अभिज्ञा,“ अगम्य मी सोनियाच्या मुलीला सोडवायला गेले होते ना मी; ती हीच हवेली आहे आणि केदारच्या म्हणण्या प्रमाणे त्याची पूर्वज कुसुमरंगिनी देवी आहेत ना त्यांच्या आत्म्याला सुर्यकांतने इथेच कैद करून ठेवले असणार आपल्याला इथे केदार भेटणार कारण तोच त्यांना इथून मुक्त करू शकतो!”
अगम्य,“ हो बरोबर आहे तुझे चल आपण पुढे जाऊ आणि केदारला शोधू!”
असं म्हणून दोघांनी ही हळूच दार उघडले आणि ते आत गेले
★★★★
इकडे केदार त्या तडा गेलेल्या काचेतून आत गेला. तर तिथे एक व्यक्ती त्याला पाहून म्हणाला की तुम्ही नवीन दिसत आहात इथे. त्या व्यक्तीच्या असे बोलण्याने केदार थोडा दचकला!कारण हे विश्व सुर्यकांतचे होते आणि ती व्यक्ती सुर्यकांतचा माणूस असण्याची दाट शक्यता होती. पण सुदैवाने ती व्यक्ती त्याच्या घराण्याचे राजगुरू होते. राजगुरू केदारला त्यांच्या बरोबर घेऊन गेला.
राजगुरू,“मी या राज्याचा राजगुरू आणि त्या नात्याने पिढ्यानपिढ्या आम्ही नक्षत्रावरून भविष्यावाणी करत होतो. त्यातूनच मला राज्यावर संकट येणार आहे याची कल्पना आली होती. पण ते संकट टाळता येण्यासारखे नव्हते. माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले पण भरीसभर म्हणून महाराणीनी शस्त्रखेड राज्यावर विश्वास ठेवला आणि राज्याची अधोगती सुरू झाली त्यातून सूर्यकांत इथे आला आणि वाईटाचे साम्राज्य सगळीकडे पसरले.” ते सांगत होते.
केदार,“ गुरुवर्य तुम्हाला तर सगळं ज्ञात आहे तुम्हीच मार्ग दाखवा यातून!” तो हात जोडून म्हणाला.
राजगुरू,“ तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे सूर्यकांत आता दुसऱ्या ठिकाणी आहे तो पर्यंत तुम्हाला हवेलीत जाऊन लवकरात लवकर महाराणीच्या आत्म्याला मुक्त करावे लागेल!” ते म्हणाले.
केदार,“ पण महाराणीचा आत्मा नेमका आहे कशात?सुर्यकांतच्या आत्म्याने त्यांचा आत्मा नेमका कशात कैद केला आहे?” त्याने विचारले.
राजगुरू,“सांगतो….. हवेलीमध्ये एक सिंहासन आहे! त्या सिंहासनामध्ये महाराणी कुसुमारंगिनी यांचा आत्मा कैद आहे.सुर्यकांतचा आत्मा सतत सिंहासनावर आरूढ असतो. तो तिथे असताना तुम्हाला काहीही करता येणार नाही. तुम्ही खंजीर सिद्ध करून आणला असेलच! त्या खंजीराने जेव्हा तू ते सिंहासन फाडशील तेव्हा महाराणी मुक्त होतील आणि त्यांची शक्ती सुर्यकांतला कमकुवत करायला मदत करेल!” ते म्हणाले.
केदार,“ बरं पण महाराणी सुर्यकांतच्या जाळ्यात कशा अडकल्या? आणि शस्त्र खेड राज्याशी त्याचा संबंध काय?” त्यांनी विचारले.
राजगुरू,“ योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल तूर्त तुम्ही; तिथे सूर्यकांत नाही तो पर्यंत त्या सिंहसना जवळ पोहोचून त्याला नष्ट करा!” त्यांनी सांगितले.
