अगम्य,“ अचानक तुम्ही लोक असे धावाधाव का करत आहात?”
माणूस,“ त्या राणीचे सैनिक आले आहेत ते आता लोकांना पकडणार आणि राजवाड्यात घेऊन जाणार तुम्ही जा लपा कुठे तरी!” तो घाबरून बोलत होता.
अगम्य,“ पण ते लोकांना पकडून नेऊन काय करतात?”त्याने आश्चर्याने विचारले.
माणूस,“ महामहिम सूर्यकांत महाराजांसाठी एक मोठा महाल बांधणे सुरू आहे इथे!त्यासाठी खूप सारे लोक लागतात पण तो महाल लवकर पूर्ण होण्यासाठी लोकांना धरून नेऊन अन्नपाणी नीट न देता रात्रंदिवस राबवले जाते.त्यामुळे चार-पाच महिन्यात तिथले लोक मरतात मग ते असं नवीन लोकांना धरून घेऊन जातात.तो महाल पूर्ण होई पर्यंत हे दुष्ट चक्र असेच सुरू राहणार!” तो असं म्हणाला आणि पळून गेला.
पण आज त्या सैनिकांनी कोणालाच पकडले नाही तर ते कोणाला तरी शोधत होते.त्यांना अगम्य आणि अभिज्ञा दिसले आणि त्यांनी दोघांना बंदी बनवले व राजवाड्यात घेऊन गेले.अगम्य आणि अभिज्ञानी देखील फारसा विरोध केला नाही कारण त्यांना देखील राजवड्यातच जायचे होते.पुढच्या कथेत जाण्याचा मार्ग आणि या कथेत सूर्यकांतने काय उच्छाद मांडला आहे ते त्यांना राजवाड्यात गेल्या शिवाय कळणार नव्हते. सैनिकांनी दोघांना नेले आणि राणी समोर उभे केले.तर दोघांना ही आश्चर्य वाटले कारण कथेतील अंजलीची काकू राणी म्हणून सिंहासनावर विराजमान होती.
राणी,“ महामहिम महाराज सूर्यकांत यांनी धरायचा आदेश दिला होता ते दोघे तुम्हीच! खूप सहज आलात की आमच्या तावडीत!यांना घेऊन जा आणि अंजलीच्या कारावासात बंदी बनवून ठेवा.याद राखा हे दोघे महाराज सूर्यकांत आदेश देत नाहीत तो पर्यंत तिथेच राहिले पाहिजेत त्यांचा आदेश आल्यावर यांना मृत्यूदंड द्यायचा आहे!” ती म्हणाली आणि सैनिक दोघांना कारागृहाकडे घेऊन गेले.
अभिज्ञा आणि अगम्य चूपचाप त्यांच्या मागे गेले.अंजलीला जिथे ठेवले होते त्या कारागृहाचे दार उघडून त्यांनी दोघांना त्यात ढकलून दिले आणि कुलूप लावून घेतले.एका कोपऱ्यात गुडघ्यात डोके घालून बसलेली अंजली त्यांना दिसली.अगम्यने अभिज्ञाला इशारा केला आणि अभिज्ञा तिच्या जवळ गेली तिने तिच्या केसांवरून मायेने हात फिरवला आणि अजंलीने चेहरावर करून तिच्याकडे पाहिले.जिथे तिथे फाटलेली आणि मळलेली साडी,धूळ आणि मातीने मळलेला चेहरा पाहून अभिज्ञाला गलबलून आले.
अभिज्ञा,“ अंजली अग तू या अवतारात?इथे कशी अग तुझं तर लग्न राजकुमार अव्दैकशी झाले होते ना? ते कुठे आहेत?”ती आश्चर्याने विचारत होती.अभिज्ञाचे प्रश्न ऐकून अंजली रडायला लागली. अभिज्ञाने तिला थोड्या वेळाने शांत केले आणि ती बोलू लागली.
अंजली,“ माझं तर नशीबच फुटकं आहे! मी राजकुमार अव्दैकच्या आयुष्य आले आणि त्यांचे ही वाईट दिवस सुरू झाले. माझं लग्न त्यांच्याशी झाले. आम्ही सुखाने संसार करत होतो. थोड्याच दिवसात राजकुमार अव्दैक यांचा राज्याभिषेक होणार होता पण पण तो राक्षस सूर्यकांत आला आणि सगळंच बदलून गेले. त्याने त्याच्या वाईट शक्तीने सगळं वश केलं आणि राज्यावर माझ्या काकुला बसवले. तिने मला माझ्या सासू-सासऱ्यांना आणि राजकुमार अव्दैकना कारागृहात डांबले.” ती रडत सांगत होती.
