लूप होल पर्व २(भाग १८)

This is suspense story.

   सारांश,

             दोन वर्षांपासून अगम्य आणि अभिज्ञा वेगळे राहत होते.अगम्य श्रीरंगपूरमध्ये तर अभिज्ञा पुण्यात! तिचा अपघात होतो आणि दोघे पुन्हा एकत्र येतात आणि एकेक कोडी उलगडत जातात!

    अगम्यवर त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या वैदेही वरून अभिज्ञा संशय घेते पण ती चुकली हे कळल्यावर ती त्याची माफी मागते पण अगम्य तिला माफ करत नाही रादर मुद्दाम तो तिला वेगळं ठेवतो त्याच्या मागे मात्र त्याला पडणारी स्वप्ने असतात.सूर्यकांत अगम्यच्या स्वप्नात येऊन त्याला त्रास देत असतो आणि त्याच्या बरोबर यावेळी अभिज्ञाला ही घेऊन जाणार अशी धमकी देतो म्हणून अगम्य अभिज्ञाला त्याच्या पासून दूर करतो.तिच्या अपघात होतो पण इंस्पेक्टरला हा घातपात करण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटत असते आणि त्यांचा संशय अगम्य वर असतो कारण दोघांमध्ये उडणारे खटके! अभिज्ञाचा हात अपघातात फॅक्चर  होतो आणि अगम्य तिला पुन्हा श्रीरंगपूरला वाड्यात घेऊन जातो. एका हळव्या क्षणी ती झोपली आहे असे समजून तो तिला येणाऱ्या संकटापासून आणि सावटा पासून लांब ठेवण्यासाठी तिला दूर लोटले असे बोलतो! ते अभिज्ञा ऐकते आणि त्याच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण काही केल्या अगम्य तिला खरे सांगत नाही म्हणून मग त्या दिवशी तो बोलत असताना  तिने सगळे ऐकले आहे आणि तिला खरं ऐकायचे असे म्हणते तेंव्हा अगम्य चिडून तिला तू पुण्याला निघून जा म्हणतो आणि अभिज्ञा दुखावली जाते आणि पुण्याला निघून जाते. ती अगम्यला  घटस्फोटाचे पेपर पाठवून अगम्यला सोडून औरंगाबादला जायला निघते. अहिल्याबाई ही या सगळ्या वरून अगम्यला दोष देतात. अगम्य अभिज्ञाला बस स्टॉपवर  थांबवायला जातो आणि तिला सगळं खरं सांगण्याचे कबुल करतो पण तिथे अभिज्ञा वर अज्ञात लोक गोळी झाडण्याचा प्रयत्न करतात आणि तिला वाचवायला जाऊन अगम्य जखमी होतो. टेन्शन, वाढलेला बी.पी. आणि दंडाला लागलेली गोळी या सगळ्यामुळे अगम्य सिरीअस होतो. तो केंव्हा शुद्धीवर येईल हे डॉक्टर ही सांगू शकत नाहीत आणि अभिज्ञाची आई तिला तिच्या आणि अगम्य मधील  भांडणाचे कारण विचारते तेंव्हा अभिज्ञा अगम्यला पडणारी स्वप्ने आणि सूर्यकांतच्या अस्तित्वाचे सत्य सगळ्यांना सांगते.