केदार,“ तुमचा आशीर्वाद असुद्या गुरुजी!” अस म्हणून त्याने त्यांना वाकून नमस्कार केला आणि राजगुरुनी त्याला आशीर्वाद दिला.
केदार हवेलीच्या दिशेने निघाला. तो हवेलीच्या दारा जवळ पोहोचला. तिथे पहारेकरी पाहून त्याने स्वतःचा अवतार ही क्रूर करण्यासाठी स्वतःचे डोळे बोटे घालून लाल केले आणि अंगाला तिथेच असलेली माती माखली.तो हवेलीच्या दारात गेला तर त्याला पहारेकाऱ्याने अडवले.
पहारेकरी,“ आपण कोण?”
केदार,“ मूर्ख मला ओळखलं नाहीस? मला काळीविद्या अवगत आहेत.अघोरी विद्या माझ्या पायाशी लोळण घेतात असा निर्जन बाबा मी!” तो कठोर आवाजात म्हणाला.
त्याचा एकंदरीत अवतार पाहून आणि आवाजातली जरब बघून त्याला पहारेकऱ्याने हवेलीत सोडले. केदार हवेली पाहत जात होता. आत्ताच्या हवेलीमध्ये आणि या हवेलीमध्ये जास्त काही फरक नव्हता.पण पाहरेकऱ्यांनी त्याला आत सोडले तरी तो कोणाच्या दृष्टीस पडणार नाही याची खबरदारी घेत होता.लपून लपून सगळं बघता बघता तो एका खोली जवळ आला. आत्ताच्या हवेलीमध्ये जिथे ती आरशाची गुप्त खोली होती तीच ही खोली! त्याने आजूबाजूला पाहिलं... खोलीच्या मध्यभागी एक लाल रंगाचं मऊ मऊ रेशमी गादीचं सिंहासन होतं! ते एवढं आकर्षक होतं की कोणीही ते बघून लगेच त्या सिंहासनाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला थांबवू शकणार नाही. एक प्रकारे संमोहन केल्यासारखे वातावरण त्या खोलीत तयार झाले होते. पण केदारला राजगुरू जे काही म्हणाले होते ते आठवलं आणि त्याच्या विद्यांमुळे त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. केदार तिथेच आड बाजूला लपून संपूर्ण खोली बघत होता. पूर्ण खोली बघून झाली तरी त्याला सूर्यकांत कुठेही दिसला नाही.
"बहुदा तो अजून दुसऱ्या कथेत अडकला असेल.. हीच वेळ आहे सिंहासन फाडायची!" तो मनात म्हणाला.
एक दीर्घ श्वास घेऊन आणि देवाचं नाव घेऊन तो त्या सिंहासनाच्या जवळ जाणार एवढ्यात त्याला तिथे सूर्यकांत दिसू लागला. तो पुन्हा लपून बसला.
सुर्यकांत,"लपू नकोस... ये... ये... समोर ये... मी तू हवेलीत आला तेव्हाच पाहिलं होतं... त्या अगम्य आणि त्याच्या बायकोची मदत करायला आलास खरा पण आता इथून तुम्ही तिघे सुद्धा जाऊ शकणार नाही... हा.. हा.. हा..." सूर्यकांतचा आत्मा जोर जोरात हसत बोलत होता.
त्याचा आवाज ऐकुन केदार समोर गेला. त्याच्या हातात त्याने खंजीर घट्ट धरून ठेवला होता.
केदार,"ए सूर्यकांत! गप... आजवर कधीही वाईट शक्ती जिंकल्या नाहीत आणि आत्ता सुद्धा जिंकणार नाहीत.... हिम्मत असेल तर सिंहासन सोड आणि लढ माझ्याशी..." त्याला खिजवत म्हणाला.
सुर्यकांत,"कळेलच तुला कोणती शक्ती जिंकते ते..." सिंहासन सोडून तो केदार जवळ येऊ लागला.
