Login

छत्रपती शिवाजी महाराज - एक आदर्श राजा.

The True King
||प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुविश्ववंदिता शाहसुनो:‌ शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

'प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाऊन शहाजीराजांचा पुत्र शिवाजी महाराजांची मुद्रा लौकिक प्राप्त करून ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल'

वरील अभिप्रेत अर्थाप्रमाणे शिवाजी शहाजी भोसले म्हणजेच, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले स्वराज्य नामक अफाट साम्राज्य निर्माण केले जे कला कलाने वाढत गेले व नावाप्रमाणेच स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य निर्माण केले. हे राज्य इतर राज्यकर्त्यांपेक्षा वेगळे या कारणाने होते की स्वराज्यातील 'स्व' हा कोण्या एकाचा किंवा केवळ राजाचा होता अशी बाब नव्हती तर स्वराज्यातील 'स्व' हा सर्व जनतेचा होता.

शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते एक सवंगडी होते, स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी जे कधी राजांना भेटलेही नव्हते त्या प्रत्येकासाठी महाराज जणू त्यांच्या घरातील एक प्रिय व्यक्ती होते, त्यांचे कुटुंब प्रमुख होते.

मुघलशाही,आदिलशाही व निजामशाहीच्या अन्याय अत्याचाराने खितपत पडलेल्या जनतेला १९ फेब्रुवारी १६३० रोजी एक नवसंजीवनी मिळाली. एक आशेचा किरण जन्माला आला हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या जनतेस अंदाज नव्हता की जिजाऊंच्या पोटी जन्मलेल्या या शूर योद्धाच्या कर्माने पूर्वापार चालत आलेली गुलामगिरीची जोखडे तुटून एक मोकळे, स्वातंत्र्य व स्वच्छंदी आयुष्य जगण्याची संधी त्यांना मिळत होती.

कुठलीही व्यक्ती जन्माने महान बनत नाही तर ती महान बनते ते व्यक्तीचा विचार, गुण व कर्तृत्वाने अगदी या उक्तीप्रमाणेच महाराज हे जन्मतः केवळ शिवराय किंवा शिवबा होते, त्यांची भविष्यातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून जडणघडण केली ती जिजाऊ यांनी. शिवराय हे छत्रपती बनले ते जिजाऊंनी त्यांच्यावर केलेला संस्कारांनी.

छत्रपती शिवाजी महाराज हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते युद्धकलेत ते पारंगत होतेच पण चतुरस्त्र ते यासाठी होते की ते भविष्यावर नजर ठेवून असत. महाराज केवळ राज्यकर्ते नव्हते तर ते कृषीतज्ञ , नीतीतज्ञ, युद्धतज्ञ व कलावंतही होते.

ऐन जिन्नस कर्ज पद्धत म्हणजे अशी कर्ज पद्धत ज्यात शेतकऱ्यांची आत्महत्या रोखली जाईल व शेतकऱ्यांना सावकारांकडून होणारा जाचही टाळला जाईल हा या कर्ज पद्धती मागचा हेतू होता.

ऐन जिन्नस कर्ज पद्धतीमध्ये शेतकऱ्यास कर्ज स्वरूपात पैसे न देता शेतीसाठी उपयोगी पडणारे अवजारे व बी बियाणे देण्याची तरतूद करण्यात आली होती. ही पद्धत स्वराज्याचे पाचवे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या साथीने महाराजांनी विकसित केली होती‌ या कर्ज पद्धतीचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकरी वर्ग सधन‌‌ झाला.

स्वतःच्या रक्ताची धार वाहून उभ्या केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांच्या कित्येक साथीदारांनी स्वतःचे प्राण गमावले पण, "आम्हाला काहीही झालं तरी आमच्यासारखे लाखो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे" या तत्त्वाने शिवरायांच्या मावळ्यांनी जीव तळ हातावर ठेवून सर्व लढा लढल्या. त्या लढाया जिंकण्यासाठी जी समयसुचकता व नियोजन गरजेचे होते ते महाराजांच्या ठायी होती. घोडदळ ,पायदळ ,आरमार अशा सर्व आघाड्यांवर महाराज योग्य युद्धनीती आखत.

युद्ध जिंकण्यासाठी शत्रूची माहिती मिळवणे फार महत्त्वाचे हे जाणून महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वात हेर खात्याची स्थापना केली.

महाराज सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालत ही त्यांची त्या काळातील सामाजिक परिस्थितीनुसार विशेष बाब होती.

महाराजांच्या नियोजनाचे योग्य वर्णन होते ते‌ आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावरून जिथे ते एक राजे होते आणि एक बाप होते.

महाराजांचे युद्धनीतीचे योग्य वर्णन होते ते प्रतापगडावरील बलाढ्य अफजल खानाच्या हत्येच्या प्रसंगाने, खानाची हत्या ही महाराजांसाठी केवळ स्वराज्यावर चालून आलेल्या संकटावर केलेली मात नव्हती, तर ती महाराजांसाठी एक वैयक्तिक विजय गाथा होती. अफजलखानाच्या वधाने महाराजांनी शहाजीराजांचे बंधू संभाजीराजांच्या हत्येचा प्रतिशोध घेतला होता.

महाराज धार्मिक स्थळांना मग ते कुठल्याही धर्माचे असुदेत त्यांचे जतन करत असत.

परस्त्री कडे केवळ आई म्हणुन महाराज पाहत असत.

"धार्मिक स्थळांना धर्म म्हणून नाही तर स्थापत्यकलेचा खजिना म्हणून पहावे." महाराजांच्या या विचारातून त्यांची व्याप्ती समजून येते.

एका तमाशात नाचणाऱ्या स्त्रीला जेव्हा महाराज ,
"आमची आई जर तुमच्या इतकी सुंदर असती तर आम्ही किती सुंदर असतो" या शब्दांनी संबोधित करतात त्यावरून महाराजांच्या स्वच्छ चारित्र्याची व जिजाऊंच्या जिंकलेल्या संस्कारांची प्रचीती येते.

असा राजा होणे नाही