       बेशुद्ध अगम्यवर हॉस्पिटलमध्ये पुन्हा हल्ला होतो आणि सगळे घाबरतात. पोलीस तपास करत असतात पण गुन्हेगार सापडत नाही. अगम्य पाच दिवसांनी शुद्धीवर येतो आणि घरी गेल्यावर सूर्यकांतचा आत्मा अजून मुक्त झाला नसून तो पुन्हा येणार आहे तसेच त्याला सतत स्वप्नात येऊन त्याला  त्रास देतो हे सत्य सांगतो आणि तो परत येणार आहे हे देखील!  हे ऐकून अहिल्याबाई आणि अभिज्ञा तसेच तिच्या आई-बाबांना ही खूप टेन्शन येते. हे सगळं ऐकून अहिल्याबाई नाशिकला  सूर्यकांतच्या आत्म्यावर उपाय शोधायला जातात. इकडे मात्र इंस्पेक्टर अगम्यला विश्वासात घेऊन सापळा रचून हल्लेखोर शोधून काढतात. गोखले वकिलाने अगम्य आणि अभिज्ञाची प्रॉपर्टीसाठी सुपारी देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असे उघड होते आणि गोखलेला अटक होते. अहिल्याबाई नाशिक वरून येतात आणि ते तांत्रीक बाबा भेटले नाही तर दुसरे बाबा भेटले आहेत आणि त्यांनी सांगितले आहे की पेंटींग जळताना तिचा एक तुकडा उडून पडला आणि तो एका पुस्तकात जाऊन चिटकला आहे आणि तिथे सुर्यकांतने अगम्यला स्वप्न लोकांतून येऊन त्रास देऊन अगम्यची ऊर्जा शोषून स्वतः चे साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे अगम्य क्षीण झाला आहे आणि सूर्यकांत शक्तीशाली झाला आहे. या वर उपाय म्हणजे अगम्यने त्या पुस्तकरूपी लूप होल मध्ये जाऊन तो पेंटींगचा तुकडा घेऊन येणे व त्या तुकड्या सहित सुर्यकांतच्या वारसा कडून पालाश विधी करून घेतला की सूर्यकांतचा आत्मा मुक्त होईल  पण त्या आधी अगम्यची आंतरिक  शक्ती  वाढवायला हवी आणि त्यासाठी  अगम्यच्या स्वप्नात सुर्यकांतला येऊ न देणे तसेच त्याच्या धर्म पत्नीने आणि आईने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तसेच अगम्यने  सप्तचक्र साधना करावी आणि  त्याच्या पत्नी सहित लूप होलमध्ये जावे कारण तो या वेळी एकटा सूर्यकांतचा सामना करू शकणार नाही.  पण अगम्य मात्र अभिज्ञाला त्या लूप होलमध्ये न्यायला तयार नाही म्हणून मग अभिज्ञा लूप होल मध्ये जायच्या  वेळी  अगम्य त्यात गेला की ती त्याच्या मागे लूप होलमध्ये जाईल असा निर्णय घेते. पालाश विधी करण्यासाठी राहून आणि मीरा श्रीरंगपूरला आले आहेत.त्यांना अगम्य एअर पोर्ट वरून घेऊन आला आहे

आता पुढे….

    अगम्य, राहुल आणि मीरा बाळाला घेऊन वाड्यात येतात. अहिल्याबाई आणि अभिज्ञा त्यांची वाटतच पाहत असतात. त्यांना दारात पाहून अहिल्याबाई सखुला हाक मारतात आणि राहुल,मीरा आणि बाळावरून भाकर तुकडा ओवाळून टाकतात. त्यांच्या पायावर पाणी घालतात आणि त्यांना आत घेतात. अभिज्ञा बाळाला लगेच मीराकडून घेत आणि अज्ञांक ही बाळाला पाहू लागतो. सगळे हॉलमध्ये येऊन बसतात. एकमेकांची जुजबी विचारपूस होते. सगळे जेवतात  आणि अहिल्याबाई सगळ्यांनाच आराम करायला पाठवून देतात.

           संध्याकाळी अगम्य, राहुल, मीरा आणि अभिज्ञा गप्पा मारत  हॉलमध्ये बसतात.

राहुल,“ अम्या कसा आहेस रे? तुला आता बरं वाटतय ना! पुन्हा एकदा जीवघेण्या संकटातून वाचलास बाबा! माझा जीव नुसता टांगणीला लागला होता. तुमच्या मागचे हे शुक्लकाष्ट  कधी संपणार काय माहीत! माझी इच्छा असून ही नाही येऊ शकलो! माझी गरज होती तुला, अभीला आणि काकुला पण मी नव्हतो तुमच्या जवळ सॉरी!” तो भावूक होऊन बोलत होता.

