द हनीट्रॅप (भाग अंतिम)

देशाचे सुरक्षा कवच असलेले हेरखाते जेव्हा हनीट्रॅपमध्ये अडकते.
द हनीट्रॅप (अंतिम भाग)

© आर्या पाटील

कौस्तुभच्या साथीने केलेला प्रेम प्रवास तिच्या डोळ्यांसमोर तरळला. परिस्थितीचा दाह सहन करूनही बहरलेला,त्यांच्या नात्याचा गुलमोहोर क्षणात जमीनदोस्त होत होता. मनात उठलेल्या त्या आठवणींच्या मांदियाळीने ती कातर झाली. थोडाच वेळ की तिने त्यातूनही स्वतःला सावरले. प्रेमाच्या आठवणींना कर्तव्याच्या कुलूपाआड बंद करत ती खंबीर बनली. तिने परत एकदा अभयचा फोटो कपाटातून बाहेर काढला. फोटोवरून हात फिरवतांना डोळ्यांत दाटून आलेले अश्रू त्या फ्रेमवर ओघळले. या सगळ्या मागे कौस्तुभचा हात असेल याची कधी कल्पनाही तिने केली नव्हती. तो फोटो पुन्हा जागेवर ठेवत तिने दीर्घश्वास घेतला. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली रिवाल्वर काढून तिने ती मागे कमरेला खोचली. डोळ्यांत दाटून आलेले अश्रू पुसत मनाशी पक्का निर्धार केला. सरांचा कॉल आल्यावर लागलीच संपर्क व्हावा म्हणून कानात इयर बड्स घातले. आपला मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवत सगळी तयारी केली. परत एकदा गणरायाचं दर्शन घेत ती आयुष्यातील सगळ्यात कठिण मोहिमेवर निघाली.
कौस्तुभच्या फ्लॅटची एक चावी तिच्याकडे होती.खूप अर्जन्ट असेल तरच त्याने फ्लॅट उघडायला परवानगी दिली होती. यामागचं कारण तिला आज कळत होतं. जरी हे खरं असलं तरी त्याची प्रेमाची भावनाही तेवढीच खरी होती. तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो याची तिला खात्री होती.प्रेम आणि कर्तव्याच्या या लढाईत तिने कर्तव्याला स्विकारत प्रेमाची आहुती द्यायचे ठरवले होते. परिस्थितीच्या अग्नीत तिच समिधा होऊन जळत होती.
चावी घेऊन ती फ्लॅटबाहेर पडली.समोर चोरपावलांनी कौस्तुभचा दरवाजा उघडून हळूच तिने आत प्रवेश केला. तो हॉलमध्ये कुठेच नव्हता. तोच पुन्हा सरांचा कॉल आला.

"जेमिनी.." तात्काळ फोन रिसीव्ह करत ती दबक्या आवाजाने म्हणाली.

"तो कौस्तुभ इनामदार नसून आयएसआय एजंटच आहे.एका निनावी फोनवरून त्याचे काही संशयित व्यक्तींसोबत फोटोज मिळाले आहेत. अभयला ट्रॅपमध्ये अडकवणाराही तोच होता हे ही त्यात नमूद केले आहे. वी हॅव टू कॅच हिम." ऑफिसर म्हणाले.

"येस सर. मी त्याच कामगिरीवर आहे. आताच त्याच्या घरात शिरले आहे." ती पुन्हा एकदा दबक्या आवाजात म्हणाली.

"व्हॉट ? मी म्हणालो होतो नी की, पोहचतो लगेच. अभयला मी गमावले आहे आता तुला गमावायचे नाही. काळजी घे मी पोहचतो लगेच." म्हणत त्यांनी फोन कट केला.

विभा लागलीच बेडरूमच्या दिशेने निघाली. दरवाजा उघडाच होता. कमरेला लावलेली बंदूक काढत तिने त्याचा कानोसा घेतला आणि हळूच दरवाजा लोटला.
समोरचं दृश्य पाहताच मात्र तिच्या पायाखालची जमिन सरकली. समोर कौस्तुभ तिच्यावर बंदूक रोखून उभा होता.

