑप्शन नव्हता त्यामुळे तिने तेथूनच सुरवात केली. माहिती गोळा करत त्याचा वेगळा फोल्डर तयार केला. काही जणांची माहिती मिळत होती तर काही प्रोफाईल लॉक असल्याने प्रॉब्लेम येत होता.

अभिराम दुबे नावाच्या प्रोफाईलवर क्लिक करताच तिला मात्र जबर धक्का बसला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन कौस्तुभ होता.हात थरथरू लागले. मनात नकोनकोत्या विचारांनी गर्दी केली. त्याच्या गूढ वागण्यामागे भयानक वास्तव तर नसेल या जाणीवेने ती हादरली. खूप काही नव्हतं त्या प्रोफाईलवर पण फोटो नक्कीच कौस्तुभचा होता. काम करण्याचं ठिकाण वगळता सगळीच माहिती चुकीची होती. ती कमालीची हताश झाली. विचार करून मेंदूला बधिरता आली होती. त्याला डायरेक्ट विचारावं तर मिशन एक्सपोज होण्याची शक्यता होती. आता तरी तिला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती.
कॉफीचा मग घेऊन रिलॅक्स व्हायला म्हणून ती थोडावेळ बाल्कनीत आली. संध्याकाळी नेहमीच्या वेळात कौस्तुभ ऑफिसमधून येतांना दिसला. गाडी पार्क करून वर येतांना त्यानेही तिच्या बाल्कनीकडे पाहिले. क्षणाचा अवकाश की त्यांची नजरानजर झाली. लागलीच तिने आपली नजर दुसऱ्या बाजूने वळवत त्याच्याकडे पाहणे टाळले. काही वेळ गेला असेल तोच दारावरची बेल वाजली. कौस्तुभ असल्याचा अंदाज बांधतांना तिच्या काळजात मात्र धस्स झाले. तिने दार उघडले. समोर तोच उभा होता.

"विभा,आत येऊ का?" तो त्रयस्थासारखा विचारता झाला.

"तुला कधीपासून परवानगीची गरज लागली ?तु जरी मला आपलं मानत नसल्यास तरी मी मात्र मनापासून तुला स्विकारले आहे." ती ही जरा गंभीरतेनेच म्हणाली.

"हे असं बोलून तु मला परकं करत आहेस. मी आधीच म्हणालो होतो,आपल्या नात्यासाठी माझ्या काही गोष्टी गुप्त राहणेच योग्य ठरतील." तो अजूनही दाराबाहेरच होता.

" का ?आणि कश्यासाठी ? असं काय लपवलं आहेस माझ्यापासून ? स्वतःची ओळख की अजून काही ?" तिने असे बोलताच तो मात्र चाचपडला.

त्याच्या मनातली चलबिचल एका गुप्तहेराच्या नजरेतून सुटली नाही.

"माझ्या ऑफिसमध्ये कशासाठी आली होतीस ?" त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला.

"त्याचे उत्तर मी तुला याआधीच दिले आहे." तिनेही लगेच उत्तर दिले.
"सर्वेक्षणाचं कारण सांगून एम्प्लॉईजची लिस्ट मिळवलीस. बरोबर का ?" त्याच्या या माहितीने मात्र ती अवाक् झाली.

"हो." नजर चोरत तिने सांगितले.

"का ? आणि कशासाठी ?" त्याने पुन्हा प्रश्न केला.

"ऑफिशियल काम होतं. सर्वेसाठी मला माहिती हवी आहे." ती अजूनही आपल्या उत्तरावर ठाम होती.

"तु काही लपवत तर नाहीस ना ?" तो संशयाने म्हणाला.

"का ? तु काही लपवलं आहेस ?" ती उलटपक्षी विचारती झाली.

"नाही." उत्तर देतांना त्याने चोरलेली नजर पुन्हा तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही.

"आत ये." तो बाहेरच उभा असल्याने तिने सांगितले.

"नको.काम आहे मला." म्हणत त्याने येण्याचे टाळले आणि तसाच मागे आपल्या फ्लॅटमध्ये शिरला.
त्याला असं निघून जातांना पाहून विभाच्या मनात मात्र संशयाची पाल चुकचुकली. काही तरी चुकीचं आहे हे कळून चुकलं.आत येत तिने दरवाजा बंद केला आणि डोळे गच्च मिटले.
मनातलं वादळ आणखी गडद होत होतं. विचारांत असतांना तिचा कॉल वाजला आणि ती भानावर आली.
अनघाचा, तिच्या कॉलेजमध्ये सोबत असलेल्या मैत्रिणीचा फोन होता.
बोलण्याची मानसिक तयारी नव्हती; पण अनघासाठी म्हणून तिने कॉल उचलला.

" हाय विभा. कशी आहेस ?" म्हणत तिने बोलायला सुरवात केली.

"मी मजेत.तु कशी आहेस ? आज खूप दिवसांनी आठवण आली." विभाने प्रतिउत्तर दिले.
त्यानंतर जवळजवळ पंधरा मिनिटे त्या एकमेकींशी मनमुरादपणे बोलत होत्या. तोच तिने विषय काढला.

"अजून एक सांगायचं होतं." तिने सांगितले.

"अगं मग सांग की." विभाही लागलीच म्हणाली.