अगम्य,“ सॉरी काय म्हणतो राहुल्या अरे तसच काही कारण असेल म्हणून तू आला नाहीस ना! आणि मला काही झाले आणि तू येणार नाही असं कधी होईल का?” तो त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाला.

अभिज्ञा,“ हो असच कारण होत म्हणून तर आणि सॉरी काय म्हणतोस राहुल!” ती त्याला रागवत म्हणाली.

अगम्य,“ आता सांगतो का राहुल्या अभी काय म्हणत आहे?” त्याने प्रश्नार्थक नजरेने विचारले.

राहुल,“अम्या अरे ज्या दिवशी तुझ्यावर गोळीबार झाला त्याच दिवशी मीरा आश्रमात पाय घसरून पडली. तातडीने तीच सी सेक्शन करावं लागलं. बाळ प्री मॅच्युअर होत पण ते ठीक होत. मीराच्या मात्र जीवाला धोका होता. तिला चोवीस तास icuमध्ये ठेवले गेले. तरी चोवीस तासात तिचा धोका टाळला त्यातच तुझी न्यूज पाहिली आणि काय करावं सुचेना मी अभीला फोन केला तेंव्हा कळले की तू बेशुद्ध आहेस! मी मीराला आणि बाळाला सोडून ही येऊ शकत नव्हतो आणि घेऊन ही! इकडे आड आणि तिकडे विहीर झालं मला! अम्या लेका इतकं सतावतात का रे आपल्या माणसांना नालायका! पाच दिवस नुसता जीव मेटाकुटीला आणलास!” तो डोळ्यात पाणी आणून त्याला बोलत होता.

अगम्य,“ काय? इतकं सगळं झालं आणि मला कोणीच सांगितलं नाही? अभी काय आहे हे आणि मीरा आता बरी आहेस ना तू?आणि राहुल्या मी तर मुद्दाम केलं असं बोलतो आहेस की मला! मला तर कुठे माहीत होतं की मी पाच दिवस बेशुद्ध होते ते!” त्याने अभिज्ञाकडे एक जळजळीत नेत्र कटाक्ष टाकला आणि मीराला काळजीने विचारले.

मीरा,“ हो दादा मी ठीक आहे आता अगदी ठणठणीत! तुमचीच काळजी लागली आहे. तुमची तब्बेत अजून ही ठीक नाही ताई म्हणत होती.” ती त्याला पाहून काळजीने म्हणाली.

अगम्य,“ मी ठीक आहे आता ग! पण अभी….” तो पुढे काही बोलणार तर राहुल मध्येच म्हणाला.

राहुल,“ अभी वर चिडून स्वतःच बी.पी नको वाढवून घेवूस अम्या! मीच तिला सांगितले होते तुला सांगू नको म्हणून मी आल्यावर सांगेन सगळं आणि तुला सांगायला तुझी तब्बेत होती का नीट! तुला ना पोकळ बांबूचे फटके द्यावेत बघ अम्या!पाच पाच दिवस झोपत का कोणी?” तो त्याला एक धपाटा घालत म्हणाला.

अभिज्ञा,“ राहुल या माणसाने ना खूप त्रास दिला आहे आम्हा सगळ्यांनाच!अजून ही साहेबांना मेडिसीन्स सुरू आहेत! मी भांडले त्याची चांगली शिक्षा दिली मला आणि तुला सांगितलंच की मी फोन वर त्या सूर्यकांत विषयी याने सगळं लपवून ठेवलं आपल्या सगळ्या पासून आणि आता त्याचे परिणाम आपल्या सगळ्याला भोगावे लागणार आहेत!” ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.

राहुल,“ नालायक आहे हा अभी आता याने करून ठेवले आहे ते आपल्याला निस्तरावे लागणार आहेत!” तो अगम्यकडे रागाने पाहत म्हणाला.