"विभा तु ?" तो आश्चर्याने ओरडला.

"ही विभा आहे. माझी मैत्रीण.." कानाला लावलेल्या इयर बड्समधून तो कोणाशी तरी संवाद साधता झाला.

"तिच आहे या हनीट्रॅपची मास्टर माईंड. ऑफिसर अभयलाही तिनेच ट्रॅपमध्ये अडकवले होते.तुझ्यासाठीही तिने तोच ट्रॅप तयार केला आहे. कॉलेजपासून ते आजपर्यंत तुम्हां दोघांमध्ये जे काही घडत होतं तो या ट्रॅपचाच भाग होता. आज ऑफिसमध्येही ती याचसाठी तर आली होती.
डोन्ट थिंक मोअर. इट्स माय ऑर्डर शूट हर.." समोरून तिला शूट करण्याची ऑर्डर आली आणि त्याचे हात थरथरले.

तो बंदुकीची ट्रिगर दाबणार तोच तिने त्याच्या बंदुकीच्या दिशेने फायरिंग केली. क्षणात त्याची बंदूक खाली पडली.त्याला शेवटचं डोळ्यांत साठवत ती पुन्हा ट्रिगर दाबणार तोच दरवाजा लोटत ऑफिसर राव आत आले.

"स्टॉप विभा, ही इज नॉट आयएसआय एजंट. तो इंटेलिजन्स ब्युरोचा अंडर कव्हर ऑफिसर आहे. ऑफिसर प्रभात मोहिते." तिच्या बंदुकीचा नेम चुकवत राव सर म्हणाले.

नेम चुकल्याने तो वाचला. ती उभ्या जागी खाली कोसळली. सरांना पोहचायला थोडा जरी उशीर झाला असता, तर तिच्या गोळीने त्याच्या हृदयाचा वेध घेत त्याला संपवले असते.
समोर काय घडतय हे कौस्तुभच्याही लक्षात आलं होतं. इंटेलिजन्स ब्युरोच्या राव सरांविषयी तो बरच काही ऐकून होता.फायरिंगचा आवाज आल्याबरोबर त्याला आलेला कॉल कट झाला होता.

" मिस्टर प्रभात मोहिते. आय ॲम ऑफिसर राव फ्रॉम इंटेलिजन्स ब्युरो ॲण्ड शी इज ऑफिसर विभावरी कर्णिक." तिची ओळख ऐकताच त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.
तिच्या आजच्या वागण्याचा त्याला उलगडा झाला होता.

"ॲक्चुअली, हा हनीट्रॅप आपल्या संपूर्ण टीमसाठी लावण्यात आला होता. अगदी अभयच्या मृत्यूपासून ते आजच्या या थरारापर्यंत सगळच पद्धतशीर आखलं होतं." राव सरांच्या तोंडून अभयचं नाव ऐकताच तो चमकला.

"येस मिस्टर प्रभात. पाच वर्षांपूर्वी तुमचा सिनियर ऑफिसर अभय याच हनीट्रॅपमध्ये अडकला. त्याच्याकडून आयएसआयला गेलेल्या माहितीमध्ये तुम्हीही एक होता.आपल्याच टीमचा भाग बनून मग आयएसआय एजंटने तुमच्यासाठी ट्रॅप रचला. तुमचा सिनियर ऑफिसर बनून तुम्हांला चुकीची माहिती दिली आणि इकडे मिशनवर पाठवले. एवढच नाही, तर आमच्या पूर्ण टिमला तुमच्या विरोधात पुरावे देत तुम्हीच आयएसआय एजंट असल्याचा संशय निर्माण केला. विभा,आपल्याला आलेले कॉल, ते फोटोज, मोबाईल लोकेशन सगळं सगळं या ट्रॅपचाच भाग होता. आपल्याच टिमच्या हातून आपल्याच ऑफिसरला संपवण्याचा कट होता त्यांचा. तु सांगितलेली माहिती आणि फोटो याची पुन्हा एकदा पडताळणी केली असता, कौस्तुभच प्रभात मोहिते असल्याचे कळले आणि खूप मोठा गुंता सुटला. दरम्यान आपल्याला आलेल्या निनावी फोन आणि मेसेजचा सुगावा लागला. खूप मोठा ट्रॅप होता; पण सुदैवाने आपण या ट्रॅपमधून वाचलो.अभयच्या बाबतीतही आपण सर्तकता दाखवली असती,तर तो आज आपल्यामध्ये असता." सरांनी सांगताच कौस्तुभला म्हणजेच ऑफिसर प्रभातला धक्का बसला.