" कौस्तुभशी काही कॉन्टॅक्ट झाला का ?" तिच्या या प्रश्नावर विभा चमकली. पुढच्याच क्षणी तिने मात्र सावध भूमिका घेतली.

"नाही." असे म्हणताच अनघाने पुढचा विषय काढला.

"त्या दिवशी कौस्तुभचे आईबाबा भेटले; पण आश्चर्याची गोष्ट ते त्याचे खरे आईबाबा नव्हते." ती विभाला संभ्रमात पाडत म्हणाली.

"काय म्हणतेस ते तुला तरी कळतं का ? तु नक्की त्यांनाच भेटली होतीस ना ?" विभा खात्री करीत म्हणाली.

" शंभर टक्के.त्याच्या घरी जेवून आलो आहोत आपण.त्याच्या आईवडिलांना बरोबर ओळखते." तिनेही लगेच आपली बाजू मांडली.

" तु बोलली त्यांच्याशी ?" विभाने पुन्हा प्रश्न केला.

" हो.बोलल्यावर कळलं की ते कलाकार आहेत.छोट्या मोठ्या नाटकात काम करतात.कौस्तुभचे आई बाबा होण्यासाठीही त्यांना पैसे मिळाले होते." तिने असे सांगताच विभा मात्र चमकली.

"तु हे सगळं खात्रीने सांगत आहेस ना ?" उठून उभी राहत विभाने विचारले.

"अगदी एकशे एक टक्के. अगं, म्हणूनच तुला कॉल केला." ती उत्तरताच विभाने मात्र डोक्याला हात लावला.

" एक अर्जंट काम आहे. मी बोलते तुझ्याशी नंतर." असं म्हणत विभाने फोन कट केला आणि पुन्हा एकदा एम्प्लॉईजची लिस्ट चाळली. दीर्घश्वास घेत तिने मनाशी निर्धार केला. कौस्तुभविषयी वाटत असलेला संशय खोटा ठरावा म्हणून तिने मनोमन गणरायाला प्रार्थना केली.त्याचे नाव त्या लिस्टमध्ये नसल्याची खात्री करून घेत तिने आपल्या दुसऱ्या मोबाईल वरून ब्युरोच्या ऑफिसर राव सरांना कॉल लावला.

"जेमिनी हिअर." फोन उचलताच तिने कोडवर्डने बोलायला सुरवात केली.
"अपोलो." त्यांनीही प्रतिसाद दिला.

"सर, कौस्तुभ इनामदार म्हणून माझ्या शेजारी राहत असलेली व्यक्ती मला संशयित वाटत आहे." म्हणत पुढचं काही सांगणार तोच त्या सरांनी समोरून सत्य सांगून तिला धक्का दिला.

"येस.आज एका निनावी कॉलवरून आम्हांला मोबाईल ट्रेसिंगचे काही पुरावे मिळाले आहेत. कंपनीनंतर तुझ्या सोसायटीतूनच आयएसआयशी संपर्क साधला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तो एजंट तिथेच राहत असावा अशी दाट शक्यता आहे." त्यांनी माहिती देताच ती मात्र पूर्णपणे कोसळली. पुढच्याच क्षणी मात्र स्वतःला सावरत तिने खंबीरता दाखवली.

"फक्त शक्यता नाही.सर,तो एजंट इथेच राहतो आहे." म्हणत तिने अगदी सुरवाती पासून कौस्तुभची सगळी माहिती दिली.

"ओह नो म्हणजे अभयसारखच तुझ्यासाठीही त्याने हनीट्रॅपचं प्लॅनिंग केलं असेल का ?" त्यांनी असे सांगताच ती मात्र शांत झाली.

"कदाचित नाही. त्याने कधीही देशाच्या सुरक्षेसंबंधी कोणतीही माहिती मला विचारली नाही; पण आजचं त्याचं वागणं मात्र पेचात टाकणारं होतं. तो ज्याप्रकारे माझ्याशी बोलत होता त्यावरून कदाचित त्याला माझा संशय आला असावा. एम्प्लॉईजच्या लिस्ट मध्ये त्याचं नाव नाही यावरून मी त्याला कोणताही प्रश्न विचारला नसल्यामुळे हा संशय नक्कीच दुणावला असेल." तिने हातचा न राखता सगळे सांगितले.

"विभा, मिशन हनीट्रॅपचा सूत्रधार तोच असावा असा माझा दाट संशय आहे. जी माहिती मिळाली आहेत यावरून तरी असच वाटत आहे; पण तरीही ठोस पुरावा मिळाल्याशिवाय कन्फर्म करणे योग्य होणार नाही. पुराव्याअभावी सोडूनही देता येणार नाही. घातपाताची शक्यता लक्षात घेता आपल्याला चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्यावेच लागेल." त्यांनी असं सांगताच विभाने मात्र डोळे गच्च मिटले.

थोडा वेळ शांततेत गेला.

"ऑफिसर, ऐकत आहेस ना ?" तिचा कोणताही प्रतिसाद न आल्याने सर म्हणाले.

"येस.. येस सर.मी घेते त्याला ताब्यात." ती खंबीर होत म्हणाली.

"मी पोहचतोय तिथे लवकरच." म्हणत त्यांनी फोन कट केला.

क्रमश:

कौस्तुभच तो आयएसआय एजंट असेल का?त्याला पकडण्यात विभा यशस्वी होईल का?की आणखी काही नवे सत्य समोर येईल ?
कळेल पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all