अगम्य,“ झालात तुम्ही दोघे एक! बास करा ना आता! किती छळणार बिचाऱ्या एकट्या माणसाला!”तो नाटकीपणे म्हणाला.

मीरा,“ दादा खरं आहे तुम्ही हे सगळं लपवून चांगले नाही केले सगळ्यांपासून!” ती काळजीने म्हणाली.

अगम्य,“ हो बाई तुझीच कमी होती ग! बोला सगळे मिळून मला मीच माती खाल्ली ना आणि अभी मला सोडून निघाली होती औरंगाबादला तिला नका कोणी काही बोलू!” तो तोंड वाकड करत म्हणाला.

राहून,“ बरं लक्षात आणून दिलस अम्या! काय ग ये अभी माझ्या अम्याला भांडूनच्या भांडून वरून त्याला सोडून निघाली होतीस होय!” तो नाटकीपणे म्हणाला.

अगम्य,“ राहू दे राहुल्या तुझी नाटक! मी मारल्या सारख करतो तू रडल्या सारख कर!”तो तोंड फुगवून म्हणाला आणि तिघे ही त्याच्या बोलण्यावर हसले.

अभिज्ञा,“ बास झालं नको फुगवू तोंड आता!” ती हसून म्हणाली.

राहुल,“ ok joke apart! त्या सूर्यकांतचे काय अजून तो आता कोणत्या तरी पुस्तकात जावून बसला आहे राक्षस! गेल्या वेळी अम्यावर किती भयंकर वार केला त्याने काकांना मारून आणि अम्याला मरणाच्या दारात पोहचवून त्याचा आत्मा अजून शांत झाला नाही का? आमच्याकडून काय मदत हवी ती सगळी करू आम्ही पण त्या सूर्यकांतचा या वेळी कायमचा बंदोबस्त करूयात!” तो गंभीर होत म्हणाला.

मीरा,“ हो दादा या वेळी असं काही करू की तो पुन्हा डोकं वर काढणार नाही!” तिने दुजोरा दिला.

अगम्य,“ हो असच होईल या वेळी!” तो म्हणाला आणि अहिल्याबाईनी सगळ्यांना चहा नाष्टा करण्यासाठी हाक मारली. 


 

         राहुल, अभिज्ञाचे बाबा आणिअगम्यचा वेळ पोरांना खेळवण्यात गेला. अभिज्ञा, मीरा आणि अहिल्याबाई, अभिज्ञाची आई यांचा वेळ गप्पा मारण्यात गेला. रात्रीची जेवणं झाली आणि सगळे झोपायला निघून गेले. 

         अभिज्ञा अज्ञांकला झोपवून रूममध्ये गेली तर अगम्य लॅपटॉपवर काम करत होता. त्याला पाहून अभिज्ञा म्हणाली.

अभिज्ञा,“ तरी बरं आज साहेब झोपले नाहीत. आज असं ही साडे अकरा वाजून गेले आहेत झोपायला म्हणलं हा झोपला की काय!” ती दार लावून बेडवर बसत म्हणाली.

अगम्य,“ कसा झोपेन तू झोपू देशील तर खरं ना!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.

अभिज्ञा,“ चांगलं आहे मग असं ही तीन वाजे पर्यंत तुला झोपू देणारच नाही मी!” ती हसून त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली.

अगम्य,“ अभी मला खरंच खूप वाईट वाटत आहे ग राहुल माझ्या प्रत्येक संकटात माझ्या बरोबर उभा होता एव्हढेच काय पण आश्रमात आणि खोलीवर देखील त्याने माझी बरीच आजारपणं काढली पण त्याला माझी गरज होती तेंव्हा मी त्याच्या बरोबर नव्हतो!” तो दुःखी होत म्हणाला.

अभिज्ञा,“ अमू तू नकोस इतकं मनाला लावून घेऊ तू हे मुद्दाम नाही केलंस ना अरे तूच हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजत होतास आणि राहुलला माहीत आहे सगळं!” ती त्याची समजूत काढत म्हणाली.