अभयच्या निधनाचं कळलं होतं;पण त्याने सुसाईड केलं होतं हे त्याला आज आणि असं समजलं.अभयनंतर आयएसआयच्या त्या एजंटने सिनियर बनून त्याचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर त्याच्या आयुष्यात पुढे जे काही घडले तो सगळा या हनीट्रॅपचाच भाग होता. डोक्याला हात लावत तो ही बेडवर बसला.

"हनीट्रॅपचा डाव उधळून लावण्यात आपल्याला यश आले आहे; पण यापुढे कोणीही या ट्रॅपमध्ये फसू नये यासाठी सक्षम पावले उचलणे गरजेचे आहे. हकनाक कोणी भारतीय गुप्तहेर यांच्या जाळ्यात अडकून स्वतःची, पर्यायाने देशाची सुरक्षितता धोक्यात आणणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकवून, हनीट्रॅपचं हे जाळं कायमचं उद्धवस्त करण्यासाठी मला तुम्हा दोघांची मदत लागेल. मिशन हनीट्रॅप अजून संपलेला नाही. मग तयार आहात दोघेही ?" सरांनी असे विचारताच ते दोघेही उठून उभे राहिले.

"येस सर.." म्हणत मिशनची जबाबदारी स्विकारली.

"बोला तुम्ही. मी निघतो." म्हणत राव सर निघून गेले.

ते निघून जाताच तो मात्र वायुवेगे तिच्यापाशी सरसावला. तिला कवेत घेत गच्च मिठी मारली. तिच्या कपाळ्यावर स्पर्श खूण उमटवली.

"माझ्यामुळे तुला काही झालं असतं, तर जिवंतपणीच मेलो असतो गं. आय ॲम सॉरी." त्याने असे म्हणताच तिनेही त्याच्या भोवतीची मिठी घट्ट केली.

"सर आले नसते तर काय झाले असते या कल्पनेने मला घाबरायला होत आहे. दादाला गमावलं आहे आता तुला गमावणं माझ्याने होणार नाही. " म्हणत ती रडू लागली.

"तुझ्या ट्रॅपमध्ये अडकल्यावर कोणाची काय बिशाद की, मला हनीट्रॅपमध्ये अडकवावं. लग्न करशील माझ्याशी ?तुझ्या प्रेमजाळ्यात कायमचा सामावून घेशील ?" तो तिचा हात पकडत पुढ्यात बसला.

याचीच तर ती क्रित्येक वर्षे वाट पाहत होती. तिने लागलीच डोळे पुसले. कमरेत वागत त्याच्या कपाळ्यावर प्रेमखूण उमटवली.मानेनेच होकार दिला. प्रेमाची लाली तिच्या खळीदार गालावर चढली. त्या खळीवर फिदा होत तो मात्र गोड लाजला.
हनीट्रॅपचा सूत्रधार सापडला नव्हता; पण रचलेला हनीट्रॅप उधळून देत ते एकमेकांना नव्याने सापडले.सात जन्मासाठी वचनबद्ध होत त्यांनी एकमेकांना नव्याने स्विकारले.

© आर्या पाटील

समाप्त

🎭 Series Post

View all