अभिज्ञा,“ पण अंजली तुझ्या बरोबर असणारी ती परी जी तुझी मदत करायची ती कुठे आहे?ती तुझ्या मदतीला धावून नाही आली का?” तिने विचारले.
अंजली,“ माझं लग्न झाल्यावर ती निघून गेली पण तिने मला एक रत्न दिले होते ज्याला घासले की ती माझ्या मदतीला येईल हे नेमके त्या राक्षसाला माहीत होते म्हणून त्याने माझ्या कडून ते रत्न काढून घेतले आहे!त्यामुळे मी काहीच करू शकत नाही!” तिने सांगितले.
अगम्य,“ बाप रे या सूर्यकांतनी या पुस्तकात किती उच्छाद मांडला आहे. सगळ्या सकारात्मक पात्रांना त्रास देऊन सगळीकडे नकारात्मकतेचे राज्य पसरवले आहे. इथे सगळ्या वाईट शक्ती शक्तिशाली झाल्या आहेत. असो अंजली तू काळजी नको करून आम्ही सुर्यकांतचा नायनाट करायला आलो आहोत. तो संपला की सगळं सुरळीत होईल.” तो म्हणाला.
अभिज्ञा,“ अगम्य पण आपण आता इथून बाहेर कसे पडणार आहोत! आपल्याला लवकरात लवकर तिसऱ्या कथेत पोहोचले पाहिजे.
अंजली,“मला एकदा राजकुमार अव्दैकने सांगितले होते की त्यांच्या पूर्वजांनी जर परकीय आक्रमण झाले आणि जर राजघराण्यातील लोकांना त्यांनी कारागृहात ठेवले तर या कारागृहात एक गुप्त रस्ता आहे जो कारागृहातून बाहेर निघतो. तो रस्ता या कारागृच्या प्रत्येक तुरुंगातून जातो पण त्यासाठी तुरुंगात असलेली कोणती तरी कळ दाबावी लागते.मी खूप प्रयत्न केले आहेत पण या तुरुंगातील ती कळ मला अजून पर्यंत सापडली नाही!” ती निराश होत म्हणाली.
अभिज्ञा,“ म्हणजे ती कळ या तुरुंगात देखील असणार आणि ती सहजा सहजी लक्षात येणार नाही अशा स्थितीत असेल;अगम्य आपण जर ती कळ शोधू शकलो तर आपण या तुरुंगातून बाहेर पडू आणि पुढच्या कथेत प्रवेश करू!”
अगम्य,“ हो ती कळ शोध अभिज्ञा मी देखील ती शोधण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे!” तो म्हणाला आणि तुरुंगाच्या भिंत्ती हाताने चाचपडू लागला.
त्याच्या बरोबर अभिज्ञा आणि अंजली ही कुठे भिंतीवर एखादी कळ हाताला लागते का पाहत होत्या.एव्हढ्यात अभिज्ञाच्या हाताने एका भिंतीवरचे कळ दाबली गेली आणि अचानक तुरुंगातील एक फरशी बाजूला झाली.अगम्यने अभिज्ञाने हात कुठे ठेवला ते पाहिले तर त्या भिंत्तीवर एक उंचवटा होता आणि त्याच्यावर दाब पडला की तो गुप्त रस्ता उघडला गेला होता.तिथे ही फरशी उघडली होती तिथून दिसणाऱ्या पायऱ्या वरून आत उतरले आणि एका बोगद्यातून जंगलात पोहोचले.
अभिज्ञा,“ अंजली तू काही वेळ याच जंगलात लपून बस आम्ही पुढच्या कथेत जातो.आम्ही त्या सुर्यकांतचा जीव ज्या चित्राच्या तुकड्यात आहे ना तो तुकडा घेऊन नष्ट करणार आहोत त्यामुळे पुन्हा तुझे राज्य आणि सगळं तुला आपसूकच परत मिळेल तू फक्त आम्हाला पुढच्या कथेत जाण्याचा मार्ग दाखव!”
अंजली,“ इथून तुम्ही जंगलाच्या दुसऱ्या टोकाला गेलात की तुम्ही तिसऱ्या कथेत पोचणार आणि मी लपून राहीन जंगलात तुम्ही दोघे काळजी घ्या आणि त्या राक्षस सुर्यकांतचे आमच्या वरील राज्य लवकर संपुष्टात आणा!” ती म्हणाली.
अगम्य,“ काळजी घे!”
असं म्हणून दोघे ही जंगलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले आणि इथून एका चिंचोळ्या रस्त्याने तिसऱ्या कथेत पोहोचले.
©Swamini chougule
©Swamini chougule