अगम्य,“ हुंम! पण नंतर घरी आल्यावर ही तू हे मला सांगितले नाहीस अभी!” तो तक्रारीच्या सुरात म्हणाला.

अभिज्ञा,“ तू टेन्शन घेतले असतेस म्हणून राहुलच म्हणाला की तुला तो आल्यावरच सांगेल! सॉरी मी तुझ्या पासून ही गोष्ट लपवली!” ती तोंड पाडून म्हणाली. 

अगम्य,“  बरं जाऊदे आता! मग आज तीन वाजे पर्यंत काय करायचे?” त्याने निरागसपणे विचारले.

अभिज्ञा,“ बाप रे किती गहन प्रश्न आहे ना! तुला खरंच माहीत नाही का काय करायचे ते!” तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत त्याच्या डोळ्यात खट्याळपणे पाहत विचारले.

अगम्य,“ अच्छा म्हणजे मॅडम आज मूडमध्ये आहेत तर मग चान्स मारून घ्यायला हवा!”असं म्हणून त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. दोघांना ही तीन कधी वाजून गेले त्याचे भान राहिले नाही.

★★★★

        अभिज्ञा आणि अगम्य सकाळी लवकरच खाली आले होते. अभिज्ञाने अज्ञांकचे आवरले पण तो आज शाळेत जायला कानकुन करत होता कारण त्याला आज बाळा बरोबर खेळायचे होते. पण अभिज्ञाने त्याला जबरदस्तीने शाळेत पाठवले. तो पर्यंत राहुल आणि मीरा बाळाला घेऊन आवरून आले. अगम्यला फॉर्मल कपडे घातलेले पाहून राहुल त्याला म्हणाला.

राहुल,“ काय रे अम्या मी आलो आहे आणि तू ऑफिसला निघालास का?”

अगम्य,“ हो पहिल्यांदा कारखान्यात जायचे आहे आणि मग ऑफिसमध्ये अरे या काही दिवसात बरीच कामे पेंडिंग आहेत ती मार्गी लावायला हवीत आणि पुन्हा आठ दिवस तिकडे दुर्लक्ष होणारच आहे अभी आहे घरात तू येतोस का माझ्या बरोबर म्हणजे कामं ही होतील आणि आपल्या गप्पा ही!” त्याने विचारले.

राहुल,“ नेकी और पुछ बूझ! चल  येतो की!” तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ बरं जा दोघे पण आधी नाष्टा तर करून घ्या!” ती डायनींग टेबलावर  नाष्टा लावत म्हणाली.

              सगळे नाष्टा करत होते आणि अभिज्ञाचा मोबाईल वाजला. तिने फोन रिसिव्ह केला. ती बोलत होती.

अभिज्ञा,“ काय ग? कधी? कसे अग  पण... बरं ठीक आहे तू रडायचे थांबव आधी! ठीक आहे मी पाहते आणि तुला कळवते! काळजी घे आणि काळजी करू नकोस होईल सगळं ठीक!” ती कोणाला तरी समजावत बोलत होती.

     अगम्य पुन्हा सूर्यकांतच्या कचाट्यातून सुटू शकेल का? तो कसल्या आणि कोणत्या पुस्तकात असेल? अभिज्ञाला कोणाचा फोन आला असेल?

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule


 

   स्पर्धेत भाग घेतल्यामुळे लूप होल सीझन दोनचा हा भाग पोस्ट करायला बराच वेळ झाला.त्यासाठी क्षमस्व!तरी तुम्ही समजून घ्यायचा ही आशा आहे! आता पर्यंत कथेत काय-काय घडले ते सारांश रूपाने त थोडक्यात मांडले आहे त्यामुळे कथा पुढे वाचायला कोणतीच अडचण येणार नाही.

   

लोभ असावा!

तुमची,

स्वामिनी चौगुले.










 

🎭 Series Post

View all