केदारच्या शक्तीमुळे त्याच्या भोवती एक वलय तयार झालं होतं जे सूर्यकांतला कधीही भेदता येणार नव्हतं. सूर्यकांतने त्याच्यावर खूप वार केले पण सगळे फोल ठरत होते. केदार फक्त डोळे मिटून तिथे उभा होता. सूर्यकांत एकावेळी दोन ठिकाणी राहू शकतो याचा त्याने फायदा उचलला होता. त्यामुळे एक सूर्यकांत सिंहासनावर तर एक केदार सोबत झटापट करत होता. पण केदारने टेलेपथी वापरून अगम्य सोबत संवाद साधला.
तो पर्यंत अगम्य आणि अभिज्ञा हवेलीत खोल्यामध्ये केदारच्या शोधत होते.अगम्यने केदारशी टेलिपॅथी व्दारे संपर्क साधला आणि केदारने तो कुठे आहे आणि त्याचा प्लॅन काय आहे हे सांगितले. त्यामुळे अगम्य आणि अभिज्ञा त्या सिंहासन असलेल्या खोलीत पोहोचले. केदारच्या अगम्य पाहिले आणि तो मुद्दाम ओरडला
केदार,"अगम्य! ते बघ ते दार आहे पुढच्या कथेत जाण्याचं... तू जा तिकडे...." केदार मुद्दाम ओरडून बोलला.
त्याच्या आवाजाने सिंहासनावर बसलेला सूर्यकांत भानावर आला आणि अगम्यच्या मागे लागला. दुसऱ्या सूर्यकांतच केदारवरून लक्ष उडण्यासाठी अभिज्ञा सिंहासनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. सूर्यकांतच लक्ष नाही हे पाहून केदारने लगेच तो सिद्ध केलेला खंजीर डोक्याला लावला आणि नमस्कार केला! तसा तो खंजीर हवेत उडू लागला आणि प्रकाशाच्या वेगाने जाऊन सिंहासनावर छेद दिला. खंजिरचा छेद लागताच एक तीव्र प्रकाश त्यातून बाहेर आला आणि महाराणी कुसुमरंगिनि मुक्त झाल्या. हे पाहून आता सूर्यकांतचा पारा आणखीन चढला. त्याला काही कळायच्या आत महाराणी कुसूमारंगिनींनी त्याच्यावर हल्ला केला... त्यामुळे एका वेळी दोन ठिकाणी असण्याची क्षमता तो गमावून बसला.
सूर्यकांत,"अजूनही तुम्ही सगळे माझ्या विश्वात आहात लक्षात ठेवा! तुम्हाला कोणालाच मी इथून बाहेर पडू देणार नाही... हा.. हा.. हा..." तो मोठ मोठ्याने हसत म्हणाला आणि एका दाराजवळ पळू लागला.
महाराणी,"लवकर जा... नाहीतर तो पुढच्या कथेत जाण्याचं दार बंद करून टाकेल..." महाराणी पटकन बोलल्या.
त्यांचं ऐकुन अगम्य आणि अभिज्ञा पटापट पुढे जाऊ लागले. महाराणी कुसुमारंगीनींनी केलेल्या वारामुळे तो थोडा कमजोर पडला होता... त्यामुळे त्याच्या आधीच अगम्य आणि अभिज्ञा पुढच्या कथेत गेले.
"महाराणी! त्या दोघांना काही होणार नाही ना?" केदार ने हात जोडून विचारलं.
"नाही.... त्या दोघांना काहीही होणार नाही. त्या सूर्यकांतची शक्ती आता जवळ जवळ निम्मी झाली आहे. नको काळजी करुस...." त्या म्हणाल्या.
हवेलीतुन अगम्य आणि अभिज्ञा त्या दारातून पुढच्या कथेत गेले.आता महाराणी आणि केदार यांच्यात काय संभाषण झाले त्या सुर्यकांतच्या जाळ्यात कशा अडकल्या हे सगळं वाचा रहस्यमय हवेली या कथेत!
©स्वामिनी चौगुले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा